राज ठाकरे: दक्षिण मुंबईत पहाटेची अजान भोंग्यांशिवाय, मशिद ट्रस्टी, मौलवींचा निर्णय

अजान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांविरुद्ध आक्रमक भूमिका घेतल्यानंतर दक्षिण मुंबईतील मशिद ट्रस्टी आणि मौलवींनी पहाटेची अजान भोंग्यांशिवाय देण्याचा निर्णय घेतला आहे.

काल (4 मे) दक्षिण मुंबईतील 26 मशिदींतील ट्रस्टी आणि मौलवी यांची एक बैठक झाली. सर्वांनी एकमताने हा निर्णय मंजूर केल्याची माहिती उपस्थितांनी दिली आहे.

आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत उप-मुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "कुणीही कायदा हातात घेऊ नये. कुणालाही अल्टिमेटम देण्याचा अधिकार नाही."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्यासंदर्भात 4 मेचा अल्टीमेटम दिला होता. त्यानंतर काल या निमित्ताने वातावरण तापलेलं दिसून आलं.

मनसे कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी अजानवेळी हनुमान चालिसा वाजवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्ते आणि नेत्यांची राज्यभरात धरपकड झाल्याच्या बातम्याही आल्या.

दरम्यान, राज ठाकरे यांनी काल दुपारी पत्रकार परिषद घेत आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याचा इशारा दिला होता. मनसेचं आंदोलन एका दिवसाचं नसून कायमस्वरुपी आहे. भोंगे उतरेपर्यंत आंदोलन कायम राहील, असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं होतं.

मात्र, आता दक्षिण मुंबईतील ट्रस्टी आणि मौलवी यांचा हा मोठा निर्णय समोर आला आहे.

पहाटेची अजान भोंग्यांशिवाय

मुंबईत एकूण 1140 मशिदी आहेत. त्यापैकी सुमारे 90 टक्के मशिदींमध्ये पहाटेची अजान लाऊडस्पीकरवर न होता तोंडी स्वरूपात झाली. मात्र 135 मशिदींनी पहाटेची अजान लाऊडस्पीकरवर लावली होती. त्यांच्यावर काय कारवाई करणार असा सवाल राज ठाकरे यांनी कालच्या पत्रकार परिषदेत विचारला होता. यानंतर या मुद्द्यावर जोरदार चर्चा झाल्याचं दिसून आलं.

मदनपुरा, बडी मशिद (फाईल छायाचित्र)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मदनपुरा, बडी मशिद (फाईल छायाचित्र)

याच पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईतील मशिदींच्या ट्रस्टी आणि मौलवींनी एक तातडीची बैठक आयोजित केली. या बैठकीत मस्जिदबंदर, भायखळा, मदनपुरा, नागपाडा, आग्रीपाडा या परिसरातील 26 मशिदींचे विश्वस्त आणि मौलवी सहभागी झाले होते. यावेळी मशिदींवरच्या भोंग्यांविषयी चर्चा करण्यात आली. या बैठकीतच पहाटेची अजान भोंग्यांशिवाय करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कुणाच्या दबावाखाली नाही, तर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार हा निर्णय घेत असल्याचं ट्रस्टी आणि मौलवींनी स्पष्ट केलं. मुंबईत शांतता अबाधित राहावी, म्हणून समजूतदारपणे हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

याविषयी बोलताना मोमीनपुरा येथील जामिया मशिद अहले हदीसचे मौलवी अब्दुल जलील अन्सारी यांनी सांगितलं, "आज मदनपुरामधील बडी मशिद येथे एक बैठक झाली. याठिकाणी येथील सगळ्या मशिदीचे ट्रस्टी आणि मौलवी उपस्थित होते. सुप्रीम कोर्टाच्या सूचनेनुसार रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत लाऊडस्पीकर न वापरण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाची पूर्णपणे अंमलबजावणी करण्यात येईल, याची मी हमी देतो. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करण्यात येईल. आम्ही त्यांच्या आदेशाचा आदर करतो.

मेहदी मशिदचे ट्रस्टी मोहम्मद अर्शद यांनीही या बैठकीबाबत माहिती दिली. ते म्हणाले, मशिदीतील पहाटेची अजान लाऊडस्पीकरवर न करण्याचा महत्त्वाचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. सगळ्यांनी एकत्रितपणे हा निर्णय घेतला आहे. नागपाडा, आग्रीपाडा, भायखळा येथील मशिदींचे वरीष्ठ पदाधिकारी या बैठकीत उपस्थित होते. सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचं पालन करत देशातील शांतता कायम राखण्यासाठी सर्वांनी एकमताने हा निर्णय मंजूर केला. त्यानुसार, रात्री 10 ते 6 या वेळेत कोणत्याही पद्धतीची अजान, घोषणा लाऊडस्पीकरवर होणार नाही.

मनसेकडून स्वागत

दक्षिण मुंबईतील मशिदींचे ट्रस्टी आणि मौलवी यांनी समाजभावनेचा आदर करत पहाटे भोंग्यांवरून अजान न देण्याचं ठरवलं आहे. या निर्णयाचं मी स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया मनसे नेते प्रकाश महाजन यांनी दिली आहे.

पण, काही ठिकाणी अजूनही पहाटेची अजान भोंग्यांमधून दिली जात असल्याचं आढळून आलं आहे. भोंग्यांवरील अजानचं प्रमाण काही अंशी कमी झालं असलं तरी पूर्णपणे याची अंमलबजावणी व्हावी, असं मत महाजन यांनी व्यक्त केलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)