You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
संभाजीराजेंवर या 5 कारणांमुळे माघार घेण्याची नामुष्की ओढावली
"राज्यसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला तेव्हा शिवसेनेत प्रवेश केल्यास राज्यसभेची उमेदवारी तत्काळ जाहीर करू, अशी ऑफर शिवसेनेने दिली होती. पण अपक्ष निवडणूक लढवण्याची भूमिका मांडून मी ती ऑफर नाकारली. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला दिलेला शब्द मोडला," अशी टीका माजी राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.
तसंच, घोडेबाजार टाळण्यासाठी आपण राज्यसभा निवडणुकीतून माघार घेत आहोत. पण ही माघार नसून हा माझा स्वाभिमान आहे, असं संभाजीराजे म्हणालेत.
शुक्रवारी (27 मे) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संभाजीराजे म्हणाले, "जे मी बोलणार आहे, ती माझी मुळीच इच्छा नाही. माझ्या तत्वात ते नाही. माझ्या रक्तात ते नाही. पण तरीसुद्धा मला बोलायचं आहे."
पण त्यांच्यावर ही नामुष्की का ओढावली याची 5 कारणं सांगता येऊ शकतात.
1. भाजपने संभाजीराजेंना पुन्हा उमेदवारी दिली नाही.
2. शिवसेनेनं पक्ष प्रवेशाचीच अट घातली.
3. राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट भूमिका घेतली नाही.
4. काँग्रेस या संपूर्ण प्रकरणात शांत राहिली.
5. संभाजीराजे कुठल्याही पक्षाच्या बंधनात अडकायला तयार नाहीत.
भाजपने संभाजीराजेंना पुन्हा उमेदवारी दिली नाही
महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी सर्वत्र मोर्चे निघत असताना आणि मराठा समाज फडणवीस सरकारच्या विरोधात जातोय की काय; अशी स्थिती निर्माण झालेली असताना खुद्द देवेंद्र फडणवीसांनी कोल्हापुरात जाऊन संभाजीराजेंना त्यांच्या राष्ट्रपती नियुक्त खासदारकीचं पत्र दिली होतं.
पुढे जाऊन मराठा आरक्षणाचा मुद्दा कोर्टात गेला आणि परिस्थिती बदलली. आपण भाजपचा सदस्य नसल्याचं संधी मिळेल तिथे दाखवण्याचा प्रयत्न संभाजीराजेंनी केला.
बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत तर त्यांनी थेट मोदींच्याविरोधात भूमिका घेतली. छत्रपतींच्या व्हेटोची भाषा केली. त्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण केल्यानंतर संभाजीराजे वेगळा पक्ष काढणार असल्याची चर्चा सुरू झाली.
सुरुवातीच्या काळात भाजपबाबत मवाळ असलेले संभाजीराजे नंतरच्या काळात मात्र त्याच्यापासून दूर गेल्याचं दिसून आलं.
सरतेशेवटी पुण्यात त्यांनी त्यांच्या स्वराज्य नावाच्या संघटनेची स्थापना केली आणि आपला मार्ग वेगळा असल्याचं दाखवून दिला.
त्यानंतर ते देवेंद्र फडणवीसंच्या भेटीसाठी गेले. भाजपने त्यांच्या अपक्ष उमेदवारीला पाठिंबा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण तसं काही घडलं नाही.
त्याचं कारण सांगताना ज्येष्ठ पत्रकार सचिन परब सांगतात, "संधी दिल्यानंतर भाजपला एकनिष्ठता पाहिजे असते. त्यांना पक्षानं दिलेल्या भूमिकेनुसार चालणारी माणसं पाहिजे असतात. तो एक शिस्तबद्ध पक्ष आहे. भाजपला तेव्हा मराठा नेतृत्वाची गरज होती. आता मात्र काळ बदलला आहे. आता मात्र भाजपकडे अनेक मराठा नेते स्थानिक पातळीवर आहेत. त्यांची त्यांच्या त्यांच्या पातळीवर ताकद आहे."
"खासदारांची संख्या मर्यादित असल्याने प्रत्येक पक्षाला आपली सदस्य संख्या जास्त असायला हवी हे वाटणं स्वाभाविक आहे. पण पक्षीय बंधनं किंवा चौकटीत नसलेल्या व्यक्तीला खासदार करणं अशी मानसिकता सध्या तरी कुठल्याही पक्षाची नाही. त्यामुळे ही कोंडी निर्माण झाली," असं ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांना वाटतं.
