महिमा चौधरी देत आहे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज, 'या' महिलांकडून मिळाली लढण्याची प्रेरणा

परदेस, सहर यांसारखे अनेक हिट चित्रपट देणारी अभिनेत्री महिमा चौधरी ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे.

अनुपम खेर यांनी महिमाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत तिच्या कॅन्सरच्या झुंजीविषयी माहिती दिली.

महिमा या व्हिडिओमध्ये म्हणते, "माझ्यात कोणतीही लक्षणं आढळली नव्हती. मी प्रत्येक वर्षाला माझ्या रेग्युलर टेस्ट करून घ्यायचे. त्याचवेळी मला कॅन्सरची टेस्ट करून घेण्याचा सल्ला मिळाला. त्यानंतर मात्र मी कोणालाही सोबत न घेता डॉक्टरांकडे गेले. तिथे डॉक्टरांनी माझी तपासणी केली आणि मला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचं समजलं," महिमाने तिच्या या व्हिडिओमध्ये इतर ही बऱ्याच गोष्टी शेअर केल्या आहेत.

"मला प्रत्येकजण सांगत होता की, तुला लवकर समजलं ही तर चांगली गोष्ट आहे, तू कशाला रडतेस? पण कॅन्सर हा शब्द ऐकून कोणीही घाबरून जाईल. याच कारणामुळे मी माझ्या पालकांना ही याबाबत काही सांगितलं नव्हतं."

नंतर मात्र तिने आपल्या आईला सांगितलं.

"मी माझ्या आईला सांगितलं की माझ्या स्तनात गाठ आहे. आणि याचमुळे मी मागच्या 10 दिवसांत तुला भेटायला येऊ शकले नाही. हे ऐकून माझ्या आईचं ब्लडप्रेशर वाढलं. तिला दवाखान्यात न्यावं लागलं,"

महिमाने तिच्या कॅन्सरच्या आजाराबद्दल शेअर केलेल्या गोष्टी, तिचं फिल्मी करिअर याबद्दल जाणून घेऊया. त्याचप्रमाणे तरुण मुलीही ब्रेस्ट कॅन्सरच्या विळख्यात कशा येतायत हे ही पाहूया

महिमाने महिलांना कोणता संदेश दिला?

महिमाने सांगितले की, "किमोसाठी येणाऱ्या महिला आपली ट्रीटमेंट संपल्यावर थेट कामावर जायच्या आणि अशा महिलांकडूनचं मला प्रेरणा मिळाली.

"त्यांना मी विचारायचे की तुमची कंपनी तुम्हाला सुट्ट्या देत नाही का? यावर त्या म्हणायच्या, कंपनीने आम्हाला सुट्ट्या दिल्या आहेत, पण नॉर्मल आयुष्य जगायचंय म्हणूनच आम्ही कामावर जातो."

व्हिडीओच्या सुरुवातीला अनुपम खेर महिमाला प्रश्न विचारतात आणि त्याचदरम्यान महिमाही तिचे अनुभव शेअर करते.

"माझ्या केसांना जेव्हा गळती लागली तेव्हा मला बरेच फोन आले. यातले बरेच कॉल्स वेब सिरीजच्या भूमिकेसाठीही असायचे."

"मी सेटवर विग घालून येऊ का, या प्रश्नावर तुम्हीच म्हटलात, (अनुपम खेर) तू विग घालून का येशील? जशी आहेस तशीच ये."

महिमाला तिच्या कुटुंबाकडून मिळालेल्या पाठिंब्यावर ती म्हणते, "माझ्या कुटुंबातील प्रत्येकजण धाडसी आहे, पण मी तशी नव्हते. मी नेहमीचं रडायचे. अशातच माझी भेट एका लहान मुलासोबत झाली. मी त्याचा आवाज ऐकला आणि मला लढण्याची प्रेरणा मिळाली. मी या लहान मुलाला किमो दरम्यान भेटले होते. मी त्याच्याशी बोलण्याचा ही प्रयत्न केला. मी त्याला म्हणाले, तुझं औषध तर एवढंसचं आहे, माझं औषध बघ, खूप आहे. त्यावर तो म्हणाला - पण यानेच तर तुम्ही बरे व्हाल."

महिमा सांगते, "मी त्याला म्हटलं की खूप त्रास होतो. मी झोपूनच असते. त्यावर तो मला म्हणाला, मी तर फक्त पाच दिवस झोपून असतो. त्यानंतर मी खेळतो."

यावर अनुपम खेर महिमाला म्हणतात, - "तू माझ्यासाठी हिरो आहेस."

महिमा चौधरीच्या करिअर एक नजर

महिमाने तिच्या करिअरची सुरुवात सुभाष घई यांच्या 'परदेस' या चित्रपटातून केली होती. हा चित्रपट 1997 मध्ये प्रदर्शित झाला होता.

परदेस चित्रपटासाठी महिमाला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.

महिमाने दिल क्या करे, दाग, धडकन, कुरुक्षेत्र, दिल है तुम्हारा, लज्जा, तेरे नाम, ओम जय जगदीश हरे यांसारख्या अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

बागबान आणि एलओसी सारख्या चित्रपटांमध्ये ही महिमाने छोटी भूमिका साकारली आहे.

महिमाचा जन्म 1973 साली बंगालमध्ये झाला. महिमाचे बालपण दार्जिलिंगमध्ये गेले. महिमाला सुरुवातीला फक्त बंगाली चित्रपटच करायचे होते.

महिमाने 2006 मध्ये लग्न बॉबी मुखर्जीसोबत लग्न केलं होतं. पण 2013 ते नातं तुटलं.

भारतीय महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा वाढता धोका

एम्समधील सर्जिकल ऑन्कोलॉजी विभागातील प्रोफेसर डॉ. एसव्हीएस देव सांगतात की, गेल्या दहा ते पंधरा वर्षांत तरुणींमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो आहे.

40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या स्त्रिया ब्रेस्ट कॅन्सरला बळी पडत आहेत. यात 20 ते 30 वर्षांच्या सर्वात तरुण स्त्रिया ही आहेत ज्यांना कॅन्सर झाला आहे.

कमी वयोगटातील स्त्रियांबद्दल बोलायचं झालं तर दोन ते तीन टक्के प्रमाण आहे. मात्र तरुण वयोगटाबद्दल बोलायचं झाल्यास हे प्रमाण 15 टक्के आहे.

40-45 वयोगटातील महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण 30 टक्क्यांपर्यंत वाढतं. 44 ते 50 वयोगटातील महिलांमध्ये हेच प्रमाण 16 टक्क्यांपर्यंत आढळतं.

ICMR आणि NCDIR रिपोर्टनुसार 2025 पर्यंत कॅन्सरच्या रुग्णांची संख्या 15.7 लाखांपर्यंत वाढेल.

कॅन्सरच्या उपचाराच्या वेळी चालणाऱ्या किमोथेरपीचा महिलांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं कशी ओळखावी?

  • स्तनात गाठ किंवा लंप
  • स्तनामध्ये कोणत्याही प्रकारची सूज असल्यास
  • स्तनाच्या त्वचेमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल दिसून आल्यास
  • त्वचेला खाज सुटणे, त्वचा लाल होणे किंवा कडक होणे.
  • स्तनाग्रातून चिकट पदार्थ गळत असल्यास

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)