राज्यसभा निवडणूक : राष्ट्रवादीच्या पळून जाणाऱ्या आमदारांची धरपकड, हॉटेलमध्ये बंदी ते पुनरावृत्तीची भीती...

फोटो स्रोत, ShivSena
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी
राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन महाराष्ट्रात रणकंदन सुरू आहे. भाजपा म्हणतं आहे की कोणत्याही परिस्थितीत त्यांचा तिसरा उमेदवार निवडून येणार, तर इकडं भाजपाचा आत्मविश्वास पाहून 'महाविकास आघाडी'ही रणनीति ठरवते आहे.
कोणालाच आपले आमदार फुटू द्यायचे नाही आहेत. त्यामुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा 'रिसॉर्ट पॉलिटिक्स' पाहतो आहे.
शेवटची जागा जिंकायची असेल तर स्वत:च्या पक्षाव्यतिरिक्त इतर पक्षांचे आमदार आणि समर्थक अपक्ष आमदार आपल्या बाजूला वळवावे लागतील, हे शिवसेना आणि भाजपा, दोघांनाही माहिती आहे.
वास्तविक राज्यसभेसाठी खुलं मतदान असल्यानं पक्षाचा आदेश आमदारांना पाळावा लागतो. पण अपक्ष आमदारांचं सांगता येत नाही आणि सध्याच्या राजकीय वातावरणात स्वपक्षीय आमदांच्या निष्ठेचीही खात्री देता येत नाही, अशी स्थिती आहे.
त्यामुळेच महाविकास आघाडीनं या स्थितीत आपल्या आमदारांना एकत्र सुरक्षित ठेवण्याची पावलं उचलणं सुरु केलं आहे. विशेषत: शिवसेना. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी संध्याकाळी सेनेसोबत महाविकास आघाडीच्या सगळ्या आमदारांसोबत बैठक घेणार आहेत.
शिवाय शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना एकत्र एका हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय झाला आहे. असाच निर्णय कॉंग्रेस-राष्ट्रवादी स्वतंत्रपणे वा 'महाविकास आघाडी' एकत्र सर्व आमदारांसाठी घेण्याच्या तयारीत आहे.
कोण तळ्यात कोण मळ्यात हे अजूनही गुलदस्त्यात आहे, पण तोंड पोळलं असल्यावर कोणीही ताक कसं फुंकून पिणं स्वीकारेल, तसं महाविकास आघाडीचं दिसतं आहे.
जेव्हा हे सरकार अस्तित्वात आलं त्याअगोदर आमदारांची कशी पळवापळवी झाली होती, पळालेल्यांना कसं पकडून आणावं लागलं होतं आणि नंतर हॉटेलमध्ये एकत्र ठेवून त्यांच्यावर कशी पाळत ठेवावी लागली होती, याची कहाणी रंजक आहे.
कदाचित तेव्हा गेलेला विश्वास अद्यापही परत आला नाही आहे म्हणून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आघाडी टाळत राहिली आणि मग गुप्त मतदानाचे नियम बदलले.
आता जेव्हा सरकार एका प्रकारच्या सत्वपरिक्षेला सामोरं जातं आहे तेव्हाही हॉटेलमध्ये आमदारांना एकत्र ठेवण्याची वेळ आली आहे. त्यावेळेस या सरकारच्या आयुष्यात ही वेळ पहिल्यांदा कधी आली ते आठवणं आता उचित ठरेल.
23 नोव्हेंबरची पहाट आणि आमदारांचं शोधसत्र
हा तो दिवस आहे जेव्हा 'महाविकास आघाडी'चा जन्म होत होता आणि तेव्हाच तोंड पोळलं. 22 नोव्हेंवर 2019च्या दिवशी दिवसभर शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तीनही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सरकारस्थापनेला अंतिम रुप दिलं.
पण त्या दिवशी रात्री अजित पवारांनी आपला कंपू बदलला आणि 23च्या सकाळी फडणवीस-पवार सरकारनं महाराष्ट्र चकित झाला. याचा अर्थ राष्ट्रवादी फुटली आणि काही आमदार अजित पवारांसोबत गेले.
इथंपासून आमदारांची शोधाशोध आणि धरपकड सुरु झाली. आता केवळ राष्ट्रवादीचीच वेळ होती. सकाळच्या शपथविधीनंतर नेमकं काय काय झालंय याचा अंदाज येताच मग 'राष्ट्रवादी'च्या हालचालींचं केंद्र नरिमन पॉईंटचं 'यशवंतराव चव्हाण सेंटर' बनलं.
शरद पवार स्वत: तिथं येऊन बसले आणि 'राष्ट्रवादी'च्या सगळ्या आमदारांना तिथं गोळा करण्याचे आदेश देण्यात आले. थोड्याच वेळात शेकडो कार्यकर्ते तिथे गोळा झाले.

