नुपूर शर्मा: ज्यांचे घर बुलडोझरने पाडलं ते जावेद मोहम्मद कोण आहेत?

फोटो स्रोत, ANI
- Author, अनंत झणाणे
- Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी, प्रयागराजहून
उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज इथे नमाजानंतर उफाळलेल्या हिंसाचारात आणि दगडफेक प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 92 लोकांना अटक केली आहे. पोलिसांनी एफआयआरमध्ये 70 लोकांची नावं नमूद केली आहेत. 29 गंभीर आरोपांसाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी पोलिसांच्या उपस्थितीत प्रयागराज डेव्हलपमेंट ऑथॅरिटीने (पीडीए) या प्रकरणातील मुख्य आरोपी जावेद मोहम्मदचं घर बुलडोझरने उद्ध्वस्त केलं.
त्यांच्या घरावर याआधी नोटीस पाठवण्यात आली होती. बुलडोझर का चालवण्यात येईल यासंदर्भातील कारणं यात देण्यात आली होती. नोटिशीनुसार अनधिकृत पद्धतीने घर बांधल्याप्रकरणी 10 मे रोजी कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. यासंदर्भात सुनावणीसाठी 24 मे तारीख निश्चित करण्यात आली होती.
पीडीएच्या दाव्यानुसार, "जावेद मोहम्मद तसंच त्यांचे वकील यांना घर अधिकृत आहे यासंदर्भात कोणताही पुरावा तसंच युक्तिवाद देता आला नाही. 25 मे रोजी जावेद मोहम्मदला आदेश देण्यात आला की 9 जूनपर्यंत घर तोडून टाकावं. त्याने तसं केलं नाही. त्यामुळे 12 जूनला सकाळी 11 वाजेपर्यंत घर रिकामं करण्याचे आदेश देण्यात आले होते. रविवारी सकाळी पीडीएने बुलडोझर कारवाई करत घर तोडलं."
पोलिसांचा दावा
प्रयागराजचे एसएसपी अजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, "हिंसाचाराच्या घटनेबाबत तत्परतेने कारवाई करण्यात आली आहे. सबळ पुरावे मिळाले तरच पुढची कारवाई करण्यात येईल. याप्रकरणात निरपराधांना कोणत्याही कारवाईला सामोरं जावं लागणार नाही."
अजय कुमार यांनी सांगितलं की, "रविवारी जावेद मोहम्मद उर्फ जावेद पंप नावाच्या आरोपीच्या घरावर अनधिकृत असल्याने जिल्हा प्रशासन आणि पीडीएने कारवाई केली. आतापर्यंत गोळीबार आणि दगडफेकीचं जे प्रकरण आहे त्यात जावेद मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलं आहे. यादरम्यान त्याच्या घराची झडती घेण्यात आली. ज्यामध्ये बेकायदेशीर पद्धतीने शस्त्रं आणि आक्षेपार्ह पोस्टर सापडलं आहे. 12 बोर रायफल, 315 बोर रायफल आणि अनेक काडतुसांचा समावेश आहे. काही कागदपत्रंही सापडली आहेत."

