महाराष्ट्रात पावसाऐवजी एवढं कडक ऊन का पडलंय?

महाराष्ट्रात येत्या तीन ते चार दिवसांत मेघगर्जनेसह पूर्वमोसमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्याबाजूला विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

मोसमी पावसाचे केरळमध्ये 29 मे रोजी आगमन झाल्यानंतर महाराष्ट्रात यंदा पाऊस वेळेआधी येईल असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु पावसासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

कारण 31 मेपासून मान्सून पश्चिम किनाऱ्यावर एकाच जागी रेंगाळला आहे. तो सात दिवसांत कर्नाटक-गोव्याच्या सीमाभागातून पुढे सरकलेला नाही.

मात्र महाराष्ट्रात काही ठिकाणी पूर्वमोसमी (मान्सूनपूर्व) पावसाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांत मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली.

कोणत्या जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'?

अहमदनगर, सातारा, पुणे, बीड, परभणी, कोल्हापूर, सोलापूर, हिंगोली, नांदेड, लातूर, उत्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये पुढच्या तीन ते चार दिवस मेघगर्जनेसह मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

6 ते 9 जून या कालावधीत एकूण 13 जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

केरळमध्ये नेहमीपेक्षा तीन दिवस आधीच मान्सून ऑनसेट म्हणजे मान्सूनचं आगमन झाल्याचं भारतीय हवामान खात्यानं जाहीर केलं होतं. मान्सून सामान्यतः 1 जूनला केरळमध्ये दाखल होतो, यंदा तो वेळेआधीच इथे सक्रिय झाला.

यंदा मान्सून अंदमानच्या समुद्रात 16 मे रोजी म्हणजे नेहमीपेक्षा साधारण आठवडाभर आधीच सक्रिय झाल्याचं हवामान खात्यानं जाहीर केलं होतं. तेव्हापासून केरळ, कर्नाटक, गोवा आणि कोकणातील अनेक ठिकाणी पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळताना दिसल्या.

उष्णता का वाढली?

यंदा अंदमानमध्ये मान्सन 16 रोजी म्हणजेच वेळेआधी दाखल झाला. त्यानंतर केरळमध्येही पाऊस लवकर आला. परंतु अरबी सुमद्रात आल्यानंतर मान्सूनचा वेग मंदावला आहे.

उत्तर ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्ताकडे वाहणाऱ्या सागरी प्रवाह आणि वाऱ्यांमध्ये बदल झाले आणि उत्तर, वायव्य आणि मध्य भारतात पुन्हा तापमान वाढलं आहे. कोरड्या हवेनं आणलेल्या व्यत्ययामुळे मान्सूनच्या प्रवासावरही परिणाम झालाय. ही परिस्थिती बदलली की मान्सून पुन्हा सक्रीय होईल.

अमरावती, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भात तापमान वाढेल.

आता विदर्भात तापमानाचा पारा 7 जूनलाही चढता राहील, तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत वादळी वाारे आणि वीजांसह पाऊस पडेल.

मॉन्सून ऑनसेट म्हणजे काय?

भारताच्या मुख्य भूमीवर नैऋत्य मोसमी वारे पहिल्यांदा केरळमध्ये दाखल होतात. सामान्यतः अंदमान-निकोबार बेटांवर 15 ते 20 मे दरम्यान आणि केरळमध्ये मे महिन्याच्या अखेरच्या दिवसांतच पाऊस पडायला सुरुवात होते.

पण फक्त पाऊस आला, म्हणजे मान्सूनची सुरुवात झाली, असं नाही. तर एखाद्या ठिकाणी विशिष्ठ कालावधीतील पावसाचं प्रमाण, वाऱ्याचा वेग आणि तापमानाची स्थिती पाहून हवामान विभागाचे तज्ज्ञ त्या ठिकाणी मान्सून ऑनसेट झाल्याचं म्हणजे मान्सूनची सुरूवात झाल्याचं जाहीर करतात.

केरळ आणि लक्षद्वीपमधल्या 14 ठराविक हवामान केंद्रांपैकी किमान 60 टक्के म्हणजे 9 केंद्रांवर ठिकाणी 10 मे नंतर कधीही सलग दोन दिवस 2.5 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली, तर तिथे मान्सून दाखल झाल्याचं हवामान विभाग जाहीर करतो.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)