एकनाथ शिंदे बंड : उद्धव ठाकरेंना आमदारांच्या बंडाचा सुगावा कसा लागला नाही?

    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

शिवसेनेत एकनाथ शिंदेंचं बंड होऊन आता 'महाविकास आघाडी' सरकारचं अस्तित्वं धोक्यात आलं आहे. ते भविष्यात होईल ते समोर येईल, पण जे भूतकाळात घडलंय त्यावरुन पडलेले काही प्रश्न अद्याप सुटले नाही आहेत. त्यातला सर्वात महत्वाचा प्रश्न, एवढं मोठं बंड होत असताना मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख असणाऱ्या उद्धव ठाकरेंना त्याचा अजिबात सुगावा कसा लागला नाही?

या बंडामुळे उद्धव ठाकरेंच्या पक्षावरच्या पकडीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत आणि शिवसेनेच्या भवितव्यावरही. पक्षशिस्तीची भीती दाखवून आता शिवसेना त्यांच्या बंडखोर आमदारांना परत आणू पाहते आहे. पण प्रश्न हा तरी उरतोच की आपल्याच पक्षातले आमदार एवढं मोठं बंड रचत असतांना, त्याचा थोडाही संशय पक्षनेतृत्वाला का आला नसावा? किंवा त्याची कल्पना होती पण त्याकडे फारसं गांभीर्यानं न पाहता काहीच कृती केली गेली नाही?

हा प्रश्न विचारलं जाण्याचं एक कारण हेही आहे की शिवसेनेत नाराजांचा एक गट आहे हे सर्वश्रुत होतं. ते कधीही लपून राहिलं नाही. एकनाथ शिंदे नाराज आहेत, त्यांना मानणारा एक मोठा गट आहे, हेही शिवसेनेत आणि बाहेरही सगळ्यांना माहित होतं. पण तरीही अशी बंडखोरी होणार नाही असं सेना नेतृत्वानं गृहित कसं धरलं, याचं उत्तर मिळत नाही.

एक नक्की आहे की, ज्या प्रकारची रणनीति आखली गेली, आमदारांना गोळा केलं गेलं, आगोदर सुरत आणि मग गुवाहाटी असा प्रवास केला गेला आणि त्यानंतर सगळ्या पुढच्या कायदेशीर प्रक्रियेची तयारी सुद्धा केली गेली. हे सगळं काही महिन्यांचं प्लानिंग आहे हे अगदीच स्पष्ट आहे.

पण मग तशी तयारी काही काळ होत असतांनाही उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारला त्याचा काहीच सुगावा कसा लागला नाही असा प्रश्न विचारला जातो आहे. त्यातही राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीवेळेस सेनेने सगळ्या आमदारांना एकत्र हॉटेलमध्ये ठेवलं होतं. तेव्हाही हे बंड रचलं जात होतं याची कल्पना कशी आली नाही?

गुप्तचर यंत्रणांनी सांगितलं नाही का?

उद्धव ठाकरेंना अगोदरच या बंडाची कल्पना का आली नाही हा प्रश्न विचारण्याचा मुख्य आधार म्हणजे मुख्यमंत्र्यांना नियमित होत असणारं गुप्तचर विभागाचं ब्रीफिंग. गृहमंत्र्यांना आणि राज्याचे प्रमुख असणा-या मुख्यमंत्र्यांना पोलिसांचा गुप्तवार्ता विभाग राज्यात सुरु असलेल्या घटनांबद्दल सातत्यानं अवगत करत असतो. हा गुप्तवार्ता विभाग म्हणजे एस आय डी राजकीय आंदोलनं, पक्षांच्या हालचाली, गुन्हेगारी विश्वातल्या घडामोडी हे हे रिपोर्ट करतांनाच राज्यात होऊ शकणा-या घटनांचीही आगाऊ कल्पना गृह मंत्रालयाला देत असतो.

असं असतांना या गुप्तवार्ता विभागाला आमदारांच्या या बंडाची माहिती आली नाही का, जर आली तर तर त्याबद्दल मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आलं का आणि आलं असेल तर त्या माहितीच्या आधारे बंड रोखण्यासाठी काही पावलं का टाकली गेली नाहीत?

