मान्सून भारताच्या मुख्य भूमीत दाखल, मान्सूनसंबंधी तुमच्या मनातल्या 5 प्रश्नांची उत्तरं

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
मान्सून आता भारताच्या मुख्य भूमीवर दाखल झाला आहे. केरळमध्ये नेहमीपेक्षा तीन दिवस आधीच मान्सून ऑनसेट म्हणजे मान्सूनचं आगमन झाल्याचं भारतीय हवामान खात्यानं जाहीर केलं आहे. मान्सून सामान्यतः 1 जूनला केरळमध्ये दाखल होतो, यंदा तो वेळेआधीच इथे सक्रीय झाला आहे. यंदा मान्सून अंदमानच्या समुद्रात 16 मे रोजी म्हणजे नेहमीपेक्षा साधारण आठवडाभर आधीच सक्रिय झाल्याचं हवामान खात्यानं जाहीर केलं होतं. तेव्हापासून केरळ, कर्नाटक, गोवा आणि कोकणातील अनेक ठिकाणी पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळताना दिसल्या.
केरळमध्ये नेहमीपेक्षा पाच दिवस आधी म्हणजे 27 मे रोजीच मान्सून दाखल होईल असा अंदाजही हवामान विभागानं आधी व्यक्त केला होता. असनी चक्रीवादळामुळे मान्सूनला गती मिळाल्याचं हवामानतज्ज्ञांनी स्पष्ट केलं होतं. पण मग जलद सुरुवात केल्यावर मान्सूनचा वेग काहीसा मंदावला आणि आता 29 मे रोजी मान्सूनचं केरळात आगमन झाल्याचं अखेर हवामान खात्यानं जाहीर केलंय.

फोटो स्रोत, @Indiametdept
मॉन्सूनने केरळच्या बहुतांश क्षेत्रासह लक्षद्वीप बेटांचे क्षेत्र, दक्षिण तामिळनाडूचा काही भाग व्यापला आहे.
आता साहजिकच महाराष्ट्रात मान्सून कधी येणार, याची सगळेच वाट पाहतायत. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यावर साधारण सात दिवसांत म्हणजे सात जूनपर्यंत तो महाराष्ट्रात येतो. यात काही तीन-चार दिवसांचा फरक पडू शकतो. यंदाही पाच ते दहा जूनदरम्यान महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता काही हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे. दरम्यान, राज्याच्या काही भागांत पावसाळी हवा असून, मान्सूनपूर्व सरी कोसळण्याची शक्यता आहे. यंदा मान्सून वेळेआधी का येतो आहे आणि त्याचा काही परिणाम होऊ शकतो का? आणि मुळात मान्सून दाखल होणं किंवा मॉन्सून ऑनसेट (Onset of Monsoon) म्हणजे नेमकं काय असतं? याची उत्तरं जाणून घेऊयात.
1. मॉन्सून ऑनसेट म्हणजे काय?
भारताच्या मुख्य भूमीवर नैऋत्य मोसमी वारे पहिल्यांदा केरळमध्ये दाखल होतात. सामान्यतः अंदमान-निकोबार बेटांवर 15 ते 20 मे दरम्यान आणि केरळमध्ये मे महिन्याच्या अखेरच्या दिवसांतच पाऊस पडायला सुरुवात होते.

