You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
संजय राऊतः काश्मिरी पंडितांच्या स्थितीत कलम 370 हटवल्यानंतरही कोणताही बदल झाला नाही #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. कलम 370 हटवल्यानंतरही काश्मिरी पंडितांच्या स्थितीत कोणताही बदल झाला नाही - संजय राऊत
काश्मीरमधील हत्यासत्रावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "काश्मीरमधील स्थिती फार गंभीर आहे. राज्यपालांसोबत गृहमंत्र्यांनी काल एक तातडीची बैठक बोलावली होती. सरकार प्रयत्न करत आहे, पण आज 1990 मध्ये होती तशीच स्थिती निर्माण झाली आहे.
"तुम्ही काश्मिरी पंडितांच्या घरवापसीबद्दल सांगितलं होतं आणि त्यावर हिंदुत्वाच्या नावे मतंही मिळवली होती. पण कलम 370 हटवल्यानंरही काश्मिरी पंडित, तेथील जनतेच्या स्थितीत कोणताही बदल झालेला नाही."
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून हत्यासत्र सुरूच आहे. कुलगाममध्ये गुरुवारी दहशतवाद्यांनी एका बँक व्यवस्थापकाची हत्या केली. दहशतवाद्यांनी 1 मेपासून काश्मीरमध्ये केलेली ही आठवी हत्या असून, या हत्यासत्राचे तीव्र पडसाद उमटत आहेत.
यावेळी राऊत म्हणाले, "लोकांना शोधून मारलं जात आहे. सरकारकडून सुरक्षेची कोणतीही व्यवस्था करण्याता आलेली नाही. लोकांचं स्थलांतर आणि पलायन सुरू आहे. जर इतर पक्षाच्या राजवटीत हे झालं असतं तर भाजपाने काश्मिरी पंडित, हिंहुत्वाच्या नावे संपूर्ण देशभर गोंधळ घातला असता.
"पण गृहमंत्री, पंतप्रधान, जम्मू काश्मीरमध्ये राज्य तुमचे असतानाही काश्मिरी पंडित जीव गमावत आहेत किंवा पलायन करत आहेत हे भयानक आहे."
2. राज्यसभेची सहावी जागा आम्ही जिंकू - रामदास आठवले
राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेत थेट लढत होणार आहे.
यावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभेची सहावी जागा आम्ही जिंकू असं म्हटलं आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.
महाविकास आघाडीने एक प्रस्ताव दिला होता, मात्र त्यावर निर्णय झाला नाही. त्यामुळे राज्यसभेची सहावी जागा आम्ही जिंकू, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.
रामदास आठवले म्हणाले, "महापालिका निवडणूक सोडत झाली असून 23 वॉर्ड शेड्यूल कास्टसाठी सोडण्यात आले आहेत. महाराष्ट्रात सर्वच महापालिकांची सोडत जाहीर झाली नसून भाजप सोबत महापालिका निवडणुका लढणार आहे. शिवाय इतर स्थानिक स्वराज संस्थेत देखील भाजप सोबत लढणार आहोत."
3 ...तर निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती करणार - विजय वडेट्टीवार
राज्यात वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं राज्य सरकारला पत्र लिहीलं आहे. मुंबई, पुणे पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये कोरोना रूगांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. त्यामुळे महापालिका तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींवर संकट निर्माण झालं आहे.
दरम्यान, कोरोना वाढल्यास राज्यातील महापालिका निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे करू, असं राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. सकाळनं ही बातमी दिली आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले, "पुढचे आठ दहा दिवस महत्वाचे आहेत. या दहा दिवसात किती पट रूग्ण संख्या किती वाढतेय त्यावरच निर्णय घेता येईल. येणाऱ्या निवडणूकीला बराच कालावधी आहे. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये निवडणूकीचा कार्यक्रम स्पष्ट होतोय.
"दोन महिने आहेत, त्या परिस्थितीवर चर्चा होईल. तशी परिस्थिती उद्भवली तर आम्हाला विनंती करावी लागेल. निवडणुका टाळता येतील का? हा देखील प्रश्न आहे."
4. वरळी, नायगाव येथील बीडीडी चाळींचे नामांतर
बीडीडी चाळींची नावे बदलण्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. त्यानुसार या चाळींच्या नामांतराचा शासन निर्णय (जीआर) शुक्रवारी गृहनिर्माण विभागाने जारी केला आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.
गृहनिर्माण विभागाच्या जीआरनुसार आता वरळीतील बीडीडी चाळीचे नामकरण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नगर करण्यात आले आहे, तर बीडीडी चाळ ना. म. जोशी मार्गासाठी आता स्वर्गीय राजीव गांधीनगर आणि बीडीडी चाळ, नायगावला शरद पवार नगर असे संबोधण्यात येईल. सध्या या चाळींच्या पुनर्वसन प्रकल्पाची कामे प्रगतीपथावर आहेत.
5. 'अपंगांना विमान कंपनी प्रवासासाठी मनाई करू शकत नाही'
कोणतीही विमान कंपनी अपंग व्यक्तींना विमान प्रवासासाठी मनाई करू शकत नाही, असं डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशननं म्हटलं आहे. एनडीटीव्हीनं ही बातमी दिली आहे.
रांची इथून विमान प्रवास करण्यास एका अपंग व्यक्तीला मनाई केल्यानंतर इंडिगो या कंपनीला 5 लाख रुपयांना दंड ठोठावण्यात आला होता.
त्यानंतर आता आठवड्याभरानं विमान प्राधिकरणानं हा निर्णय घेतला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)