Sensex, Nifty मध्ये इतकी घसरण का होतेय?

सोमवारी (13 जून) राष्ट्रीय शेअर बाजार निफ्टी आणि मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स असे दोन्ही निर्देशांकांमध्ये अडीच टक्क्यांपेक्षा जास्त घसरण दिसत आहे.

निफ्टीमध्ये 400 अंशांपेक्षा जास्त घसरणीमुळे हा निर्देशांक 15,800च्या खाली गेला आहे. तर सेन्सेक्सचा स्तर 52,800च्या खाली गेला आहे. सेन्सेक्समध्ये 1400 अंकांची घसरण पाहायला मिळत आहे.

बँक, ऑटो, फार्मा अशी सगळीच क्षेत्रं लाल रंगात आहेत. गेल्या आठवड्यात अमेरिकेत महागाई दराचे आकडे प्रसिद्ध झाले. आणि तिथे अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजे 8.6% इतकी महागाई आहे. त्यामुळे जगभरातल्या शेअर बाजारात शुक्रवारपासूनच नरम गरम वातावरण होतं.

आता अमेरिकन मध्यवर्ती बँक म्हणजे फेडरल बँकेचं पतधोरण बुधवारी जाहीर होणार आहे. भारताप्रमाणे तिथेही कर्जाचे व्याजदर वाढवले जाण्याची शक्यता आहे. त्याचाच परिणाम जगभरातल्या शेअर बाजारात जाणवत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 120 डॉलर प्रती बॅरलवर पोहोचल्यात. भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत 78 रुपयांच्या नीच्चांकावर पोहोचला आहे. तर जपानी येनही वीस वर्षांतल्या नीच्चांकी स्तरावर आहे.

या सगळ्याचा परिणाम म्हणून जगभर शेअर बाजारात मंदीचंच वातावरण आहे. आणि परकीय गुंतवणूकदार संस्थांनी केलेल्या जोरदार विक्रीमुळे भारतीय शेअर बाजारातही विक्रीचा जोर दिसून येत आहे.

सोमवारी (13 जून) भारतीय शेअर बाजार सुरू झाले तेव्हा पहिल्या पन्नास कंपन्यांपैकी सन फार्मा आणि पॉवरग्रिड हे दोनच शेअर हिरव्या रंगात होते. थोड्याच वेळात त्यांच्यामध्येही विक्रीचा सपाटा सुरू झाला.

केंद्र सरकारने गाजावाजा करून एलआयसी कंपनीचा आयपीओ मे महिन्यात बाजारात आणला. सलग दहाव्या दिवशी या शेअरमध्येही घसरण दिसून येत आहे. सोमवारी 4 टक्क्यांच्या घसरणीसह हा शेअर 700च्याही खाली गेला आहे.

जगात काही ठिकाणी वाढणाऱ्या कोव्हिड केसेस्, तेलाच्या वाढत्या किमती, कर्जाचे वाढते व्याजदर आणि महागाई दर यामुळे येणारे काही दिवस ही परिस्थिती अशीच राहील असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

या आठवड्यात शेअर बाजार खालीच राहील. आणि निफ्टीचा स्तर येणारे काही दिवस 16,000 ते 16,400 असा असेल असा टेक्निकल अॅनालिस्ट संमित चव्हाण यांचा अंदाज आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.)