पोटातली बाळं आणि 25 दिवसांच्या तान्ह्यासह तीन सख्या बहिणींचा मृत्यू, हत्या की आत्महत्या हे गूढ

राजस्थान

फोटो स्रोत, MOhar sing Meena/ BBC

    • Author, मोहर सिंग मीणा
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

एका शेतात सर्जिकल ग्लोव्हज आणि मास्क अस्तव्यस्त पडलेत. जवळच एक विहीर आहेत. वरून पाहिलं तर पाणी दिसतं, पण विहीर खोल आहे. बाहेरची जमीन ओली आहे, जणू काही थोड्याच वेळापूर्वी यातलं पाणी बाहेर काढून जमिनीवर सांडलं आहे.

आम्ही इथे पोचलो त्याच्या काही मिनिटं आधी या विहिरीतून एका नवजात बाळाचा मृतदेह बाहेर काढला होता.

याच विहिरीतून 28 मे ला सकाळी 27, 23 आणि 20 वर्षांच्या तीन सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले गेले होते. या तीन बहिणींपैकी दोघी सात आणि नऊ महिन्यांच्या गरोदर होत्या. इतकंच नाही, या विहिरीतून एका पंचवीस दिवसांच्या बाळाचा आणि चार वर्षाच्या चिमुरड्याचाही मृतहेर बाहेर काढला आहे. तीन दिवस हे मृतदेह विहिरीत पडून होते.

एकूण सात आयुष्य संपलीत, दोन तर जन्माला येण्याआधीच.

आत्महत्या एक गंभीर सामाजिक आणि मानसिक समस्या आहे. तुम्हीही तणावाचा सामना करत असाल तर भारत सरकारच्या जीवनसाछी हेल्पलाईनला 18002333330 फोन करून मदत मागू शकता. तुम्ही तुमचे मित्र आणि नातेवाईकांशीही याबद्दल बोलू शकता.

जयपूर-अजमेर हायवेवर जयपूरपासून साधारण 65 किलोमीटर दूर दूदू फ्लायओव्हरपासून फर्लांगभर अंतरावर मीणा वस्ती आहे. इथेच या मृत बहिणींचं सासर होतं. या घरापासून दोन किलोमीटर अंतरावर ती विहीर आहे इथे या बहिणींचं, त्यांच्या बाळांचं आयुष्य संपलं.

व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवून बेपत्ता झाल्या बहिणी

दूद गावापासून 5 किलोमीटरवर छप्या गावात या बहिणींचं माहेर आहे. त्यांचे कुटुंबीय आता दुःखात बुडालेले आहेत आणि अस्थिविसर्जनासाठी हरिव्दार जाण्याची तयारी करत आहेत.

या बहिणींचे भाऊ छीतरमल मीणा यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "25 मे ला दुपारी मावशीच्या नवऱ्याने पाहिलं की बहिणींनी स्टेटस ठेवलंय - जगण्यापेक्षा मरणं परवडलं, सासरी त्रास होतो. घरच्यांनी आमची काळजी करू नये - स्टेटस पाहिल्यावर त्यांच्या माहेरचे दूदला त्यांच्या सासरी गेले तर या बहिणी घरी नव्हत्या."

छतरलाल म्हणतात, "आम्ही खूप शोधलं, नातेवाईकांना फोन केले पण त्या तिघी सापडल्या नाहीत."

"आम्ही पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी खूप शोधलं पण कुठूनही कोणतीच माहिती मिळत नव्हती. तीन दिवस आम्ही सगळे शोधत होतो. मग 28 मेला सकाळी, सगळ्यांचे मृतदेह एकदम सापडले."

जयपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनीष अग्रवाल यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, "25 मे ला सासरच्यांनी तिघी बहिणी आणि त्यांची मुलं हरवल्याची तक्रार केली होती. 26 मेला या बहिणींच्या वडिलांनी 498A कलमाखाली घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली. आता त्यांचे मृतदेह मिळाल्यानंतर 304 कलमही जोडलं गेलं आहे.

पोलीस व्हॉट्सअॅप स्टेट्सला सुसाईड नोट समजत आहेत का? याचं उत्तर देताना दूदूचे पोलीस निरिक्षक चेतन राम म्हणतात की, "या प्रकरणी तपास सुरू आहे."

सासरच्या लोकांना अटक

दूदचे पोलीस उपाधिक्षक अशोक राठोड यांनी म्हटलं की या प्रकरणी तिन्ही महिलांचे पती, सासू आणि मोठ्या जावेला अटक केली आहे."