फोटो स्रोत, ANI
घरातून जप्त करण्यात आलेल्या गोष्टींसंदर्भात एसएसपी अजय कुमार म्हणाले, "जावेदने न्यायालयावर आक्षेपार्ह आणि टोकाच्या भाषेत टीका केली आहे."
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, "या सगळ्या गोष्टींचा पुराव्यामध्ये समावेश करण्यात येणार आहे जेणेकरून न्यायालयासमोर सादर करता येईल."
जावेदच्या घरातून काही पुस्तकं, साहित्य, झेंडा, पोस्टर, बॅनर हेही सापडलं आहे. या सगळ्याची पडताळणी केली जाईल. हे कोणी लिहिलं आहे, का लिहिलं आहे, लिहिणाऱ्याच्या काय भावना आहेत हे तपासलं जाईल.
मुलांना पुढे करून दंगल भडकावणे, दगडफेक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असं पोलिसांनी सांगितलं.
आतापर्यंत काय काय झालं?
- मोहम्मद पैगंबरांसंदर्भात आक्षेपार्ह उद्गारांसंदर्भात शुक्रवारच्या नमाजानंतर रांची, हावडासह अनेक शहरांमध्ये आंदोलन झालं.
- उत्तर प्रदेशात कानपूर, सहारनपूरसह प्रयागराज या शहरात आंदोलनादरम्यान हिंसाचार उसळला. 306 लोकांना अटक करण्यात आली.
- टीव्ही चॅनेलवरील कार्यक्रमात बोलताना भाजपच्या तत्कालीन प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबरांसंदर्भात आक्षेपार्ह उद्गार काढले.
- या वक्तव्यावरून देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटली. व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर कतार, सौदी अरेबिया, कुवेत, बहरीन, संयुक्त अरब अमिरातीसह अनेक देशांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत जाब विचारला. हे सगळे मुस्लीमबहुल देश असून त्यांच्यासाठी मोहम्मद पैगंबर श्रद्धेय आहेत.
- विरोध वाढू लागल्यानंतर भाजपने नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केलं.
- भाजपने मीडिया सेलचे प्रमुख नवीन कुमार जिंदल यांना याविषयासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी निलंबित केलं.
बुलडोझरची कारवाई झालेलं घर कोणाच्या नावावर?
पीडीएने घरावर लावलेल्या नोटिशीनुसार घर जावेद मोहम्मदच्या नावे आहे. पण जावेदच्या वकिलांनी अलाहाबाद न्यायालयात केलेल्या याचिकेत म्हटलं आहे की जे घर बुलडोजरने पाडण्यात आलं ते जावेद मोहम्मदच्या नव्हे तर त्याची पत्नी परवीन फातिमा यांच्या नावावर आहे. परवीन यांना हे घर लग्नाआधी आईवडिलांकडून भेट म्हणून मिळालं होतं.
वकिलांनी याचिकेत म्हटलं आहे की, "जावेद यांच्या नावे घर नाही. ते घराचे मालक नाहीत. बुलडोझरने केलेली कारवाई कायद्याच्या विरोधात आहे. हा जावेद यांच्या कुटुंबीयांवर झालेला अन्याय आहे."

फोटो स्रोत, KK ROY
जावेद मोहम्मद यांचे वकील केके रॉय यांनी आरोप केला की, "घर पाडण्याची कारवाई वैध ठरावी यासाठी 11 जूनला घरावर नोटीस लावण्यात आली. यावर मागच्या एका तारखेचा संदर्भ देण्यात आला. ही कारणे दाखवा नोटीस जावेद किंवा त्याची पत्नी फातिमा यांना कधीही मिळाली नाही."
मुस्लिम पर्सनल लॉ नुसार मुस्लीमधर्मीय महिलेला भेटीत मिळालेली संपत्ती मरेपर्यंत त्या महिलेचीच राहते. संपत्तीसंदर्भात हिंदू कायदा मुस्लीम कायद्यांपेक्षा वेगळा आहे. या न्यायाने त्या घराची मालकी परवीन फातिमा यांच्याकडे आहे आणि प्रशासनाने नोटीस पाठवली जावेद मोहम्मद यांना. हे घर जावेद यांचं नाहीच. पण तुम्ही याकडे लक्षच दिलं नाहीत असं रॉय यांनी सांगितलं.
उद्धवस्त करण्यात आलेलं घर पुन्हा उभारलं जात नाही तोवर लढत राहीन असं रॉय यांनी सांगितलं. यासाठी सर्वोच्च न्यायालयाही दाद मागेन असं ते म्हणाले.
रॉय यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात बीबीसीने पीडीए, प्रयागराजचे जिल्हाधिकारी, एसएसपी, प्रयागराज डेव्हलपमेंट ऑथॅरिटीचे व्हीसी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण ही बातमी प्रसिद्ध होईपर्यंत यांच्यापैकी कुणाशीही संपर्क होऊ शकला नाही.
जावेद मोहम्मद कोण आहे?
जावेद मोहम्मदचे वकील आणि त्याला जवळून ओळखणाऱ्यांपैकी एक वकील के. के. रॉय हे आहेत. त्यांच्या मते जावेद विद्यार्थी राजकारणात सक्रिय होता. जावेद यांच्याशी मैत्री याच काळात झाली. मुस्लिमांसंदर्भात ज्या समिती होत्या त्यात जावेद असे.
जावेद एक बिनधास्त माणूस आहे. जिल्हा प्रशासनाशी तो संलग्न होता. जो माणूस 20 वर्षं समाजसेवा करतो आहे, ज्याच्याविरुद्ध छोटा गुन्हादेखील नाही, गुन्ह्यांमध्ये दोषी आढळलेल्या आरोपींबरोबर ज्याची उठबस नाही. त्यांच्या आणि माझ्याविरोधात शांतताभंगाचं गुन्हा दाखल झाला आहे तोही मॅजिस्ट्रेटसमोर. सगळी आंदोलनं शांततामय पद्धतीने झाली होती. कोरोना काळात त्यांनी लोकांची मदत केली.
के. के. रॉय यांच्या मते, जावेद मोहम्मद प्रयागराज प्रशासनाचे लाडके आहेत. ईद, बकरी ईद, चाँदरात, शुक्रवारचा नमाज या मोठ्या सणांच्या वेळी खास व्यवस्था करायची असेल तर जावेद मोहम्मद प्रशासनाला मदत करण्यात आघाडीवर असत. ते अचानक हिंसेचे मास्टरमाईंड कसे असतील? ते मास्टरमाईंड आहेत तर त्यांचं घर पाडा. पण ते घर जावेद यांच्या नावावर नाहीच.

