'शॉट'च्या त्या जाहिरातीवर सरकारनं घातली बंदी, जाणून घ्या प्रकरण

लेयर बॉडी स्प्रे उत्पादनाच्या आक्षेपार्ह जाहिरातीवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बंदी घातली आहे. ही जाहिरात प्रसारित झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत होता.

लेयर शॉट या बॉडी स्प्रे ची ही जाहिरात आहे. ही जाहिरात बलात्काराला प्रोत्साहन देत असल्याचा आक्षेप सोशल मीडियावर अनेकांनी नोंदवला होता. या आक्षेपाची नोंद घेत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जाहिरातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

जाहिरातीत एका खोलीत बेडवर एक मुलगा आणि मुलगी बसलेले असतात. यावेळी खोलीत चार मुलं येतात. त्यापैकी एक मुलगा म्हणतो, शॉट मारलास का?

आता आमची बारी असं म्हणून तो खोलीत ठेवलेली शॉट स्प्रेची बाटली घेऊन जातो. मग शॉट स्प्रेची बाटली हातात घेऊन तो म्हणतो- "शॉट तो बनता है"

लेअरच्या शॉट बॉडी स्प्रेची दुसरीही एक जाहिरात वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या जाहिरातीचा व्हीडिओही सोशल मीडियावर व्हायरल आहे.

एका स्टोअरमध्ये चार मुलं दिसतात. परफ्यूम ठेवलेल्या ठिकाणी जातात. तिथे आधीच एक मुलगी असते. त्या ठिकाणी शॉट स्प्रेची एक बाटली असते. मुलं म्हणतात, "आपण चौघं आहोत आणि इथे एकच आहे. मग शॉट कोण घेणार".

तेवढ्यात ती मुलगी मागे वळते, ती त्यांच्या बोलण्याने घाबरलेली दिसते. मुलीच्या चेहऱ्यावर रागही स्पष्ट दिसतो. तिला वाटतं की ते तिच्याबद्दलच बोलत आहेत. कॅमेरा लेअर शॉट बॉडी स्प्रेच्या बाटलीवर स्थिरावतो. त्या चौघांपैकी एकजण ती बाटली उचलतो आणि म्हणतो, "शॉट तो बनता है".

'शॉट' या शब्दाला दैनंदिन जीवनात शरीरसंबंधाचा संदर्भ आहे. बॉडी स्प्रेचं नाव द्वयर्थक पद्धतीने वापरून ही जाहिरात करण्यात आली.

या जाहिरात प्रसारित झाल्यानंतर सोशल मीडियावर वादाची राळ उडाली. ही जाहिरात तातडीने सर्व प्लॅटफॉर्म्सवर काढून टाकण्यात यावी असं अनेक सोशल मीडिया युझर्सनी अडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स काऊंसिल ऑफ इंडियाला टॅग करून म्हटलं आहे.

ही जाहिरात आक्षेपार्ह नाही? कृपया याची नोंद घेऊन कारवाई व्हावी असं युझर अनुराग दीक्षित यांनी म्हटलं आहे.

ही जाहिरात अतिशय आक्षेपार्ह आहे. एखाद्याचा छळ/अत्याचार शब्दच्छल पद्धतीने वापरून जाहिरात कशी तयार केली जाते? असा सवाल सामीम यांनी विचारला आहे.

या जाहिरात खूपच त्रासदायक आहेत. दोन्ही जाहिरातीत मुलं शॉट मारणार का? असं विचारतात. गँगरेपची मानसिकतेला अगदी स्पष्ट पद्धतीने खतपाणी घातलं जात आहे. अशा विकृत मानसिकतेच्या जाहिराती तयार होतात आणि लोक त्याचे व्हीडिओ शेअरही करतात असं कौस्तुभ यांनी म्हटलं आहे.

"ही डिओडरंटची जाहिरात खुलेआम बलात्काराच्या मानसिकतेला प्रोत्साहन देते. ही जाहिरात तयार करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा यासंदर्भात आम्ही दिल्ली पोलिसांना सूचित केलं आहे. या जाहिराती सर्व प्लॅटफॉर्म्सवरून तात्काळ काढून घेण्यात यावी", असं दिल्ली कमिशन फॉर वूमनच्या चेअरपर्सन स्वाती मालीवाल यांनी सांगितलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)