एक तर या सगळ्या आमदारांबरोबर सशस्त्र पोलिस सुरक्षा रक्षक सतत असतो. त्यात या बंडखोर आमदारांमध्ये चार मंत्री आहेत. त्यात एक खुद्द गृहराज्य मंत्री शंभुराजे देसाई आहेत. या सगळ्या मंत्र्यांच्या ताफ्यात मोठा पोलिस बंदोबस्त असतो. एवढी मोठी पोलिस यंत्रणा दिमतीला असतांना त्यांच्या गुजरात पलायचा थांगपत्ताही सरकारच्या नेतृत्वाला आणि गृहमंत्रालयाला कसा लागला नाही हा तार्किक प्रश्न विचारला जातो आहे.

या सरकार जवळच्या काही सूत्रांच्या आधारे दोन महिन्यांपूर्वी सरकारमधले काही आमदार विरोधी पक्षाच्या संपर्कात आहेत अशी माहिती गुप्तवार्ता विभागातर्फे सरकारला देण्यात आली होती. तशा बातम्याही माध्यमांमध्ये प्रकाशित झाल्या आहेत. पण या आमदारांची संख्या आज आहे त्यापेक्षा कमी होती आणि ती सरकारच्या स्थैर्याला धोक्यात आणण्याएवढी नाही म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं असंही सांगण्यात येतं आहे. हे दुर्लक्ष आता सरकारच्या मुळावर उठल्याची चिन्हं आहेत.

गुप्तवार्ता विभागाच्या माहितीच्या आधारे सरकार विरोधी पक्षाच्या हालचालींवरही लक्ष ठेवत असते. गेल्या भाजपाच्या सरकारच्या काळात रश्मी शुक्ला यांच्या काळात विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या फोनचं झालेलं टॅपिंग प्रकरण हे त्याचं एक वादग्रस्त उदाहरण. पण सरकारला विरोधी पक्षाच्या हालचालींचीही माहिती असते. तसं असतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विरोधी पक्षाच्या संपर्कात असलेल्या आमदारांबद्दल आणि या बंडाच्या शक्यतेबद्दल कसं समजलं नाही हाही प्रश्न आहेच.

यात एक उपप्रश्न हा आहे की गृह खातं 'राष्ट्रवादी'कडे आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणेकडून जी माहिती मिळणं अपेक्षित होतं ती 'राष्ट्रवादी'कडे होती का आणि जर होती तर त्यांनी काय केलं? एवढा मोठा आमदारांचा आणि मंत्र्यांचा ताफा सीमा ओलांडून जातो आणि आपल्याला कसं समजलं नाही अशा आशयाचा प्रश्न शरद पवार यांनी 'राष्ट्रवादी'च्या बैठकीतही केल्याचं समजतं आहे.

उद्धव आणि शिंदे यांचं बोलणं झालं होतं?

एक चर्चा आणि थिअरी अशीही आहे की एकनाथ शिंदे यांच्या या बंडाच्या शक्यतेबद्दल उद्धव ठाकरे यांना शंका आली होती आणि त्याबद्दल त्यांनी शिंदेंकडे विचारणा केलीही होती.

'लोकसत्ता'नं आज (गुरुवारी) यावर बातमी लिहिली आहे. त्यानुसार शिंदेंच्या या हालचालींची उद्धव ठाकरेंना कल्पना होती. सेना नेतृत्वाला यामुळेही शंका आली होती की सेनेच्या अनेक नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांची कारवाई होत असतांना शिंदेंविरुद्ध असं काहीही केलं गेलं नव्हतं.

माहिती होती की भाजपाकडून त्यांना संपर्क केला गेला होता. जेव्हा नोव्हेंबर महिन्यात उद्धव यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर जेव्हा ते घरी परतले तेव्हा शिंदे यांना बोलावून ठाकरेंनी त्यांना याबाबत विचारलं होतं, पण शिंदेंनी त्यांचा असा कोणताही विचार नसल्याचं त्यांना सांगितलं होतं.

