बंगाली अभिनेत्रींच्या आत्महत्येच्या घटना का वाढताय, चमचमत्या ग्लॅमरमागचं वास्तव काय?

मनोरंजन, अभिनेत्री, टॉलीवूड, आत्महत्या, मानसिक आरोग्य

फोटो स्रोत, PALLAVI SOCIAL MEDIA PAGE

फोटो कॅप्शन, पल्लवी
    • Author, प्रभाकर मणी तिवारी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी, कोलकत्याहून

"अभिनेत्री पल्लवी डे हिने आत्महत्या केल्यानंतर मला माझ्या मुलीची काळजी वाटू लागली होती. पल्लवीसारखीच तीही एकटीच रहायची. तिनेही पल्लवीसारखा चुकीचा निर्णय घेतला तर, अशी धास्ती वाटायची."

कोलकत्यातली उदयोन्मुख मॉडल विदिशा डे मजूमदारचे वडील विश्वजीत डे मजूमदार सांगत होते. ते सांगत होते, "माझी मुलगी संघर्षाला घाबरून पळ काढण्याचा मार्ग निवडेल, असं मला कधीच वाटलं नव्हतं."

पल्लवीच्या आत्महत्येची बातमी कळाल्यापासून विदिशाची आई खूप घाबरली होती आणि त्यांनी ही भीती विदिशाकडे बोलूनही दाखवली होती.

पण, तेव्हा विदिशा म्हणाली होती, "अरे! पल्लवीने मूर्खपणा केला. मी स्ट्राँग मुलगी आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी असं काही करणार नाही."

मात्र, असं म्हणणाऱ्या पल्लवीने केवळ दहा दिवसातच स्वतःही आत्महत्या केली. विदिशाच्या आत्महत्येनंतर तिची आणखी एक मॉडल मैत्रिण मंजुषा निगोयी हिनेही तशाच प्रकारे आत्महत्या करत आयुष्य संपवलं.

मंजुषाची आई सांगते, "विदिशाच्या मृत्यूनंतर माझ्या मुलीला नैराश्याने ग्रासलं. ती सारखी विदिशाविषयी बोलायची."

पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये मे महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात तीन उदयोन्मुख अभिनेत्री आणि एका मॉडेलच्या आत्महत्येने टॉलीवुड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगाली फिल्म जगत हादरलं आहे.

चमचमणारी फिल्मी दुनिया

या आत्महत्यांचा संबंध चमचमणाऱ्या फिल्मी दुनियेच्या खाली असलेला अंधार आणि संघर्षात आलेलं अपयश याच्याशी जोडून बघितलं जातंय. एखाद्या प्रकरणात प्रेमभंगही कारण असू शकतं.

मात्र, या चौघींच्या आत्महत्येमागचं मूळ कारण नैराश्य आहे, हे स्पष्ट आहे. या सगळ्या घटनांबाबत लोक फारसं बोलायला तयार नाही.

आत्महत्या एक गंभीर मानसिक आणि सामाजिक समस्या आहे. तुम्हीही नैराश्याचा सामना करत असाल तर केंद्र सरकारच्या 18002333330 या जीवनसाथी हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करून मदत मिळवू शकता. आपले नातेवाईक आणि मित्रांशीही तुम्ही बोललं पाहिजे.

या घटनांमुळे सिनेमांमध्ये एका रात्रीतून फेमस होण्यासाठीचे प्रयत्न, संघर्ष आणि यात अपयश आलं की पळ काढण्याचा गंभीर मुद्दा अधोरेखित झाला आहे. एका पंधरवाड्याच्या आता झालेल्या या चार आत्महत्यांमुळे बांगला चित्रपट आणि मालिकांच्या जगावर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे.

