You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ताजमहाल की तेजोमहालय? 'त्या' 22 खोल्यांमध्ये काय गूढ दडलं आहे?
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी मराठी
ताज महाल की एक जुनं शिवमंदिर? शाहजहानने आपल्या मृत पत्नीसाठी बांधलेला महाल एका शिवमंदिराच्या जागेवर उभा आहे का? ताज महालात बंद ठेवलेल्या 22 खोल्यांचं गूढ काय आहे?
ते उकलण्यासाठी अलाहाबाद हाय कोर्टात याचिका दाखल केली गेली होती. पण कोर्टाने ही याचिका फेटाळून लावत असतानाच याबद्दल नाराजी व्यक्त केली. सगळं कशासाठी चाललंय?
न्यायाधीश डी के उपाध्याय आणि सुभाष विद्यार्थी यांनी म्हटलं, ''अशाप्रकारच्या वादांवर चार भिंतींच्या आत चर्चा झाली पाहिजे, कोर्टात नाही. उद्या तुम्ही येऊन म्हणाल न्यायाधीशांच्या दालनात शिरायचं आहे. एखादी वास्तू कुणी उभारली हे आता कोर्ट ठरवणार का?''
1631 ते 1653 या काळात संपूर्ण ताज महालाचा परिसर उभा राहिला. ही माहिती खुद्द ताज महालच्या अधिकृत सरकारी वेबसाईटवर दिलीय. ही वेबसाईट उत्तर प्रदेश सरकार चालवतं.
9 मे 2022 ला अलाहाबाद हायकोर्टात काही जणांनी एक याचिका दाखल केली होती. त्यांची मागणी होती की ताज महालातल्या ज्या 22 बंद खोल्या आहेत त्या उघडून तिथे असलेल्या मूर्ती आणि शिलालेखांचा शोध घ्यायला कोर्टाने पुरातत्व विभागाला सांगावं. या खोल्या उघडल्या तर ताजमहाल की तेजोमहालय हे गूढ उकलेल असं आजवर अनेक लोक म्हणत आलेत.
ही याचिका करणारे डॉ. रजनीश सिंह पेशाने डेंटिस्ट आहेत आणि भाजपचे अयोध्या जिल्हा समितीचे सदस्य आणि माध्यम संयोजक आहेत. पण ते म्हणतात या याचिकेशी भाजपचा संबंध नाही.
ते पुढे सांगतात, "या खोल्या सुरक्षेच्या कारणास्तव बंद केल्या का याबद्दलची माहिती त्यांनी 2019मध्ये पुरातत्व विभागाकडून मागवली होती. त्यावर या खोल्या बंद करण्यामागे फक्त सुरक्षेचं कारण आहे असं उत्तर पुरातत्व विभागानं दिलं होतं. नंतर पुरातत्व खात्याने आपल्या पत्रांना उत्तर देणं बंद केलं."
या याचिकेने मराठी इतिहास अभ्यासक पु. ना. ओक यांच्या पुस्तकावरून दावे केलेत. या पुस्तकाचं नाव होतं 'ताजमहाल नव्हे तेजोमहालय'. 1989 सालच्या या पुस्तकाचा आधार घेत आतापर्यंत अनेकदा ताजमहालावरून वाद झालेत. पु. ना. ओकांनी आपल्या पुस्तकात जगातील कोणतीही ऐतिहासिक वास्तू पाहण्याचे चार सिद्धांत मांडलेत. त्यातल्या तिसऱ्या सिद्धांतात ते म्हणतात, "सध्या उभे असलेले बांधकाम सर्व हिंदूंचे तर पाडकाम तेवढे सर्व इस्लामी आक्रमकांचे आहे."
शहाजहानने या वास्तूतल्या 150 खोल्या बुजवण्यासाठी 22 वर्षं घालवली असंही ओक म्हणतात. ते आपल्या पुस्तकात पुढे म्हणतात, "ताजमहाल उर्फ तेजोमहालय ही इमारत पायापासून शिखरापर्यंत जशीच्या तशी संपूर्णतया हिंदू राजमंदिर - राजमहाल आहे. एवढेच नव्हे तर शहाजहानाने त्यातील मौल्यवान वस्तू काढून स्वखजिन्यात नेल्या. हिंदू मूर्ती व संस्कृत शिलालेख ओढून काढून त्या रिक्त जागा कुराणातील वचनांनी भरून काढल्या...."