फोटो स्रोत, ANI
जावेद दिल्ली वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाशी संलग्न आहेत. या संघटनेचे संस्थापक एसक्यूआर इलियास आहेत.
वेल्फेअर पक्षाआधी ते जनता दलात होते. 2022 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांआधी एसक्यूआर इलियास, जावेद मोहम्मद यांच्यासह अखिलेश यादव यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. आम्ही एकत्र निवडणूक लढवू अशी घोषणा त्यांनी केली होती. जावेदला वेल्फेअर पक्षाकडून उमेदवारी हवी होती. पण त्यांना संधी देण्यात आली नाही. पण ते आघाडीच्या राजकारणाचे समर्थक होते.
जावेद मोहम्मद यांचं दुकान आहे. एक किंवा दोन हॉर्सपॉवर असलेल्या मोटारपंपांचा त्याचा व्यवसाय आहे असं केके रॉय यांनी सांगितलं.
जावेद मोहम्मद यांनी 10 जूनला बंदची हाक दिली होती का? या प्रश्नाबाबत केके रॉय सांगतात, अगदीच नाही. त्यांनी बंदचं खंडन केलं होतं. बंदचा जो व्हॉट्सअप मेसेज फिरतो आहे तो नकली आहे.
दुसरीकडे प्रयागराज प्रशासनाचा दावा आहे की मुख्य आरोपी जावेद मोहम्मदच आहे.
जावेद मोहम्मद यांची मुलगी आफरीन फातिमा कोण?
के. के. रॉय यांनी जावेद मोहम्मद यांच्या मुलीबाबत सांगितलं. आफरीन अलीगढ मुस्लीम विद्यापीठाच्या महिला कॉलेजच्या विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आहे. ती हुशार विद्यार्थिनी आहे. जवाहरलाल नेहरू (जेएनयू) विद्यापीठात विद्यार्थी संघटनेची पदाधिकारी होती. आता ती संशोधन करते आहे.
आफरीनवर कारवाईसंदर्भात प्रयागराजचे एसएसपी अजय कुमार यांनी सांगितलं की, जसं मी शनिवारी सांगितलं हिंसेनंतर आमची पथकं सातत्याने तपास करत आहेत. पुरावे मिळाल्यानंतरच कारवाई करण्यात येईल. पुराव्याविना कोणावरही कारवाई करण्यात येणार नाही.

फोटो स्रोत, ANI
शनिवारी एसएसपी अजय कुमार यांचं वक्तव्य समोर आलं होतं. त्यात ते म्हणाले होते जावेद यांची चौकशी करण्यात आली. त्यांची मुलगी जेएनयूमध्ये शिकते आहे. वडिलांना सल्ला देत असते.
जावेद हे कोणाशी सल्लामसलत करत असे हे पोलीस तपासत आहेत. जावेदच्या फोनमध्ये अनेक फोननंबर मिळाले आहेत जे डिलिट करण्यात आले आहेत. व्हॉट्सअप मेसेजही डिलिट करण्यात आले आहेत. हे मेसेज पुन्हा मिळवण्यासाठी जावेद यांचा फोन फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे.
प्रयागराज पोलीस जावेद मोहम्मद यांच्या मुलीचीही चौकशी करणार का? यासंदर्भात एसएसपी अजय कुमार यांनी सांगितलं की, "सुरुवातीच्या चौकशीत काही गोष्टी समोर आल्या आहेत. ठोस पुरावे मिळाले तर कारवाई करायला मागेपुढे पाहणार नाही. तात्काळ अटकेसाठी आम्ही आमची पथकं दिल्लीला पाठवू. दिल्ली पोलिसांना विनंती करू."
बीबीसीने आफरिनशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याशी बोलणं होऊ शकलं नाही.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








