You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एकनाथ शिंदे बंड : महाराष्ट्राची वाटचाल राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने सुरू झाली आहे का?
- Author, प्रविण काळे
- Role, बीबीसी मराठीसाठी
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचं नेतृत्व करत असलेल्या शिवसेना पक्षातच बंडाळी झाल्याने सरकारवर गंभीर संकट ओढवलं आहे. या पार्श्वभूमीवर रोज नवनव्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी शनिवारी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली.
नवनीत राणा म्हणाल्या, "मी गृहमंत्री अमित शहा यांना विनंती करते की, उद्धव ठाकरे यांना सोडून जाणाऱ्या आणि स्वत:चा वेगळा निर्णय घेणाऱ्या आमदारांच्या कुटुंबीयांना सुरक्षा द्यावी. उद्धव ठाकरे यांची गुंडगिरी संपली पाहिजे. मी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करते."
शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची संतप्त कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी हे वक्तव्य केले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेल्या शिवसेनेच्या आमदारांपैकी तानाजी सावंत हे एक आहेत. सर्व बंडखोर आमदारांसोबत सध्या गुवाहाटीमध्ये आहेत.
शिवसेनेच्या एका स्थानिक नेत्याने पुण्यात दावा केला की, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड केली होती.
संजय राऊत यांच्याकडूनही इशारा
संजय राऊत यांनी देखील दोन दिवसांपूर्वी ट्विट केलं की, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने होतोय.
राऊत यांच्या या ट्विटनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते अशा प्रकारची शक्यता वर्तवली गेली होती.
नवनीत राणा यांच्या मागणीनंतर पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवटी संदर्भात चर्चा सुरू आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची वाटचाल खरंच राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने सुरू झाली आहे का? या प्रश्नाचं उत्तर आता आपण जाणून घेणार आहोत.
राष्ट्रपती राजवट केव्हा लावली जाऊ शकते?
राज्यात सध्याच्या परिस्थितीमध्ये राष्ट्रपती राजवट केव्हा लावली जाऊ शकते, याबद्दल माहिती घेण्यासाठी आम्ही घटनातज्ञ उल्हास बापट यांच्याशी संपर्क साधला.
ते म्हणतात, "राज्यात जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला किंवा त्यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करता आले नाही तर राज्यातील सध्याचे सरकार पडू शकते. अशा वेळी राज्यपाल दुसऱ्या पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी बोलावू शकतात.
"जर दुसऱ्या पक्षानेही सत्ता स्थापनेसाठी असमर्थता दर्शवली तर राज्यपाल राज्यात राज्यघटनेच्या कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करू शकतात. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून सहा महिन्यात नव्याने निवडणुका घेतल्या जाऊ शकतात."
केंद्र सरकार राष्ट्रपती राजवट लागू करू शकतं का?
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. तर राज्यात केंद्र सरकार राष्ट्रपती राजवट लागू करू शकतं का? हे जाणून घेण्यासाठी आम्ही राज्यशास्त्राचे आणि संविधानाचे अभ्यासक अशोक चौसाळकर यांच्याशी संवाद साधला.
ते म्हणतात, "राज्यात दोन परिस्थितीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते. पहिले म्हणजे जर सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करता आले नाही आणि राज्यात पर्यायी सरकार स्थापन न झाल्यास."
"दुसरी परिस्थिती म्हणजे जर राज्यात कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला, आता ज्या पद्धतीने काही ठिकाणी गुंडागर्दी केली जात आहे, अशी परिस्थिती मोठ्या प्रमाणात हाताबाहेर गेली तर केंद्र सरकारकडून हस्तक्षेप केला जाऊ शकतो आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते."
पण सध्यातरी राज्यात अशाप्रकारे परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, अशी स्थिती नसल्याचे चौसाळकर पुढे नमूद करतात.
पर्याय काय?
"राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू होईल अशी शक्यता नाही," असे मत जेष्ठ पत्रकार, लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान व्यक्त करतात.
ते म्हणतात, "सध्या एकनाथ शिंदे गटाकडे सध्या दोन तृतीयांश आमदारांचा पाठिंबा आहे, जर त्यांना तो टिकवता आला तर ते भाजपसोबत सरकार स्थापन करू शकतात.
"पण जर त्यांना तो टिकवता आला नाही किंवा शिंदे गटातील काही सदस्य परत गेले तर आपोआपच पक्षांतरबंदी कायद्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द होईल. परिणामी त्यांना नव्याने निवडणुकीला सामोरं जावं लागेल."
प्रधान पुढे सांगतात, "जर बंडखोर आमदारांना नव्याने निवडणुकांना सामोरं जावं लागलं तर परत आलेलं सदस्य आणि अपक्षांच्या मदतीने महाविकास आघाडी स्वतःच बहुमत सिद्ध करू शकते."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)