एकनाथ शिंदे यांच्याकडे 46 आमदार, फडणवीसांबरोबर सरकार दृष्टीपथात?

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात केलेल्या बंडामध्ये आता आणखी आमदार येऊन सामील झाले आहेत.

"तूर्तास तरी आम्ही पक्ष सोडणार नाही. पण आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाणार नाही," असं शिंदेंच्या गोटातून सांगण्यात आलं आहे.

"भाजपने एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे", असं एकनाथ शिंदेंच्या अत्यंत जवळच्या सूत्रांनी बीबीसी मराठीचे प्रतिनिधी मयांक भागवत यांना सांगितलं आहे.

शिंदे यांच्याकडे आता 46 आमदार असल्यामुळे या गटातल्या आमदारांचं सदस्यत्व जाणार नाही. आज संध्याकाळपर्यंत एकनाथ शिंदे राज्यपालांना पत्र देण्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे.

आता हे शिवसेना आमदार आणि अपक्ष असे एकूण 46 आमदार एकनाथ शिंदे यांच्या सेनेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील घडामोडींना वेग आला आहे. आता देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान सागर येथे बैठक सुरू आहे. या बैठकीला आशिष शेलार, गिरीश महाजन,नितेश राणे, धनंजय महाडिक, श्रीकांत भारतीय हे नेते उपस्थित आहेत.

दीपक केसरकर, आशिष जैस्वाल, मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर हे चार आमदार सकाळीच गुवाहाटीमध्ये आले आहेत. ते आज एकनाथ शिंदे गटात दाखल झाले आहेत.

गुलाबराव पाटील, योगेश कदम, चंद्रकांत पाटील आणि मंजुळा गावित हे चार आमदार बुधवारी रात्री गुवाहाटीला पोहोचले आहेत. त्यापैकी जळगावचे चंद्रकांत पाटील हे अपक्ष आमदार आहेत. आणि ते अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात.

तर योगेश कदम हे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे पुत्र आहेत. त्यामुळे आता शिंदेंच्या बंडाला रामदास कदमांची साथ असल्याचं स्पष्ट झालं आहे.

तर गुलाबराव पाटील हे उद्धव ठाकरे यांचे खंदे समर्थक मानले जातात. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

राष्ट्रवादीचे नेते काय म्हणतात?

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.

ते म्हणाले, "सरकार वाचवण्यासाठी सगळे प्रयत्न करण्याची तयारी आहे. इथले आमदार तिथे गेले याचा अर्थ ते त्यांच्यात सामील झाले असं नाही. ते आमदार स्वतः उघडपणे शिंदेंसोबत असल्याचं सांगत नाहीत, तोपर्यंत असं म्हणू शकत नाह. अजितदादांनी मौन बाळगलेलं नाही. आमच्या सगळ्यांचा उद्धवजींना पाठिंबा आहे. मी सगळ्यांच्या वतीने बोलतोय."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)