शरद पवार: ब्राह्मणांनी आरक्षण मागितल्यावर शरद पवार म्हणाले...

फोटो स्रोत, Getty Images
ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात ब्राह्मण समाजातील संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यात एक बैठक आज (21 मे) सायंकाळी पुण्यात पार पडली. .
या बैठकीकरिता विविध जिल्ह्यांमधून सुमारे 40 ब्राह्मण समाजबांधव शरद पवारांची भेट घेण्यासाठी पुण्यात आले होते. हे 40 जण ब्राह्मण समाजातील सुमारे 9 ते 10 संघटनांचे सदस्य होते. या संघटनांनी आपल्या मागण्या पवार यांच्यासमोर मांडल्या.
या बैठकीनंतर शरद पवार यांनी त्याची माहिती प्रसारमाध्यमांसमोर दिली. 'ब्राह्मण समाजाची सामाजिक स्थिती पाहता, आरक्षणाच्या सूत्रात ते बसत नाही. पण म्हणून दलित, आदिवासी आणि इतर मागासवर्गीयांचं आरक्षणही काढून घेता येणार नाही', असं मत त्यांनी मांडलं आहे.
पवार म्हणाले, "ब्राह्मण समाजातील विविध संघटनांसोबत तीन मुद्द्यांवर चर्चा झाली. पहिला मुद्दा म्हणजे त्यांच्यामध्ये काही अस्वस्थता होती. माझ्या पक्षातील काही सदस्यांनी ब्राह्मण समाजाविषयी वक्तव्ये केली होती. त्याविषयी पक्षांतर्गत बैठकीत चर्चा आधीच झालेली आहे. नेत्यांनी कोणत्याही जाती-धर्माविषयी बोलू नये. एखाद्याच्या धोरणांबाबत किंवा कार्यक्रमाविरुद्ध बोलण्याचा आपल्याला अधिकार आहे. जातीविषयक वक्तव्ये कुणीच यापुढे करू नये, अशी सूचना नेत्यांना आधीच देण्यात आली आहे."
शरद पवार आणि ब्राह्मण समाजातील चर्चेचा दुसरा मुद्दा हा ब्राह्मण आरक्षणाबाबत होता. ग्रामीण भागातील हा वर्ग हा नागरी भागात जास्त आलेला आहे. त्यामुळे साहजिकच नोकरीच्या क्षेत्रात ब्राह्मण समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, अशी संघटनांनी मागणी केली होती.
याविषयी माहिती देताना पवार म्हणाले, "साधारणतः महाराष्ट्रातील तसंच केंद्राची माहितीही आम्ही गोळा केली, त्यानुसार आरक्षणाचं सूत्र बसेल, असं मला स्वतःला वाटत नाही. त्यावर ब्राह्मण संघटनांनी म्हटलं की मग आरक्षणाला आमचा विरोधच आहे. आरक्षण कुणालाच देण्यात येऊ नये, पण असं करता येणार नाही, असं माझं म्हणणं मी त्यांना सांगितलं."

फोटो स्रोत, Getty Images
"देशातील दलित, आदिवासी आणि इतर मागासवर्गीयांना आरक्षण द्यावंच लागेल. हा वर्ग शैक्षणिक, सामाजिक प्रगतीसंदर्भात मागे राहिलेला आहे. त्यामुळे इतरांच्या स्तरापर्यंत तो येईपर्यंत त्याला विरोध करू नये," असं माझं मत मी त्यांना सांगितलं, अशी माहिती पवार यांनी यावेळी दिली.
तसंच तिसरा मुद्दा म्हणजे महामंडळांविषयी तसंच राज्य सरकारला सूचना करण्यासंदर्भात होता.
"आपल्या राज्यात विविध समाजांना व्यवसायाला मदत करण्यासाठी मंडळे किंवा महामंडळे आहेत. त्या धर्तीवर ब्राह्मण समाजासाठी परशुराम महामंडळ स्थापन करण्यात यावं, अशी मागणी ब्राह्मण संघटनांनी केली होती. पण हा विषय माझ्या हातात नाही. राज्य सरकार त्याबाबत निर्णय घेऊ शकतं," असं पवार यांनी सांगितलं.
राज्य सरकारशी संबंधित सर्व विषय मी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवेन. त्यांची वेळ घेऊन तुमची आणि त्यांची एक बैठक आयोजित करता येईल. तिथं तुमचे रास्त प्रश्न मांडण्याची संधी तुम्हाला मिळेल, असं पवार यांनी ब्राह्मण संघटनांना सांगितलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








