सौरव गांगुलीच्या 'नवे पर्व'च्या ट्वीटवरून चर्चांना उधाण, नंतर दिले स्पष्टीकरण

आज सकाळी वेगवेगळी वृत्तपत्रे आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. सौरव गांगुलीच्या ट्वीटवरून चर्चांना उधाण, नंतर दिलं स्पष्टीकरण

टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलींनी 1 जूनला संध्याकाळी एक ट्वीट करत चाहत्यांना संभ्रमात टाकलं. त्यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चा सुरू झाल्या.

त्यांच्या राजकारण प्रवेशाच्या शक्यतांवरून अनेक सोशल मीडिया युझर्सने प्रतिक्रिया दिल्या. पण काही वेळातच बीसीसीआय सचिव जय शाह यांनी गांगुलीने राजीनामा दिला नसल्याचं सांगितलं.

स्वतः सौरव गांगुलीही यांनी दुसरं ट्वीट करून स्पष्टीकरण दिलं की त्यांनी एक जागतिक शैक्षणिक अॅप लॉन्च केलेलं आहे.

ही बातमी NDTV ने दिली आहे.

सौरव गांगुलींनी आपल्या पहिल्या ट्वीटमध्ये लिहिलं होतं की, '1992 साली माझ्या क्रिकेटच्या प्रवासाला सुरूवात झाली. 2022 मध्ये आता याला 30 वर्ष पूर्ण होत आहेत. तेव्हापासून क्रिकेटने मला बरंच काही दिलं आहे. या प्रवासात मला पाठिंबा दिलेल्या प्रत्येकाचे मनापासून आभार. त्यांच्या मदतीमुळे मी इथपर्यंत पोहोचलो आहे. मी आजपासून काहीतरी नवीन सुरू करण्याची योजना आखत आहे, ज्यामुळे अनेकांना मदत मिळेल. आयुष्याच्या नव्या पर्वांत तुमच्या सगळ्यांचा असाच पाठिंबा मिळत राहिल, अशी आशा करतो."

2. बारावीचा निकाल पुढच्या आठवड्यात

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे (HSC Board) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर होणार आहे. तर दहावीचा निकाल जून अखेरीस लागणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

हे वृत्त एबीपी माझाने प्रसिद्ध केलं आहे.

बोर्डाच्या शेवटच्या पेपरच्या 60 दिवसांनंतर निकाल जाहीर केला जातो ही प्रमाणित प्रक्रिया आहे.

यावेळी बारावीचा पेपर 15 दिवस उशिरा सुरू झाला. त्यामुळे, आम्ही 10 जूनपर्यंत निकाल जाहीर करू, असं बोर्डाने म्हटलं होतं. त्यानुसार बारावीच्या परीक्षांचा निकाल पुढील आठवड्यात, तर दहावीचा निकाल जून अखेरीस लागणार असल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या.

3. मालमत्ता शांतपणे रिकाम्या करा, एकनाथ खडसेंना डीची नोटीस

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी आणि त्यांच्याशी संबंधित अन्य तिघांच्या मालकीच्या तात्पुरत्या जप्त केलेल्या मालमत्ता दहा दिवसांत 'शांततेत' रिकाम्या करण्याची नोटीस ईडीने खडसे व संबंधितांना जारी केली.

ही बातमी लोकमतने दिली आहे.

लोणावळा, पुणे, जळगाव, नाशिक, मुंबई व सुरत येथील या स्थावर मालमत्तांमध्ये भूखंड,बंगले, फ्लॅट आदी मालमत्तांचा समावेश आहे.

या मालमत्तांचे 25 मे 2022 रोजी ॲडज्युडिकेशन झाल्यानंतर 30 मे रोजी या मालमत्ता रिकाम्या करण्याची नोटीस ईडीने जारी केली. या नोटिशीनुसार, या जागा रिकाम्या झाल्यानंतर कारवाईची पुढील दिशा निश्चित होईपर्यंत या मालमत्ता पूर्णपणे ईडीच्या ताब्यात राहतील.

4. राज्यात एक हजाराहून अधिक नवीन कोरोनाबाधितांची नोंद

राज्यात करोना संसर्ग पुन्हा एकदा हळूहळू वाढताना दिसत आहे. 1 जूनला राज्यात 1 हजार 81 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. या अगोदर राज्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची संख्या ही 711 होती.

ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 78,88,167 एवढी झालेली आहे. तर, राज्यात आज रोजी एकूण 4 हजार 32 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 2 हजार 970 रुग्ण हे मुंबईतील आहेत.

5. जम्मू-काश्मीर सरकार हिंदू कर्मचाऱ्यांचं स्थलांतर करणार

काश्मिरात हिंदुंवर झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान पॅकेज अंतर्गत, खोऱ्यातील काश्मिरी हिंदू आणि अल्पसंख्याक समुदायातील सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याचे आदेश जम्मू काश्मीर सरकारने दिले आहेत.

ही बातमी झी 24 तासने दिली आहे.

या सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याची प्रक्रिया 6 जूनपर्यंत पूर्ण होईल. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या समस्या लवकरात लवकरत सोडवण्यासाठी विशेष तक्रार कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.

कर्मचाऱ्यांना ई-मेलद्वारे तक्रारी नोंदवता येतील. वेळेत समस्या न सोडवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी 1 जूनला प्रशासन आणि पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हे आदेश दिले आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)