ऑपरेशन ब्लू स्टार : भिंद्रनवाले कोण होते? त्यांनी सुवर्णमंदिराचा ताबा कसा घेतला?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, नीलेश धोत्रे
- Role, बीबीसी मराठी
एक अशी घटना ज्याने देशाच्या एका पंतप्रधानाचा आणि एका माजी लष्कर प्रमुखाचा जीव घेतला. एक राज्य अस्थिर केलं. हजारो लोकांच्या मनावर या घटनेचे ओरखडे उमटले.
39 वर्षांच्या कालखंडानंतरही या घटनेच्या ठिणग्या कधी युकेत कधी कॅनडात तर कधी पंजाबात पडताना दिसतात.
पंजाबमध्ये सध्या उद्भवलेली स्थिती, अमृतपाल सिंग यांना झालेली अटक, गेल्या वर्षी पंजाब पोलिसांच्या मुख्यालयावर झालेला हल्ला ग्रेनेड हल्ला, पंजाबात काही ठिकाणी सापडलेले बॉम्ब असोत किंवा मग हरियाणी पोलिसांनी केलेल्या अटकेच्या कारवाया असोत. त्याच्या मुळाशी आहे ती खलिस्तानची मागणी आणि 1984 मध्ये राबवलं गेलेलं ऑपरेशन ब्लू स्टार...
1. ऑपरेशन ब्लू स्टार कोणत्या प्रांतात राबवलं गेलं?
ऑपरेशन ब्लू स्टार पंजाबमध्ये 1984 मध्ये राबवलं गेलं होतं.
2. ऑपरेशन ब्लू स्टार का करावे लागलं?
शिखांसाठी सर्वांत पवित्र असलेल्या धर्मस्थळांपैकी एक आहे आनंदपूर साहिब. इथंच 1973मध्ये शीख समुदायाकडून एक प्रस्ताव पारित करण्यात आला. ज्यात पंजाबला स्वायत्ता देण्याची मागणी करण्यात आली.
संरक्षण, परराष्ट्र, दूरसंचार आणि अर्थ सोडून इतर सर्व खात्यांचा कारभार थेट राज्याकडे सोपवण्याची एक प्रमुख मागणी त्यात होती.
तसंच चंदीगढ पंजाबला मिळावं,नद्यांच्या पाण्याच्या वाटपावर सर्वोच्च न्यायलायचं मत घ्यावं, लष्करात शिखांच्या भरतीवर लावण्यात आलेली मर्यादा उठवण्यात यावी आणि अखिल भारतीय गुरुद्वारा कायदा बनवला जावा अशासुद्धा मागण्या त्यावेळी ठेवण्यात आल्या होत्या.
शीख समुदाच्या मागण्यांचा जोर वाढत होता. त्याचवेळी त्याच्यातला अंतर्गत संघर्ष सुद्धा वाढत होता. वातावरण स्फोटक होण्यासाठीचा पाया रचला जात होता.
पण त्याला फार मोठा इतिहाससुद्धा आहे - जो तुम्ही इथं वाचू शकता.
त्यानंतर 1980च्या दशकात पंजाबमध्ये फुटिरतावादी चळवळीनं वेग घेतला. खलिस्तान म्हणजेच वेगळ्या पंजाबच्या मागणीसाठी जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांच्या नेतृत्वात आंदोलन पुकारण्यात आलं.
त्याकाळात पंजाबला भारतापासून वेगळं करून एक वेगळा प्रदेश करण्यासाठी भाषणं दिली जाऊ लागली. भारताबरोबर सशस्त्र संघर्ष करायला तयार रहा, असंसुद्धा सांगितलं जाऊ लागलं.

फोटो स्रोत, Getty Images
अशा सगळ्या स्थितीत 31 मे 1984ला अमृतसरच्या प्रसिद्ध सुवर्णमंदिरात भिंद्रनवालेने यांनी संपूर्णपणे कब्जा केला आहे आणि पंजाबमध्ये कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले. पंजाब हातातून निघून जाण्याची स्थिती निर्माण झाली होती.
3. भिंद्रनवाले कोण होते? त्यांनी सुवर्णमंदिराचा ताबा कसा घेतला?
अकाली दल आणि काँग्रेसमध्ये एकमेकांना राजकारणात काटशह देण्याची स्पर्धा सुरू होती. अशातच 1977 मध्ये एक महत्त्वाची घटना घडली. जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांची अकालींच्या राजकारणात एन्ट्री झाली.
