पंजाब डख : हवामान अंदाजासाठी चर्चेत असणारी ही व्यक्ती आहे तरी कोण?

फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी
महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला पंजाब डख हे नाव माहिती नसेल, असं क्वचितच घडेल.
हवामान अभ्यासक पंजाब डख आणि त्यांनी सांगितलेला हवामानाचा अंदाज याची गावागावात चर्चा होताना दिसून येते. त्यांचे अंदाज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसून येतात.
जालना, औरंगाबाद आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये रिपोर्टिंग करत असताना मी स्वत: याचा अनुभव घेतला.
28 मे रोजी मी औरंगाबादमधल्या शेंद्रा कमंगर या गावी होतो. पाऊस-पाण्यावर चर्चा सुरू असताना तिथल्या शेतकऱ्यांनी मला सांगितलं, "पंजाब डख यांचे अंदाज आमच्यापर्यंत येत असतात. आम्ही त्यांच्या अंदाजाची वाट पाहत असतो."
असाच अनुभव मला गेल्यावर्षी जालन्यात आला. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात चंदन शेतीची बातमी करण्यासाठी गेलो असता तिथलेही शेतकरी म्हणाले, "पंजाब डख यांचा हवामानाचा अंदाज खरा ठरताना दिसत आहे."
पंजाब डख यांची त्यांच्या हवामानाच्या अंदाजामुळे एवढी क्रेझ निर्माण झालीय, की महाराष्ट्रातल्या गावागावांमध्ये त्यांचे सत्कार सोहळे आयोजित केले जात आहेत. मिरवणूका काढल्या जात आहेत.
त्यामुळे मग पंजाब डख कोण आहेत? ते हवामानाचा अंदाज कसा सांगतात? तो कितपत खरा ठरतो? त्यांच्या अंदाजांवर हवामान तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे? आणि पंजाब डख यांचा अंदाज शेतकऱ्यांना किती पटतो? ते आता आपण जाणून घेणार आहोत.
पंजाब डख कोण आहेत?
पंजाब डख यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी मी त्यांच्या परभणी जिल्ह्यातल्या गुगळी धामनगाव (26 ऑगस्ट 2021) या गावात पोहोचलो.
दुपारी कुठेतरी मार्गदर्शन करण्यासाठी जायचं असल्यामुळे त्यांनी आम्हाला सकाळीच 8 वाजता बोलावलं होतं.
तुमच्याविषयीची वैयक्तिक माहिती सांगा असं विचारल्यार ते म्हणाले, "माझं बीए झालेलं आहे. सीटीसीए आहे आणि एटीडी आहे. मी गावातल्या जिल्हा परिषद शाळेवर अंशकालीन शिक्षक म्हणून 2012 साली लागलो होतो. पण, 2017 च्या नंतर त्याला कोर्टानं स्टे दिला. त्यामुळे सगळे 18 हजार शिक्षक आता रिक्त पदावर आहेत."
शेतीविषयी विचारल्यावर ते म्हणाले, "माझ्याकडे 10 एकर जमीन आहे. 1995 पासून माझा हवामानावर अभ्यास आहे. त्यामुळे मी निर्सगावर, हवामानावर आधारित शेती करतो. मी सोयाबीन आणि हरभरा पिके घेतो. घरचंच बियाणं वापरतो. बिगर बैलाची, बिगर गड्याची, बिगर मजुराची शेती करतो."

फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
हवामानाबद्दल नेमकं काय शिक्षण घेतलंय, या प्रश्नाचं उत्तर देताना डख म्हणाले, "मी आणि माझे वडील हिंदीमधील हवामानाच्या बातम्या पाहायचो. त्यात हवामानाचे अंदाज दाखवायचे. हिंदी आणि इंग्रजीत अंदाज सांगितला जायचा, पण तो राष्ट्रीय पातळीवर सांगितला जायचा. मग मी वडिलांना म्हणालो की महाराष्ट्रात 42 हजारांहून अधिक गावं आहेत. त्यामुळे मग राज्यात नेमका पाऊस कुठे आणि कधी पडेल हे कसं सांगायचं? त्यावेळेस मी आठवीला होतो.
"तेव्हापासूनच मला हवामानाचा छंद लागला. 2002 ला परभणीला जाऊन सीडॅक कॉम्प्युटरचा कोर्स केला. तिथं फक्त आणि फक्त उपग्रह बघण्यासाठी मी जात होतो. त्यानंतर निसर्गाच्या बारीक बारीक बदलांवर अभ्यास सुरू केला."
पावसाचा अंदाज कसा सांगता हा प्रश्न असं विचारल्यावर ते म्हणाले, "माझा उपग्रह आणि निसर्गावर अभ्यास आहे. माझं निरीक्षण खूप आहे. मी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काम करतो म्हणून मला केवळ पाण्याचे ढग दिसतात. माझा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. मी जे बघतो ते शेतकऱ्यांच्या भल्याच्या दृष्टिकोनातून बघतो."

फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
पण, पावसाचा अंदाज सांगण्याचं तुमचं तंत्र काय आहे, असं विचारल्यावर डख म्हणाले, "माझा शास्त्रीय, नैसर्गिक आणि वातावरणाचा अभ्यास आहे. निसर्गात पाऊस येणार की नाही हे सांगणारे काही इंडिकेटर्स असतात. ते पाहून पाऊस येणार की नाही ते कळतं."
23 ते 28 ऑगस्ट 2021 दरम्यान पाऊस पडणार नाही, सूर्यदर्शन होईल, असा अंदाज तुम्ही सांगितला होता. पण, या काळात आम्ही रिपोर्टिंग करत आम्हाला जालन्यात 25 ऑगस्ट रोजी पाऊस लागला. त्यात आम्ही भिजलोसुद्धा. याच दिवशी बीड आणि उस्मानाबादमध्ये पाऊस पडल्याच्या बातम्या होत्या. मग तुमचा अंदाज चुकतो, असं नाही का वाटतं, असं विचारल्यावर डख म्हणाले,
"नाही, माझा अंदाज चुकीचा ठरत नाही. तुम्ही माझा मेसेज नीट बघितला की कळेल, त्यात राज्यात काही काही ठिकाणी तुरळक पाऊस पडेल असं लिहिलं आहे. मी पाऊस जरी नाही सांगितला तरी स्थानिक वातावरणाहून त्याजागी पाऊस पडतो, हे शेतकऱ्यांना माहिती असावं. वारे बदल झाला की, पावसाची दिशा, ठिकाण आणि वेळ बदलते."
जूनच्या सुरुवातीचा अंदाज काय?
"राज्यात जून 1, 2, 3, 4 दरम्यान दररोज भाग बदलत पावसाचं जोरदार आगमन होणार आहे. कोल्हापूर, सातारा, सागंली, पुणे, नगर, नाशिक, सोलापुर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, बीड, जालना, औरंगाबाद-वैजापूर असा भाग बदलत पाऊस पडणार आहे. शेवटी हा अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ, ठिकाण, बदलते हे माहीत असावं," पंजाब डख यांनी अलीकडे जारी केलेला अंदाज असा होता.
या अंदाजाविषयी विचारल्यावर औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरमधील तरुण शेतकरी संदीप औताडे सांगतात, "1 जून रोजी वैजापूरला एकदम तुरळक पाऊस झाला. 2 तारखेला मात्र वैजापूरच नाही तर माझ्या लासूर स्टेशन गावातसुद्धा पाऊस पडलेला नाही."

फोटो स्रोत, PAnjab dakh
पंजाब डख माहिती आहेत का, असं विचारल्यावर औताडे म्हणाले, "पंजाब डख यांचा एक कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता. गेल्यावर्षी त्यांचे अंदाज बरोबर आले होते. यावर्षीचे अंदाज फसले आहेत. ते नेमकं कशाच्या आधारे अंदाज देत आहेत, हे सांगत नाहीत."
"पंजाब डख आता बियाण्यांच्या कंपन्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांनाही जात आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात चुकीचे मेसेज चालले आहेत," असंही औताडे म्हणाले.
हवामान तज्ज्ञ काय म्हणतात?
पंजाब डख यांच्या हवामानाच्या अंदाजाविषयी काय वाटतं, हे हवामान तज्ञांकडून जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.
हवामान अभ्यासक उदय देवळाणकर यांच्या मते, "आपल्या देशात एकूण 36 हवामान विभाग आहेत. महाराष्ट्रात 4 हवामान विभाग आहेत. हवामान विभागाची मोठी यंत्रणा कार्यरत आहे. हवामान विभाग हा विभागनिहाय अंदाज देत असतो. हवामान अंदाजाचा हा एक विश्वासार्ह स्रोत आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाची अचूकता 85 ते 90% आहे. त्यामुळे इतरांच्या भोंदूपणावर विश्वास ठेवू नये."
"हवामान विभाग दर 15 दिवसांचा अंदाज देत असतं आणि दररोज यासंदर्भातले नकाशे प्रकाशित करत असतं. यात OLR मॅप जो मान्सूनच्या हालचाली दर्शवत असतो तसंच INSAT CCD (सॅटेलाईट मॅप) असतो. शेतकऱ्यांच्या मुलांनी हवामान विभागाचे हे अंदाज वाचायला शिकलं पाहिजे. याशिवाय जवळच्या हवामान केंद्रावरचा हवेचा दाब पाहिला पाहिजे," असं ते पुढे म्हणाले.

