नवनीत राणांनी तुरूंगात मारहाण झाली नाही म्हणून सरकारचे आभार मानावेत- बच्चू कडू #5मोठ्याबातम्या

आज सकाळी विविधं वर्तमानपत्रं आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. तुरूंगात मारहाण झाली नाही म्हणून नवनीत राणांनी सरकारचे आभार मानावेत : बच्चू कडू
शिवसेनेवर दादागिरीचा आरोप करणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उत्तर दिलंय. तुरूंगात मारहाण झाली नाही म्हणून राणा दाम्पत्याने सरकारचे आभार मानावेत, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे.
"शिवसेनेची दादागिरी ही प्रामाणिकपणाची आहे. 'मातोश्री' हे शिवसेनेचं श्रद्धास्थान आहे. त्याला ललकारण्याचा प्रयत्न शिवसैनिक कसे सहन करणार?" असा प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे.
"दुसऱ्यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या राणा दाम्पत्याला लाज वाटायला हवी. जेलमध्ये राणा दाम्पत्याला पोलिसांकडून मारहाण झाली नाही याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानायला हवेत. आता राणा दाम्पत्याला तक्रार करण्यासाठी दिल्ली हेच एकमेव ठिकाण उरलं आहे. त्यांनी सरकारी कार्यालयात तक्रार केली तरी त्याची दखल भाजपच्या कार्यालयातून घेतली जाते," असा टोला बच्चू कडू यांनी लगावला आहे.
एबीपी माझानं हे वृत्त दिलं आहे.
2. राज ठाकरे यांना अयोध्येला जाऊ द्या, विरोध करु नका- देवेंद्र फडणवीस
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण यांनी जोरदार विरोध केला आहे. बृजभूषण यांनी त्यासाठी मंगळवारी (10 मे) मोर्चाही काढला होता. याच प्रकरणावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडताना म्हटलं की, राज ठाकरे यांना अयोध्येला जाऊ द्या. विरोध करण्याचं कारण नाही.
"राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला बृजभूषण सिंग का विरोध करत आहेत, हे मला माहिती नाही. माझं याविषयी त्यांच्याशी काही बोलणं झालेलं नाही. राज ठाकरेंना विरोध करण्याचं कारण मला समजलेलं नाही, पण माझं स्पष्ट मत आहे, रामाच्या चरणी जो जात असेल त्याला जाऊ दिलं पाहिजे. त्यांना विरोध करण्याचं काही कारण नाही," असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
दरम्यान, मनसे नेत्यांच्या कारवाईसंदर्भात आक्रमक होऊन राज ठाकरे यांनी मंगळवारी (10 मे) राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खरमरीत पत्र लिहिलं.
या पत्राबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, "राज ठाकरे मुख्यमंत्र्यांकडून इतकी भाबडी अपेक्षा ठेवतील असं वाटलं नव्हतं. आम्ही ठाकरे सरकारविरोधात दोन हात करतोय, राज ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकारविरोधात लढलं पाहिजे."
महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
3. 'द कश्मीर फाइल्स'वरून शशी थरूर- विवेक अग्निहोत्री यांच्यात ट्विटर वॉर
प्रदर्शनाला जवळपास दोन महिने उलटून गेलेले असतानाही 'द कश्मीर फाइल्स' चित्रपट सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत आहे. काहींना या चित्रपटाला काल्पनिक म्हटलं आहे, तर काहींना एक विशिष्ट विचारधारा लोकांमध्ये रुजवण्याचं काम हा चित्रपट करतोय असा आरोप या चित्रपटावर केला. आता काँग्रेस नेते शशी थरूर आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यात या चित्रपटावरून ट्विटर वॉर सुरू झालं आहे.
सिंगापूर फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'द कश्मीर फाइल्स' चित्रपटावर बंदी घालण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आणि त्यानंतर हा वाद सुरू झाला.