फोटो स्रोत, Twitter / @NCPSpeaks
पहाटे अजित पवारांच्या निरोपाबरोबर जे आमदार राजभवनावर गेले होते त्यांना नंतर समजलं की पक्षात फूट पडली होती. त्यातला अनेकांना हा पक्षाचा आदेशच वाटला होता आणि ते गेले होते.
आता जसं खरं समजलं तसे जे जे मुंबईतच होते, ते ते यशवंतराव चव्हाट सेंटरला एकेक यायला लागले. येऊन त्यांना ते शरद पवार आणि पक्षासोबतच आहेत हे जाहीरपणे सांगावं लागलं. राष्ट्रवादीच्या आमदारांची गणती होऊ लागली आणि संख्या वाढू लागली.
पण सगळेच काही परत येत नव्हते. काहींना तर शिवसेनेच्या नेत्यांनीही मुंबईतून शोधून आणलं. अजित पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय बनसोडे होते अशी चर्चा तेव्हा दिवसभर होती. त्यांना मुंबईबाहेर नेण्याचा प्रयत्न सुरु होता.
मात्र शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांनी त्यांना जवळपास ताब्यात घेऊनच पुन्हा राष्ट्रवादीच्या गोटात आणलं अणि ते स्वत: बनसोड यांना यशवंतराव चव्हाण सेंटरला घेऊन आले.
पण त्याहीपेक्षा मोठं नाट्यपूर्ण सत्र घडलं ते हरयाणाच्या गुरुग्राममध्ये. अजित पवारांसोबत गेलेल्या चार आमदारांना भाजपाशासित हरियाणामध्ये नेण्यात आलं होतं. पण राष्ट्रवादीच्या तिथल्या कार्यकर्त्यांनी त्यांना अक्षरश: तिथून 'रेस्क्यू' करुन आणलं.
हरयाणातलं राष्ट्रवादी आमदारांचं 'रेस्क्यू ऑपेरेशन'
नरहरी झिरवळ, अनिल पाटील, नितीन पवार, दौलत दरोडा असे राष्ट्रवादीचे काही आमदार चार्टर्ड विमानानं मुंबईबाहेर नेण्यात आले होते. त्यांना कल्पनाही नव्हती की त्यांना कुठे नेण्यात आलं आहे.
गुरुग्राममधल्या हॉटेलमध्ये नेल्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांच्या सुरक्षेत त्यांना ठेवण्यात आलं होतं. या आमदारांना सिनेमामध्येच शोभावं अशा प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा संघटनेनं सोडवून मुंबईला परत आणलं.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा आणि विद्यार्थी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहान आणि त्यांच्या टीमने ही सुटका केली होती.
सोनिया दुहान यांनी तेव्हा बीबीसी मराठीशी बोलताना ऑपरेशन गुरुग्रामबद्दल माहिती दिली होती. त्या स्वतः गुरुग्राममध्ये राहातात. त्या म्हणाल्या, "आमच्या (राष्ट्रवादी) काँग्रेसच्या आमदारांना ओबेरॉय हॉटेलमध्ये बंद केल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. परंतु नक्की कोणतं ओबेरॉय हॉटेल हे आम्हाला समजलं नव्हतं. दिल्ली आणि गुरुग्राम अश दोन ठिकाणी ओबेरॉय हॉटेल्स आहेत."

