मुली असतातच बाबाला विरघळवून टाकणाऱ्या- ब्लॉग

फादर्स डे

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

आताशा कुठे ती मला ओळखायला लागलीय. हा माणूस आपला आहे हे माझ्या मुलीच्या आता लक्षात आलंय. समोर आलं की ती अजून दात नसलेलं तोंडाचं बोळकं पसरून एकदम मोकळेपणानं हसते. त्यात फक्त ओळख दाखवणं हे नसून ती तुझं 'आपलेपण' मला समजलंय हे सांगत असते.

या आपलेपणाच्या सुखावणाऱ्या भावनेबरोबर ती प्रचंड विश्वासाने खांद्यावर येते. खांद्यावर जेव्हा तिची इवलाश्या बोटांचा स्पर्श होतो किंवा तिचं हसू पाहायला मिळतं तेव्हा सर्वात उच्च कोटीचा आनंद होत असतो.

बाबा होणं म्हणजे फक्त कुटुंबात वाढ होणं असा कोरडा अर्थ नसून त्यात बरंच काही आहे हे आपल्या प्रत्येक दिवसानिशी जाणवायला लागतं. आता मी म्हणायला गेलं तर 'नवानवा' बाबा असलो तरी बाळाच्या वाढीबरोबर बाबांची वाढ अनुभवणं मजेदार आहे.

जानेवारीच्या थंडीत सकाळ-सकाळी डॉक्टरांनी एक चिमुकला गुंडा हातात आणून ठेवला. आपण बाबा झालो आहोत ही हातात असलेली मुलगी आपली आहे.

आपण ज्याची गेले नऊ महिने वाट पाहिली होती ते बाळ आता डोळे उघडून रडतंय असे अनेक विचार एकदम अगदी एका क्षणात डोक्यात पटापट येऊन गेले.

बाबा होणं... आपण निर्मितीच्या प्रक्रियेचे एक भाग झालो आहोत याची जाणिव आपल्या पत्नीच्या गरोदरपणापासूनच होत असते.

गरोदरपणाच्या या काळात आणि बाळाच्या जन्मानंतर आईमध्ये जसे जैवमानसशास्त्रीय बदल होतात तसे कदाचित बाबामध्येही होत असावेत. अर्थात हे व्यक्तिपरत्वे बदलतही असेल.

मुलीला आई होण्यासाठी निसर्ग जसा तिच्यात संप्रेरकांचा बदल घडवून आणत असेल माझ्या मते तसाच तो मुलालाही बाबा होण्यासाठी तयार करत असेल. त्याच्यात हे बाबापण तयार व्हावं यासाठी तो प्रयत्न करत असेल.

स्वस्थ बसून निरीक्षण केलं तर आपल्याला हे बदल जाणवू शकतील.

आई आणि मूल यांच्यात बंध निर्माण होण्यासाठी जसे जैवरासायनिक बदल बाळामध्ये आणि आईमध्ये होतात तसेच बाबांमध्येही होत असावेत.

पहिलं म्हणजे तुमच्या बाळाने तुमच्या, तुमच्या घराचा, त्याच्या नातलगांच्या, आजी-आजोबांच्या मनावर जबरदस्त पकड घेतलेली असते. घरातला हा नवा सदस्य सतत आनंदाचा आणि सुखाचा वर्षाव करत असतं.

सुखाच्या भावनेचा हा अनुभव सर्वात जास्त बाळाच्या आईला येत असतो. तिच्यापाठोपाठ तो सर्वात जास्त बाळाच्या बाबाला येत असावा असं मला वाटतं.

बाळ घरी आल्यावर ते तुमच्या मनाचा ताबा घेत नाही तर ते बाळ सगळ्या घराचं मालक होऊन जातं. आई-बाबांचं, आजी-आजोबांचं, नातलगांचं सगळं लक्ष वेधून घेतं. त्या घराचं केंद्रच होऊन जातं. सगळं घर बाळाच्या हुंकारावर, हास्यावर, हालचालीवर अगदी रडण्यावरही चालतं. त्यातही मुलींमध्ये ती शक्ती जास्त असावी असं वाटतं.