फोटो स्रोत, Getty Images
पण फक्त पाऊस आला, म्हणजे मान्सूनची सुरुवात झाली, असं नाही. तर एखाद्या ठिकाणी विशिष्ठ कालावधीतील पावसाचं प्रमाण, वाऱ्याचा वेग आणि तापमानाची स्थिती पाहून हवामान विभागाचे तज्ज्ञ त्या ठिकाणी मान्सून ऑनसेट झाल्याचं म्हणजे मान्सूनची सुरूवात झाल्याचं जाहीर करतात.
केरळ आणि लक्षद्वीपमधल्या 14 ठराविक हवामान केंद्रांपैकी किमान 60 टक्के म्हणजे 9 केंद्रांवर ठिकाणी 10 मे नंतर कधीही सलग दोन दिवस 2.5 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली, तर तिथे मान्सून दाखल झाल्याचं हवामान विभाग जाहीर करतो.
2. यंदा मान्सून लवकर का आला आहे?
मोसमी वारे म्हणजे ऋतूनुसार वाहणारे वारे. साधारण उन्हाळा ऐन भरात असताना हे वारे वाहू लागतात, पण कुठल्याही नैसर्गिक घटनेसारखी मोसमी वाऱ्यांचीही काही निश्चित तारीख ठरलेली नसते.
मान्सूनपूर्व काळातलं भारतातलं तापमान, चक्रीवादळं आणि वाऱ्याच्या स्थितीवर मोसमी पाऊस कधी येणार हे अवलंबून असल्याचं हवामानतज्ज्ञ सांगतात.
यंदाही बंगालच्या उपसागरात आलेल्या असनी चक्रीवादळामुळे विषुववृत्ताकडून भारताच्या दिशेनं वाहणाऱ्या वाऱ्यांना गती मिळाली आणि परिणामी अंदमानमध्ये मान्सूनचं आगमन वेळेआधी झाल्याचं हवामान तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
3. मान्सूनचं लवकर आगमन ही असामान्य घटना?
वर्षानुवर्ष हवामानाचा अभ्यास केल्यावर एखाद्या जागी मान्सूनचं आगमन कुठल्या दिवसांत होतं, याचे आडाखे बांधता येतात.
त्यानुसार केरळमध्ये 1 जूनपर्यंत, तळकोकणात 7 जूनपर्यंत आणि मुंबईत 10 जूनच्या आसपास मान्सून दाखल होतो. 15 जुलैपर्यंत संपूर्ण भारतभर मान्सून पसरतो.

फोटो स्रोत, Shivani Anand / EyeEm
पण मान्सूनचं लवकर किंवा उशीरानं आगमन ही काही अगदीच असामान्य गोष्ट आहे, असं नाही.
केरळमध्ये मान्सून दाखल होण्याच्या गेल्या काही वर्षांमधल्या हवामान विभागानं दिलेल्या तारखा पाहा.
2021 - 3 जून
2020 - 1 जून
2019 - 8 जून
2018 - 29 मे
2017 - 30 मे
2009 साली तर 23 मे रोजीच मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता. केरळमध्ये लवकर मान्सून दाखल झाला, तर महाराष्ट्रातही तो लवकर किंवा वेळेवर दाखल होण्याची शक्यता असते.
4. मान्सून लवकर आल्यावर काय परिणाम होईल?
मान्सून किंवा नैऋत्य मोसमी वारे भारतासाठी किती महत्त्वाचे आहेत, हे वेगळं सांगायला नको. भारतातला सुमारे 70 ते 80 टक्के पाऊस मान्सूनमुळेच पडतो आणि इथल्या शेतीची, अर्थव्यवस्थेची गणितं त्यावरच अवलंबून असतात. त्यामुळेच मान्सूनच्या आगमनाकडे भारतीयांचं लक्ष लागलेलं असतं.

फोटो स्रोत, Getty Images
एक लक्षात घ्यायला हवं की, मान्सूनचं लवकर आगमन किंवा त्याला येण्यास झालेला उशीर यामुळे कुठे आणि किती पाऊस पडेल यावर परिणाम होत नाही.
याचं उत्तम उदाहरण म्हणजे 2009 सालची मान्सूनची आकडेवारी. वर नमूद केल्याप्रमाणे त्या वर्षी मान्सून केरळमध्ये लवकर दाखल आणि 3 जुलैपर्यंत म्हणजे नेहमीपेक्षा आठवडाभर आधीच भारतभर पसरला. पण 2009 मध्ये देशभरात सरासरीच्या 77 टक्केच पाऊस झाला होता.
5. यंदा किती पाऊस पडेल?
14 एप्रिलला भारतीय हवामान विभागानं मोसमी पावसाचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला होता. त्यानुसार देशात यंदा नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी 96% ते 104% पाऊस पडू शकतो.
मोसमी पावसाची स्थिती सामान्य राहील आणि एकूण सरासरीच्या तुलनेत 99 टक्के पाऊस पडेल, असंही हवामान विभागानं तेव्हा म्हटलं होतं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








