राज ठाकरे यांचे पुस्तक खरेदी आधी 'फटकारे'... जगू द्याल की नाही?

हनुमान चालिसा, भोंगे, वेगवेगळ्या शहरातल्या सभा आणि आगामी अयोध्या दौरा यामुळे राज ठाकरे आता सतत बातम्यांमध्ये असतात.

ते सभेत काय बोलणार इथपासून सभा संपल्यावर त्यांच्या बोलण्याचा काय अर्थ आहे यावर तर्कवितर्क लावले जातात. त्यांच्या प्रत्येक हालचालीची बातमी होते.

औरंगाबादच्या सभेला जाताना माध्यमांनी शिवाजी पार्क ते औरंगाबाद असं क्षणाक्षणाचं वार्तांकन केलं होतं. आता पुण्याच्या सभेची तयारी मनसे आणि पर्यायानं माध्यमांनी केली आहे.

काल पुण्यात राज ठाकरे एका पुस्तकाच्या दुकानात जात असताना असंच घडलं. मनसे अध्यक्षांची गाडी येताच फ्लॅश लाईट, कॅमेरे, माईक घेऊन माध्यमांचे प्रतिनिधी सज्ज राहिले.

राज ठाकरे येताच पत्रकारांनी सर सर, राजसाहेब अशा हाकाही मारल्या. आता राज ठाकरे गाडीतून उतरून ते आपल्याशी बोलतील अशी या प्रतिनिधींना अपेक्षा होती.

पण राज ठाकरे गाडीतून उतरले तेच मुळी करारी चेहरा घेऊन. तीन बोटं नाचवत त्यांनी सर्वांना लाइट बंद करायला लावले. काय जगू द्याल की नाही असं वाक्य त्यांनी जोरात उच्चारल्यावर सगळेच शांत झाले. त्यात एखाद्याचा लाइट सुरूच राहिला तेव्हा सगळ्यांना वेगळं सांगायला पाहिजे का असं त्यांनी विचारलं. मग ते अक्षरधाराच्या पुस्तकदुकानात गेले.

राज ठाकरे यांनी पाहिजे तसं जगू देण्याचं आवाहन केलं असलं तरी पुस्तकाच्या दुकानात ते काय करत आहेत हे सर्वांना कळण्याची व्यवस्था होतीच. राज ठाकरे दुकानात पुस्तकं पाहात असताना, खरेदी करत असतानाचे फोटो, व्हीडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत. यावेळेस त्यांच्याबरोबर मनसेचे पदाधिकारी अनिल शिदोरे आणि इतर उपस्थित होते.

राज ठाकरेंनी कोणती पुस्तके खरेदी केली?

अक्षरधाराचे रमेश राठीवडेकर यांनी त्यांच्या भेटीबद्दल माध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले, "राज ठाकरे यांनी जवळपास 50 हजार रुपयांची दोनशे पुस्तके विकत घेतली. त्यांच्याकडील काही पुस्तके नाहीशी झाली होती. त्यांची त्यांनी पुन्हा खरेदी केली. इतिहास, चरित्र अशा विषयांच्या पुस्तकांची खरेदी त्यांनी केली.

"गजानन भास्कर मेहेंदळेंचं शिवाजी महाराजांवरचं पुस्तक, बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपतीची इंग्रजी आवृत्तीही त्यांनी विकत घेतली. ही त्यांची अक्षरधारा बुक गॅलरीला चौथी भेट होती."

राज ठाकरे पत्रकारांवर बरसले असले तरी आजवरचा इतिहास पाहाता पत्रकारांना कदाचित आजही ते आपल्याशी बोलतील असं वाटलं होतं. पण त्यांना वेगळाच 'बाईट' मिळाला.

राज ठाकरे यांचे कुटुंब, घर, नव्या घराची रचना, त्यांच्या घरातील सदस्य, पाळीव प्राणी या सर्वांची माहिती, फोटो, व्हीडिओ सोशल मीडिया आणि मीडियावर येत असतात. एबीपी वाहिनीवर त्यांनी आपल्या लग्नाची गोष्ट, प्रेम, नातवाचा जन्म, सिनेमा पाहायची आवड अशा कुटुंबातील सर्व गोष्टी पत्रकारांना सांगितल्या.

सार्वजनिक क्षेत्रात राहाणाऱ्या नेत्याचं वैयक्तिक, कौटुंबिक आयुष्य सर्वांना जाणून घ्यायचं असतं. पण ते कधी सार्वजनिक आयुष्यात आहेत आणि कधी वैयक्तिक आयुष्यात आहेत हे ठरवण्याचा अधिकार नेते स्वतःकडे राखून ठेवतात.

पुण्यातले पत्रकार नेमकं हेच विसरले. त्यांना वाटलं मनसे अध्यक्ष आता सार्वजनिक आयुष्यात आहेत आणि ते माईक-कॅमेरे घेऊन सरसावले. पण त्यांचा अंदाज चुकला. राज ठाकरेंचे फटकारे त्यांना सहन करावे लागले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)