फिल्मी दुनियेचं ग्लॅमर बघून अनेक तरुण-तरुणी या मोहाकडे आकर्षित होतात. पण, या दुनियेच्या आतला काळोख आणि चिखल बघून लवकरच त्यांचा रसभंग होतो. चित्रपट उद्योगातील लोकांसोबतच मानसोपचारतज्ज्ञही यावर काळजी व्यक्त करतात. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी या घटनांमधून धडा घेऊन पावलं उचलण्याची गरज ते व्यक्त करतात.

एका ढोबळ अंदाजानुसार बांगलाच्या छोट्या पडद्यावर तयार होणाऱ्या मालिकांवर दरवर्षी जवळपास 100 कोटी रुपये खर्च होतात. मात्र, कोरोनाकाळात दीर्घकाळ शूटिंग पूर्णपणे बंद होतं. त्यामुळे या इंडस्ट्रीचं मोठं नुकसान झालं आणि रोजगाराच्या संधीही आटल्या.

यापूर्वीही झाल्या आहेत आत्महत्या

बंगाली चित्रपटसृष्टीत विशेषतः तरुण अभिनेत्रींच्या रहस्यमयी मृत्यूचा इतिहास फार जुना आहे. 1985 साली सुप्रसिद्ध बांगला अभिनेत्री महुआ राय चौधरी हिचा जळून मृत्यू झाला होता.

2015 साली उदयोन्मुख अभिनेत्री दिशा गांगुलाचा मृतदेह तिच्या फ्लॅटमध्ये आढळून आला होता. 2016 साली पूजा आयीच या अभिनेत्रीचाही संशयस्पद मृत्यू झाला होता. 2017 साली अभिनेत्री बितस्ता साहा ही अभिनेत्रीही तिच्या घरात मृत आढळली होती.

2018 साली पायल चक्रवर्ती या अभिनेत्रीचाही सिलिगुडीच्या एका हॉटेलच्या खोलीत मृत्यू झाला होता. तर 2020 साली आर्या बॅनर्जी या अभिनेत्रीचाही तिच्याच फ्लॅटमध्ये मृत्यू झाला होता.

आर्याने 'लव्ह, सेक्स और धोका' आणि 'द डर्टी पिक्चर' अशा अनेक सिनेमांमध्ये काम केलं होतं. या अभिनेत्रींच्या संशयास्पद मृत्यूनंतर बांगला चित्रपट सृष्टीत काही दिवस अगदी तशीच खळबळ होती जशी शांत पाण्यात दगड फेकल्यानंतर असते. मात्र, काही दिवसांनंतर पुन्हा सगळं जैसे थे.

अलीकडच्या काळातील घटना

सर्वांत आधी छोट्या पडद्यावरची अभिनेत्री पल्लवी डे हिने स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्या 15 मे रोजी तिचा मृतदेह आढळून आला होता. त्यावेळी ती तिचा लिव्ह-इन-पार्टनर साग्निक चक्रवर्ती याच्यासोबत रहात होती.

मात्र, तिच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी आपल्या मुलीची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला होता. पल्लवीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन दिवसांनंतर साग्निकला अटक केली होती.

मनोरंजन, अभिनेत्री, टॉलीवूड, आत्महत्या, मानसिक आरोग्य

फोटो स्रोत, PALLAVI SOCIAL MEDIA PAGE

फोटो कॅप्शन, पल्लवी

सध्या पल्लवी बंगाली मालिका 'मन माने ना' मध्ये मुख्य भूमिका साकारत होती. यापूर्वी 'आमी सिराजेर बेगम', 'रेशमा जापी', 'कुंजो छाया' और 'सरस्वती प्रेम'सारख्या मालिकांमध्येही ती महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसली होती.

पल्लवी डेच्या आत्महत्येनंतर विदिशा डे मजूमदार या अभिनेत्रीने फेसबुक पेजवर "हे काय आहे? माझा यावर विश्वासच बसत नाहीय," असं लिहीत आश्चर्य व्यक्त केलं होतं.

