एकनाथ शिंदे बंड: 'गुलाबराव पाटील पुन्हा पानटपरीवर बसतील'- संजय राऊत #5मोठ्या बातम्या

फोटो स्रोत, Getty Images
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1. गुलाबराव पाटील पुन्हा पानटपरीवर बसतील- संजय राऊत
"गुलाबराव पाटील हे आमदार होण्याआधी पानटपरी चालवायचे त्यानंतर ते कॅबिनेट मंत्री झाले मात्र ते आता पुन्हा पानटपरीवर बसतील," अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. एकनाथ शिंदे समर्थक आमदारांवर राऊत यांनी टीकास्त्र सोडलं. दहिसर येथे पार पडलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. 'टीव्ही9 मराठी'ने ही बातमी दिली आहे.
राऊत म्हणाले, "गुलाब पाटील हे असे भाषण करायचे की शिवसेनेमध्ये कोणी वाघच नाही, जणू हे एकटेच वाघ असल्यासारखे ते वागायचे मात्र, ते पळून गेले. ते म्हणायचे की, मी पानटपरीवाला मला कॅबिनेट मंत्री केलं आता तुम्हाला पुन्हा पानटपरीवर बसावं लागेल. हे महाभारतातल्या संजयचे वक्तव्य आहे. हे लक्षात ठेवा. मी बाळासाहेबांच्या पायाशी बसून सुमारे 30 वर्षं काम केलं आहे. माझा शब्द कधी खोटा होत नाही."
"संदिपान भुमरे यांना पहिलं तिकीट मिळालं तेव्हा ते पैठणच्या साखर कारखान्यात वॅाचमन होते. मोरेश्वर सावेंचं तिकीट कापून बाळासाहेबांनी साधा शिवसैनिक म्हणून त्यांना तिकीट देण्यात आल होतं. तेव्हा त्यांना हॅाटेलमध्ये वडा-सांबर सुद्धा खाता येत नव्हतं. ते जमिनीवर बसून खायचे. मात्र, ते आज कॅबिनेट मंत्री आहेत," असं राऊत म्हणाले.
2. उत्तर प्रदेशात सपला धक्का, पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलाचा आपला दणका
लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या सात जागांसाठी 23 जून रोजी पोटनिवडणूक घेण्यात आली होती.
उत्तर प्रदेशातील रामपूर आणि आझमगड हे समाजवादी पक्षाचे बालेकिल्ले लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपने काबीज केले, तर पंजाबमधील संगरूर लोकसभा मतदारसंघात तेथील सत्ताधारी 'आप'ला शिरोमणी अकाली दलाने धक्कादायकरित्या पराभूत केले. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
उत्तर प्रदेशात सत्ताधारी भाजपचे उमेदवार घन:श्याम लोधी यांनी रामपूर लोकसभा मतदारसंघात 42 हजार मताधिक्याने विजय मिळवला. लोधी यांनी समाजवादी पक्षाचे मोहम्मद असीम रजा यांचा पराभव केला.
समाजवादी पक्षाचा अभेद्य किल्ला मानल्या जाणाऱ्या आझमगडमध्येही भाजपचे दिनेशलाल यादव 'निरहुआ' यांनी समाजवादीचे धर्मेद्र यादव यांचा साडेआठ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. या मतदारसंघातून 'सप'चे अध्यक्ष अखिलेश यादव निवडून आले होते, परंतु विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली.
राजधानी दिल्लीतील राजिंदर नगर विधानसभेची जागा मात्र आपने जिंकली. तेथे आपचे दुर्गेश पाठक यांनी भाजपच्या राजेश भाटिया यांचा 11 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. त्रिपुरा आणि झारखंडमधील प्रत्येकी एक जागा काँग्रेसने जिंकली आहे.

फोटो स्रोत, TWITTER/SIMRANJIT SINGH MANN
पंजाबमध्ये महिन्याभरापूर्वी सत्तेवर आलेल्या 'आप'ला संगरूर लोकसभा पोटनिवडणुकीत धक्कादायकरीत्या पराभूत व्हावे लागले. ही जागा मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दोनदा जिंकली होती; परंतु पोटनिवडणुकीत 'आप'चे गुर्मेल सिंग यांचा शिरोमणी अकाली दलाचे (अमृतसर) अध्यक्ष सिमरनजितसिंग मान यांनी 5822 मताधिक्याने पराभव केला.