फोटो स्रोत, PAnjab dakh
तर एका ज्येष्ठ हवामान तज्ञानं नाव न छापण्याच्या अटीवर म्हटलं, "हवामानाचा अंदाज सांगणं हे फार हुशार लोकांचं काम आहे. पण, हवामानाचं बेसिक ज्ञान नसताना हवामानाचे अंदाज कुणी सांगत असेल तर अवघड आहे. वारे, ढग, तापमान, आद्रर्तेबद्दलचे ज्ञान नसेल, कधी वेधशाळेत गेला नसेल आणि हवामानाचा अंदाज सांगत असेल तर हे खूप रिस्की काम आहे."
दरम्यान, 8 जून ते 15 जून दरम्यान राज्यात जोरदार पावसाची हजेरी असणार, असा अंदाज पंजाब डख यांनी 4 जून रोजी व्यक्त केला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
तर, भारतीय हवामान विभागाचे पुणे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी 5 जून रोजी एक ट्वीट करत म्हटलंय की, "राज्यातील अनेक स्वयंघोषित तज्ज्ञांनी पावसाबद्दल केलेल्या चुकीच्या निवेदनांवर विश्वास ठेवू नका. पेरणीसाठी शेतकऱ्यांनी राज्याच्या कृषी विभागाकडून मिळणाऱ्या सल्ल्यांकडेच लक्ष द्यावं. भारतीय हवामान विभागानं सतत दिलेल्या पावसाबद्दल माहिती पाहावी."
शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया
शरद सवडे मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यातील शेतकरी आहेत.
पंजाब डख यांच्या हवामानाच्या अंदाजाविषयी विचारल्यावर ते सांगतात, "पंजाब डख यांचे अंदाज व्हॉट्सअपवर आमच्यापर्यंत पोहोचत असतात. त्यांनी सांगितलेलं अॅक्युरेट ठरतं. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होतो. आम्ही स्वत: त्यांच्या अंदाजावर विश्वास ठेवतो आणि त्याचा आम्हाला फायदाही होतो."

फोटो स्रोत, PAnjab dakh
तर विदर्भातल्या बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी सुभाष खेत्रे सांगतात, "पंजाब डख यांचे हवामानाचे अंदाज व्हॉट्सअपवरून आमच्यापर्यंत पोहोचतात. त्यांचे अंदाज 70 ते 80 % खरे ठरतात. थोडं फार मागे-पुढे होतं. पण, आमचं आधी जे नुकसान व्हायचं ते त्यांच्या अंदाजामुळे झालं नाही. त्यांच्या अंदाजानुसार आम्ही काम करत असतो."
दरम्यान, हवामान विभागाच्या वेबसाईटवर जाऊन अंदाज कसे बघायचे, हे शेतकऱ्यांना माहिती नसतं. पंजाब डख आणि इतर काही जणांचे हवामानाचे अंदाज थेट व्हॉट्सअपवरून आणि सोप्या भाषेत आमच्यापर्यंत येतात. त्यामुळे मग त्यांची शेतकऱ्यांमध्ये क्रेझ आहे, असं संदीप औताडे सांगतात.
हवामानाचा अंदाज कुठे आणि कसा बघायचा?
भारतीय हवामान विभागाचा अंदाज हा हवामानाच्या अंदाजाचा अधिकृत स्रोत समजला जातो. याशिवाय कृषी विद्यापीठांच्या परिसरात हवामान केंद्रे स्थापन केलेली असतात. तिथेही हवामानाचे अंदाज व्यक्त केले जातात.
स्कायमेट ही हवामानाचा अंदाज देणारी खासगी संस्था आहे. भारतीय हवामान विभाग आणि स्कायमेट यांनी वर्तवलेल्या अंदाजाची आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असते.
भारतीय हवामान विभागाचा अंदाज बघण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल.
या वेबसाईटवर दिसत असलेल्या Warnings या भागात विशेष काही इशारा असेल, तर त्याची तारीख आणि जिल्हानिहाय तसंच विभागनिहाय माहिती दिलेली असते. जसं इथं 6 जून रोजी वाशिमध्ये वादळ आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तवली आहे.

फोटो स्रोत, Prataprao jadhao
Nowcast या भागात पुढच्या काही तासांत हवामानासंबंधी काही इशारा आहे का, याची जिल्हानिहाय आणि हवामान केंद्रानिहाय माहिती दिलेली असते.
Our Services या रकान्यात Rainfall information या भागात तुम्ही तुमच्या राज्यातील तुमच्या जिल्ह्यात गेल्या काही तासांत किती पाऊस झाला, याची नोंद केलेली असते.
तर Monsoon या भागात मान्सून कुठपर्यंत पोहोचलाय, त्याची काय स्थिती आहे ते तुम्ही पाहू शकता.
Cyclone या भागात पुढच्या काही तासांमध्ये वादळाची शक्यता आहे, ते सांगितलेलं असतं.
याशिवाय भारतीय हवामान विभागाच्या यूट्यूब चॅनेलवर दररोज संध्याकाळी देशातल्या हवामानाच्या अंदाजाविषयी माहिती दिली जाते. तीसुद्धा तुम्ही पाहू शकता. इथं दिवसभरातील हवामान आणि पुढच्या काही तासांतील हवामानाचा अंदाज यांची माहिती सांगितली जाते. हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत ही माहिती दिली जाते.

फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
स्कायमेट या संस्थेच्या हवामानाचा अंदाज संस्थेच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेला असतो. इथं जाऊन तो पाहता येऊ शकतो.
या वेबसाईटवर हवामानासंबंधीच्या बातम्या हिंदी, इंग्रजी आणि मराठीत वाचायला मिळतात. हवामानाच्या अंदाजासंबंधीचे नकाशे आणि व्हीडिओही इथं पाहायला मिळतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