या महिलांच्या सासरी भयानक शांतता आहे. घरात फक्त तिन्ही बहिणींच्या सासूची आई नानकी, त्यांच्या नवऱ्यांची मावशी संतरा आणि आत्या बादाम मीणा बसल्यात.

बीबीसीशी बोलताना संतरा मीणा म्हणतात, "घरात नव्या बाळाचा जन्म झाला होता, बारसं होतं, म्हणून पाहुणे एकत्र झाले होते. कोणतंही भांडण झालं नव्हतं. काय माहिती या मुलींनी असं का केलं."

"सगळे आपआपल्या कामात होते. आजी इथे बसली होती, पण त्या गपचूप निघून गेल्या. आम्ही खूप शोधलं पण सापडल्या नाहीत. पोलीस आधी दोन मुलांना, जगदीश आणि मुकेशला घेऊन गेले आणि मग दुसऱ्या दिवशी मोठ्या मुलाला आणि त्यांच्या आईला घेऊन गेले."

राजस्थान

फोटो स्रोत, MOhar Singh Meena/BBC

फोटो कॅप्शन, सगळ्या मृतांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या महिलांच्या नातेवाईकांनी सासरच्यांवर हुंड्यासाठी मारहाण केल्याचे आरोप केले आहेत.

त्यावर बोलताना संतरा म्हणतात, "फालतू आरोप आहेत हे. सासरचेच लोक मुलींना शिकवत होते, त्यांचा खर्च करत होते. परीक्षा द्यायला जायच्या त्या. मोठी आणि धाकटी ठीक होत्या, मधली या दोघींना घेऊन गेली. आधीही हुंड्याची केस दाखल केली होती पण एक लाख रूपये दिल्यावर त्यांनी केस मागे घेतली."

पण या बहिणींच्या सासरच्या घरी शेजारी राहाणाऱ्या एका व्यक्तीने आपलं नाव न छापण्याच्या अटीवर म्हटलं की, "या तिन्ही बहिणी चांगल्या शिकल्या सरवलेल्या होत्या. त्यांचे नवरे त्यांना दारू पिऊन मारहाण करायचे. अनेकदा त्यांच्या घरातून भांडणाचे आणि किंकाळ्यांचे आवाज यायचे पण कोणी त्यांना वाचवायला जायचं नाही."

या घटनेने ही व्यक्ती खूपच दुःखी दिसली. खिन्न होऊन म्हणाली, "कोणी आनंद झाला म्हणून आत्महत्या करत नाही. आयुष्याला वैतागून सात जणांचे जीव गेले."

सामूहिक आत्महत्येवर प्रश्न

शिकल्यासवरलेल्या तिन्ही बहिणींनी एकत्र आत्महत्या कशी केली? मोठी बहीण कालू मीणाने आपल्या चार वर्षांच्या आणि फक्त 25 दिवसांच्या बाळाला घेऊन जीव कसा दिला? ममता आणि कमलेशने आपल्या पोटात वाढणाऱ्या सात आणि नऊ महिन्यांच्या बाळाला घेऊन स्वतःचं आयुष्य कसं संपवलं?

या प्रश्नांची उत्तर त्यांच्या माहेरच्यांना मिळत नाहीयेत. सगळ्यांना एकच प्रश्न पडलाय की तिन्ही बहिणींनी ठरवून मुलाबाळांसकट कशी आत्महत्या केली?

राजस्थान
फोटो कॅप्शन, मृत महिलांच्या सासरी आता या तीनच वयस्क महिला आहेत आणि तिची जावेचे मुलं तिथे बसलेले दिसत आहेत.

या मुलींचे भाऊ छीतरमल मीणा त्यांच्या सासरच्यांवर गंभीर आरोप करतात. त्यांचं म्हणणं आहे की, "25 मे पासून माझ्या बहिणी बेपत्ता होत्या. त्याच दिवशी त्यांच्या घरी 5-6 पुरुष पाहुणे आले होते. आम्हाला त्यांच्यावर संशय आहे. त्यांनी तर माझ्या बहिणींना मारून टाकलं नाही ना?"

ते पुढे म्हणतात, "तिघींनाही एकत्र आत्महत्या करावी असं का वाटलं? एकीला तर वाटलं असतं की असं करायला नको. आमचा विश्वास नाही त्यांनी आत्महत्या केली आहे. आम्ही पोलिसांनाही हे सांगितलं आहे."

