विजय चव्हाण जन्मदिन: मिलमधला 'टाइम कीपर' ते महाराष्ट्राची फेव्हरेट 'मोरूची मावशी'

मोरूची मावशी

फोटो स्रोत, Youtube/Prism Video

फोटो कॅप्शन, विजय चव्हाण मोरूच्या मावशीच्या भूमिकेत

मोरूची मावशी या नाटकाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचा आज जन्मदिन आहे. झपाटलेला, माहेरची साडी, जत्रा श्रीमंत दामोदरपंत यातील त्यांच्या व्यक्तिरेखाही गाजल्या. महाराष्ट्रातील लाडक्या अभिनेत्यांपैकी एक असलेल्या विजय चव्हाण यांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा.

"विजय चव्हाणने केलेली मोरूची मावशी आजही लाखो लोकांच्या मनात आहे. आमच्यासाठी तो आमच्या 'सुयोग' परिवारातला मोठा मुलगा होता. कर्ता आणि कोणत्याही प्रसंगात कुटुंबाच्या पाठी भक्कम उभा राहणारा. त्याने आयुष्यभर आमच्यासाठी खूप केलं. मोरूची मावशी हा तर आम्हा सगळ्यांच्याच आयुष्यातला एक सुंदर प्रवास होता," सुयोग नाट्यसंस्थेचे गोपाळ अलगेरी सांगतात.

1 जानेवारी 1985 रोजी रंगमंचावर पहिल्यांदा सादर झालेल्या आणि त्यानंतर अडीच हजार प्रयोगांद्वारे जगभरातल्या प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या 'मोरूची मावशी' या नाटकाची गोष्ट रंजक आहे.

कसं झालं 'मोरूची मावशी'?

'सुयोग' ही नाट्यसंस्था त्या वेळी बाळसं धरत होती. त्या वेळी गोपाळ अलगेरी आणि सुधीर भट एक नवीन नाटक काढण्याची चर्चा करत होते.

अलगेरी सांगतात, "त्या वेळी 'टुरटूर' हे नाटक जोरदार चाललं होतं. त्या नाटकात अनेक कलाकार होते... लक्ष्मीकांत बेर्डे, प्रशांत दामले, प्रदीप पटवर्धन, विजय चव्हाण अशा अनेक कलाकारांचा समावेश होता. आपल्या नवीन नाटकात पुरुषाला बाईची भूमिका करावी लागते, असं काहीतरी हवं, असं आमचं बोलणं झालं."

मुंबईत त्या वेळी गिरणगावात एक वेगळीच नाट्यचळवळ जोमाने सुरू होती. मुंबईतल्या गिरण्यांमध्ये आंतरगिरणी नाट्यस्पर्धा व्हायची. या नाट्यस्पर्धेत विजय चव्हाण यांनी मफतलाल मिल नंबर 2साठी आचार्य अत्रे यांनी लिहिलेलं 'मोरूची मावशी' नाटक केलं होतं, अशी आठवण ज्येष्ठ नाट्य समीक्षक आणि नाट्य चळवळीचे अभ्यासक जयंत पवार सांगतात.

विजय चव्हाण त्या वेळी या मिलच्या Time office मध्ये Time-keeper म्हणून काम करत होते.

मोरूची मावशी

फोटो स्रोत, Youtube/Prism Video

फोटो कॅप्शन, विजय चव्हाण आणि प्रशांत दामले

सुयोग संस्थेसाठी नवीन नाटक करायचं ठरलं, तेव्हा याच नाटकाचं नाव समोर आल्याचं गोपाळ अलगेरी सांगतात.

"त्या वेळी 'मोरूची मावशी' या नाटकाला पारितोषिक मिळालं होतं. लक्ष्याने ते नाटक बघितलं होतं. त्यानेच आम्हाला विजय चव्हाणचे त्या नाटकातले फोटो दाखवले आणि तो ही भूमिका उत्तम वठवेल, हे सांगितलं. आम्ही केवळ विजयचे फोटो बघून त्याला हे काम दिलं," अलगेरी त्या दिवसांच्या आठवणींमध्ये हरवतात.

या नाटकातल्या इतर कलाकारांची नावंही लक्ष्मीकांत बेर्डेनीच सुधीर भट आणि गोपाळ अलगेरी यांना सुचवल्याचं या नाटकात काम करणारे अभिनेते प्रशांत दामले आणि स्वत: अलगेरी सांगतात.

तालमीच्या गमतीजमती

या नाटकाचं दिग्दर्शन दिलीप कोल्हटकर यांनी केलं होतं.

"दिलीप कोल्हटकर हे भाषेला अत्यंत महत्त्व देणारे दिग्दर्शक होते. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला आम्हा कलाकारांची भाषा शुद्ध आणि स्पष्ट करण्यावर मेहेनत घेतली," प्रशांत दामले सांगतात.

