अवकाळी पाऊस पडण्याचं नेमकं कारण काय?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, राहुल गायकवाड
- Role, बीबीसी मराठीसाठी
बुधवारी (1 डिसेंबर) राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. मुंबई, पुणे, नाशिक या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मुंबई - पुण्यात तापमानात मोठ्या प्रमाणावर घट झाली होती. त्यामुळे धुकं आणि पाऊस एकत्र झाल्याचं पाहायला मिळालं.
पुण्यात येत्या तीन दिवसांमध्ये हलका स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. तर येत्या 24 तासात मुंबई आणि उपनगरांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
डिसेंबरमध्ये सर्वदूर पाऊस नेमका का पडतोय ?
आग्नेय अरबी समुद्र तसेच लक्षद्वीप बेट समूह या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्याचबरोबर थायलंड परिसरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र बंगलचा उपसागर आणि अंदमान समुद्रात आले आहे.
त्याचे येत्या दोन दिवसात चक्री वादळात रूपांतर होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. लक्षद्वीप बेटापासून उत्तर महाराष्ट्रापर्यंत पसरलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या महाराष्ट्रात पाऊस पडत असल्याचे चित्र आहे.
भौतिकशास्त्रज्ञ आणि हवमान तज्ज्ञ किरणकुमार जोहरे यांनी नोव्हेंबरमध्ये बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये डिसेंबरमध्ये देखील पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता. त्याचबरोबर डिसेंबरमध्ये गारपीट देखील होऊ शकते असं देखील ते म्हणाले होते.
''गेल्या 20 वर्षांत पावसाचा पॅटर्न बदलला आहे. सध्या पडणारा अवकाळी पाऊस हा बदललेल्या पॅटर्नमुळे पडणारा पाऊस असल्याचं'' देखील जोहरे म्हणाले होते.
सध्या सुरू असलेल्या पावसाबद्दल देखील बीबीसी मराठीने जोहरे यांना विचारलं.

फोटो स्रोत, Getty Images
जोहरे म्हणाले, "निम्म्या महाराष्ट्रामध्ये कमी दाबाचा पट्टा सध्या निर्माण झाला आहे, त्यामुळे सध्या पाऊस पडत आहे. हा कमी दाबाचा पट्टा सोमवारपर्यंत राहण्याचा शक्यता आहे. त्यामुळे सोमवारपर्यंत राज्यातील विविध भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. याला आपल्याला न्यू नॉर्मल म्हणावं लागणार आहे. राज्याचं तापमान येत्या काळात 10 डिग्रीच्या खाली जाण्याची शक्यता आहे.''
"बंगालच्या उपसागरात जवाद नावाचं चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. सात ते आठ दिवसात हे वादळ तयार होईल आणि त्याचा महाराष्ट्राला कुठलाही धोका नाही," असंही जोहरे सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
या अवकाळी पडणाऱ्या पावसाबद्दल बीबीसी मराठीने ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली. कुलकर्णी म्हणाले, "अरबी सुमद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. त्या भोवती चक्राकारगतीने वारे फिरत आहेत. ते वारे बाष्प घेऊन महाराष्ट्राकडे येत आहेत. त्यामुळे ढगांची निर्मिती होऊन पाऊस पडत आहे.
"आणखी दोन दिवस हा पाऊस पडू शकतो. बंगालच्या उपसागरात तयार होणारं चक्रीवादळ आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीला धडकेल त्यामुळे आंध्रप्रदेश, तेलंगणा, ओडिसा भागात येत्या काळात पाऊस पडेल.
"जागतिक वातावरण बदल आपल्या दरवाजापर्यंत आलं आहे, त्यामुळे हा अवकाळी पाऊस पडत असल्याचं," देखील कुलकर्णी म्हणाले.
अवकाळी पाऊस आणि थंडीने मेढ्यांचा मृत्यू
अवकाळी पाऊस आणि थंडीमुळे पुणे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये गारठून मेढ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
आंबेगाव तालुक्यातील धोंडमाळ शिवार येथे 35, शिंगवे येथे 20 ते 25, खडकी येथे 45, पिंपळगाव म्हाळुंगे येथे 3, खातपूर बुद्रुक येथे 32, वळती येथे 23 मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे.
तर अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पळशी गावात 25 बकऱ्यांचा गारठून मृत्यू झाला आहे. इतर ठिकाणी देखील मेंढ्यांचा मृत्यू झाला असून जिल्हा प्रशासनाकडून माहिती संकलित करण्यात येत आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी गावात देखील सारखीच परिस्थिती होती. या भागात राहणाऱ्या गणेश माने यांच्या शेतात असणाऱ्या धनगरांच्या अनेक मेंढ्यांचा थंडीने मृत्यू झाला.
माने बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "रात्री अवकाळी पावसामुळे आणि थंडीमुळे आमच्या शेतात असणाऱ्या धनगरांच्या अनेक मेंढ्यांचा मृत्यू झाला. काही मेंढ्यांना आम्ही सकाळी सुरक्षित ठिकाणी हलवलं. रात्री खूप थंडी होती. डॉक्टरांकडून सध्या तपासणी करण्यात येत आहे."
जवाद चक्रीवादळाचा धोका ?
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचं येत्या 24 तासांत चक्रीवादळात रूपांतर होण्याची दाट शक्यता आहे. चक्रीवादळ तयार झालं तर त्याचं नाव 'जवाद' असं असेल असं सांगितलं जातंय.
हे नाव सौदी अरेबियानं सुचवलेलं नाव आहे. हे वादळ 4 डिसेंबरच्या आसपास ओडिशाच्या किनाऱ्याल धडकण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आंध्रप्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