भिंद्रनवाले यांची शीख धर्माच्या प्रचाराची जबाबदारी असलेल्या दमदमी टकसालच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आणि इथूनच सुरू झाली खरी कहाणी.
त्यानंतर निरंकारी आणि अकाली अशा शिखांच्या दोन पंथांमधला संघर्ष रस्त्यावर आला. 1977च्या एप्रिल महिन्यात अखंड किर्तनी जत्थ, दमदमी टकसाल आणि निरंकारी शिखांदरम्यान अमृतसरमध्ये दंगल भडकली. त्यात 13 शिखांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर अकाल तख्ताकडून संत निरंकारी पंथाच्या विरोधात फतवा जारी करण्यात आला.
याच काळात पंजाबला स्वायत्ता देण्याच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापत होतं. त्याला हिंसक वळण लागत होतं. अशातच 1979 मध्ये अकाली दलात फूट पडली.
निरंकारी आणि अकालींच्या वादाचं पर्यावसन निरंकारी पंथाचे प्रमुख गुरबचन सिंह यांच्या हत्येत झालं. 1980 च्या एप्रिलमध्ये दिल्लीत त्यांची हत्या करण्यात आली. त्यावेळी ते त्यांच्या दिल्लीतल्या मुख्यालयात जात होते.
त्यानंतर 9 सप्टेंबर 1981 ला पंजाब केसरीचे संपादक लालाजगत नारायण यांचीसुद्धा हत्या झाली.
याबाबत तत्कलिन बीबीसी प्रतिनिधी सतिश जेकब सांगतात, "या प्रकरणी भिंद्रनवाले यांच्यावर आरोप ठेवण्यात आले. त्यांच्याविरोधात वॉरंट जारी करण्यात आलं. त्यांना अटक करण्यासाठी पंजाब पोलीस हरियाणात पोहोचले पण त्यांना अटक न करता एका सरकारी गाडीतून जाऊ देण्यात आलं. भिंद्रानवाले यांना जाणूनबुजून पंजाब सरकारकडून शक्ती प्रदान केली जात होती. त्यांची प्रतिमा बहुबलीची व्हावी असा प्रयत्न सरकारकडून केला जात होता."
पुढे अमृतसरमधून भिंद्रनवालेंना अटक करण्यात आली. पण लगेचच त्यांना जमीन देण्यात आला आणि गृहमंत्री ग्यानी झैलसिंग यांनी त्यांच्याविरोधात कुठलेही पुरावे नसल्याचं जाहीर करून टाकलं.
दुसरीकडे पंजाबमध्ये हिंसक घटना थांबण्याच नाव घेत नव्हत्या. पंजाबला वेगळा देश म्हणजेच खालिस्तान म्हणून मान्याता देण्याची मागणी जोर धरत होती.

फोटो स्रोत, PIB
त्यावेळी पटियाळाच्या पोलीस उपमहानिरीक्षकांच्या कार्यालयात बाँबस्फोट घडवण्यात आला. तत्कालिन मुख्यमंत्री दरबारा सिंग यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला.
त्याचदरम्यान सुटका झालेल भिंद्रनवालेंनी त्यांच्या सशस्त्र अंगरक्षकांसह देशभरात दौरे केले. मुंबई-दिल्ली दौरासुद्धा केला.
एप्रिल 1983 मध्ये तर या सर्व हिंसक कारवायांचा कहर झाला. पंजाब पोलिसांचे उपमहानिरिक्षक अवतार सिंग अटवाल यांची सुवर्णमंदिराच्या पायऱ्यांवर दिवसा ढवळ्या गोळी घालून हत्या करण्यात आली. महत्त्वाचं म्हणजे ते तिथं माथा टेकण्यासाठी (दर्शनासाठी) गेले होते.
मारेकरी मंदिराच्या आतून आले आणि त्यांनी अवतार सिंग अटवाल यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि ते परत मंदिराच्या आत गेले.
या घटनेनंतर सतिश जेकब पंजाबच्या तत्कालिन मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले होते. जेकब सांगतात, "हत्येनंतर अवतार सिंग अटवाल यांचा मृतदेह कितीतरी तास तिथंच पडून होता. एकाही पोलिसाची तो उचलण्याची हिंमत झाली नाही. शेवटी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून भिंद्रनवाले यांना फोन गेला. अटवाल यांचा मृतदेह ताब्यात घेऊ देण्याची विनंती करण्यात आली."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
यावरून तत्कालिन पोलिसांच्या मनोबलाची स्थिती लक्षात येते. आनंदपूर साहिबमध्ये पारित झालेल्या प्रस्तावाच्या म्हणजेच पंजाबला स्वायतत्ता देण्याच्या मागणीसाठी अकालींनी रस्त्यावर उतरायला सुरुवात केली होती.
