हनुमानाचं जन्मस्थळ नाशिकमधलं अंजनेरी की कर्नाटकातलं किष्किंधा?

    • Author, प्रविण ठाकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

नाशिकमधलं अंजनेरी हे हनुमानाचं जन्मस्थळ असल्याची भाविकांची मान्यता आहे. मात्र श्री हनुमद तीर्थक्षेत्र ट्रस्टचे मठाधिपती महंत गोविंदानंद सरस्वती यांनी कर्नाटकातील किष्किंधा हे हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचा दावा केला आहे.

हनुमान जन्मभूमीवर शास्त्रार्थ पुरावे आणि दाव्यांवर चर्चा करण्यासाठी महंत गोविंदानंद त्र्यंबकेश्वरमध्ये आले आहेत. त्यांचं आवाहन आहे की येथील अभ्यासक आणि साधू-महंतांनी ग्रंथ, वेद आणि पुराण या संदर्भाने पुरावे देऊन जन्मस्थळ दाव्याविषयी चर्चेला यावं.

यासाठी महंत गोविंदानंद यांनी सोमवारी (30 मे) रथयात्रेचं आयोजन केलं होतं, तर 31 मे रोजी शास्त्रार्थ सभेचं आयोजन नाशिकमध्ये केलं आहे.

अंजनेरी गावातील नागरिकांनी मात्र याला विरोध केला आहे. त्र्यंबकेश्वर पोलिसांना एक निवेदन देऊन त्यांनी गोविंदानंद सरस्वती यांची रथयात्रा आणि हनुमान जन्मस्थळाबाबतचे त्यांचे दावे यावर प्रतिबंध करण्याची मागणी केली आहे.

अंजनेरीच्या गावकर्‍यांनी आणि संत महंतांनी सोमवारी नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवर 'रस्ता रोको' करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बोटावर मोजता येईल एवढेच नागरिक उपस्थित होते. हा रास्ता रोको गोविंदानंद सरस्वती यांच्या रथयात्रेविरोधात करायचा होता, मात्र तो अचानक दुपारी करण्यात आला.

अटल आखाड्याचे उदयगिरी महाराज यांनी शास्त्रार्थ सभेचं आयोजन चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. "या संदर्भात विवाद किवा संशय उत्पन्न झाल्यास बैठका बसते. या बैठकीत सर्व शंकराचार्य, आखाडा परिषद आणि विद्वान उपस्थित हवे तेव्हा त्या सभेला अधिकृत दर्जा आहे," असंही उदयगिरी महाराज यांनी म्हटलंय.

अंजनेरीचे ग्रामस्थ राजाराम जाधव यांनी सांगितलं की, "आम्ही जन्मापासून हे स्थळ बघतोय. अंजनीमातेची तपोभूमी हीच आहे. मी स्वतः नवनाथ ग्रंथ वाचला असून त्यातही या स्थळाचा उल्लेख आहे. आम्ही स्वतः आणि ग्रामस्थ याविरुद्ध जो लढा द्यायचा असेल तो देऊ."

"हे स्थान दुर्लक्षित असल्याने कुणीही काहीही दावे करत आहे. तेरा आखाड्यांनीही ह्या स्थळाला मान्यता दिली आहे. आम्ही या संदर्भात सर्व पीठाच्या शंकराचार्यांचीही भेट घेऊ. वाल्मिकी रामायणात इथे की कर्नाटकमध्ये हनुमानाचं जन्मस्थान असल्याचा स्पष्ट उल्लेख नाही. मात्र, स्कंदपुराणात ब्रम्हगिरीच्या शेजारील पर्वत असं स्पष्ट म्हटलं आहे. सृष्टीमध्ये फक्त एकच ब्रम्हगिरी पर्वत आहे आणि तो इथंच आहे," असं जुना दशनाम उदासीन आखाड्याचे पिनाकेश्वरगिरी महाराजांनी म्हटलंय.

ते पुढे सांगतात, "एका आंतराष्ट्रीय वृत्तसंस्थेने हनुमान जन्मस्थळीविषयी लिहिले होतं की, हनुमानचं जन्मस्थळ नेमकं सांगता येणार नाही. पण त्यांनी वृत्त लिहीत असताना सरकरी दस्त बघायला हवे होते. अंजनेरीची नोंद हनुमान जन्मस्थळ अशीच आहे."

