Covid : मृतांच्या आठवणी जिवंत ठेवण्यासाठी संघर्ष करणारी भारतीय महिला

कोरोना, महिला, कोव्हिड, आरोग्य

फोटो स्रोत, SWASTIK PAL

फोटो कॅप्शन, पपरी चौधरी
    • Author, सौतिक बिस्वास
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

भारतात कोव्हिडने मरण पावलेल्यांची संख्या नाही म्हटलं तरी 50 लाखांच्या घरात आहे. पण WHOच्या मते, ही संख्या दहापट असण्याची शक्यता आहे. कोव्हिडच्या साथीला आज दोन वर्ष झाली. मात्र आजही या साथीने झालेलं नुकसान लोक सहनच करत आहेत. कोव्हिडमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या लोकांचं स्मारक उभारण्यासाठी अगदी कमी प्रतिसाद मिळाला आहे. याचा अर्थ कोव्हिडच्या आठवणी मिटवण्यासाठी भारताचा आटापिटा सुरू आहे का?

साधारण वर्षाभरापूर्वीची गोष्ट असेल. कोलकात्याच्या पूर्व भागात एकाच रुग्णालयात मात्र वेगवेगळ्या मजल्यावर एक जोडपं कोव्हिडशी झुंज देत होतं.

पपरी चौधरी असं त्या महिलेचं नाव. त्यांचे पती अतिदक्षता विभागात होते. पपरी सुद्धा तापाने फणफणत होत्या. त्यांनी लावलेलं सलाईन उपसून काढलं आणि तिथं असणाऱ्या नर्सना आपल्या पतीला भेटू द्या म्हणून विनवणी केली.

त्यांची विनवणी ऐकून पापरींना त्यांनी संरक्षणसाठी तोंडावर फेस शिल्ड लावायला लावलं, हॅन्डग्लोज घालायला लावले आणि व्हीलचेअरवर बसवून त्यांना आयसीयूमध्ये नेलं.

पपरी आपल्या पतीजवळ अरुप प्रकाश चौधरींजवळ गेल्या. त्यांच्या नाकाला श्वासोच्छवासाचं मास्क लावलं होतं. पपरी यांना पाहताचं अरुप यांनी पपरींचा हॅन्डग्लोज घातलेला हात हातात घेतला आणि रडवेल्या स्वरात म्हटले, "मला आता श्वासही घेता येत नाही."

मिसेस चौधरी सांगतात, त्या आपल्या 58 वर्षांच्या नवऱ्याकडे अगतिक नजरेने पाहत होत्या.

"ते लढवय्ये आहेत" असं तिथं असलेली एक नर्स म्हणाली, "ते तरतील."

पण त्याला जमलं नाही.

कोरोना, महिला, कोव्हिड, आरोग्य
फोटो कॅप्शन, पपरी आणि अरुप चौधरी

त्यानंतर चारच दिवसात अरुपने प्राण सोडला. ते एक सरकारी अभियंता, जलतरणपटू आणि 23 वर्षांच्या मुलीचे वडील होते. मागच्या उन्हाळ्यात भारतात आलेल्या साथीच्या दुसऱ्या महाभयंकर लाटेत आणखी एक भर पडली होती. त्या दुसऱ्या लाटेत मरण पावणाऱ्यांची आकडेवारी मोठी होती.

एका वर्षानंतर, मिसेस चौधरी सांगतात की त्या दु:खाच्या गर्तेत अगदी खोलवर बुडाल्या होत्या.

एकेकाळी हट्टी नास्तिक असणाऱ्या पपरी आता अध्यात्माकडे वळल्या. मृत्यूनंतरच्या जीवनावर विश्वास ठेवायला लागल्या. त्यांनी बरंच दुःख झेललंय. विसाव्या वर्षी त्यांनी त्यांचे वडील गमावले. त्यांच्या आईला अल्झायमरचा आजार सुरू झाला. पण त्या म्हणतात, या सगळ्या प्रसंगात "अरुप माझा आधार होता. तो माझा सूर्य होता. माझा आधार सुटला आणि सूर्य बुडाला."

48 वर्षांच्या मिसेस चौधरी यांनी नवे कपडे घालणं, त्यांचे आवडते पदार्थ खाणे, कौटुंबिक कार्यक्रमांना जाणं बंद केलंय. त्यांच्या पतीच्या रक्षा त्यांनी त्यांच्या पेंडंटमध्ये भरल्या आहेत. जेव्हा त्या अंघोळीला जातात, अंगावर शॉवर घेतात तेव्हा त्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही. त्या विचारतात, "मला तुला शेवटची मिठी मारायची आहे."