स्वतः अटक करून घेण्याचं अभियान छेडण्यात आलं. तब्बल 30 हजार पेक्षा जास्त लोकांना यावेळी अटक करण्यात आली.
त्याच दरम्यान 5 ऑक्टोबर 1983 ची घटना परिस्थिती आणखी चघळवणारी ठरली. पंजाबमधल्या कपूरथलावरून जलंधरला जाणाऱ्या पंजाब रोड वेजच्या बसवर बंदुकधारी शिखांनी हल्ला केला. त्यातून हिंदू प्रवाशांना वेचूनवेचून खाली उतरवण्यात आलं. त्यांना एका ओळीत उभं करून गोळ्या झाडण्यात आल्या.
या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी इंदिरा गांधींनी पंजाबमधलं काँग्रेस सरकार बरखास्त केलं आणि राष्ट्रपती शासन लागू केलं.
आतापर्यंत पंजाबमध्ये परिस्थिती एवढी हाताबाहेर गेली होती की वेगवेगळ्या हिंसक घटनांमध्ये मरणाऱ्यांची संख्या 298 वर पोहोचली होती.
अकालींच्या राजकारणाचा अभ्यास करणाऱ्यांनुसार ऑपरेशन ब्लुस्टार सुरू करण्याच्या आधी इंदिरा गांधींनी तीन वेळा अकाली नेत्यांशी चर्चा केली होती. शेवटच्या टप्प्यातली चर्चा फेब्रुवारी 1984मध्ये झाली होती. पण, हरियाणात शिखांविरोधात झालेल्या हिंसेमुळे चर्चा फिस्कटली होती.
दरम्यानच्या काळात भिंद्रनवाले आणि त्यांच्या लोकांनी सुवर्ण मंदिरावर कब्जा केला. याबाबत तुम्ही इथं अधिक वाचू शकता.
1 जूनला सुवर्ण मंदिरावर कब्जा केलेले भिंद्रनवालेंचे लोक आणि आणि बाहेर तैनात असलेल्या पोलिसांमध्ये गोळाबार झाला होता. पण तोपर्यंत ही गोष्ट त्यांच्यासाठी नेहमीची झाली होती.
4. माजी लष्करी अधिकाऱ्याची भिंद्रनवालेंना साथ
अमृतसरचं सुवर्णमंदिर आणि अकालतख्त भिंद्रावालेंना सहज ताब्यात घेता आलं त्याला कारण ठरलं ते म्हणजे त्यांना आणि त्यांच्या लोकांना मिळालेलं लष्करी ट्रेनिंग. तेही एका पदच्युत भारतीय लष्करी अधिकाऱ्याकडून. ज्याचं नाव आहे मेजर जनरल शाबेग सिंग.

फोटो स्रोत, SATPAL DANISH
याच शाबेग सिंग यांनी भारताच्या बांगलादेश मुक्ती संग्रामात महत्त्वाची भूमिका बजावली होती. सॅम माणेक शॉ यांच्या नेतृत्वात राबवण्यात आलेल्या या ऑपरेशनमध्ये शाबेग सिंग यांच्यावर बांगलादेशी तरुणांना लष्करी ट्रेनिंग देण्याचं काम देण्यात आलं होतं. सॅम माणेक शॉ यांनी स्वतः शागेब सिंग यांची यासाठी निवड केली होती.
पण पुढे निवृत्तीच्या एक दिवसआधी शाबेग सिंग यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पदावरून बडतर्फ करण्यात आलं. त्यांना निवृत्तीनंतरच्या सुविधासुद्धा नाकारण्यात आल्या.
हेच शाबेग सिंग नंतरच्या काळात जर्नल भिंद्रनवालेंना जाऊन भेटले आणि भारताविरोधा त्यांनी भिंद्रनवालेंच्या लोकांना लष्करी ट्रेनिंग देण्यास सुरूवात केली.
याच लष्करी ट्रेनिंगच्या जोरावर भिंद्रनवाले आणि त्यांच्या लोकांनी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर कब्जा मिळवला.
5. ऑपरेशन ब्लू स्टारदरम्यान काय घडलं?