'मोरूची मावशी' नाटकाच्या तालमी जुन्या रवींद्र नाट्यमंदिरमध्ये चालायच्या. त्या वेळी रवींद्र नाट्यमंदिर खूपच सुंदर जागा होती, असं प्रशांत दामले सांगतात.

"खालच्या मजल्यावर ऑडिटोरियम होतं. मध्ये मोकळी जागा होती. कँटीन होतं. अनेक कलाकार तिथे गप्पा मारायला यायचे. वरच्या मजल्यावर अगदी डाव्या बाजूला तालीम हॉल होता. तिथे आमच्या तालमी व्हायच्या. आम्ही सगळेच नोकरी सांभाळून नाटक करणारे होतो. त्यामुळे तालमी रात्रीच्या वेळीच व्हायच्या," दामले तालमींच्या दिवसांमध्ये हरवून जातात.

मोरूची मावशी

फोटो स्रोत, Youtube/Prism Video

फोटो कॅप्शन, प्रदीप पटवर्धन आणि विजय चव्हाण

"या मूळ नाटकाचं स्क्रिप्ट खूप मोठं होतं. तेव्हा असं ठरलं की, काही गद्य पानांची गाणी करू या. मग मंगेश कुलकर्णी यांनी अत्यंत सोपी आणि लोकांच्या ओठांवर रूळतील अशी गाणी लिहिली. मला वाटतं, अशोक पत्कींनी संगीत दिलेलं ते पहिलंच नाटक होतं," दामले अगदी आठवून सांगतात.

'टांग टिंग टिंगा'ची धमाल

या नाटकाचे संगीतकार अशोक पत्की या नाटकातल्या सगळ्यात गाजलेल्या गाण्याबद्दल सांगतात. ते त्या वेळी फाउंटन भागातल्या वेस्टर्न आउटडोअर नावाच्या स्टुडियोत जाहिरातींच्या जिंगल्स तयार करायचे.

"दिलीप कोल्हटकरची बँक आमच्या स्टुडियोच्या खालीच होती. लंच टाइममध्ये आम्ही भेटायचो. असंच तो मला भेटला. सध्या काय करतोस, असं विचारलं आणि संध्याकाळी रवींद्र नाट्यमंदिरला यायला सांगितलं. एका नाटकाचं संगीत तुला करायचं आहे."

"संध्याकाळी सातच्या सुमारास मी 'रवींद्र'ला पोहोचलो, तेव्हा तिथे पाच-सहा मुलं मुली बसले होते. दिलीपने ओळख करून द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला प्रशांत, मग प्रदीप, नंतर दोन तीन मुलींची ओळख आणि नंतर विजयची ओळख झाली."

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

"या नाटकातलं आचार्य अत्रे यांनी लिहिलेलं 'टांग टिंग टिंगा' हे गाणं सोडलं, तर इतर गाणी नंतर लिहिलेली आहेत. आम्ही त्या वेळी अशा उडत्या आणि सोप्या चालीतल्या गाण्यांना 'बोल गाणी' म्हणायचो. दिलीपने मला तशी बोल गाणी द्यायचा आग्रह केला. ही गाणी कोण गाणार, असं विचारल्यावर दिलीपने विजयकडे बोट दाखवलं," अशोक पत्की यांना तो दिवस लख्ख आठवतो.

मग अशोक पत्की यांनी प्रत्येकाला थोडं थोडं गायला लावल्याचंही ते सांगतात. "विजयची पाळी आली, तेव्हा तो म्हणाला की, मी अजिबात गाऊ शकत नाही. तरीही मी आग्रह केला तेव्हा त्याने काही कोळी गीतं आणि त्या वेळी बाल्या लोक गायचे ती गाणी गायली. त्याला संगीताचा गंध नव्हता, हे खरं. पण तो तन्मयतेने गात होता," पत्की सांगतात.

नाटक गाजायला सुरुवात झाली आणि विजय चव्हाण या गाण्यावर वन्स मोअर घेतात, असं कोणीतरी अशोक पत्कींना सांगितलं. त्यांना आश्चर्य वाटलं.

"एक दिवस मी गपचूप शिवाजी मंदिरच्या एका प्रयोगाला जाऊन बसलो. 'टांग टिंग टिंगा' सुरू झालं. या गाण्यात 'टांग टिंग टिंगा' चं एक आवर्तन झालं की, 'टांग टिंग टिंगाक्... ढुम्म्' असा एक आवाज येतो. त्या आवाजावर विजयने एवढ्या वेगवेगळ्या गोष्टी केल्या की, मी पोट धरून हसायला लागलो. वन्स मोअर मिळाला नसता, तरच नवल!"

या गाण्यांची एक आठवण प्रदीप पटवर्धनही सांगतात. "आमच्यापैकी प्रशांत गायक होता. पण माझा आणि विजयचा गाण्याशी काहीच संबंध नव्हता. पण तरीही आपल्याला कुणीतरी गाणं गायला देतंय, तर ते आपल्याला गाता आलंच पाहिजे, ही जिद्द आमच्यात होती."