मिसेस चौधरी सांगतात, "मी माझं दु:ख कवेत धरलंय. मला त्या दुःखाचा सामना करत येत नाही. मी माझ्या हृदयात एक कप्पा केलाय ज्यात मी माझ्या पतीला ठेवलंय."

त्यांना विश्वास आहे की, त्या दु:खाच्या जुलमला त्या शरण गेल्या, मात्र जगण्याची हिंमत हरल्या नाहीत. त्यांनी सायकॉलॉजीच्या क्लाससाठी ऍडमिशन घेतलं, जेणेकरून त्या एक थेरपिस्ट बनू शकतील. त्या लोकांचे फोन घेतात, त्यांना जे दुःख झालंय त्यावर समुपदेशन करतात.

एका दुःखी विधवेला पपरींनी हल्लीच एक मेसेज केलाय, "तुमच्या दैनंदिन कामाव्यतिरिक्त दुसरं काहीतरी काम शोधा. तुमच्या आयुष्यात कोणतं काम अपूर्ण आहे ते शोधा"

कोरोना, महिला, कोव्हिड, आरोग्य

मिसेस चौधरी त्यांच्या तीस वर्षांच्या लग्नाबद्दल आणि कोव्हीडने त्यांच्या कुटुंबाला दिलेल्या त्रासाबद्दल एक संस्मरण लिहित आहेत. तसंच कोव्हिडच्या आजाराने आतापर्यंत जे लोक मरण पावले आहेत त्यांच्या स्मारकासाठी इतर लोकांनी रस घ्यावा म्हणून प्रयत्न करत आहेत.

मिसेस चौधरी सांगतात, "लोक साथीच्या रोगाची भीषणता विसरत आहेत असं दिसतंय. त्यांना असं वाटतंय की जे घडलं ते त्यांच्या नशिबातच होतं. पीडितांसाठी एक स्मारक महत्वाचंच आहे. ते एक प्रकारे दुःख विसरण्याचा मार्ग आहे."

फेब्रुवारीमध्ये, पपरींनी एका व्हर्च्युअल मेमोरियलमध्ये त्यांच्या पतीच्या काही आठवणींची भर घातली. हा उपक्रम डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या एका गटाने सुरू केलाय जो भारतातील एकमेव उपक्रम आहे.

त्या लिहितात, "असं वाटतं की कोणीतरी माझ्या गळ्यावर चाकू ठेवलाय. ना मला यासोबत जगता येतंय ना मी यासोबत मरता येतंय."

कोरोना, महिला, कोव्हिड, आरोग्य
फोटो कॅप्शन, रजनी आणि श्रीधर जगताप

आज एका वर्षानंतरही, कोव्हिडच्या साथीत मरण पावलेल्या केवळ 300 भारतीयांची यादी स्मारकात आहे. आयोजकांनी फेब्रुवारीमध्ये भारतातील 29 राज्यांना माहितीच्या अधिकारात (आरटीआय) अर्ज केले होते. यात अशा लोकांच्या नावाची मागणी करण्यात आली होती ज्यांचा कोव्हिडमुळे मृत्यु झालाय आणि ज्यांना सरकारी नुकसान भरपाई मिळाली आहे. यातला फक्त 11 राज्यांनी उत्तर दिलं आणि 182 नावं मिळाली.

"मृतांची नावं मिळणं म्हणजे एकप्रकारे परीक्षाचं आहे. मला वाटतं की आपल्याला त्यांना लवकर विसरायचं आहे. 'जे गेले ते गेले' ही वृत्ती यामागे असू शकते" असं स्मारकाची सुरुवात करणारे डॉ. अभिजित चौधरी म्हणतात. "आमच्या आठवणी अल्पायुषी आहेत का आपणच त्या नाकारत जगतोय?"

हे सांगणचं कठीण आहे. कोट्यवधी भारतीय अजूनही आपल्या प्रियजनांच्या आठवणीत शोकमग्न आहेत. त्यापैकी बरेच अकाली आणि अचानक गेले. आरोग्य यंत्रणा कोलमडली होती, रूग्णालयातील बेड, अत्यावश्यक औषधं, अगदी ऑक्सिजनचीही कमतरता होती. साथीच्या या लाटेदरम्यान अनेक मृत्यू टाळता येण्यासारखे होते. लोक एकांतात मरण पावले. लॉकडाऊन प्रोटोकॉलमुळे कुटुंबीय अंत्यसंस्कारांनाही उपस्थित राहू शकले नाहीत.

डॉ चौधरी सांगतात, भारताने मृतांची कमी मोजणी झालीय हे नाकारून संकटातून पुढे जाण्याची घाई केली असल्याचं दिसतं. "नाकारलं तर विसरणं सोपं होतं."