मात्र, दहा दिवसांनंतर, 25 मे रोजी विदिशानेही आत्महत्या केली. कोलकात्यातील डमडम भागातील तिच्या फ्लॅटमध्ये तिचा मृतदेह आढळून आला.

मनोरंजन, अभिनेत्री, टॉलीवूड, आत्महत्या, मानसिक आरोग्य

फोटो स्रोत, VIDISHA SOCIAL MEDIA PAGE

फोटो कॅप्शन, विदिशा

दोनच दिवसांनी 27 मे रोजी विदिशाची जवळची मैत्रीण मंजुषा नियोगी हिनेही आत्महत्या केली. ती 'कांची' या बांगला मालिकेत काम करत होती.

त्यानंतर सरस्वती दास नावाच्या एका उदयोन्मुख मॉडेलनेही अशीच आत्महत्या केली. तिने याच वर्षी दहावीची परीक्षा दिली होती आणि सोबतच मॉडलिंगच्या दुनियेत प्रवेश करण्याचा तिचा प्रयत्न सुरू होता.

पोलीस काय म्हणतात?

सरस्वती प्रेमभंगामुळे नैराश्यात असल्याचं कोलकाता पोलिसांचं म्हणणं आहे. पोलीस अधिकारी सांगतात, "मंजुषाला मनोरंजन विश्वात नाव चमकवण्याची घाई होती. पण, कदाचित अपेक्षित यश न मिळाल्याने तिला नैराश्याने ग्रासलं. यापूर्वीही तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पण, त्यावेळी तिच्या एका मित्रानेच तिला वाचवलं."

मंजुषा पती आणि आई-वडिलांशीही तिच्या नैराश्याविषयी बोलली होती, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

मनोरंजन, अभिनेत्री, टॉलीवूड, आत्महत्या, मानसिक आरोग्य

फोटो स्रोत, MANJUSHA SOCIAL MEDIA PAGE

फोटो कॅप्शन, मंजुषा आपल्या पतीबरोबर

बंगली अभिनेत्री इंद्राणी हालदार म्हणतात, "कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसात हे क्षेत्र अनेकांना निष्ठूर वाटू शकतो. बरेचदा दीर्घकाळ काम मिळत नाही. असा काळ परीक्षा घेणारा ठरतो. मी ही त्यातून गेले आहे. पण, माझ्या मनात कधीही आत्महत्येचा विचार आला नाही."

मालिकांच्या निर्मितीशी संबंध असणारे सुप्रियो म्हणतात, "फिल्मी दुनियेच्या झगमगाटाने आकर्षित होऊन इथे पाऊल ठेवणारे तरुण-तरुणी अचानक मिळालेलं नाव, पैसा आणि व्यस्तता पचवू शकत नाही. कोव्हिडमुळे कुणीही नवीन सिनेमे किंवा मालिका बनवत नव्हते. त्यामुळे अनेकांची कामं अचानक बंदी झाली. यामुळे विशेषकरून तरुण कलाकारांमध्ये निराशा आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली."

मानसिक नैराश्य

बंगाली चित्रपट आणि मालिका विश्वात मानसिक नैराश्याची समस्या खरंच गंभीर रूप धारण करत आहे का? पल्लवी डेचा लिव्ह-इन-पार्टनर साग्निकने पोलिसांना सांगितलं होतं की पल्लवी ज्या मालिकेत काम करत होती ती लवकरच संपणार होती. यामुळे तिला काळजी वाटत होती. तिच्याकडे दुसरं काम नव्हतं.

साग्निकच्या दाव्याची सत्यता पडताळून बघण्यासाठी पोलिसांनी पल्लवीच्या सहकलाकारांची चौकशी केली. त्यांनीही शूटिंग बंद होणार असल्याने पल्लवी काळजीत होती आणि नवीन कामाच्या शोधात होती, असं सांगितलं.

