बुलडोझर : भारतीय मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करणारं मशीन

फोटो स्रोत, Getty Images
- Author, गीता पांडे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
सुमारे शंभर वर्षांपूर्वी बुलडोझरचा शोध लागला. हा शोध लागल्यापासून घरांपासून कार्यालये, रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या बांधकामासाठी बुलडोझरचा वापर व्हायला लागला.
पण हा बुलडोझर अलिकडच्या काही वर्षांत भारतातील हिंदू राष्ट्रवादी पक्ष असलेल्या भाजपच्या हातातलं एक हत्यार बनलं आहे. या बुलडोझरचा वापर करून अल्पसंख्याक मुस्लिमांची घरे, दुकाने आणि मालमत्ता पाडल्या जातायत.
राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं राज्य असलेल्या उत्तरप्रदेशात या बुलडोझरची संख्या वाढताना दिसते आहे.
या बुलडोझरने अलीकडेच उत्तर प्रदेशातील प्रयागराज (पूर्वी अलाहाबाद) इथं एक पराक्रम केला. रविवारी राजकीय कार्यकर्ते जावेद मोहम्मद यांचं घर पाडण्यात आलं. हे घर बेकायदेशीरपणे बांधण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, कुटुंबीयांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.
टीकाकार म्हणतात की, बांधकाम पाडण्याचा आणि इमारतीच्या बेकायदेशीर असण्याचा काहीही संबंध नाही. जावेदने सरकारवर उघड टीका केल्याचा परिणाम त्यांच्या कुटुंबाला शिक्षा झाली.
घर पाडण्याच्या एक दिवस आधी पोलिसांनी त्यांना अटक केली. मोहम्मद पैगंबर यांच्या अपमानाविरोधात प्रयागराजमध्ये जी हिंसक निदर्शन झाली त्याचा 'मास्टरमाइंड' म्हणून त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला.
'कायद्याचा मूळ आत्माच बुलडोझरने नष्ट केला'
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यामुळे भारतातील मुस्लिम संतप्त झाले. परिणामस्वरूप शुक्रवारी देशभरातील अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शन करण्यात आली.
भाजपने नुपूर शर्माची पक्षातून हकालपट्टी केली. मात्र त्यांना अटक व्हावी अशी आंदोलकांची मागणी आहे.
भाजप नेत्यांनी जावेद आणि त्याच्यासारख्या इतरांवरील अटकेच्या कारवाईला 'यात बेकायदेशीर असं काहीच नाही' म्हटलं आहे.
भारतातील घरं उद्ध्वस्त करण्याच्या या कृतीची तुलना इस्त्रायलच्या पॅलेस्टिनी विद्ध्वंसाशी केली जाते. या गोष्टींमुळे भारतावर टीका तर होतेच आहे. पण याची जगभरात चर्चासुद्धा होताना दिसते.

फोटो स्रोत, Getty Images
टीकाकार म्हणतात की, या कृतीवर कायद्याची एक अतिशय बारीक झालर आहे आणि अधिकारी कायद्याचा मूळ आत्माच बुलडोझरने नष्ट करत आहेत.
अनेक माजी न्यायमूर्ती आणि वकिलांनी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाला यासंदर्भात पत्र लिहिलंय. ते पत्रात म्हणतात की, "बुलडोझर चालवणं म्हणजे कायद्याच्या आधारे करण्यात आलेली दडपशाही आहे." या पत्रात त्यांनी मुस्लिमांवरील दडपशाही आणि हिंसाचार थांबवण्याचं आवाहनही केलं आहे.
इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्रात माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी एक लेख लिहला होता. त्या लेखात सिब्बल म्हणतात, "बुलडोझरचा बेकायदेशीर बांधकामांशी काहीही संबंध नाही. मी कोण आहे आणि मी कोणत्या बाजूने उभा आहे यावर सगळ्या गोष्टी ठरतात.
"मी सार्वजनिक ठिकाणी काय बोलतो, माझ्या श्रद्धा, माझा समुदाय, माझा धर्म, माझे अस्तित्व, माझा विद्रोही आवाज याच्याशी त्या बुलडोझरचं देणंघेणं आहे. जेव्हा एखादा बुलडोझर माझ्या घरावर चालवला जातो तेव्हा तो फक्त माझं घरचं पाडतोय असं नाही तर तो माझी बोलण्याची हिंमतही तोडतोय."
यावर न्यायालय काय म्हणतंय?
बुलडोझरच्या वापराला भारताच्या सर्वोच्च न्यायालयातही आव्हान देण्यात आलंय. यावर, तो कायद्याच्या मर्यादेत वापरला पाहिजे, बदला घेण्यासाठी नाही, असं न्यायालयाने म्हटलं आहे.
बुलडोझरमुळे निर्माण झालेला धोका अद्याप समोर आलेला नाही.
या वर्षी मी उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचं कव्हरेज करत असताना मला एक मनोरंजक दृश्य दिसलं. योगी आदित्यनाथांच्या रोड शोमध्ये त्यांचे समर्थक खेळण्यातले बुलडोझर घेऊन पोहोचले होते. पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी योगी आदित्यनाथ रिंगणात होते. निवडणूक जिंकून ते पुन्हा मुख्यमंत्री झाले आहेत.
हातात प्लास्टिकचे बुलडोझर घेऊन 'वो बुलडोजर वाला बाबा फिर से आएगा' हे गाणं गात योगी आदित्यनाथ यांचे समर्थक टीव्ही कॅमेऱ्यांसमोर नाचत होते.