पण यामुळे दुःखाचं स्वरूप बदलत आहे. जसजसं भारतीय लोक शहरांमध्ये गेले, कुटुंबांपासून विभक्त झाले आहेत, तसतसं दुःख खाजगी, जवळचं, समाजापासून लांब आणि क्रियाशील बनलंय. आपल्या प्रियजनांना गमावल्यानंतर एकटेपणा आणि रागाचा सामना करणारी कुटुंब आपलं दु:ख आणि चिंता कमी करण्यासाठी नवीन मार्गांच्या शोधात आहेत.

काही लोक आधार देण्यासाठी ग्रुप तयार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पुण्यात राहणाऱ्या रजनी जगताप यांनी त्यांच्या 59 वर्षीय पेशाने डॉक्टर असलेल्या पतींना कोव्हिडमध्ये गमावलं. रजनी जगताप या देखील डॉक्टर आहेत. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या लोकांचं समुपदेशन करण्यासाठी रजनी यांनी स्टेइंग अलाइव्ह नावाचा ऑनलाइन ग्रुप सुरू केलाय.

आज या ग्रुपमध्ये 60 लोक जॉईन झाले आहेत. यात आर्ट थेरपिस्ट, एक क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, एक वकील आणि एक योग प्रशिक्षक सुद्धा आहेत. बहुतेक तरी महिला सदस्या आहेत. या ग्रुपमध्ये असणाऱ्या एकीने काही वर्षांपूर्वी आपलं बाळ गमावलंय नंतर कोव्हिडमुळे नवरा गमावला. दुसरीने तिचा नवरा आणि तिची भावजय त्याच दिवशी त्याच रुग्णालयात गमावली.

स्वत: डॉ. जगताप यांच्यासारख्या अनेकांना आपल्या प्रियजनांच्या मृत्यूनंतर एक वर्षानंतर विधी पार पडल्यानंतर काही प्रमाणात दुःख कमी झाल्याचा अनुभव आला.

कोरोना, महिला, कोव्हिड, आरोग्य

फोटो स्रोत, Reuters

यावर डॉ. जगताप म्हणतात, "अनुभव सारखेच आहेत. लोकांमध्ये आपल्या प्रियजनांना वाचवण्यात अयशस्वी ठरलेल्या आरोग्य यंत्रणेबद्दल भ्रमनिरास आहे. काही लोक डॉक्टरांना दोष देतात. अनेक महिलांना त्यांच्या सासरच्या लोकांमध्ये परकेपणा जाणवतो. इथं एक संतापाची भावना नेहमीचा असते की, माझ्यासोबत असं का झालं?'"

"पण मला असं वाटतं की आपण विसरत नाही. कुटुंब संरक्षणात्मक असतात. यासाठी एक स्मारक अर्थातच उत्तम कल्पना आहे."

पुष्कळ लोक म्हणतात, दु:ख हा देखील अनेक लोकांसाठी एक विशेषाधिकार आहे. "बहुतेक भारतीयांकडे दुःख करण्यासाठी वेळच नसतो. सधन, विशेषाधिकारप्राप्त शहरी लोकांकडे वेळ असतो. इतरांसाठी मात्र शोक हा विधींचा एक संच आहे जो तुम्ही पटकन पूर्ण करा आणि जीवनात पुढे जा. कारण त्यांच्यासमोर जगण्यासाठी सुद्धा कठीण आव्हानं आहेत," असं मानसोपचार तज्ज्ञ सौमित्र पठारे म्हणतात.

"याचा अर्थ असा नाही की तुम्हाला दु:ख वाटत नाही. खरं तर तुमच्याकडे दु:ख करायला वेळ नाहीये."

सरतेशेवटी, झालेलं हे गंभीर नुकसान अगदी वैयक्तिक असतं. गेल्या वर्षी उन्हाळ्याच्या रात्री उशिरा हॉस्पिटलमधून एक फोन आला. मिसेस चौधरी यांनी आपली मुलगी तन्विषाला फोन उचलायला सांगितला. ती फोन घेऊन खोलीतून निघून गेली.

भीतीने तिचा चेहरा पांढरा फटफटीत पडला होता. ती थोड्या वेळाने बाहेर आली.

"पॉप राहिले नाहीत." ती म्हणाली.

मिसेस चौधरी सांगतात, त्या सुन्न झाल्या होत्या. त्या त्यांच्या मुलीच्या केसांवर हात फिरवत बसल्या.

"आई, तू आता तुझ्या आईसारखी होशील का?," तन्विशाने विचारलं

कारण दु:ख स्वतःसोबत एक नवी भीती घेऊन येतं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)