नंदन निलेकणी : साधा बल्बही न बदलता येणारा इंजिनिअर ते आधारचा निर्माता

नंदन निलेकणी

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, स्नेहल माने
    • Role, बीबीसी मराठीसाठी

भारताच्या प्रत्येक नागरिकाला मिळालेली स्वतःची ओळख म्हणजे आधार कार्ड. दैनंदिन जीवनात कित्येक गोष्टींसाठी आपण आधार कार्ड वापरतो. आज कोणी कितीही टीका केली, आधार कार्डातल्या त्रुटी दाखवून दिल्या तरी एक गोष्ट मान्य करावी लागेल ती म्हणजे आधार कार्ड हे आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक ठरलं आहे.

एकशे तीस कोटी भारतीयांचं जगणं काही प्रमाणात सोपं करणारा आधार हा फक्त आपल्यासाठीच नाही तर संपूर्ण जगभरासाठी कुतूहलाचा विषय ठरला.

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या देशात इतकी प्रचंड लोकसंख्या असूनही तिथल्या प्रत्येक नागरिकाला एक युनिक नंबर असलेलं बायोमॅट्रिक कार्ड देणं ही एक अशक्यप्राय गोष्ट होती. पण भारताचं ते स्वप्न साकार झालं एका व्यक्तीमुळं. त्याचं नाव आहे - नंदन मोहनराव निलेकणी.

कोण आहेत नंदन निलेकणी

नंदन निलेकणी यांचा जन्म 2 जून 1955 रोजी बंगळूरातील एका मध्यमवर्गीय कुटूंबात झाला. त्यांचे वडील एका टेक्सटाईल मिलमध्ये मॅनेजर होते. नंदन यांचं प्राथमिक शिक्षण मात्र बंगळुरपासून दूर आपल्या काकांकडे धारवाड इथं झालं. नंदन निलेकणी जात्याचं हुशार माणूस. धारवाड सारख्या शैक्षणिकदृष्ट्या सजग असलेल्या शहरात त्यांच्या व्यक्तिमत्वावर पैलू पडले.

त्यांनी मेहनत करून देशातील सर्वांत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या आयआयटी मुंबईत इलेक्ट्रिक इंजिनीयरिंगसाठी प्रवेश मिळवला. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर नंदन निलेकणी हे इतर अभ्यासेतर उपक्रमातदेखील सहभागी व्हायचे. आयआयटी मुंबईच्या क्विझ टीमचं नेतृत्व त्यांनी केलं. अनेक स्पर्धा जिंकल्या.

नोकरीच्या शोधात...

पुढे इंजिनियरिंग पूर्ण झाल्यावर नोकरीच्या शोधात असताना नंदन निलेकणींना पटणी कॉम्प्युटर्स या कंपनीमधून इंटरव्ह्यूसाठी कॉल आला. तिथे त्यांचा इंटरव्ह्यू घेतला तो कर्नाटकच्याचं एका आयआयटी पासआऊट इलेक्ट्रिक इंजिनियरने. ते होते नारायण मूर्ती.

नंदन निलेकणी

फोटो स्रोत, Getty Images

नारायण मूर्तींनी बिझनेस टुडेला दिलेल्या एका मुलाखती मध्ये सांगितलं होतं की, "नंदनला त्या दिवशी मुलाखतीमध्ये मी अत्यंत अवघड अशी आयक्यू टेस्ट दिली होती. ती त्याने सहजपणे सोडवली." त्या दिवशीच्या मुलाखतीमध्ये नंदन निलेकणी यांनी नारायण मूर्तींवर जो प्रभाव पाडला होता ते आजही विसरू शकले नाहीत.

आणि याचमुळे पटणी कॉम्युप्टर्सच्या टीममध्ये तरुण असलेल्या नंदन निलेकणी यांचादेखील समावेश झाला.

पटणी कॉम्प्युटर्स ही तेव्हा देशातील मोजक्या आणि अग्रगण्य सॉफ्टवेअर कंपनीपैकी एक होती. नारायण मूर्ती तिथे सॉफ्टवेअर विभागप्रमुख होते. भारतातील पहिल्या पिढीचे सॉफ्टवेअर इंजिनियर तेव्हा नारायण मूर्तींच्या हाताखाली काम करायचे. नंदन निलेकणी यांच्याशी त्यांची घट्ट मैत्री झाली.

इन्फोसिसची मुहूर्तमेढ...