दुधाच्या बाटल्या, औषधं, दुपटी, लंगोट, खेळणी या गोष्टी एका पिढीच्या अंतराने घरात प्रवेश करत्या झालेल्या असतात. आता त्यांना मुख्य स्थान मिळालेलं असतं. घरात आलेली ही राणी सगळ्या दळाला नुसत्या आवाजाने आज्ञा देत असते आणि त्यानुसार दळ हलू लागतं.

फादर्स डे ओंकार करंबेळकर

फोटो स्रोत, Getty Images

आपल्या बाळाचं निरीक्षण करणं ही सर्वांत भारी गोष्ट आहे. आमच्याकडे असंच आहे. तिच्यासाठी जगातली प्रत्येक गोष्ट नवी आहे अगदी दिवस रात्रसुद्धा.

कदाचित रोज नव्या गोष्टीचा अनुभव घेत ती सरावत जातेय.

आजूबाजूच्या गोष्टींकडे ती पाहाते तेव्हा तिच्या डोळ्यांमध्ये आश्चर्य आणि कुतुहल भरलेलं असतं. स्वतःचेच पाय डोळ्यांसमोर आणून ते पकडायचा प्रयत्न करते.

आपल्याला पाय आहेत, त्यांना लहानशी बोटं आहेत याचंही तिला कुतुहल वाटत असेल.

एखाद्या वेलीनं आधाराला अलगद वेटोळे देऊन पकडावं तशी तिचं बोट माझ्या हाताचं बोटं पकडतात. ती बोटं नाजूक असली तरी पकड घट्ट आहे. त्यात तिला विश्वास वाटतो, आधारही वाटतो.

रोजच्या दुधाबरोबर आंब्यासारखा वेगळा पदार्थ ओठांजवळ नेला तर तिची जीभ वेगानं लपलप आवाज करते. हे सगळं पाहाणं मस्त असतं.

आपल्याला लहानपण आठवत असलं तरी इतक्या बालपणाच्या गोष्टी कधीच आठवणीत नसतात. आपण बाळ असताना कसे होतो, काय करायचो हे आपल्या घरातल्या लोकांनी सांगितलेलं असतं. पण आपल्या बाळाच्या निरीक्षणातून आपण ते अनुभवू शकतो.

झोप आणि भूक या दोनच खऱ्या गरजा आहेत हे बाळाकडे पाहिल्यावर लक्षात येतं. त्या गरजांच्या पूर्ततेसाठीच रडणं. ते ही त्या पूर्ण झाल्या की तात्काळ बटण दाबल्यासारखं रडणं थांबणं हा एक संवादच आहे.

हसतमुख राहाणं, कधी हुंकारासारखे आवाज काढणं किंवा रडणं हेच तिचे संवाद साधण्याचे सध्याचे मार्ग आहे. झोपेतलं तिचं हास्य बघून मनोरमाबाई रानडे यांची एक कविता वाचलेली अगदी मनापासून पटली. त्या लिहितात,

तुज काय वाटलें काय स्वप्न तुज पडलें?

झोंपेंत हांससी! मोह पडे मज बाळे!

जागृतींत चाळे अमित करुनि हांसविसी

निद्रेंत म्हणुनी का देव हांसवी तुजसी?

सतत हसणारी ही मुलगी तुम्हाला तुमच्या घरादाराला एकदम विरघळवून टाकते. आजवर अनेक मित्रांनी त्यांच्या मोबाईलमध्ये, पाकिटात, व्हॉट्सअपमध्ये त्यांच्य मुलांचे-बाळांचे फोटो लावलेले पाहिलेले, काही लोकांनी तर मुलांची नावं हातावर गोंदवून घेतलेली.

एका मित्राने त्याच्या मुलीच्या जन्मापासून प्रत्येक घटनेचा फोटो काढून एक अल्बम केलेला. प्रत्येक महिन्याचा, पहिल्यांदा केस कापले तेव्हा, पहिल्यांदा गाडीमध्ये बसली तेव्हा वगैरे असे अनेक फोटो त्याने मला दाखवले. हे सगळं दाखवताना तो पार हरवून गेलेला.

तेवढ्यापुरता तो वेगळ्याच जगात गेलेला. तेव्हा त्याची ती स्थिती पाहाताना गंमत वाटलेली, कौतुक वाटलेलं आणि थोडं हसूही आलेलं.