पंजाबमधली परिस्थिती संपूर्णपणे हाताच्या बाहेर जात असल्याचं लक्षात आल्यानंतर इंदिरा गांधी सरकारनं 1 जून 1984 रोजी पंजाबचं संपूर्ण प्रशासन लष्कराच्या ताब्यात दिलं.
2 जूनच्या संध्याकाळी पंतप्रधान इंदिरा गांधी अचानक दूरदर्शनवर आल्या. देशाला उद्देशून त्यांनी भाषण सुरू केलं. त्यात त्यांनी जर्नलसिंग भिंद्रनवाले यांना चर्चेचं आमंत्रण दिलं. पण त्याचवेळी संपूर्ण अमृतसरच्या फोन लाईन्स कापण्यात आल्या होत्या.
एकिकडे इंदिरा गांधी दूरदर्शनवर देशाला संबोधित करत होत्या तर दुसरीकडे मेजर जनरल कुलदीपसिंग ब्रार यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कराच्या 9 व्या तुकडीनं सुवर्ण मंदिराच्या दिशेनं त्यांचा मोर्चा वळवला होता.
लष्कराच्या हलचालींची माहिती मिळताच 3 जूनला दुपारच्या वक्ताला भिंद्रनवालेंनी पत्रकार परिषद बोलवली. त्यावेळी सतीश जेकब सुद्धा हजर होते. ते सांगतात, "लष्कर सुवर्ण मंदिराच्या दरात येऊन ठेपलं होतं, पण ते कारवाई करणार नाहीत असं भिंद्रनवाले यांना वाटत होतं. पण त्यांनी कारवाई केलीच तर चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असं ते म्हणत होते. तसंच त्यांनी लढण्याची संपूर्ण तायरी केली होती. इथून मला कुणी जिवंत हालवू शकत नाही असं भिंद्रनवाले बोलत होते."
ही भिंद्रनवाले यांची शेवटची पत्रकार परिषद होती. त्यानंतर एवढ्या लगेचच कारवाई सुरू होईल असं वाटतं नव्हतं, असं जेबक सांगतात.
त्यानंतर सर्व पत्रकारांना अमृतसरमधून बाहेर काढण्यात आलं. पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेला सील करण्यात आलं. पंजाबला जाणाऱ्या, तिथून सुटणाऱ्या आणि राज्यातून प्रवास करणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या. बस सेवा थांबवण्यात आली. विदेशी मीडियाला राज्यातून बाहेर करण्यात आलं.

फोटो स्रोत, SATPAL DANISH
लष्करानं मंदिरात लपलेल्या लोकांना बाहेर येण्याची विनंती केली. त्यासाठी लाऊड स्पीकरचा वापर करण्यात आला. लष्कर वारंवार मंदिरात लपलेल्यांना बाहेर येण्याचं अपिल करत होतं.
मंदिरात भाविकाची मोठ्या प्रमाणात गर्दी होती, कारण 2 जून पासून शिखांसाठीचं गुरू अर्जन पर्व सुरु झालं होतं.
तीन जूनपर्यंत भारतीय लष्करानं संपूर्ण सुवर्ण मंदिराला वेढा घातला होता. चार जूनला लष्करानं शेवटी गोळीबार सुरू केला. पण जोरदार प्रत्युत्तर मिळाल्यानंतर मात्र लष्करानं रणगाडे आत घुसवण्याचा निर्णय घेतला.
लष्करानं रणगाडे घुसवले आणि लास्ट बॅटल म्हणजेच अंतिम प्रतिकाराला सुरूवात झाली. भारतीय लष्कर हरमंदिर साहिबच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचलं.
भारतीय लष्करानं ही करावाई सुरू करून बराच वेळ उलटून गेला होता. सरते शेवटी 7 जूनच्या रात्री उशीरा कारवाई संपुष्टात येण्याची चिन्ह निर्माण झाली. रात्री उशिरा जनरलसिंग भिंद्रनवाले यांचं शव हरमंदिर साहिबच्या तळघरात सापडलं आणि ऑपरेशन ब्लूस्टार संपुष्टात आलं.
या संपूर्ण ऑपरेशनमध्ये भारतीय लष्कराचे 83 सैनिक मारले गेले आणि 248 सैनिक जखमी झाले. याशिवाय 492 लोकांचा मृत्यू झाला आणि 1,592 लोकांना अटक झाली.
