इंदुरीकर महाराज या 5 वक्तव्यांमुळे आले होते अडचणीत...

फोटो स्रोत, KIRAN GUJAR
कीर्तनकार निवृत्ती देशमुख म्हणजेच इंदुरीकर महाराज त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपिठाने दिले आहेत.
पण, आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे इंदुरीकर महाराज अनेकदा चर्चेत असतात.
इंदुरीकर महाराजांनी केलेली 5 वादग्रस्त वक्तव्यं आता पाहूयात...
1. 'सर्व्हिसवाल्यांचे पेमेंट बुद्धीवर असायला पाहिजेत'
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित किर्तनात इंदुरीकर महाराज म्हणाले, "आपल्याकडे सगळे उलटे नियम आहेत. खरी कष्टाची ड्यूटी ज्यांची आहे, त्यांना पेमेंट कमी आहे. ज्यांना काहीच काम नाही, पैसाच मोजता नाही.
"सर्व्हिसवाल्यांचे पेमेंट हे बुद्धीवर असायला पाहिजेत. 1 जानेवारीला मेंदू चेक करायचा, जिकती बुद्धी कमी तितकं पेमेंट कमी करायचं."
इंदुरीकरांच्या या वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे.
2. 'तुमची मुलं दिव्यांग जन्माला येतील'
मार्च महिन्यात अकोल्यात आयोजित केलेल्या किर्तनात इंदुरीकर महाराजांनी त्यांचे व्हीडिओ यूट्यूबवर टाकणाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं होतं. यावेळी त्यांनी आपल्या वक्तव्यातून वाद ओढवून घेतला होता.
ते म्हणाले होते, "माझ्या कीर्तनाच्या व्हिडीओ क्लिप्स यूट्यूबवर टाकणाऱ्यांचे मुलं दिव्यांग जन्माला येतील. त्यांचं वाटोळं होईल. माझ्या जीवावर आतापर्यंत 4 हजारांवर लोकांनी युट्यूबकडून कोट्यवधी रूपये कमवलेय. अन् याच लोकांनी आपल्याला अडचणीत आणलंय."

फोटो स्रोत, KIRAN GUJAR
इंदुरीकरांच्या या वक्तव्यानंतर पुण्यातील दिव्यांग बांधवांनी त्यांच्याविरोधात तक्रार दिली होती. दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांनी त्यांच्या तक्रारीची चौकशी करून दोषी आढळल्यास कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना दिले होते.
इंदुरीकर यांच्या या वक्तव्यामुळे दिव्यांग व्यक्तींच्या भावना दुखावल्या आहेत. दिव्यांग व्यक्ती हक्क कायद्यानुसार हा गुन्हा आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली होती.
3. 'स्त्री संग सम तिथीला केल्यास...'
इंदुरीकरांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे तर त्यांच्याविरोधात न्यायालयात खटलाही दाखल करण्यात आला आहे.
एका कीर्तनात इंदुरीकर म्हणाले होते, "स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होत असतो. स्त्री संग जर विषम तिथीला झाला, तर मुलगी होत असते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होत असते.
"याचा पुरावा विचाराल तर पुलश्य नावाच्या ऋषीनं कैकशी नावाच्या स्त्रीसोबत सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आले आणि आदिती नावाच्या ऋषीनं पवित्र दिवशी संग केला, तर त्याच्यापोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्यकश्यपूनं नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला."

