रुपाली चाकणकर : 'आपल्याला सत्यवानाची सावित्री समजली, मात्र जोतिबांची सावित्री अजून समजली नाही' #5मोठ्याबातम्या

रुपाली चाकणकर

फोटो स्रोत, @NCPRUPALICHAKANKAR

आज सकाळी विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. 'आपल्याला सत्यवानाची सावित्री समजली, परंतु ज्योतिबांची सावित्री अजून समजली नाही'

"वटपौर्णिमेनिमित्त अनेक महिला वडाला फेरे मारुन पुढचे सात जन्म हाच पती मिळू दे, अशी प्रार्थना करतात. पण मी लग्न झाल्यापासून एकदाही वडाला फेरे मारले नाहीत. माझ्या सासरच्या मंडळींनी देखील मला कधी आग्रह केला नाही वा माझ्या नवऱ्याने पण कधी तसा हट्ट केला नाही. याबाबत मी भाग्यवान आहे," असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

"आपल्या समाजाला सत्यवानाची सावित्री फार लवकर समजली, परंतु जोतिबाची सावित्री अजून समजली नाही," असंही रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय.

हेरवाडच्या धर्तीवर खडकवासला धायरीसह एकूण 29 ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा बंदी करणारा ठराव मंजूर केला. यावेळी आयोजित कार्यक्रमात महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर बोलत होत्या.

समाजात अनेक अनिष्ट प्रथा परंपरा प्रचलित असून राज्यातील प्रत्येक गावाने विधवा प्रथा मुक्तीचा ठराव करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं.

महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

2. अयोध्येत ठाकरे कुटुंबीयांना नव्हे तर फक्त राज ठाकरेंना विरोध- ब्रिजभूषण सिंह

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचं स्वागत केलं आहे.

ब्रिजभूषण सिंह

फोटो स्रोत, Getty Images

एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बृजभूषण सिंह यांनी म्हटलं की, राज ठाकरे या एकमेव व्यक्तीचा अपवाद वगळला तर ठाकरे कुटुंबीयांपैकी कुणाच्याही अयोध्या दौऱ्याला आपला विरोध नाही.

"महाराष्ट्रतील लोकांशी अयोध्यावासीयांचं कोणतंही शत्रूत्व नाही. आमचं शत्रूत्व हे फक्त राज ठाकरेंशी आहे. कारण त्यांनी उत्तर भारतीयांना अपमानित केले आहे. राज ठाकरे या एकमेव व्यक्तीचा अपवाद वगळला तर ठाकरे कुटुंबीयांपैकी कुणाच्याही अयोध्या दौऱ्याला आपला विरोध नाही. जर राज ठाकरे यांचं कुटुंब, त्यांची आई-मुलगा कोणीही येऊ दे... त्यांचं स्वागत आदरातिथ्य माझ्या घरी करेन. पण राज ठाकरेंना विरोध राहणार आहे," असंही ब्रिजभूषण यांनी म्हटलंय.

3. पैगंबरांच्या नावाखाली हिंसक निषेध सहन करणार नाही; मुस्लिम संघटना काढणार फतवा

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर देशात मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत.

'पैगंबरांच्या नावाखाली देशात चाललेला हिंसक निषेध सहन करणार नसल्याचं जमात उलेमा ए-हिंद या संघटनेनं जाहीर केलं आहे. इस्लामिक तत्वानुसार नुपूर शर्मा यांना माफ करायला हवं,' असं आवाहन त्यांनी मुसलमान बांधवांना केलं आहे.

जमातचे अध्यक्ष सुहैब यांनी म्हटलं, "आम्हाला देशभरात सुरु असलेला हा हिंसाचार मान्य नाही. भाजपाने नुपूर शर्मांना निलंबित केलं याचं आम्ही स्वागत करतो. पण इस्लामिक तत्वानुसार नुपूर शर्मांना माफ केलं जावं.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

आम्ही रसत्यावर उतरून नियम तोडायला आम्ही परवानगी देऊ शकत नसल्याचंही सुहैब यांनी म्हटलं. असदुद्दीन ओवैसी आणि मोहम्मद मदानी यांच्याविरोधातही फतवा काढणार असल्याचे सुहैब यांनी सांगितलं.

सरकारने मुस्लिम संघटना आणि त्यांना पैसे पुरवणाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी सुहैब यांनी केली आहे.

लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

4. LIC ठरला आशियातील तोटा झालेला सर्वांत मोठा आयपीओ

बाजार मूल्यात 17 बिलियनच्या मोठ्या घसरणीमुळे भारतीय आयुर्विमा महामंडळाला (LIC) या वर्षी आशियातील IPO मध्ये सर्वांत मोठा तोटा झाला आहे. या घसरणीसह एलआयसीचा आयपीओ गुंतवणूकदारांचे पैसे बुडवण्याच्या बाबतीत संपूर्ण आशियातील प्रथम क्रमांकाचा आयपीओ बनला आहे.

एलआयसी आयपीओ

फोटो स्रोत, Getty Images

स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध झाल्यापासून LIC चे बाजार मूल्य सुमारे 17 बिलियन डॉलरने कमी झाले आहे. त्यामुळे LIC चा IPO 2022 मध्ये आशियातील सर्वांत वाईट कामगिरी करणारा IPO बनला आहे. एलआयसीचा शेअर आयपीओच्या किंमतीपेक्षा 29 टक्क्यांहून अधिक घसरला आहे.

ब्लूमबर्गने तयार केलेल्या आकडेवारीनुसार, LIC चा IPO 17 मे रोजी सूचीबद्ध झाल्यापासून बाजार भांडवलात घट होण्यामध्ये आशियामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. LIC चं मार्केट कॅप 29 टक्क्यांनी घसरलं आहे. दुसरीकडे, दक्षिण कोरियाच्या एलजी एनर्जी सोल्युशन्सचा स्टॉक 30 टक्के कमी झाला आहे.

सकाळनं ही बातमी दिली आहे.

5. कोरोना अजून गेलेला नाही, राज्यांनी सतर्क रहावे - मनसुख मांडवीय

गेल्या काही दिवसांत देशातील कोरोना बांधितांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राने सोमवारी (13 जून) राज्यांची आढावा बैठक घेतली.

व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीत देशातील कोरोना संसर्गाची स्थिती, लसीकरण याचा आढाव घेण्यात आला.

कोरोना संपलेला नाही. त्यामुळे कोरोनाबाबत आखलेल्या नियमांची आणि लसीकरण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असं आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी या बैठकीत राज्यांना केल्याचं मिंटने आपल्या बातमीत म्हटलं आहे.

कोरोनाबाधित रुग्णाशी संपर्कात आलेल्यांचा शोध आणि कोरोना विषाणूच्या जिनोम सिक्वेन्सिंगकडेही लक्ष ठेवण्याचं आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी केलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)