आणि अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात भारतीय सैन्याचे रणगाडे शिरले.... ( सविस्तर वृत्तांत तुम्ही इथं वाचू शकता )
6. ऑपरेशन ब्लू स्टार कुणी आखलं?
सुवर्ण मंदिरातील लष्करी कारवाईचं नेतृत्व केलं मेजर जनरल कुलदीप बुलबुल ब्रार यांच्याकडे सोपवण्यात आलं. पण प्रत्यक्ष मोहिम मात्र मेजर जनरल सुंदरजी (जे पुढे लष्करप्रमुख झाले) यांनी पूर्ण केली. त्याकाळी भारतीय लष्कराचं प्रमुखपद एका मराठी माणसाकडे होतं. ते म्हणजे जनरल अरुण वैद्य.

फोटो स्रोत, SATPAL DANISH
'ऑपरेशन ब्लू स्टार'नंतर दोन मोठ्या व्यक्तिमत्वांची शीख कट्टरतावाद्यांनी हत्या केली- पहिली, ऑक्टोबर 1984 मध्ये इंदिरा गांधींची आणि दुसरी ऑगस्ट 1986 मध्ये जनरल वैद्य यांची.
जनरल अरुणकुमार वैद्य यांची पुण्यात भरदिवसा हत्या झाली होती. याबाबत तुम्ही इथं सविस्तर वाचू शकता.
7. अरुण कुमार वैद्यांची भूमिका काय होती?
ऑपरेशन ब्लू स्टार संपल्यानंतर इंदिरा सरकार आणि लष्कराविरोधातही रोष उसळला. लष्कराने शीखांवर अत्याचार केल्याच्या अनेक अफवा उठल्या, देशाच्या अनेक कानाकोपऱ्यांत हिंसक घटना झाल्या. केवळ चार महिन्यांतच पंतप्रधान इंदिरा गांधींची दिल्लीतल्या राहत्या निवासस्थानी त्यांच्याच अंगरक्षकांनी हत्या केली.
भारतीय सैन्यात विविध हुद्द्यांवर असलेल्या अडीच हजार पेक्षा जास्त शीख सैनिकांनी लष्कर सोडलं. जनरल वैद्य यांनी 1985 साली इंडिया टुडे मासिकाला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल म्हटलं होतं, "आपल्या जमातीबद्दलची निष्ठा (tribal loyalty) राष्ट्रीय निष्ठेपेक्षा वरचढ ठरल्याचा तो प्रकार होता. लष्करातल्या 75 शीखबहुल युनिट्सपैकी 8 युनिट्समध्येच या घटना घडल्या हे विसरू नका. दुष्प्रचार आणि चिथावणी ज्या युनिट्समध्ये नेतृत्वापेक्षा बलशाली ठरली तिथेच हे पाहायला मिळालं."
ब्लू स्टारमध्ये सहभागी प्रमुख लष्करी अधिकाऱ्यांना कट्टरतावाद्यांकडून अनेक वर्षं धमक्या येत होत्या. जनरल वैद्यही त्याला अपवाद नव्हते.
8. ऑपरेशन ब्लू स्टार नंतर काय घडलं?
या संपूर्ण ऑपरेशनमध्ये भारतीय लष्कराचे 83 सैनिक मारले गेले आणि 248 सैनिक जखमी झाले. याशिवाय 492 लोकांचा मृत्यू झाला आणि 1,592 लोकांना अटक झाली.

फोटो स्रोत, SATPAL DANISH
या घटनेमुळे संपूर्ण जगातील शीख धर्मियांच्या भावना दुखावल्या. हे ऑपरेशन म्हणजे भारतीय सैन्याचा विजय होता, पण राजकीयदृष्ट्या एक मोठा पराभव होता.
या ऑपरेशनची वेळ, तयारी, अंमलबजावणी याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि शेवटी इंदिरा गांधीना आपला जीव गमावून त्याची किंमत चुकवावी लागली.
बीबीसीच्या माजी पत्रकार राणि सिंग यांनी सोनिया गांधींवर लिहिलेल्या पुस्तकात या प्रकरणाचा उल्लेख करताना म्हटलंय, 'ऑपरेश ब्लू स्टारचे आदेश दिल्यानंतरच इंदिरा गांधी यांना कळून चुकलं होतं की आपला अंत जवळ आला आहे'
'80 बाटल्या रक्त चढवूनही त्यांचा जीव वाचला नाही' - हे संपूर्ण प्रकरण तुम्ही इथं वाचू शकता.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