याबद्दल शिवसेना वा शिंदेंच्या निकटचं कोणीही बोलायला तयार नाही, मात्र त्यावरुन अशी शक्यता दिसते की उद्धव यांना अंदाज होता. पण जर असं असेल तर गेल्या काही महिन्यात जेव्हा या बंडाची रचना ठरवली जात असेल तेव्हा त्यांनी काही पाऊल का उचललं नाही. त्याचा एक अर्थ असाही होती की शिंदे यांनी आश्वस्त केल्यावर असं काही घडणार नाही याची खात्री सेना नेतृत्वाची पटली आणि त्यांनी पुढे काहीही केलं नाही.

उद्धव ठाकरे यांच्या या शिंदेंबद्दलच्या संदिग्ध भूमिकेमुळे अशी शक्यताही बोलून दाखवली जाते आहे की त्यांना या बंडाबद्दल माहिती नसणे शक्य नाही आणि त्यांच्या सहमतीनेच हे होतं आहे. पण राजकीय अनिश्चिततेच्या वातावरणात अशा थिअरीज उठत असतात आणि त्याला कोणताही आधार नाही. पण उद्धव यांना पक्षात एवढ्या आमदारांचं बंड शिजत असतांना त्याबद्दल समजलं का नाही हा प्रश्न दूर होत नाही.

'उद्धव ठाकरेंना पूर्वकल्पना होती'

राजकीय पत्रकार आणि 'मविआ' सरकारच्या स्थापनेवर 'चेकमेट' हे पुस्तक लिहिणारे सुधीर सूर्यवंशी यांच्या मते उद्धव यांना या बंडाची पूर्वकल्पना होती. "माझी जी माहिती आहे त्यानुसार ठाकरेंना याची सहा महिन्यांपासून पूर्वकल्पना होती. जे आज बंड करत आहेत हे सगळे नेते त्यांच्याकडे गेलेही होती. मुख्य कारण हे होतं की केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा जो अनेक नेत्यांच्या मागे लागला होता. भाजपाला आता आर्थिक राजधानीही त्यांच्या ताब्यात हवी आहे, त्यामुळे हा संघर्ष आता वाढत जाणार होता. त्यामुळे भाजपासोबत जावं हा प्रवाद सेनेमध्ये होताच. केवळ उद्धव यांच्याकडे त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग नव्हता, म्हणून आमदारांनी हा मार्ग निवडला. उद्धव यांना याची कल्पना होती आणि त्यांनी गोष्टी आपल्या हातातून जाऊ दिल्या," असं सूर्यवंशी म्हणतात.

उद्धव यांना पूर्वकल्पना होती या त्यांच्या तर्काला आधार देतांना सूर्यवंशी असंही म्हणतात की, "एकनाथ शिंदे यांची ताकद इतकी नाही की ते 40 आमदार आपल्याकडे नेतील. अजित पवारांपेक्षाही त्यांची ताकद मोठी आहे का? माझ्या मते तसं नाही. शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांचं त्यांच्या मागे असण्याशिवाय आणि मोठी यंत्रणा हाती असल्याशिवाय ते शक्य नाही. म्हणून मला असं वाटतं की हे केवळ एकनाथ शिंदेंचं पाऊल नाही."

राजकीय पत्रकार दीपक भातुसे म्हणतात, "राजाची गुप्तचर यंत्रणा त्या दिवशी रात्री काय करत होती हा प्रश्न आहेच. एवढं सगळं घडत होतं पण त्यांनी गृहमंत्रालय वा मुख्यमंत्री कार्यालयाला काही सांगितलं किंवा नाही यावर प्रश्नचिन्हं आहे. पण दुसरीकडे मला असं वाटतं की, उद्धव यांनी शिंदे असं काही करतील या शक्यतेकडे दुर्लक्ष केलं. संजय राऊत वा अनिल परब 'ईडी'ची कारवाई होतांनाही शांत होते. शिंदेंविरुद्ध तर तसं काहीच नव्हतं. त्यामुळे ते बंड करतील असं त्यांना वाटलं नसावं. वास्तविक शिंदे नाराज आहेत, जाऊ शकतात हे कुणकुण बाहेर सगळ्यांना होती."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)