एकनाथ शिंदे: 'रिक्षावाला ते 'नॉट रिचेबल' शिवसेना नेते आणि मंत्री

एकनाथ शिंदे

फोटो स्रोत, Getty Images

21 जूनला सकाळी एकनाथ शिंदे 11 आमदारांना घेऊन सुरतला गेल्याची बातमी कळली आणि संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. वाक्बाण, ट्विटवॉर, चिखलफेकीला सुरुवात झाली. हे बंड शमेल ही चिन्हं पहिल्या दिवशीपासूनच नव्हती.

अखेर नऊ दिवसांनंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. एकनाथ शिंदे आज सकाळी मुंबईत आले आणि थेट राजभवनात गेले आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊनच बाहेर आले.

एकनाथ संभाजी शिंदे यांचा प्रवास हा असाच वादळी आहे.

ठाण्यामधील कोपरी-पाचपाखाडीचे आमदार एवढीच त्यांची ओळख नसून गेली अनेक दशके ते शिवसेनेत संघटन वाढवणारे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे कल्याण मतदारसंघातून दुसऱ्यांदा लोकसभेत गेले आहेत.

एकनाथ शिंदे गेली अनेक वर्षं शिवसेनेत कार्यरत आहेत. ठाण्यातल्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून ते निवडून आलेत. ठाणे महापालिकेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून काम केल्यानंतर 2004 पासून ते विधानसभेवर निवडून जात आहेत. पण त्यांचा हा प्रवास सुरु झाला होता रिक्षाचालकापासून.

ठाणेवैभव या वृत्तपत्राचे संपादक मिलिंद बल्लाळ एकनाथ शिंदेची ओळख 'आक्रमक शिवसैनिक ते शाखाप्रमुख ते जबाबदार मंत्री' अशी करून देतात.

मिलिंद बल्लाळ एकनाथ शिंदेंविषयी सांगतात, "सातारा हे एकनाथ शिंदेंचं मूळ गाव. ते ठाण्यात आले ते आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी. मात्र घरच्या हालाखीच्या परिस्थितीमुळे त्यांना आपलं शिक्षण अर्ध्यातच सोडावं लागलं. आता हाताला नोकरी हवी म्हणून त्यांनी रिक्षा चालवायला सुरुवात केली. पुढे ते ठाण्यातील शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांच्या संपर्कात आले."

एकनाथ शिंदे

फोटो स्रोत, Getty Images

"वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी त्यांनी शिवसेनेतून आपल्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात हिरहिरीने सहभाग घेऊन आक्रमक भूमिका घेणाऱ्या एकनाथ शिंदेंवर आनंद दिघेंची कृपादृष्टी झाली आणि शिंदे ठाण्यातील किसन नगरचे शाखाप्रमुख झाले.

त्यानंतर 1997 मध्ये आनंद दिघेंनी शिंदेंना ठाणे महापालिकेचं तिकीट दिलं.

आपल्या पहिल्याच प्रयत्नांत शिंदेंनी महापालिकेत बाजी मारली आणि ठाणे महापालिकेचे सभागृह नेतेही झाले. 2004 साली त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. इथे सुद्धा पहिल्याच प्रयत्नात ते निवडून आले.

2004 सालापासून सलग चार वेळा कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून आमदारपदी निवडून आलेत.

शिंदे यांनी या आधी 2015 ते 2019 पर्यंत सार्वजनिक बांधकाम या खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले.

बंडखोरीचे दिवस

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते नगरविकास मंत्री होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबरच्या सरकारमधून बाहेर पडून भाजपबरोबर सरकार स्थापन करावं अशी त्यांची मागणी सुरुवातीपासून होती.

सुरुवातीला 11 मग 29 आणि सरतेशेवटी 45 आमदार सोबत नेण्याची कामगिरी त्यांनी साधली. या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी शिंदे आणि बंडखोर आमदारांना अनेकदा परत येण्याचं आवाहन केलं. मात्र ते बधले नाहीत. उत्तरोत्तर त्यांची भूमिका आणि वक्तव्य अधिकाधिक बंडखोरीची होत गेली. हे बंड इतकं टोकाला गेलं की उद्धव ठाकरे सरकारमध्ये फक्त आदित्य ठाकरे हा एकटाच लोकनिर्वाचित नेता उरला होता.

आता एकनाथ शिदेंच्या नेतृत्वाखाली ज्या वेगाने महाराष्ट्राचा विकास झाला तो वेग आता संपणार आहे. मला विश्वास आहे की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात ओबीसींना पुन्हा आरक्षण देण्याचा विषय निश्चित टप्प्यावर घेतील

मी एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करतो. असं देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)