फोटो स्रोत, SONIA DUHAN
"आमच्या आमदारांनांही आपल्याला कुठे ठेवण्यात आलंय हे माहिती नव्हतं. त्यांनी फूड ऑर्डर बूकवरून ओबेरॉयमध्ये आहोत इतकाच मेसेज कसाबसा पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचवला होता. त्यामुळे आम्ही हे रेस्क्यू ऑपरेशन सुरु केलं.
गुरुग्रामच्या ओबेरॉयमध्ये आम्ही 200 लोकांना घेऊन गेलो. त्यासाठी 2 टीम्स तयार करण्यात आल्या होत्या. हे तिघे पाचव्या मजल्यावर आहेत असं आम्हाला समजलं ते 5109, 5100, 5111 या खोल्यांमध्ये होते आणि त्यांच्यावर भाजपच्या सुमारे 100 ते 150 लोकांचा पहारा होता."
"या लोकांना सोडवण्यासाठी आमच्या टीमने हॉटेलमध्ये रुम्स बुक केल्या आणि दिवसभर हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आम्ही तेथे राहिलो. जसे आमचे एकेक आमदार दृष्टीस पडले तसे एकेकाला हॉटेलच्या काही स्टाफच्या मदतीनं मागच्या दाराने आम्ही बाहेर काढलं. त्यानंतर गोएअरच्या विमानानं त्यांना मुंबईत आणलं."
महाविकास आघाडीचे सगळे आमदार 'बीकेसी'तल्या हॉटेलमध्ये
एवढं सगळं घडल्यानंतर दोन दिवसांनी पवार-फडणवीसांचं सरकार पडलं. उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग सोपा झाला होता. पण तरीही शेवटी विश्वासदर्शक ठरावापर्यंत आमदारांना हॉटेलमध्येच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
'राष्ट्रवादी'च्या आमदारांना तर यशवंतराव चव्हाण सेंटरमधूनच एकत्र हॉटेलमध्ये नेण्यात आलं होतं. कॉंग्रेसचे सगळे आमदार पहिल्यापासून राजस्थानातल्या एका हॉटेलमध्ये होते. आता शिवसेनेसहित या तीनही पक्षांचे आमदार 'बीकेसी'तल्या सोफिटेल हॉटेलमध्ये मुक्कामाला नेण्यात आले.

सोफिटेलमध्ये असतांनाच सगळ्या आमदारांना एकत्र राहण्याची शपथ देण्यात आली. या सगळ्या मुक्कामात आमदार बाहेर पडू शकले नाहीत. त्यांच्या हालचालींवर, संपर्कावर लक्ष ठेवण्यात आलं.
बाहेर शिवसैनिकांचा अक्षरश: पहारा ठेवण्यात आला होता. विधानसभा अध्यक्षपद निवडीनंतरच संख्याबळाची स्पष्टता आली आणि आमदार आपापल्या घरी जाऊ शकले. आता तीच परिस्थिती परत दिसण्याची शक्यता आहे.
राज्यसभेच्या एका जागेसाठी पुन्हा हॉटेलवारी
राज्यसभेच्या निवडणूकीसाठी आमदारांच्या मतांची रस्सीखेच सुरू आहे. राज्यसभेचं मतदान हे खुल्या पध्दतीने होत असल्यामुळे पक्षाचे आमदार फुटण्याची जरी भिती नसली तरी आमदार निवडणूकीवेळी गैरहजर राहू नयेत, त्याचबरोबर मतं बाद होऊ नयेत यासाठी सर्व आमदार एकत्रित एका हॉटेलमध्ये ठेवण्याची रणनिती केली जाते.

फोटो स्रोत, Twitter / @NCPSpeaks
अपक्ष आमदारांवर घोडेबाजार करून किंवा इतर मार्गाने दबाव आणून मतं फुटू शकतात. यासाठी हॉटेलमध्ये एकत्रितपणे सर्व आमदारांना ठेवलं जातं.
शिवसेनेकडून मुंबईतलं पंचतारांकित हॉटेल बुक करण्यात आलं आहे. भाजपकडूनही काही हॉटेल्स बुक करण्यात आली आहेत अशी माहिती आहे. पण अद्याप कोणकोणते हॉटेल्स बुक करण्यात आले आहेत याबाबत कोणीही अधिकृत माहिती कोणत्याही पक्षाकडून देण्यात आलेली नाही.
पण महाराष्ट्राचं राजकारण या एका जागेसाठी एका निर्णायक वळणार येऊन ठेपलं आहे आणि त्यातलं एक आयुध हॉटेल आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