फोटो स्रोत, Social Media/Twitter
चित्रपटावर बंदी घालताना, 'मुस्लिमांची एकच बाजू मांडून चित्रपट लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला' असं कारण देण्यात आलं. त्यासंबंधीचा एक लेख शेअर करत शशी थरूर यांनी एक ट्वीट करून म्हटलं, 'भारतात सत्तेत असणाऱ्या पक्षानं प्रमोट केलेला चित्रपट 'द कश्मीर फाइल्स'वर सिंगपूर फेस्टिव्हलमध्ये बंदी घालण्यात आली.'
शशी थरूर यांच्या या ट्वीटला चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी देखील एक ट्वीट करत उत्तर दिलं. त्यांनी लिहिलं, 'सिंगापूर जगातील सर्वात प्रतिगामी सेन्सॉर आहे. त्यांनी तर 'द लास्ट टेम्पटेशन ऑफ जीझस ख्राइस्ट'वरही बंदी घातली होती. एवढंच नाही तर रोमँटिक चित्रपट 'द लीला हॉटेल फाइल्स'वरही बंदी घातली जाईल. त्यामुळे कृपया काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराची खिल्ली उडवणं थांबवा.'

फोटो स्रोत, Twitter/Vivek Agnihotri
यानंतर विवेक अग्निहोत्री यांनी आणखी एक ट्वीट केलं. त्यात त्यांनी शशी थरूर यांच्या दिवंगत पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिलं, 'तुमची पत्नी दिवंगत सुनंदा पुष्कर या कश्मिरी हिंदू होत्या? जर हा स्क्रीनशॉट खरा असेल तर त्यांचा सन्मानार्थ तुम्ही हे ट्वीट डिलिट करायला हवं.' या ट्वीटमध्ये त्यांनी सुनंद पुष्कर यांच्या ट्वीटचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ज्यात त्यांनी काश्मिरी हिंदू असल्याचा उल्लेख केला आहे.
लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
4. राजद्रोहाच्या प्रलंबित प्रकरणांबाबत तुमची भूमिका काय?- सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल
राजद्रोह कायद्याच्या फेरविचारापर्यंत प्रलंबित प्रकरणांचे काय करणार, याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (10 मे) केंद्र सरकारला दिले. राजद्रोह कायद्याचा फेरविचार करण्याच्या केंद्राच्या प्रतिज्ञापत्राची दखल घेत सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या कायद्याबाबत अधिक स्पष्टीकरण मागितल़े.
या कायद्याखाली दाखल असलेल्या प्रलंबित प्रकरणांचे काय करणार आणि कायद्याचा फेरविचार होईपर्यंत या कायद्याखाली नवे गुन्हे दाखल करणार नाही का, असे प्रश्न न्यायालयाने विचारल़े. त्यावर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारचे मत विचारात घेऊन याबाबत बुधवारी (11 मे) भूमिका मांडणार असल्याचे स्पष्ट केलं.
राजद्रोह कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल असून त्यावर सर्वोच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी सुरू आहे.
इंडियन एक्सप्रेसनं ही बातमी दिली आहे.
5. 'असानी' चक्रीवादळाची तीव्रता आज वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज
बंगालच्या उपसागरात तयार झालेलं 'असानी' हे चक्रीवादळ वायव्य दिशेला आंध्र-ओडिशाच्या किनारपट्टीच्या दिशेनं पुढे सरकलं आहे. हे चक्रीवादळ पुढे सरकत असताना कोलकात्यासह अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. कोलकात्यात अनेक ठिकाणी पाणी भरल्याचंही पाहायला मिळालं.
हवामान विभागाने सावधानतेचा इशारा देताना मच्छिमारांनी 10 मे पासून 12 मे पर्यंत बंगालच्या उपसागरात वायव्य दिशेला न जाण्याची सूचना केली आहे.
'असानी'चा वेग आणि तीव्रता पाहता हे चक्रीवादळ बुधवारी (11 मे) तीव्र चक्रीवादळात परिवर्तित होऊ शकतं आणि गुरूवारी (12 मे) त्याचा दाब वाढू शकतो, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केल्याचं एनडीटीव्हीनं आपल्या बातमीत म्हटलंय.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