फोटो स्रोत, kiran gujar
इंदुरीकरांचं हे वक्तव्य म्हणजे गर्भलिंग निदान कायद्याचं उल्लंघन आहे, अशी टीका त्यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती.
त्यानंतर काही दिवसांनी एक पत्रक काढून इंदुरीकरांनी या वक्तव्याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली होती.
या वक्तव्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं इंदुरीकरांविरोधात न्यायालयात खटला दाखल केला आहे. सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात प्रलंबित आहे.
4. महिलेची तुलना चपलेशी
इंदुरीकरांच्या कीर्तनातील अनेक वक्तव्यं ही महिलांचा अपमान करणारी असतात, असा आक्षेप महिलांनीच बीबीसी मराठीशी बोलताना नोंदवला होता.
एका कीर्तनात लव्ह मॅरेजविषयीचं मत पटवून देताना इंदुरीकर महिलांची तुलना चपलेशी करतात.
ते म्हणतात, "लव्ह मॅरेज करणाऱ्या माणसाची बायको नवऱ्याला नावानं हाक मारते. किती मोठा कमीपणा आहे हा. आपण पुरुष आहोत पुरुष. नवरा आहे नवरा. मह्या बायकोनं मला एकेरी हाक मारली तर दात नाही का पाडणार तिचे? चप्पल कितीही भारी झाली म्हणून काय गळ्यात घालतो का? अहो चप्पल कुठं शोभती? बायको आहे ती. तिनं त्या मापात असावं."
5. 'मोबाईलमुळे मुली बिघडतात'
मुलीच्या जवळील मोबाईलबाबत केलेल्या वक्तव्यामुळेही इंदुरीकर महाराज वादात सापडले होते.
ते म्हणाले होते, "शाळेतल्या मुलीचं दप्तर तपासत जा. वह्या चेक करीत जा. एसटीचा पास चेक करीत जा. 8-10 दिवस झाले आपल्या पोरीची पास पंच नाही. मग पोरगी भुयारातून वर्गात निघती की काय, हे पाहा. मुलीचे मोबाईल चेक करत जा. तीन-तीन सिम आहेत त्याच्यात. तुम्हाला एकच नंबर माहिती आहे. दोन नंबरांना घरात रेंज नाही. मुलीचा मोबाईल घरात आवाज देत नाही, सज्जन आहे तो. सायलेंट असतो. तो घरात फक्त कन्हतो.
"मुलीच्या मोबाईलमधला बॅलेन्स चेक करत जा. आपण तर 100 रुपये दिले होते, त्याच्यात 200 रुपये आले. 100ला 500 ही स्कीम कोणती आहे बाबा. ही 1 जीबी आहे, 2 जीबी आहे, 4 जीबी आहे, का भूर्र जीबी (महाराज पोरगी पळून जाण्याच्या अर्थानं भूर्र म्हणत आहेत) आहे, जरा चौकशी करा."

फोटो स्रोत, kiran gujar
इंदुरीकरांची महिलांविषयीची ही अशी वक्तव्यं म्हणजे महिला स्वातंत्र्यावर बंधनं घालण्याचा प्रकार आहे, असं महिलांचं म्हणणं होतं.
तर, "प्रत्येक माणूस वेगळाच विचार करणार ना. आपला महिलांबद्दलचा दृष्टिकोन तसा तर नाहीये ना," असं इंदुरीकर महाराज बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले होते.
कीर्तनातील महिलांविषयीच्या या वक्तव्यांमुळे इंदुरीकरांना कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठात फेब्रुवारी 2020 मध्ये आयोजित किर्तनाचा कार्यक्रम रद्द करावा लागला होता.
"स्त्रियांच्या बाबतीत लांच्छनास्पद विधान करणारे, अवैज्ञानिक दावे करणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी कायद्यावर घाला घातला आहे. त्यामुळे असंवैधानिक विधानं करणाऱ्या व्यक्तीला विद्यापीठात येऊ देऊ नये," अशी मागणी अंनिसच्या सीमा पाटील यांनी त्यावेळी केली होती.
हेही वाचलंत का?
- इंदुरीकर महाराजांचा कोल्हापुरातील कार्यक्रम का रद्द झाला?
- गाडगेबाबांनी महाराष्ट्रात किर्तनाच्या माध्यमातून पिढ्यांना घडवलं, असं का म्हटलं जातं?
- शिवलीला पाटील यांनी मागितली वारकरी संप्रदायाची माफी
- 2 वर्षांनंतर मोफत जेवण मिळणार, या आशेनं ती शाळेत आली पण....
- एकाच वेळी दोन पदव्या घ्यायच्या असतील तर हे नक्की वाचा-
- पोद्दार शाळेची पाच तास गायब झालेली बस नेमकी कुठे गेली होती?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








