पोहे दिन: नागपूरचे तर्री पोहे खाल्ले नसतील तर काहीतरी राहून गेलंय समजा...

तर्री पोहे.

फोटो स्रोत, Rohan Namjoshi

फोटो कॅप्शन, तर्रीमुळे पोह्याचं महत्त्व कमी झालं असं कधीतरी वाटतं तरी...
    • Author, रोहन नामजोशी
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

तुम्ही नागपुरात आहात, छान थंडी पडली आहे. ब्लँकेटमधून बाहेर यायची इच्छा होत नाही आणि घरातला कोणीतरी पुकारा करतो, "तर्री पोहे पाहिजे यार".. शून्य मिनिटात मरगळ झटकून चित्तवृत्ती जाग्या होतात. मनाची मरगळ जाते. नाकात तर्रीचा सुवास जातो, जिभेवर त्याची सुंदर चव तरळते, आणि आवरता आवरता आपण आपल्या आवडत्या जागी तर्री पोह्यांच्या जगात पोहोचलो असतो.

तर्री पोहे ही नागपूर आणि अख्ख्या विदर्भाची ओळख आहे. नागपूरच्या बाहेर गेलं की आधी हा प्रश्न विचारला जातो. तर्री म्हणजे रस्सा, पश्चिम महाराष्ट्राच्या भाषेत बोलायचं झालं तर कट. पण तर्रीची जी मजा आहे ती फक्त नागपुरात अनुभवावी. तर्री म्हणजे काळ्या चण्याची सावजी मसाला घातलेली उसळ, त्यावर रस्सा आणि हवाच असेल तर त्यावर तेलाचा तवंग म्हणजे तर्री आपल्या पोह्यांवर टाकली, त्यावर बारीक कांदा, शेव, लिंबाची फोड घातली की सगळा मामला तयार.

कोणताही ऋतू असला तरी नागपूरकरांची सकाळ तर्री पोह्यानेच होते. गेल्या काही वर्षांत तर्री पोह्यांच्या दुकानाची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. एक साधी हातगाडी ते पूर्ण गाळा अशी दुकानं नागपूरभर तुम्हाला दिसतात. अगदी पहाटे चार ते दुपारी अकरा वाजतापर्यंत ही दुकानं सुरू असतात. अस्सल खवय्यांना वेळेचं बंधन नसतं. तरी सकाळची वेळ उत्तम असते.

तर्री पोह्याचा उल्लेख आला आणि कस्तुरचंद पार्काचा उल्लेख आला नाही असं होऊ शकत नाही. मुख्य रेल्वे स्थानकाच्या जवनळ असलेल्या अजस्त्र कस्तुरचंद पार्कासमोरची पोह्याची दुकानं ही नागपूरकरांचं जीव की प्रमाण. तिथले रुपम साखरे यांचा तर्री पोहे लोकप्रिय करण्यात सिंहाचाच वाटा आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांचं निधन झालं आणि तमाम नागपूरकर हळहळले.

तर कस्तूरचंद पार्क. इथे पोह्याची दोन तीन दुकानं आहेत. एका ठेल्यावर मोठ्या कढईत पोहे केलेले असतात. बाजूला तर्री खळाखळा उकळत असते. एका भांड्यात लाल तिखट चिवडा असतो आणि आसपास भुकेने व्याकूळ झालेले गिऱ्हाईक. चहाच्या बशीत हाफ (त्याला नागपुरी भाषेत हाप म्हणतात) किंवा फुल असे पोहे मिळतात. त्यावर टमाटर हवा का अशी विचारणा केली जाते. आता पोहे आणि टमाटर हेही अजब कनेक्शन आहे.

तर्री पोहे.

फोटो स्रोत, Rohan Namjoshi

फोटो कॅप्शन, कस्तुरचंद पार्कातले प्रसिद्ध तर्री पोहे आणि टमाटर

जेव्हा तर्री उकळत असते तेव्हा त्यात अर्धा टमाटर कापून घालतात. पोहे खाताना तो टमाटर तोंडात गेला की त्याची एक वेगळीच चव लागते. याचा अर्थ पोह्यात टमाटर टाकायचा असा अजिबात नाही. एकदा तरी नक्की खाऊन पहा. तर्री पोह्याच्या साथीने समोसा आणि आलुबोंडा पण असतो. हल्ली पोह्यात समोसाही कुस्करून घालतात. पण खरं सांगायचं तर तो तर्री पोह्याचा अपमान आहे.

कस्तुरचंद पार्कातल्या तर्री पोह्याचा सुवास आता संपूर्ण शहरभर आणि खरंतर शहराबाहेरही पसरला आहे. नागपुरातून अनेक मुलं मुली नोकरी शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर गेली आणि तिथेही त्यांनी तर्री पोह्याची कीर्ती पसरवली. त्यामुळे नागपुरात येणाऱ्या लोकांनाही हा पदार्थ चाखावासा वाटतो. पण ते तितकंसं सोपं नाही. मात्र एकदा जर त्यांनी तुमच्या जिभेचा ताबा घेतला की मग विषय खलास. सूर्य उगवला की तुमची पावलं पोह्याच्या दिशेने वळलीच म्हणून समजा.

आता प्रत्येक भागात तर्री पोह्याची वेगवेगळी दुकानं आहेत. तीसुद्धा प्रत्येकाची ठरलेली. त्यामुळे आता दुकानदारांनाही तो फॉर्म्युला पाठ झाला आहे. पहाटे उठून केशवचे पोहे खायला जाणारे शौकिन लोक आजही तिथे आहेत. हे दुकान चार सव्वा चार ला उघडतं आणि सात साडेसात पर्यंत पोहे संपलेले असतात. एअरपोर्टवरून येता येता किंवा जाता जाता रामजी श्यामजीचे पोहे खाणं हे आन्हिकाइतकंच काही लोकांना महत्त्वाचं वाटतं. तिथे कांदा आपला आपण चिरून घ्यायचा असतो. त्यामुळे तिथे गेल्यावर वेगवेगळ्या आकारातले कांदे पाहून खरोखर डोळ्यात पाणी येतं.

युट्यूब आणि फेसबुकवर तर्री पोह्याचे व्हीडिओ येतात तेव्हा कितीदाही पाहिले तरी ते वारंवार पहायची इच्छा होते. त्यानिमित्ताने नागपूरला गेल्याचा फिल येतो, मनाने का होईना एकदा तरी ते पोटात जातात, काही क्षणांसाठी क्षुधाशांती होते आणि मन प्रसन्न होतं.

तर्री पोहे.

फोटो स्रोत, Rohan Namjoshi

बाकी या सगळ्या आख्यानात पोह्यांबदद्ल बोलायलाच हवं. पोहे हा जगातला अतिशय सोपा पदार्थ आहे. त्यात कोणतीही गुंतागुंत नसते. महाराष्ट्रात स्थळं पहायला गेल्यावर पोहे होतातच. म्हणून त्याला चहा पोह्याचा कार्यक्रम म्हटलं जातं. प्रसिद्ध शेफ रणबीर ब्रार म्हणतो की महाराष्ट्रात पोहे नसते तर कदाचित लग्नच झालं नसतं. पोह्याने नाती जोडली जातात, ते आयुष्यभर लक्षात राहतात. त्याला कधीतरी तर्रीची, रस्स्याची जोड मिळाली की मग विचारायलाच नको.

आज पोहे दिनानिमित्त तर्री पोह्याची आठवण व्हायलाच हवी. या मंग आमच्या नागपूरला. तर्री पोहे गिहे खाऊ.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)