3. तिस्ता सेटलवाड यांना 2 जुलैपर्यंत कोठडी
तिस्ता सेटलवाड आणि आणि माजी आयपीएस आरबी श्रीकुमार यांना 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
गुजरातच्या अहमदाबाद क्राइम ब्रँचने दोघांनाही 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना 2 जुलैपर्यंत कोठडी दिली आहे. अहमदाबाद येथील घिकाटा येथील अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी क्रमांक 11 यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. 'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, ANI
गुजरात दंगलीप्रकरणी खोटी माहिती दिल्याबद्दल तिस्ता सेटलवाड यांना गुजरात एटीएसने काल अटक केली होती. गुजरात दंगलीवरील एसआयटीच्या अहवालाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने 24 जून रोजी फेटाळून लावली होती. झाकिया जाफरी यांनी ही याचिका दाखल केली होती.
2002 च्या गुजरात दंगलीमध्ये झाकिया जाफरी यांचे पती एहसान जाफरी यांची जमावाने हत्या केली होती. एहसान जाफरी यांची पत्नी झाकिया जाफरी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून एसआयटीच्या अहवालाला आव्हान दिले आहे. एसआयटीच्या अहवालात राज्यात मोठ्या पदावर असलेल्या लोकांना क्लीन चिट देण्यात आली होती.
4. समस्यांपासून लक्ष वळवण्यात मोदी व्यस्त- राहुल गांधी
"पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेचे लक्ष दुसरीकडे वेधण्याची कला साध्य केली आहे," अशी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी 'ट्वीट'द्वारे केली.
त्यांनी म्हटले, की "सध्या बेरोजगारीने सार्वकालिक उच्चांक गाठला आहे, घाऊक किंमत निर्देशांकाने (डब्ल्यूपीआय) उच्चांकी पातळी गाठली आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) 17 अब्ज डॉलरचे अवमूल्यन यासारख्या समस्यांकडे दुर्लक्ष करता येत नाही," असे राहुल यांनी नमूद केले. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, ANI
डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे 78 रुपयांपर्यंत अवमूल्यन झाले आहे. 'डीएचएफएल'प्रकरण सर्वांत मोठी बँक फसवणूक आहे. सर्वसामान्य भारतीय नागरिक अशा समस्यांशी झुंजत असताना मोदी मात्र त्यांचे लक्ष अन्यत्र वळवण्याच्या प्रयत्नांत व्यस्त आहेत. पंतप्रधानांचे हे कौशल्य मूळ समस्या-संकटे लपवू शकत नाहीत, असे ते म्हणाले. तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणीही राहुल गांधींनी केंद्राकडे केली.
5. भारताचा आयर्लंडवर विजय
भारतीय संघाने डब्लिन इथे झालेल्या पहिल्या ट्वेन्टी20 लढतीत आयर्लंडवर 7 विकेट्सनी विजय मिळवला. पावसामुळे ही लढत 12-12 षटकांची खेळवण्यात आली. आयर्लंडने प्रथम फलंदाजी करताना 108 धावांची मजल मारली. हॅरी टेक्टरने नाबाद 64 धावांची खेळी केली. भारतातर्फे भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या, अवेश खान आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. 'इंडियन एक्स्प्रेस'ने ही बातमी दिली आहे.
प्रत्युत्तरादाखल खेळताना दीपक हुड्डाच्या 47 धावांच्या खेळीच्या बळावर भारतीय संघाने विजयावर शिक्कामोर्तब केलं. या विजयासह भारतीय संघाने 2 ट्वेन्टी20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
भारताचा मुख्य संघ इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिजची तयारी करत आहे. चहलला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. हार्दिक पंड्याने या सामन्याद्वारे कर्णधार भूमिकेत तर उम्रान मलिकने आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