योगी आदित्यनाथ यांना स्थानिक मीडियाने 'बुलडोझर बाबा' हे नाव दिलं होतं. मात्र योगींचे विरोधक असलेल्या अखिलेश यादव यांनीही त्याचा वापर केला त्यामुळे सुद्धा हे नाव पडलं.
अखिलेश यादव यांनी खरं तर उपहासाने या नावाचा वापर केला. पण ज्येष्ठ पत्रकार शरत प्रधान म्हणतात, "भाजपने त्याचाही फायदा घेतला. कारण यामुळे आदित्यनाथ यांची प्रतिमा अधिकच मजबूत झाली."
योगी आदित्यनाथ यांच्या रॅलींदरम्यान बऱ्याच शहरांमध्ये बुलडोझर उभे करण्यात आले होते. आणि जेव्हा ते निवडणूक जिंकले तेव्हा विधानभवनाबाहेरही बुलडोझरची परेड काढण्यात आली.
'आवाज दडपण्यासाठी बुलडोझरचा वापर'
ज्येष्ठ पत्रकार आलोक जोशी सांगतात की, "योगी आदित्यनाथ यांनी सर्वांत पहिल्यांदा गुन्हेगार विकास दुबेच्या विरोधात बुलडोझरचा वापर केला. दुबेवर आठ पोलिसांची हत्या केल्याचा आरोप होता. यानंतर गुंड-राजकारणी मुख्तार अन्सारी यांच्याविरोधात बुलडोझरचा वापर करण्यात आला."
त्यांच्या मालमत्तेची तोडफोड केल्याचे व्हिडिओ नॅशनल टेलिव्हिजनवर दाखवले गेले. साहजिकच गुन्हेगारांच्या विरोधात खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल सरकारला लोकांचं समर्थन मिळालं.
"पण आता हा बुलडोझर विरोधकांवर आणि सरकारच्या टीकाकारांवर, विशेषत: मुस्लिमांच्या विरोधात डावपेच म्हणून वापरला जात असल्याचं," जोशी म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
सहारनपूर आणि प्रयागराजमध्ये बुलडोझर चालवण्याआधी एक बैठक झाली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ होते. तेव्हा ते म्हणाले होते की, गुन्हेगार आणि माफियांवर बुलडोझर चालवणं सुरूच राहील.
प्रधान म्हणतात की, "सरकारने मजबूत प्रशासनाचं प्रतीक अशी प्रतिमा असलेल्या बुलडोझरला एका अशा हत्यारात बदललंय, ज्याचा वापर करून कायद्याचं उल्लंघन आणि मुस्लिमांविरूद्ध द्वेषाचे राजकारण करणं सुरू आहे."
"हे म्हणजे असं झालंय की, तू माझ्यावर दगड टाकलास तर मी तुझं घर पाडीन. तुझ्या संपूर्ण कुटुंबाला धडा शिकवीन. स्थानिक गुंड असाच वागतो."
ते म्हणतात, "पण देशाचा कायदा तुम्हाला कोणत्याही मालमत्तेवर बुलडोझर चालवण्याची परवानगी देत नाही. जर कुटुंबातील एका सदस्य खून करतो तर त्यासाठी तुम्ही संपूर्ण कुटुंबाला फाशी द्याल का? पण हे सरकार फिर्यादी, न्यायाधीश, ज्युरी आणि जल्लाद अशा प्रत्येक भूमिकेत वावरताना दिसतंय."
जगभरात बुलडोझरवर भले ही टीका होत असेल, पण त्यामुळे योगी आदित्यनाथ यांना प्रचंड राजकीय मायलेज मिळतंय. आणि कदाचित या सर्व गोष्टींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही पाठिंबा मिळू शकतो, असं जोशींच म्हणणं आहे.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये यूपीच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, "जेव्हा एखाद्या माफियावर बुलडोझर चालतो, जेव्हा बेकायदेशीर इमारती पाडल्या जातात तेव्हा त्या पाडणाऱ्या लोकांनाही वेदना होतात."
पंतप्रधानांच्या वक्तव्यानंतर जातीय हिंसाचाराचा आरोप असलेल्यांवर बुलडोझरचा वापर केला जातोय. अलीकडेच मध्यप्रदेश आणि दिल्लीतही बुलडोझर वापरण्यात आला. अशा कारवाईत मुस्लिमांना टार्गेट करण्यात आलं. त्यांची घरं, छोटी दुकान आणि उद्योगांचं नुकसान झालं.
जोशी म्हणतात, "एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला असेल आणि न्यायालयाने त्याला दोषी ठरवले असेल तरी त्याचं घर पाडा, असं न्यायालयाने आपल्या आदेशात कधीच म्हटलं नाही. मग अशा परिस्थितीत जेव्हा प्रशासन एखाद्याच्या घरावर बुलडोझर चालवतं त्यावेळी फक्त एकचं मेसेज जातो, आणि तो म्हणजे जो कोणी आमच्या विरोधात उभा राहील त्याला जमीनदोस्त करण्यात येईल."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