अलाहाबाद कोर्टातल्या याचिकेतही काय दावा केलाय पाहा, "1212 साली राजा परमर्दिदेव यांनी इथं तेजोमहालय बांधला. पुढे त्याचा ताबा जयपूरचे मानसिंह यांच्याकडे व नंतर राजा जयसिंह यांच्याकडे गेला. पुढे 1632 मध्ये शाहजहान बादशहाने ही जमिन हडपली."
इतिहास अभ्यासक राणा सफ्वी या दाव्यांबद्दल काय म्हणतात? "ताजमहाल बांधण्याआधी त्या जागी हिंदू राजा जय सिंग यांच्या मालकीची हवेली होती. शहाजहाँने त्यांच्याकडून ही हवेली विकत घेतली. यासाठी अधिकृतरित्या फर्मान काढण्यात आलं होतं. या फर्मानमधल्या माहितीनुसार हेही दिसून येतं की मुघल सम्राट त्यांच्या व्यवहाराच्या आणि इतिहासाच्या सगळ्या नोंदी ठेवत होते."
ताज महाल हा हिंदू आणि मुस्लीम स्थापत्यशास्त्राच्या मिलाफाचं उदाहरण आहे असं उत्तर प्रदेश सरकारनेच म्हटलंय. ताजमहाल जगातल्या सात आश्चर्यांमध्ये त्याच्या स्थापत्यकलेसाठीच गणला जातो. पण यावरूनही वाद आहेत.
पु. ना. ओक यांच्यासोबत काम केलेले लेखक सच्चिदानंद शेवडे म्हणतात की ताजमहाल हे मुळात हिंदू स्थापत्यशास्त्राचं उदाहरण आहे. ते म्हणतात, "ताजमहालच्या मध्यघुमटावर चंद्रकोर आहे. मुस्लीम संस्कृतीत पूर्ण चंद्र हे प्रतीक असतं, चंद्रकोर नसते. अशी चंद्रकोर शंकराच्या डोक्यावर असते, अशी शिवभक्तांची श्रद्धा आहे. या घुमटावर कलशही आहे. त्यासोबत आंब्याची पानं आणि मधोमध नारळाचा आकार आहे. ही हिंदू संस्कृतीची प्रतीकं आहेत. फुलं आणि प्राण्यांची चित्रं मुस्लीम स्थापत्यशास्त्रात निषिद्ध आहेत. पण ताजमहालवर हेही कोरीव काम पाहायला मिळतं."
इतिहासकार हर्बन्स मुखिया हा दावा फेटाळून लावतात, "स्थापत्यकलेमध्ये नेहमीच वेगवेगळ्या संस्कृतींचा प्रभाव पाहायला मिळतो. मुघल स्थापत्यकला यापेक्षा वेगळी नाही. कलश हे हिंदूंसाठी महत्त्वाचं प्रतीक आहे पण मुघल रचनांमध्येही आपल्याला कलश पाहायला मिळतो. ताजमहालमध्येही तो आहे. फुलंपानांची रचनाही मुघल इमारतींमध्ये पाहायला मिळतील," असं ते सांगतात.
ताज महालातल्या 22 खोल्या बंद का आहेत? या खोल्यांमध्ये नेमकं काय गूढ दडलंय? हा प्रश्न अनेकदा येतो. याबद्दल अधिकृत माहिती सार्वजनिक केली गेलेली नाही. या बंद खोल्यांवरून अनेक तर्क-वितर्क लढवले जात असतात. उत्तर प्रदेशातले हिंदू महासभेचे कार्यकर्ते अनेकदा ताज महालात जाऊन हिंदू पूजा-अर्चा आणि सण साजरे करण्याचा प्रयत्न करतात. पण प्रशासन त्यांना वेळोवेळी थांबवत असतं.
अलिकडेच एका साधूंनी तिथे जाऊन अक्षय्य तृतीया साजरी करण्याचाही प्रयत्न केला होता. काही कार्यकर्त्यांना त्या बंद खोल्यांमध्ये बसून हनुमान चालिसा म्हणायची होती. आता ही याचिका कोर्टाने दाखल करून घेतल्यानंतर हिंदू संघटनांनी आनंद व्यक्त केलाय. इतिहासाचे काही अभ्यासक मात्र हा निष्कारण वाद आहे असं म्हणतायत.
(सिद्धनाथ गानू, अनंत झणाणें आणि विकास पांडे यांच्या इनपुट्ससह)
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)