याबद्दल पोलिसांना विचारलं कर त्यांचं म्हणणं आहे की, "घरी पाहुणे आले होते हे खरं आहे. कालू मीणाच्या 25 दिवसांच्या बाळाचं बारसं होतं. बाकी तपास सुरू आहे."

या मुलींचे शाळेचे शिक्षक बजरंग लाल बीबीसीशी बोलतान म्हणतात की, "या मुली अतिशय हुशार होत्या. ममताने काही दिवसांपूर्वीच पोलीस भरतीची परीक्षा दिली होती. इतक्या शिकलेल्या मुली एकमताने आत्महत्येचा निर्णय कसा घेऊ शकतात हे समजण्याच्या पलीकडचं आहे."

या महिलांच्या भावाचा आरोप आहे की, "सासरकडची मंडळी या बहिणींना मारहाण करायचे. त्यांची मोठी जाऊ त्यांना टोमणे मारायची. या मुली खूप त्रस्त होत्या. त्यांनी अनेकदा घरी सांगितलंही होतं हे."

एकाच चितेवर अंत्यसंस्कार

28 मे च्या दिवशी सकाळी त्यांचे मृतदेह विहिरीतून काढण्यात आले. त्यावेळी तिथे उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनूराम मीणा यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "एसडीआरएफच्या तुकड्यांनी मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. तीन दिवस विहिरीत राहिल्यामुळे मृतदेह कुजले होते."

त्यांनी सांगितलं,"सर्व मृतदेहांचं शवविच्छेदन करण्यात आलं. त्याच दरम्यान गर्भवती महिलेच्या पोटातून बाळही बाहेर काढलं गेलं."

राजस्थान

फोटो स्रोत, MOhar singh meena/BBC

शवविच्छेदनानंतर नातेवाईकांनी त्यांचे मृतदेह माहेरी नेऊन एकाच चितेवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

28 मे रोजी मृतदेह मिळाल्यानंतर 29 मे रोजी दुपारी विहिरीतून नवजात बालकाचा मृतदेह मिळाला.

दूदचे पोलिस उपअधीक्षक अशोक राठोड यांनी सांगितलं, "कदाचित हे मूल दगडांच्या खाली दबलं गेलं होतं. मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या माहेरी याबाबत माहिती देण्यात आली असून शवविच्छेदन करण्यात आलं आहे."

बाल विवाहानंतरही ग्रॅज्युएट

दूदमध्ये जयपूर-अजमेर हायवेच्या एका बाजूला मृत महिलांचं माहेर आणि दुसरीकडे सासर आहे. दोन्हीमध्ये जवळपास सात किलोमीटरचं अंतर आहे.

अल्पवयीन असलेल्या या तिन्ही बहिणीचं- कालू देवी, ममता आणि कमलेश यांचं लग्न भंवर मीणा यांच्या मुलांशी- नरसी, जगदीश आणि मुकेश यांच्याशी झालं होतं. भंवर मीणा यांचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता.

मृत बहिणांचे नातेवाईक असलेल्या छीतरमल मीणा यांनी सांगितलं, "दोन बहिणी ग्रॅज्युएट होत्या. त्या अभ्यासात पहिल्यापासूनच हुशार होत्या. लग्नानंतरही त्यांनी आपलं शिक्षण सुरू ठेवलं होतं."

राजस्थान

फोटो स्रोत, MOhar Singh Meena/BBC

या बहिणींच्या शाळेतले शिक्षक बजरंग लाल यांनी सांगितलं की, या तिन्ही बहिणी सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होत्या. बालविवाह झाला तरी त्यांनी शिक्षण थांबवलं नाही आणि सरकारी कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. कमलेश ग्रॅज्युएट होती, ममता सेंट्रल युनिव्हर्सिटीमधून एमए करत होती. ती सरकारी नोकरीची तयारी करत होती. तिला नोकरी लागलीही असती."

बजरंग लाल सांगतात, "या बहिणींच्या नवऱ्यांनी शालेय शिक्षणही पूर्ण केलं नव्हतं. त्यांच्यापैकी कोणीही सातवी किंवा आठवीपेक्षा जास्त शिकला नव्हता."

बाल विवाह प्रथेविरोधात अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या डॉक्टर कृती भारती या घटनेबद्दल सांगतात, "मुलींना आकाशात भरारी मारण्यासाठी पंख तर दिले जातात, मात्र पायात बाल विवाहाची बेडीही अडकवली जाते. जर त्यांना योग्यवेळी बाल विवाहाच्या जोखडातून मुक्त केलं असतं तर त्या आणि त्यांच्या गर्भात वाढणारं बाळ जिवंत असतं."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)