मनोरंजन, अभिनेत्री, टॉलीवूड, आत्महत्या, मानसिक आरोग्य

फोटो स्रोत, MANJUSHA SOCIAL MEDIA PAGE

फोटो कॅप्शन, मंजुषा

एक मॉडल शुभांगी (बदललेलं नाव) सांगते, "प्रतिभा असलेल्या लोकांसाठी काम कमी नाही. पण, प्रतिभा असणाऱ्यांना कायमच काम मिळतं, असंही नाही. काही जणांना ओळखीतून बरंच काम मिळतं. त्यामुळे कमी ओळखी असणाऱ्यांना काम कमी मिळतं. परिणामी ते हळूहळू नैराश्याच्या गर्तेत अडकत जातात."

तर याच इंडस्ट्रीत काम करणारी अभिनेत्री दिया मुखर्जीच्या मते काही घटनांमुळे संपूर्ण इंडस्ट्रीच नैराश्यात असल्याचं म्हणणं योग्य नाही. रोजगाराच्या सर्वच क्षेत्रात नैराश्य आहे. चित्रपटांमध्ये काम करणारेही याच समाजाचा भाग आहेत.

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रीना घोष सांगतात, "कामाचं प्रेशर, कामाचे तास ठरलेलं नसणं, अति महत्त्वाकांक्षा आणि बरेचदा अपेक्षित समर्थन न मिळणं, हे सर्वही नैराश्याला कारणीभूत ठरतात. अनेकजण प्रेशर हँडल करू शकत नाही आणि कोलमडतात. अनेक मुली कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन हे क्षेत्र निवडतात. पण, या क्षेत्रात अपेक्षित यश न मिळाल्याने आता कुठल्या तोंडाने घरी परत जायचं, या विचाराने नैराश्यग्रस्त होतात."

मानसोपचारतज्ज्ञ अनुरुपा बॅनर्जी म्हणतात, "सामान्यपणे अशा घटना लवकरच विस्मृतीत जातात. मात्र, भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नये, यासाठी याच्या तळाशी जाऊन नैराश्याची नेमकी कारणं हुडकून काढयला हवी."

बंगाली फिल्म आणि टेलिव्हिजन उद्योगात गेली अनेक वर्ष काम करणारे एक गृहस्थ नाव न छापण्याच्या अटीवर बीबीसीशी बोलताना म्हणाले, "हल्ली या क्षेत्रात विशेषतः जे नवीन लोक येत आहेत त्यांना शॉर्टकटने यश मिळवायचं आहे. पण, यश मिळवण्यासाठी मेहनत आणि मोठा संघर्ष करावा लागतो, हे त्यांना कळत नाही. उदयोन्मुख कलाकार एका रात्रीतून फेमस होण्याचं स्वप्न घेऊन या इंडस्ट्रीत पाऊल ठेवतात, मात्र, इथल्या कटू सत्याचा सामना झाल्यावर त्यांचा स्वप्नभंग होतो आणि मग अपयश पदरी येत असल्याचं बघून पळ काढण्याचा प्रयत्न करतात."

हल्ली तर दहावी, बारावीतल्या मुलीही मालिकांमध्ये काम करण्यासाठी येत असल्याचं ते सांगतात. एखाद्या मालिकेत काम करून मिळालेल्या पैशांमुळे त्यांचं रहाणीमानच बदलतं. पण, पुढे काम मिळालं नाही की त्या खचून जातात, त्यांना नैराश्य येतं.

नैराश्यग्रस्त रुग्णांसाठी काम करणारी आणखी एका बिगर-सरकारी संघटनेचे संचालक धीरेन कुमार दास सांगतात, "कुणीही अचानक आत्महत्या करत नाही. काही दिवसांआधीपासूनच त्याचे संकेत मिळत असतात. अशा लोकांवर जवळून लक्ष ठेवलं तर अनेकांचे प्राण वाचू शकतात. शिवाय, अशा लोकांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारण्यापेक्षा वेळीच डॉक्टरांची मदत घ्यावी."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)