अनिल परब यांना ईडीचं समन्स, आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश #5मोठ्याबातम्या

अनिल परब

फोटो स्रोत, Getty Images

आज सकाळी विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. अनिल परब यांना ईडीचं समन्स, आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

शिवसेनेचे नेते अनिल परब यांना ईडीचं समन्स आलं आहे. दापोली रिसॉर्ट प्रकरणात ईडीने त्यांना आज (15 जून) चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले असल्याचं सकाळनं आपल्या बातमीत म्हटलं आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानावर ईडीने मागच्या काही दिवसांपूर्वी छापा टाकला होता.

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर मनी लॉड्रिंगचा आरोप करत काही पुरावे ईडी कार्यालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानावर आणि त्यांच्याशी संबंधित काही लोकांच्या घरी ईडीने धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर आता परब यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान ईडीने छापा टाकल्यावर परबांची तब्बल तेरा तास चौकशी करण्यात आली होती. चौकशी संपल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. "पर्यावरणाची दोन कलमे लावून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली." कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले होते.

2. अजित पवारांच्या स्पष्टवक्तेपणामुळे अडचण झाली - रोहित पवार

"छत्रपतिंचा तसंच क्रांतीज्योतींचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना पंतप्रधान साहेबांसमोर खडे बोल सुनावणाऱ्या अजित पवारांच्या स्पष्टवक्तेपणामुळे भाजपची नक्कीच अडचण होत असणार. म्हणूनच कदाचित भाजपने अजित पवारांना बोलू दिलं नसणार," असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली आहे.

देहूतल्या संत तुकाराम मंदिराच्या शिळेच्या लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. प्रोटोकॉलप्रमाणे अजित पवारांना पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणं बंधनकारक आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. पण त्यांना बोलू दिलं नाही.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाल्यानंतर सूत्रसंचालकांनी थेट पंतप्रधानांचे नाव पुकारलं. ही बाब लक्षात आल्यानंतर पंतप्रधानांनी हाताने इशारा करत अजित पवारांना बोलावं असं सांगितलं. पण सूत्रसंचालकांनी नावच न पुकारल्याने अजित पवारांना बोलण्याची संधी मिळाली नाही.

रोहित पवारांची फेसबुक पोस्ट

फोटो स्रोत, Facebook/Rohit Pawar

फोटो कॅप्शन, रोहित पवारांची फेसबुक पोस्ट

या सर्व प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपवर टीका केली आहे. अजित पवार यांना बोलू न देणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. तर रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट लिहित भाजपवर निशाणा साधला आहे.

वारकऱ्यांच्या कार्यक्रमात सर्व भेद, द्वेष, अहंकार विसरून सहभागी व्हायचे असतं. परंतु अहंकाराच्या आहारी गेलेल्या प्रदेश भाजपच्या नेत्यांकडून ही अपेक्षा करणे व्यर्थ आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

टीव्ही9मराठीने ही बातमी दिली आहे.

3. पंकजा मुंडे भाजपला ब्लॅकमेल करत आहेत- नारायण राणे समर्थकांचा आरोप

माजी मंत्री पंकजा मुंडे यांना विधान परिषद निवडणुकीत डावलल्यानंतर त्यांच्या संतप्त समर्थकांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली.

त्यानंतर तुळजापुरात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मोटार अडवल्याचा प्रकार घडला. या पार्श्वभूमीवर भाजपातील खदखद बाहेर पडत असताना पंकजा मुंडे भाजपाला ब्लॅकमेल करीत असल्याचा आरोप भाजपमधील राणे समर्थक संतोष पाटील यांनी केला आहे.

पंकजा मुंडे

फोटो स्रोत, @PANKAJAGOPINATHMUNDE

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला महाराष्ट्रात पर्याय नसल्याचा दावाही पाटील यांनी केला आहे. यासंदर्भात प्रसार माध्यमांना प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात संतोष पाटील म्हणाले की, "केवळ राजकीय द्वेषापोटी पंकजा मुंडे यांनी फडणवीस यांची प्रतिमा बहुजन समाजाविरोधी करण्याचा प्रयत्न चालवला आहे."

त्यांचा पक्षांतर्गत जाणीवपूर्वक सुरू असलेला संघर्ष योग्य नाही, असं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे.

लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

4. कोरोनामुळे स्मृती गेली, ईडीच्या प्रश्नांवर सत्येंद्र जैन यांचं उत्तर

आप नेते आणि नवी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना ईडीनं 30 मे रोजी अटक केली आहे. सत्येंद्र जैन यांना ईडीकडून मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

ईडीने चौकशीदरम्यान जैन यांना पैसे कुठून आले याबद्दल विचारलं. त्यावेळी सत्येंद्र जैन यांनी कोरोना संसर्गामुळे आपली स्मृती गेली असल्याचं उत्तर दिलं.

सत्येंद्र जैन

फोटो स्रोत, ANI

जैन यांच्या जामीन अर्जावर मंगळवार (14 जून) दिल्लीतील न्यायालयात सुनावणी पार पडली. त्यावेळी ईडीच्या वकिलांनी सत्येंद्र जैन यांच्याविषयी ही माहिती दिली.

ईडीचे वकिल अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. वी. राजू यांनी न्यायालयाला ही माहिती दिल्याचं महाराष्ट्र टाइम्सनं आपल्या बातमीत म्हटलंय.

दिल्लीतील न्यायालयानं जैन यांची ईडी कोठडी 13 जूनपर्यंत वाढवली होती. त्यानंतर मंगळवारी सत्येंद्र जैन यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करण्यात आली. आता 18 जून रोजी जैन यांच्या जामीन अर्जाबाबत निर्णय जाहीर होणार आहे.

5. एकाच वेळी दोन जागांवर निवडणूक लढवता येणार नाही?

केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करणे, ओपिनियन पोल आणि एक्झिट पोलवर बंदी घालणे यासह सहा महत्त्वाच्या मुद्द्यांवर केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला आहे. निवडणूक आयोगाच्या प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यास लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 37(1) मध्ये मोठा बदल होऊ शकतो.

निवडणूक आयोगाने एका उमेदवाराला केवळ एका जागेवरच निवडणूक लढवता येईल, असाही प्रस्ताव केंद्र सरकारला दिला आहे.

लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 33(7) नुसार एखाद्या उमेदवाराला सार्वत्रिक निवडणूक किंवा पोटनिवडणुकांचा एक गट किंवा दोन मतदारसंघातून द्विवार्षिक निवडणूक लढवण्याची परवानगी मिळते. निवडणूक आयोगाने 2004 मध्येच कायद्याच्या कलम 33(7) मध्ये दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव दिला होता.

या प्रस्तावानुसार एका उमेदवाराला केवळ एका जागेवरच निवडणूक लढवता येईल.

एबीपी माझानं हे वृत्त दिलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)