राज ठाकरेंविरोधात अटक वॉरंट, तर मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांची नोटीस

राज ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सांगलीच्या शिराळा न्यायालयाने वॉरंट बजावलं आहे. 2008 साली राज ठाकरे यांच्यासह सांगलीच्या मनसे कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी न्यायालयामध्ये तारखांना गैरहजर राहिल्याप्रकरणी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. त्यामुळे पोलीस राज ठाकरेंना अटक करणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भोंग्यांवरील भूमिकेवरून वातावरण तापलेलं आहे. यावरून राज ठाकरे यांच्या विरोधात टीका होत आहे.

या पार्श्वभूमीवर सांगली शिराळा न्यायालयाने राज ठाकरेंना अजामीनपात्र वॉरंट बजावला आहे. शिराळ्याच्या न्यायालयामध्ये एका गुन्ह्याप्रकरणी राज ठाकरे यांच्या विरोधात हे वॉरंट बाजवले आहे. खटल्याच्या सुनावणीस वारंवार गैरहजर राहिल्याने शिराळा न्यायालयाने राज ठाकरे यांना अजामीनपात्र वॉरंट बजावलं आहे.

सांगली पोलिसांना राज ठाकरे यांना पकडून हजर करण्याबाबतची नोटीस देखील शिराळा न्यायालयाने दिली आहे.

2008 साली परप्रांतियांच्या मुद्द्यांवर झालेल्या तोडफोडप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कल्याण येथे अटक झाली होती. त्याचे संतप्त पडसाद सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यात उमटले म्हटले होते. शेंडगेवाडी या ठिकाणी मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं होतं.

या आंदोलनादरम्यान तोडफोडीचा प्रकार घडला होता. या प्रकरणी शिराळा पोलीस ठाण्यामध्ये तानाजी सावंत यांच्यासह मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता.त्यानंतर राज ठाकरे 2009 मध्ये जामिनीसाठी शिराळा न्यायालयामध्ये हजर झाले होते व त्यांना जमीन मिळाला होता. मात्र त्यानंतर राज ठाकरे खटल्याच्या सुनावणीस गैरहजर राहिले आहेत,असा ठपका शिराळा न्यायालयाने ठेवला आहे.आणि 6 एप्रिल रोजी शिराळा न्यायालयाने राज ठाकरे यांना पकडून आणण्याबाबत मुंबई पोलिसांनी अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.

मनसेच्या नेत्यांना मुंबई पोलिसांची नोटीस

दरम्यान मनसे नेते आणि कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. ईद सणाच्या कार्यकाळात शांतता आणि सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये म्हणून 3 ते 17 मे या कालावधीत मुंबई सोडून जाण्याची नोटीस काढण्यात आली आहे.

ओमप्रकाश यादव यांच्या नावाने लिहिण्यात आलेल्या पत्रात मुंबईत वावर करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी आनंद नेर्लेकर यांनी हे आदेश काढले आहेत.

औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे काय म्हणाले?

मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आज (1 मे) औरंगाबादमध्ये सभा सुरू झाली आहे. त्यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातून या ठिकाणी मनसैनिक आले आहेत.

राज ठाकरे

फोटो स्रोत, Shrikant Bangale

जे लोक आपला इतिहास विसरतात त्या देशाचा भूगोल बदलतो असं राज ठाकरे औरंगाबाद येथील सभेत म्हणाले.

मी दुही माजवतोय असा आरोप शरद पवार यांनी माझ्यावर केला, पण मी कधीही दुही माजवली नाही. पण शरद पवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख कधी केला आहे का?

आता शरद पवार तल्लीन झालेले दिसत आहेत, गीता रामायण ऐकत आहेत आणि बाजूला शिवाजी महाराजांचा फोटो आहे, हे नाटक कशासाठी असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

पवारांनी जातीयवादाचे विष पसरवले आहे असं राज ठाकरे म्हणाले.

याआधी शरद पवारांनी म्हटले होते, की प्रबोधनकारांचे विचार राज यांनी वाचायला हवे होते. त्याला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की शरद पवारांनी केवळ सोयीनेच प्रबोधनकार वाचू नये.

राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतरच जातीयवादाचं विष पेरलं आहे असं राज ठाकरे म्हणाले.

'मशिदींवरील भोंगे काढलेच पाहिजेत'

याआधी मीच केवळ भोंग्यांबद्दल बोललो नव्हतो. पण मी पर्याय दिला. जर 4 तारखेनंतर मशिदीवरील भोंगे उतरले नाहीत तर माझी सर्व हिंदू बांधवांना विनंती आहे की मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावावी.

जर सरळ सांगून समजत नसेल तर कठोर पावलं उचलावीच लागतील, असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांच्या सभेच्या वेळी त्यांनी असं म्हटलं की सभा सुरू असतानाच लाऊडस्पीकरवरून बांग ऐकू येत आहे. पोलिसांनी हे भोंगे तत्काळ थांबवावेत असं राज ठाकरे म्हणाले.

जर सरळ सांगून कळत नसेल तर एकदाच जे व्हायचं ते होऊ द्या असं राज ठाकरे म्हणाले.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)