मूर्ती हे त्यांच्यासाठी गुरूच बनले होते. दोघांच्या अनेक विषयांवर चर्चा व्हायच्या. या चर्चांमधून कॉम्प्युटर भविष्यात क्रांती घडवणार हे नारायण मूर्ती यांच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे नोकरी करण्यापेक्षा स्वतःची एक सॉफ्टवेअर कंपनी सुरु करावी, असं त्यांच्या डोक्यात घोळू लागलं.

पण त्यासाठी लागणार भांडवल आणि टीम त्यांच्याकडे नव्हती. अखेर बायकोने म्हणजेच सुधा मूर्तींनी उसन्या दिलेल्या दहा हजार रुपयांवर त्यांनी स्वतःची एक कंपनी सुरू केली. नाव दिलं इन्फोसिस...

नंदन निलेकणी

फोटो स्रोत, Getty Images

इन्फोसिसची मुहूर्तमेढ रोवताना नारायण मूर्ती एकटे नव्हते. पटणीमध्ये त्यांच्या हाताखाली काम करणारे इतर सहा इंजिनियर देखील त्यांचे पार्टनर होते. यात प्रमुख नाव होत नंदन निलेकणी. नारायण मूर्ती यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी आपली पटनी मधील मोठी नोकरी सोडायचं धाडस केलं होतं. सातही जण एका वेड्या स्वप्नाने भारावून गेले होते.

इन्फोसिसमधले ते दिवस..

पुण्यातल्या एका छोट्या फ्लॅटमध्ये इन्फोसिसचं काम सुरु झालं. पैसे वाचावेत म्हणून नारायण मूर्ती आणि नंदन निलेकणी हे आपल्या कुटुंबासह त्याच फ्लॅटमध्ये राहायचे. इतकंच नाही तर सुधा मूर्ती आणि रोहिणी निलेकणी या दोघीही आपल्या पतींना मदत व्हावी म्हणून ऑफिसमध्ये टेलिफोन उचलण्यापासून ते सर्व छोटी मोठी कामं करायच्या.

नंदन निलेकणी

फोटो स्रोत, Getty Images

जिद्दीने अनेक खटपटी करत इन्फोसिस त्यांनी उभं केलं. पुढे काही कारणांनी पुण्याहून कंपनी बंगळुरूला शिफ्ट झाली. 1992 साली इन्फोसिसचे शेअर सार्वजनिकरित्या खुले झाले. नव्वदच्या दशकात इन्फोसिस भारतातील सर्वांत मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये गणली जाऊ लागली. सात जणांनी लावलेल्या या रोपट्याचा हळूहळू वटवृक्ष झाला.

नंदन निलेकणी हे 2002 साली इन्फोसिसचे सीईओ बनले. पुढे 2007 साली त्यांना कंपनीचे चेअरमन बनवण्यात आलं. मूर्तींच्या सोबत कंपनीला भरभराटीस आणणारे नंदन निलेकणी कधीतरी इन्फोसिस सोडतील असं कोणालाच वाटलं नव्हतं. पण तशी वेळ आली 2009 मध्ये. कारण ठरले भारताचे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग...

'आधार'ची जन्मकथा..

द हिंदू या वृत्तपत्रात सांगितल्यानुसार, आधारची कार्डची पहिली संकल्पना 1999 साली मांडण्यात आली. त्याकाळी भारत पाकिस्तान यांच्या दरम्यान कारगिल युद्ध सुरू होतं. या युद्धानंतर राष्ट्रीय सुरक्षेचा अभ्यास करण्यासाठी के. सुब्रमण्यम यांच्या नेतृत्वाखाली कारगिल पुनरावलोकन समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने आपल्या अनेक निरक्षणांसोबत सीमाभागातील लोकांना आयडेंटिटी कार्ड देण्यात यावे असा प्रस्ताव सरकारकडे सोपवला.

तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर बनवायची पावले उचलण्यात आली. गृहमंत्री लालकृष्ण अडवाणींनी राष्ट्रीय आयडेंटिटी कार्ड बनवावे यासाठी प्रयत्न सुरु केले. याला अडथळे ठरणारे काही कायदे 2003 साली शिथिल करण्यात आले. पण पुढच्या वर्षी सरकार बदललं. वाजपेयींच्या जागी डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान बनले. त्यांनी ही योजना गुंडाळली नाही तर त्याऐवजी या योजनेची व्याप्ती वाढवली.

