You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज्यसभा निवडणूक निकाल: देवेंद्र फडणवीसांनी पहाटेच्या वेळी उद्धव ठाकरेंना पुन्हा धोबीपछाड कसं केलं?
राज्यसभा निवडणुकीचा निकाल नुकताच लागला आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पहाटेच्या वेळी पुन्हा एकदा छोबीपछाड केलं आहे. पुन्हा यासाठी की याआधी 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पहाटेच अजित पवारांसोबत शपथ घेऊन उद्धव ठाकरेंना धोबीपछाड केलं होतं.
राज्यसभेच्या या निवडणुकीत प्रतिष्ठेची ठरलेली सहावी जागा भाजपनं जिंकली आहे. या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांना पराभूत केलं आहे.
संजय पवार यांना पहिल्या पसंतीची 32, तर धनंजय महाडिक यांना 25 मतं मिळाली. त्यामुळे संजय पवार आणि धनंजय महाडिक यांच्यात आता चुरशीची लढत निर्माण झाली. पण, दुसऱ्या पसंतीची मतं महाडिक यांना जास्तीची मिळाल्यानं त्यांचा विजय झाला आहे.
धनंजय महाडिक यांच्या विजयाचं श्रेय देवेंद्र फडणवीसांना दिलं जात आहे. त्यामुळे मग फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना धोबीपछाड केल्याची चर्चा सुरू झाली आहे. पण, देवेंद्र फडणवीसांनी ही निवडणूक कशी सर केली, ते आपण आता जाणून घेणार आहोत.
त्याआधी नेमका निकाल काय लागला, ते पाहूया.
महाविकास आघाडी विरुद्ध भाजप
राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपच्या विरोधात उभे ठाकले होते.
आपले चारही उमेदवार जिंकून येतील, असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात होता. पण, निवडणूक निकालात तसं काही झालं नाही.
शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत, काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल विजयी झाले. तर भाजपचे उमेदवार अनिल बोंडे, पीयूष गोयल आणि धनंजय महाडिक विजयी झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांना पहिल्या पसंतीची 43, शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत यांना 41, काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना 44, तर भाजपचे उमेदवार अनिल बोंडे आणि पीयूष गोयल यांना पहिल्या पसंतीची अनुक्रमे 48 मतं मिळाली. धनजंय महाडिक यांना 41 मतं मिळाली.
अशारितीनं महाविकास आघाडी आणि भाजप या दोघांनीही या निवडणुकीत तीन जागा जिंकल्या आहेत.
महाविकास आघाडीनं सहाव्या जागेसाठी झालेला पराभव मान्य केला आहे.
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी निकालानंतर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "आम्हाला या पराभवाची समीक्षा करावी लागेल."
तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी म्हटलं, "आमचे दोन आमदार मतदान करू शकले नाहीत. तर सुहास कांदे यांचं मत बाद झालं. याचा फटका महाविकास आघाडीला बसला. नाहीतर संजय पवारांना पहिल्या पसंतीत जास्त मतं मिळाली असती."
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी निकालावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं, "आजचा विजय महत्त्वाचा आहे. भाजपला जनतेनं बहुमत दिलं होतं. पण आमच्या पाठीत सुरा घोसून ते काढून घेण्यात आलं. आमचे जे तिसरे उमेदवार निवडून आलेत, त्यांनी शिवसेनेच्या प्रथम उमेदवारापेक्षा जास्त मतं घेतली आहेत. ही जी विजयाची मालिका सुरू झाली आहे, ती अशीच पुढे सुरू राहिल."
देवेंद्र फडणवीसांनी नेमकं काय केलं?
राज्यसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयाचं श्रेय राजकीय विश्लेषक देवेंद्र फडणवीसांना देतात.
ज्येष्ठ राजकीय पत्रकार सुधीर सुर्यवंशी यांच्या मते, "महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचं प्लॅनिंग अजिबात नव्हतं हे स्पष्ट झालंय. देवेंद्र फडणवीस यांच्या रणनितीसमोर उद्धव ठाकरे फेल ठरले."
"निवडणूक निकाल उद्धव ठाकरेंना मोठा धक्का आहे. त्यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली होती. यातून आता त्यांनी धडा घ्यायला हवा. आकड्या्च्या गणितावरून काही अपक्ष भाजपकडे गेले हे दिसून येतंय. त्यामुळे याचा परिणाम विधानपरिषदेवर होईल. कारण विधानपरिषदेत गुप्त मतदान असतं."
या निकालांचा मुंबई महापालिकेवर परिणाम होईल. कारण शिवसेनेचं मॅारल डाऊन होईल, असं राजकीय जाणकार सांगतात.
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांच्या मते,"राज्यसभेचा निकाल बघितला तर महाविकास आघाडीची 9 मतं कमी झालेली दिसतात. याशिवाय एमआयएम पक्षानं महाविकास आघाडीला दिलेली मतंही कुठे रिल्फेक्ट झालेली दिसत नाहीत. सोबत संजय राऊत यांचंही एक मत कमी झालंय. काँग्रेसनं त्यांचा संपूर्ण कोटा त्यांच्याच उमेदवारासाठी वापरलाय. यातून महाविकास आघाडीचं नियोजन योग्य नव्हतं हे स्पष्ट दिसतं."
"दुसरीकडे भाजप 113 च्या आसपास मतं मिळवेल असं वाटत होतं. पण त्यांनी त्याहून अधिक मतं मिळवली. त्यांनी आपल्या उमेदवारांना पहिल्या पसंतीची मतं इतकी जास्तीची दिली की नंतर मतं ट्रान्सफर करण्याची गरजच पडली नाही. याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीसाठी योग्य नियोजन केलं होतं," देशपांडे पुढे सांगतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)