आहार : ‘इडली’ या शब्दाला आणि पदार्थालाही स्वॅग वगैरे नाही, पण तरीही... - ब्लॉग

- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
इडली या शब्दातच निरामय निरुपद्रवीपण आहे. आपण आपलं काम करत राहावं, कोणाच्या अध्यात मध्यात नाही या पंथात इडली बसते. इडली म्हणजे गुंते कमी करून सोल्युशनमार्गी माणसासारखी आहे.
इडली या शब्दाला आणि पदार्थालाही स्वॅग वगैरे नाही. आजारी माणसाचं अन्न अशी इडलीची हेटाळणी केली जाते. इडलीचं उजवेपण म्हणजे तिच्याभोवती सात्विकतेचं वलय आहे. एक अनामिक सुकून जाणवतो इडली खाल्ल्यावर. कदाचित इडलीचा पांढरा रंग तिला हे अधिष्ठान प्राप्त करून देत असेल.
इडली खाण्याचा प्रहरही विलक्षण असा. झकास अशी झोप झालेली असावी. उठल्यानंतर चमचमणारं निरभ्र आकाश सामोरं यावं, सूर्यकिरणांचे कवडसे वास्तूला उजळवून टाकत असावेत. प्रसन्नतेची डूब मनात तयार असावी. आणि त्याचवेळी हिरव्याकंच केळीच्या पानावर वाफाळत्या इडल्या रचल्या जाव्यात. तो गंध मोहून टाकणारा. इडलीचं ते रवाळ दर्शन दिवसाची मोहीम फत्ते होईल असं बळ देतं.
हलक्या आणि सच्छिद्र कणांमधून इडली उमलत राहते. याच्या जोडीला पिवळसर ब्राऊनिश रंगाचं सांबार असतं. शेवग्याच्या शेंगा, टोमॅटो, भोपळा, तो विशिष्ट स्वाद असलेला मसाला, मध्येच येणारा उदडाचा दाणा यांनी बहार येते. ताज्या नारळाची खोवलेली चटणी तडका प्राप्त करून देते. केशरी रंगाची टोमॅटोची चटणी तो खाद्यपट खुलवून टाकतो. या इडलीख्यानात माणूस दंग होऊन जातो.
पंचतारांकित हॉटेलांपासून ते रस्त्याकडेच्या अण्णाच्या टपरीपर्यंत, इडलीचा गाभा कायम असतो. रेल्वेस्टेशन किंवा बसस्टँडबाहेर पडलात तर एखादं शेट्टीपंथांचं उडपी हॉटेल तुम्हाला दिसेल. गल्ला काऊंटरच्या डोक्यावर देव्हाऱ्यात पूजाअर्चा झालेली असते. धूपाचा दर्प रंध्रांना जाणवतो. बाकी हॉटेल म्हणाल तर ambiance अशा लाईफस्टाईल गोष्टींपेक्षा झटपट उदरभरण याला महत्त्व.
सकाळच्या वेळी प्रत्येकाचं दिवसाचं गणित ठरलेलं असतं. अशावेळी स्टीलच्या प्लेटमध्ये येणारी शांत इडली दिवसाचा टोन सेट करते. काहीजण इडलीला सांबाराने न्हाऊन घालून खातात. काहीजण इडलीचे तुकडे करून सांबार-चटणीबरोबर खातात. दक्षिण भारत हा इडलीचा बालेकिल्ला. पण मुंबई, महाराष्ट्र आणि अन्य राज्यातही सकाळी रंगणारा इडलीचा माहौल मुळातूनच अनुभवण्यासारखा.

इडलीची कोणावरही कुरघोडी नाही. पोहे-उपमा-उकड-मोकळ भाजणी-शिरा हे घरगुती पदार्थ उत्तमच लागतात. ताजा पाव, तळणीतून निघालेला गरमागरम वडा-वड्याचं चुराभुस्कूट, तळलेली मिरची, लाल चटणी जिव्हा तृप्त करतं. नेहमीच्या अड्ड्यावर बाकड्यावर बसून तिखटजाळ मिसळीचा आस्वाद घेतला की असं एकदम जागृत वाटतं.
उत्तर भारतात मिळणारे छोले-कुलचे, अमृतसरी नान, छोले भटुरे, प्रांठा या सगळ्यानेही निस्सीम आनंद मिळतो आणि पोटही भरतं. डोसा, उताप्पा, मेदूवडा अप्पम, अप्पे या इडली पंथातल्याच गोष्टी निरलस आनंद मिळवून देतात. साबुदाणा वडा/खिचडी, सामोसा, मॅगी या सगळ्यांचं प्रत्येकाचं फॅनफॉलोइंग आहे.
सकाळसकाळी तेलकट खाणं टाळावं असा मुद्दा निघाला की वरच्यापैकी बरेच पदार्थ बाजूला सारले जातात. मैदा नको म्हटलं की ऑप्शन्स आणखी कमी होतात. कामाच्या निमित्ताने अनेकमंडळी घराबाहेर असतात.
घरगुती नाश्त्याचे पदार्थ खायला हवे असतात पण ते बाहेर मिळत नाही असं होतं. इडलीचा युएसपी म्हणजे तिच्या आरोग्यावरचा परिणाम. इडली बाधली असं आतापर्यंत ऐकिवात नाही. दिवेकर-दीक्षित किंवा तत्सम डाएटवाल्यांनी इडलीला खाण्यातून रद्दबातल करा असं सांगितलेलं नाही.
चव, मिळण्याची शक्यता, खर्च यापेक्षाही पदार्थाचा पोटावर होणारा परिणाम निर्णायक ठरतो. इडली आंबवलेली असते हे वास्तव नाकारण्यासारखं नाही. परंतु त्यामुळे तब्येतीचं घाऊक नुकसान झाल्याचं ऐकिवात नाही.