शिवसेनेनं पक्ष प्रवेशाचीच अट घातली
राज्यसभेची खासदारकी अपक्ष लढण्याचं जाहीर केल्यानंतर संभाजीराजे यांनी दुसरी महत्त्वाची भेट घेतली ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची. या भेटीत सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं.
पण, शिवसेनेनं त्यांचा पक्ष प्रवेशाचा हट्ट सोडला नाही आणि संभाजीराजे मात्र त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वावर ठाम राहिले.
"असं नाही की शिवसेनेला संभाजीराजे नकोत. शिवसेनेला ते पक्षात पाहिजेत. पण संभाजीराजेंचा राजकीय इतिहास पाहाता ते कुणालाही अपक्ष म्हणून नकोत. राज्यसभेतलं प्रत्येक मत महत्त्वाचं असतं. म्हणून खासदार पक्षाच्या बंधनात राहावा असं प्रत्येक पक्षाचं म्हणणं असतं," असं सचिन परब सांगतात.
सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे हेही तितकंच खरं आहे की, संभाजीराजे खासदार असताना कधीही भाजपसाठी कार्यरत राहिले नाहीत.
याबाबत दैनिक लोकमतचे कोल्हापूर आवृत्तीचे संपादक वसंत भोसलेंनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "कोणत्याही निवडणुकीत भाजपच्या व्यासपीठावर जाऊन संभाजीरजेंनी प्रचार केला नाही. त्यामुळे ज्या राजकीय हेतूने भाजपने संभाजीराजे यांना संधी दिली होती तसं काहीच घडताना दिसलं नाही. हा अनुभव पाहता शिवसेनेनं संभाजीराजे यांना पक्ष प्रवेशाची अट घातली असावी."
शिवाय शिवसेनेनं आता संजय पवार यांना उमेदवारी दिल्यामुळेसुद्धा वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं.
त्यावर सचिन परब सांगतात, "शिवसेनेच्या जडणघडणीत राजेमहाराजे कधीच नव्हते. तसंच आम्हाला रेडीमेड मोठ्या माणसांची गरज नाही. आमच्यासाठी छोट्यात छोटा कार्यकर्तासुद्धा महत्त्वाचा आहे हे दाखवून देण्याची संधी उद्धव ठाकरेंनी साधली आहे."
संजय पवार यांच्या उमेदवारीला मुंबई महापालिका निवडणुकीचीसुद्धा किनार असल्याचं सचिन परब यांना वाटतं.
ते सांगतात, "आघाडीत आम्ही स्ट्राँग आहोत हासुद्धा शिवसेनेला संदेश द्यायचा आहे. त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला आम्ही यंदा तडजोड करणार नाही हे सांगितलेलं दिसून येतंय. त्याला मुंबई महापालिका निवडणुकीची किनार आहे. आघाडीत जाऊन शिवसेनेचं नुकसान होतंय या भाजपच्या प्रचाराला त्यांना दोन उमेदवार देऊन उत्तर द्यायचं आहे."
राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट भूमिका घेतली नाही?
या सगळ्या राजकारणात ज्यांच्या भूमिकेकडे सर्वांच लक्ष होतं त्या शरद पवार आणि त्यांच्या पक्षानं संभाजीराजेंना चांगलंच टोलवलं.
तसा संभाजीराजेंचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जुना संबंध आहे. संभाजीराजेंनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर 2009ची लोकसभा निवडणूक लढवली होती. पण पराभव झाल्यानंतर मात्र त्यांनी राष्ट्रवादीपासून दूर राहणंच पसंत केलं होतं.
"संभाजीराजेंना पाठिंबा द्यायचा नाही आणि त्याचा ठपका आपल्यावर येऊ नये अशी राष्ट्रवादीची भूमिका होती. गेल्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या 2 जागा राज्यसभेवर निवडून आणल्या होत्या. त्यामुळे यंदा शिवसेनेला 2 जागा देणं त्यांना भाग होतं. परिणामी राष्ट्रवादीने स्पष्ट भूमिका घेणं टाळलं असावं," असं ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने यांना वाटतं.