दरम्यान, किष्किंधा मठाचे मठाधिपती महंत गोविंदानंद सरस्वती यांनी वाल्मिकी रामायणातले काही पुरावे आणि संदर्भ देत हनुमानाचं जन्मस्थळ अंजनेरी नसून किष्किंधा असल्याचा दावा केला आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी शृंगेरी आणि द्वारकेच्या शंकराचार्य तसंच राम जन्मभूमी न्यासचे पूजक यांची भेट घेऊन या विषयावर 20-20 दिवस चर्चा करून याविषयी त्यांना त्यांचं म्हणणं पुराण आणि तुलसी रामायणाच्या संदर्भाने पटवून दिलं आहे.

महाराष्ट्र आणि गुजरातचा विषय असल्याने खास करून द्वारकापिठाचे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांच्याशी खास चर्चा केली असंही त्यांनी सांगितलंय.

द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वरुपानंद यांचे माध्यम प्रभारी रामानंद ब्रम्हचारी यांनी मात्र शंकरचार्यांचा या सर्व प्रकाराशी काहीही संबंध नसल्याचं संगितलं आहे. तसंच त्यांनी कोणतंही पत्र किवा मान्यता गोविंदानंद सरस्वती यांना दिलेली नाही. शिवाय गोविंदानंद हे नकली असल्याची प्रतिक्रिया यांनी फोनवर दिली आहे.

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे कोशाध्यक्ष भगवान बाबा यांनी सांगितले की, "असे दावे-प्रतिदावे यावर चर्चा ही धर्म संसदेत होते. तिथे धर्मसभा किवा शास्त्रार्थ सभेत चारही पीठाचे शंकराचार्य, निंबारकाचार्य, वल्लभाचार्य, रामानंदाचार्य आणि आखाडा परिषद हे निर्णय घेतात. अशा सभेत संबधित विषयातील विद्वान, अभ्यासक यांना देखील निमंत्रित करण्यात येते. त्यामुळे नाशिकमध्ये होणाऱ्या सभेला महत्त्व नाही."

नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते, गोदावरी कोंक्रिटीकरण विरोधी चळवळीचे कार्यकर्ते तसंच इतिहास अभ्यासक देवांग जानी सांगतात की, "पौराणिक ग्रंथांवर आधारित दावे चालत नाहीत. सरकारी कागदांवर आधारित दावे ग्राह्य धरले जातात, शास्त्रार्थ सभेत मी जाणार आणि ह्याच मुद्द्यावर मी बाजू मांडणार आहे. अंजनेरी पर्वतरांगा आणि अंजनेरी पर्वत हा हनुमान जन्मस्थळ असल्याचं सरकारी दस्तामध्ये नोंद आहे. या बाबतचे पुरावे मी थेट सभेत मांडणार आहे."

गुजरातमधील डांग जिल्ह्यातील पर्वतरांगा, नाशिकमधील अंजनेरी, कर्नाटकमधील किष्किंधामध्ये किंवा हरियाणातील काही ठिकाणी हनुमानाचा जन्म झाल्याचे दावे करण्यात आले होते. आंध्रप्रदेशमधली तिरुपती देवस्थानमार्फत विकसित होणारं हनुमान जन्मस्थळ प्रकरण थेट कोर्टात गेले होते. कोर्टाच्या आदेशानुसार तिरुपती देवस्थान एक पाऊल मागे आले आहे.

रामायणात आणि काही ग्रंथांमध्ये हनुमान जन्मभूमीसंबंधी अंजनेरी, अंजनादरी आणि अजेंयानंदरी असे उल्लेख आहे, हे तिन्ही ठिकाणं अनुक्रमे महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकशी संबंधित आहेत.

कर्नाटकचा दावा आहे की, हनुमानाचा जन्म हम्पीजवळील किष्किंधा येथील अंजनाद्री पर्वतात झाला आहे. आंध्रप्रदेशचा दावा आहे की हनुमानाचा जन्म तिरुमालाच्या सात डोंगर रांगामध्ये म्हणजेच सप्तगिरीच्या अंजनाद्री किंवा अजेंयानंदरी येथे झाला आहे. महाराष्ट्रात मात्र मान्यता आहे की त्र्यंब्यकेश्वर ब्रह्मगिरीच्या पर्वत रांगांमधील अंजनेरी पर्वतावर हनुमानाचा जन्म झाला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)