इडलीतलं निर्धोकपण आणि पांढरपेशी वृत्ती लक्षात घेऊन हल्ली अनेक मराठमोळ्या लग्नांमध्ये हॉलवर सकाळी नाश्त्याला इडली असते. मराठी भाषा, मराठी संस्कृती जपण्याचा आग्रह धरणारी मंडळी अगदी सहजतेने इडली चापताना दिसतात.
हॉस्पिटल्सच्या कॅन्टीनमध्ये हमखास इडली मिळते. अनेक शिबिरं, कॅम्पच्या ठिकाणी आयोजक इडलीच ठेवतात.
अनेक सीनियर सिटिझन मंडळी मॉर्निंग वॉक झाला की इडलीआहार घेतात. पिकनिकला जाताना किंवा दूरच्या प्रवासाला जाताना इडली खाणारी अनेक कुटुंबं आहेत. मुंबई आणि उपनगरांमध्ये चार इडल्या आणि चटणी असं पॅकेज्ड फूड देणारी मंडळी आहेत. इडलीचं पीठ मिळेल अशा पाट्या तुम्हाला अनेकठिकाणी अगदी बिगबझार, डीमार्टमध्येही दिसतील.

इडलीचं कूळ काय, कुठून आली, इडली कशी करतात, इडलीपात्र कुठे मिळतं हे सगळं अन्नपूर्णा पुस्तकात आहेच, नाही तर मित्रवर्य गुगल इडलीविषयी शेकडो पानं लगेच हजर करेलच.
आपला मतबल जीव ओतून तयार केलेली इडली फस्त करण्याशी आहे. दिवस सरकत जातो तसं इडलीचं अस्तित्व कमी होत जातं. पण हल्ली इडलीनेही कात टाकायला सुरुवात केली आहे. इडली चिली, इडली शेजवान, मसाला इडली, दही इडली असा इडलीचे चॅट आयटम प्रसिद्ध होऊ लागलेत.
मुंबईतला माटुंगा परिसर हा इडलीभक्तांसाठी श्रद्धेय ठिकाण. रुईया नाक्यावरच्या मणीज हॉटेलमधली इडली आणि त्याबरोबर मिळणारं सांबार-चटणी खाणं मस्ट आहे. पारंपरिक वळणाच्या शारदाभवनमध्ये इडली खाण्याचा आनंद अवर्णनीय आहे.
तिथून पुढे सरकलं आर्यभवन लागतं. जरा पुढे गेलं की श्रीसुंदर, समोरच राम आश्रय, डावीकडे पुढे मद्रास कॅफे, कॅफे म्हैसूर- इडली पर्यटनासाठी हा आदर्श परिसर आहे. कढी इडली, गडबड इडली, पोडी इडली, खोटो इडली अशा विविधांगी इडली इथे मिळतात.
माटुंग्यातच 'इडली हाऊस' नावाचं छोटेखानी हॉटेल आहे. इडली भाविकांसाठी हे तीर्थस्थळ आहे. इथे २५ विविध प्रकारच्या इडली मिळतात. इथल्या अनुभवावर स्वतंत्र लेख होऊ शकेल. याच परिसरातल्या अय्यपन इडली हाऊसमध्ये थट्टे इडली नावाचा भन्नाट प्रकार मिळतो.
हा ऐवज जेवणाला पर्याय होऊ शकतो. मुंबईल्या या दाक्षिणात्य वळणाच्या भागात तुम्हाला इडलीप्रेमी करण्याची ताकद आहे. हे प्रातिनिधिक झालं. ठाण्यात रात्री एक इडलीवाला कार्यरत असतो. तुमच्या आजूबाजूला, शहरात, राज्यात असंख्य ठिकाणी दर्जेदार इडली मिळते. दक्षिणेकडच्या राज्यांची वारी झाली तर इडलीप्रेमींची चंगळच. एअरपोर्टवर इडलीचे ब्रँड आऊटलेट सुरू झालेत. तिकडे ओट्सची इडलीही मिळते.

इडलीची आणखी एक ठसठशीत आठवण म्हणजे सकाळच्या वेळेस स्टीलच्या पातेल्यात पानांमध्ये गुंडाळलेल्या इडल्या आणि बरणीत चटणी घेऊन फिरणारे विक्रेते. शर्ट आणि लुंगी अशा पेहरावातले ही मंडळी पातेले डोक्यावर घेऊन पॉम्प पॉम्प असा भोंगा वाजवत हिंडत असतात. अनेक श्रमिक मंडळी अगदी स्वस्तात मिळणारा हा पौष्टिक नाश्त्यावर ताव मारतात.
आशिया खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत लेदर उद्योग प्रामुख्याने चालतो. याच धारावीत इडलीभोवती प्रचंड मोठं अर्थकारण आहे. धारावीतल्या अरुंद कोंदट गल्ल्यांमध्ये रोज पहाटे हजारोंच्या संख्येने इडल्या तयार होतात.
तामिळनाडूहून आलेली मंडळी तयार झालेल्या इडल्या आणि चटण्यांची पातेली घेऊन मुंबईभर हिंडत राहतात. सकाळी आठ ते दुपार होईपर्यंत ही मंडळी पार कर्जत ते कसारा आणि पनवेलपर्यंत पॉम्प पॉम्पचा भोंगा देत इडल्या विकतात. हातातलं काम न थांबवता झटपट करता येणारा आणि स्वस्तात मिळणारा हा नाश्ता अनेकांसाठी सोयीचा ठरतो.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