आधारसाठी इन्फोसिसचा राजीनामा..

UIDAI च्या वेबसाईटवर दिलेल्या इतिहासानुसार, 03 मार्च 2006 रोजी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 'बीपीएल कुटुंबांसाठी युनिक आयडेंटिफिकेशन' नावाच्या प्रकल्पासाठी मान्यता दिली. यावर कार्यवाही करण्यासाठी त्याच वर्षी एक कमिटी स्थापन करण्यात आली.

आधी हा प्रकल्प नियोजन आयोगाच्या अंतर्गत चालवला जायचा. पण 2009 साली पंतप्रधानांनी हा प्रोजेक्ट स्वायत्त बनवायचं ठरवलं आणि याच्या निर्माणासाठी जबाबदारी दिली ती इन्फोसिसच्या नंदन निलेकणी यांच्याकडे.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

2 जून 2009 रोजी मनमोहन सिंग यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युनिक आयडेन्टिटी ऑथॉरिटीच्या चेअरमनपदी नंदन निलेकणी यांची निवड करण्यात आली. या स्वायत्त संस्थेचा प्रमुख म्हणून नंदन निलेकणी यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा असणार होता.

कोट्यवधी देशवासियांना ओळख मिळवून देणाऱ्या कार्डची निर्मिती करण्यासाठी नंदन निलेकणी यांना पूर्णवेळ काम करणं गरजेचं होतं. राष्ट्रीय आयडेंटिटी कार्डसाठी त्यांनी आपलं पहिलं प्रेम असलेल्या इन्फोसिसचा राजीनामा दिला.

नंदन निलेकणी यांच्या प्रवेशानंतर UIDAI च्या कामाला वेग आला. एप्रिल 2010 रोजी त्यांनी राष्ट्रीय ओळखपत्राचं नाव आधार कार्ड असेल अशी घोषणा केली आणि लोगोचे अनावरण केले. त्यांच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रचंड ज्ञान आणि अनुभवाच्या जोरावर विक्रमी वेळेत आधार कार्डची निर्मिती झाली.

आधारमध्ये केलेल्या कामामुळे नंदन निलेकणी हे पंतप्रधानांच्या अगदी जवळचे बनले.

आधार

फोटो स्रोत, Getty Images

या काळात नंदन निलेकणी यांचा काँग्रेस पक्षाशी देखील संपर्क वाढला. याचाच परिणाम 2014 साली त्यांना बंगळूर येथे काँग्रेस पक्षाने खासदारकीचे तिकीट दिलं. राहुल गांधी यांच्या आग्रहामुळे नंदन निलेकणी यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश झाला. भविष्यात काँग्रेसची पुन्हा सत्ता आली तर डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात त्यांना मोठपद मिळण्याची शक्यता बोलून दाखवली गेली.

नंदन निलेकणी यांच्यासारखं स्वच्छ चारित्र्य असणारे आणि कॉर्पोरेट क्षेत्रातला अनुभव असणारे व्यक्ती राजकारणात येणे हे बदलत्या भारताचं चांगलं चित्र आहे असं मानलं गेलं. पण दुर्दैवाने मोदी लाटेत नंदन निलेकणी यांचा खासदारकीला पराभव झाला. या निवडणुकीनंतर सरकार बदललं मात्र तरीही नंदन निलेकणी यांची अनेक महत्त्वाच्या सरकारी बोर्डावर नियुक्ती करण्यात आली.

2017 साली त्यांनी नारायण मूर्ती यांच्या इच्छेखातर इन्फोसिस मध्ये पुनरागमन केलं. विशाल सिक्का यांच्या वादग्रस्त प्रकरणानंतर इन्फोसिसला सावरण्यासाठी नंदन निलेकणी हेच एकमेव पर्याय आहेत असं अनेकांचं मत होतं. आपली राजकीय वस्त्रे बाजूला ठेवून नंदन निलेकणी आपल्या लाडक्या इन्फोसिसमध्ये परतले. आजही ते या कंपनीचे नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन आहेत.

आधार प्रणालीचा हा पायोनियर आपल्या खऱ्या आयुष्यात मात्र अत्यंत साधा आहे. बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ते गंमतीने म्हणाले होते, "आजही माझी बायको मला साधा बल्ब न बदलता येणारा एक खराब इलेक्ट्रिक इंजिनियर म्हणते."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)