शिवाय मतांच्या राजकारणात छत्रपतींच्या घराण्यातला व्यक्तीचा फायदा होतोच असं ठोस सांगता येत नाही, हेसुद्धा राष्ट्रवादीनं स्पष्ट भूमिका न घेण्याचं कारण असू शकतं असं माने यांना वाटतं.
काँग्रेस या संपूर्ण प्रकरणात शांत का राहिली?
काँग्रेसनं मात्र या संपूर्ण प्रकरणात लो प्रोफाईल राहणंच पसंत केलं आहे. संभाजीराजेंनीसुद्धा काँग्रेसच्या कुठल्या नेत्यांची भेट घातली नाही किंवा त्यांच्याकडे कुठली मागणी केली नाही.
संभाजी महाराजांचा आम्ही आदर करतो पण आमच्याशी त्यांचं कुठलही बोलणं झालेलं नाही, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी स्पष्ट केलं.
त्यातच काँग्रेसचा फक्त एकच खासदार निवडून जाऊ शकतो. त्या एका जागेसाठीच काँग्रेसमध्ये आधीच मोठी रस्सीखेच आहे. अशा स्थितीत काँग्रेस नेत्यांनी यावर मूग गिळून गप्प बसणंच पसंत केल्याचं दिसून येतं.
शिवाय एखाद्या पक्षाचं पद उपभोगणाऱ्या व्यक्तीनं समांतर राजकीय संघटना चालवणं कुठल्याही पक्षाच्या पक्षश्रेष्ठींना फारसं रुचणारं नसतं. नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना त्यांना सतत स्वाभिमानी संघटनेबाबत पक्षश्रेष्ठींनी टोला हणल्याचा इतिहास आहे हेसद्धा विसरून चालणार नाही.
काँग्रेसने संभाजीराजेंच्या नावाचा विचार केला असता तर कदाचित त्यांनासुद्धा काँग्रेसकडून अप्रत्यक्ष स्वराज्य संघटनेबाबत सांगण्यात आलं असतं. शिवाय पक्षात येण्याची अटसुद्धा घालती गेली असती.
संभाजी राजे कुठल्याही पक्षाच्या बंधनात अडकायला का तयार नाहीत?
संभाजीराजे हे सध्या मराठा समाजाच्या आंदोलनातील आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जातात, अशा वेळी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी लढताना जर संभाजीराजे शिवसेनेतील नेते असतील तर मात्र पक्षीय चेहरा म्हणून याचा आंदोलनावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यात संभाजीराजेंनी स्वतःची 'स्वराज्य' नावाची संघटना स्थापन करून त्यांचा पुढचा राजकीय मार्ग स्पष्ट केलाय. एखाद्या पक्षात जाणं म्हणजे स्वतःच्याच संघटनेचं अस्तित्व दुय्यम करण्यात सारखं होऊ शकतं. त्यामुळेसुद्धा संभाजीराजे कुठल्या पक्षात जाण्यास तयार नसावेत.
"एखाद्या पक्षात गेल्यावर त्या पक्षाच्या कलानं वागवं लागतं. स्वतंत्र निर्णय घेऊन कार्यक्रम राबता येत नाही. ते नको म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असावा," असं श्रीमंत माने यांना वाटतं.
यावर सकाळचे समूह संपादक श्रीराम पवार यांच्याशी चर्चा केली असता ते सांगतात, "संभाजीराजे यांचा आजवरचा प्रवास पाहता कोणत्याही पक्षाची जवळीक नको आहे, पण तरीही पद हवं आहे. भाजपने त्यांना गेल्यावेळी राष्ट्रपतीनियुक्त खासदार केल्याने राजेंना आताही तशाच प्रकारे राज्यसभेत जायचं आहे. पण त्यावेळची कारणं वेगळी होती.
"मराठा आंदोलन, मोर्चामुळे राजकीय वातावरण गरम होतं. त्यामुळे मराठा चेहरा म्हणून भाजपने त्यांना संधी दिली. मात्र हे नेहमीच घडेल याची शक्यता फार कमी असते. पक्षीय विचारसरणी किंवा चौकटीत न राहता पद मिळवणं हे संभाजी राजेंसाठी सध्या तरी कठीण आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)