जोधपूरमध्ये 'या' कारणामुळे उसळला हिंदू-मुस्लिमांमध्ये हिंसाचार

फोटो स्रोत, ANI
ईदच्या दिवशी जोधपूरमध्ये दोन समुदायांमध्ये हिंसा झाली. ईदच्या दिवशी झालेला हिंसाचार हा दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी व्यक्त केलीय. गहलोत यांनी जिल्हा प्रशासनाला कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं आवाहन केलं आहे.
त्यांनी म्हटलं, "जोधपूरमध्ये काल रात्रीपासून जो तणाव निर्माण झाला आहे, तो दुर्दैवी आहे. सर्व समाज आणि धर्माचे लोक प्रेम आणि बंधुभावाने राहतात. ही राजस्थानची परंपरा आहे. मी लोकांना आवाहन करतो की, त्यांनी शांतता राखावी."
अशोक गहलोत यांनी म्हटलं, "कोणत्याही असामाजिक घटकांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. मी पोलिसांना कारवाईची सूचना दिली आहे. मी राजकीय पक्षाच्या नेत्यांना विनंती करतो की, त्यांनीही सर्वांना शांततेचं आवाहन करावं."

फोटो स्रोत, ANI
राजस्थानच्या जोधपूरमधील जालोरी गेट भागांत दोन समुदायांमध्ये हिंसक झटापट झाली, त्यानंतर प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद केली.
हा वाद सोमवारी (2 मे) रात्रीपासून सुरू झाला. परशुराम जयंतीच्या निमित्तानं एका समुदायानं झेंडे लावून सजावट केली होती आणि दुसऱ्या समुदायानं ते झेंडे हटवून आपले झेंडे आणि लाउडस्पीकर लावले, असा आरोप करण्यात आला.
त्यानंतर मंगळवारी (3मे) ईदच्या नमाजनंतर पुन्हा एकदा झेंड्यांवरून वाद सुरू झाला. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला.
नेमकं काय घडलं?
ईदच्या दिवशी जालोरी गेटजवळ ईदगाहवर नमाज अदा केली जाते. 3 मे रोजीही इथे ईदची नमाज अदा होणार होती, ज्यासाठी रात्रीपासून तयारी सुरू असते. जालोरी गेटपाशी अनेक झेंडे, बॅनर आणि लाउडस्पीकर आणले जात होते.
स्थानिक लोकांच्या मते हिंदू समुदायाच्या लोकांनी जालोरी गेटवर याचा विरोध केला. मोठ्या संख्येनं लोक इथं जमा झाले आणि झेंड्यांना आक्षेप घेतला, त्यावरून वाद सुरू झाला.
जमावानं झेंडे तसंच बॅनर फाडले आणि लाउडस्पीकर हटवले असाही आरोप आहे. दुसऱ्या बाजूनं याचा विरोध केला आणि दोन्ही बाजूने दगडफेकही केली गेली.

फोटो स्रोत, MOHAR SINGH MEENA/BBC
परिस्थिती चिघळल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि अतिरिक्त पोलिस दल तैनात करण्यात आलं. संतप्त जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला तसंच लाठीचार्जही केला.
राजस्थान पोलिस महासंचालक (डीजी) डॉ. मोहनलाल लाठर यांनी बीबीसीशी फोनवर बोलताना म्हटलं, "ईदची तयारी सुरू होती. जालोरी गेटपाशी एका प्रतिमेजवळ लावण्यात येणाऱ्या झेंड्यावरून आक्षेप घेतला गेला आणि वाद सुरू झाला. आम्ही पोलिस दल तैनात केलं आहे आणि शांतता राखण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत."
लाठर यांनी म्हटलं, "आम्ही या प्रकरणी 39 लोकांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर दोषींवर सक्त कारवाई केली जाईल." नेमकं काय घडलं?
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