पण बाबालोकांचं हे असं का होतं हे बाबा झाल्यावरच समजलं.

फादर्स डे ओंकार करंबेळकर

फोटो स्रोत, Getty Images

मुलीचं बाबांशी आणि बाबाचं मुलीशी एक वेगळं नातं असतं हे आजवर ऐकलेलं ते अगदी तंतोतंत खरं आहे याची अनुभुती इतक्या लवकर येईल असं आजिबात वाटलं नव्हतं. पण तो सगळा दोष आपल्या गोड मुलीचाच असतो. त्या बाबाला विरघळवून टाकतात.

फक्त गालातल्या गालात हसून त्या बाबाला सहज खिशात टाकतात. तुम्ही कितीही त्रासलेले असाल, दमलेले असाल तिची एक स्निग्ध नजर सगळा कंटाळा पळवून लावते. मेंदूत एकदम सुखाचा झरा वाहू लागतो.

आपण आपल्या बाबांकडून नेहमीच एका संरक्षकासारख्या आधाराची अपेक्षा केलेली असते. ती त्यांनी निभावलेलीही असते. त्यामुळे येत्या काळात आपल्याला ही जबाबदारी पार पाडायची आहे याचं भान आलेलं असतं.

आपल्यासमोर वडिलांचा आदर्श असल्यामुळे त्या जबाबदारीची जाणिव असते. फक्त त्यात काळानुरुप बदल होत असतील. परंतु आपली मुलं आपल्याकडे आश्वासक नजरेने पाहात असतील या कल्पनेनं भारी वाटत असतं.

आपल्या घरात बाळ होणार आहे याची चाहूल लागल्यावर त्या चाहुलीपेक्षा वेगानं आपलं डोकं पळायला लागतं. रोजचा विचार सोडून पुढचा विचार करण्याची सवय जास्तच वेगाने पळू लागते.

एकदा एका डॉक्टरांनी मला थेट सांगितलं की, अरे जास्तीत जास्त पुढच्या तीन महिन्यांचा विचार आपण करावा. मूल जन्माला यायच्या आधी त्याला कुठल्या शाळेत घालायचा हा विचार करू नये.

'तुमची मुलं ही तुमची नसतात'अशा खलिल जिब्रान टाइप कविता किंवा तशाच उपदेशपर गोष्टी कितीहा वाचलेल्या असल्या तरी आपल्या मुलांबद्दल आई-बाबांच्या अपेक्षा असतात. किंबहुना त्यांच्या भविष्याबद्दल त्यांना काळजीपर विचार करायचे असतात.

माझंही तसंच आहे. मुलांवर तुमच्या अपेक्षांचं ओझं नको हा सल्ला चांगला असला तरी या सल्ल्याचा भडिमारही होता कामा नये.

एखादी गोष्ट आपल्या बाळानं करावी किंवा आपण मिळवलेला आनंद त्याच्याही वाट्याला यावा यासाठी प्रयत्न करणं काहीच चूक नाही. त्यात 'गिल्ट' येण्यासारखं काहीच नाही.

आपल्याद्वारे या जगात आलेलं बाळ ठाम पाय रोवून उभं राहावं असा विचार पालक नक्कीच करू शकतात.

फादर्स डे ओंकार करंबेळकर

फोटो स्रोत, Getty Images

आपण मुलांवर काही लादतोय वगैरे असा उगाच भाव मनात येऊ देऊ नये असं मला वाटतं. मुलं मोठी होईपर्यंत तरी त्यांच्या सुखदुःखासाठी आपण काळजी घेतली पाहिजे.

त्यात काहीच चूक नाही असं माझं स्वतःचं मत आहे.

उगाच खलील जिब्रानचं वाक्य डोक्यात घेऊन गोंधळून जाऊ नये. तुमची मुलं ही तुमचीच असतात.

आता माझी मुलगी रांगू लागेल, मग चालू-बोलू लागेल. माझं बाबापणही तिच्याबरोबर मोठं होत जाईल. ते मी एन्जॉय करणार आहेच.

आणि त्या डॉक्टरांनी सांगितलेल्या मंत्राप्रमाणे सध्या विचार फक्त पुढच्या तीन महिन्यांचाच....

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)