गोपाळ अलगेरी सांगतात, "विजय गाण्याच्या बाबतीत खूपच अवघडलेला होता. पत्की काकांनी मग त्याला विचारलं की, 'तुला कोणत्या सुरात गाता येईल?' त्याने मग साधारण सूर वगैरे सांगितला. आता हे पत्की काकांचं कौशल्य आहे की, त्यांनी अगदी सहज सोपी आणि कुणालाही गाता येईल, अशी चाल बांधली. ही चाल पुढे खूपच लोकप्रिय झाली."

या गाण्याची एक आठवण प्रशांत दामलेंकडेही आहे. "नाटकाच्या तालमी सुरू झाल्या. विजय चव्हाण यांचा स्टेजवरचा वावर भन्नाट होता. पण गाणं आलं की ते थोडेसे घाबरायचे. मग ते मला हाताने खेचून जवळ उभं करायचे. त्यांनी मला सांगितलं होतं की, पहिला सूर तू दे मग मी व्यवस्थित गातो. पहिले काही प्रयोग आम्ही असंच केलं. पण त्यानंतर त्यांनी सुरासाठीच नाही, तर इतरही गोष्टींसाठी मागे वळून पाहिलं नाही."

...आणि हाऊसफुल्लचा बोर्ड लागला!

1 जानेवारी 1985 रोजी या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग झाला. त्यानंतर या नाटकाच्या जवळपास 129 प्रयोगांना लोकांनी अजिबात गर्दी केली नव्हती.

"सुरुवातीला जेमतेम दीड-दोन हजार रुपयांचं बुकिंग मिळालं होतं. पण मी आणि भटांनी हे नाटक चालवायचंच, हे ठरवलं होतं," अलगेरी सांगतात.

"आम्हाला कळत नव्हतं की नेमकं कुठे काय चुकतंय. लोक नाटकाला गर्दी करत नव्हते. विजय चव्हाणच नाही तर आम्ही सगळेच जीव ओतून काम करत होतो. अत्र्यांचं लेखन असल्याने ती बाजूही भक्कम होती. पण म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता," प्रशांत दामले सांगतात.

मोरूची मावशी

फोटो स्रोत, Youtube/Prism Video

फोटो कॅप्शन, टांग टिंग टिंगाक्... या गाण्याने लोकांच्या मनावर गारूड घातलं होतं.

त्याच सुमारास म्हणजे जुलै-ऑगस्ट 1985 मध्ये 'मोरूची मावशी'चा गोवा दौरा होता. पणजीच्या कला अकादमीमध्ये एका महोत्सवात या नाटकाचा प्रयोग झाला. योगायोगाने त्या वेळी दूरदर्शनने या महोत्सवाचं वार्तांकन केलं होतं.

"27 ऑगस्ट 1985 या दिवशी विनय आपटे यांनी त्यांच्या 'गजरा' या कार्यक्रमात आमच्या नाटकातलं 'टांग टिंग टिंगाक्' हे गाणं दाखवलं आणि जादूची कांडी फिरल्यासारखं झालं. गोव्याहून आम्ही परत आलो आणि रवींद्र नाट्यमंदिरला पहिलाच प्रयोग झाला. त्या प्रयोगाला हाऊसफुल्लची पाटी पहिल्यांदा लागली. त्यानंतर जवळपास दोन हजार प्रयोग होईपर्यंत ती उतरलीच नाही," अलगेरी सांगतात.

"पुढल्याच वर्षी ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये 'मोरूच्या मावशी'चे सलग चार दिवस 12 प्रयोग झाले. विशेष म्हणजे हे बाराही प्रयोग हाऊसफुल होते. कदाचित हा एक विक्रम असेल," प्रशांत दामले सांगतात.

1 जानेवारी 1985 रोजी सुरू झालेला 'मावशी'चा झंझावात पार अमेरिकेत जाऊन 2000-2002 साली थांबला. तोपर्यंत या नाटकाचे अडीच हजार प्रयोग झाले होते. या सगळ्या प्रयोगांमध्ये विजय चव्हाण यांनीच मावशीची भूमिका केली. त्यांनी केलेली मावशी लोकांना इतकी आवडली की, इतर संचांमध्ये झालेल्या या नाटकाला लोकांनी फारशी पसंती दिली नाही, असं निरीक्षण अलगेरी नोंदवतात.

लाईट गेले, पण...

'मोरूची मावशी' या नाटकाच्या एका प्रयोगाची आठवण गोपाळ अलगेरी यांच्या मनात अगदी खोलवर दडली आहे.

"पुण्याच्या भरत नाट्यमंदिरमध्ये आमचा प्रयोग होता. प्रयोग हाऊसफुल होता. पण प्रयोग सुरू होण्याआधीच लाईट गेले. आता प्रयोग रद्द करून लोकांना पैसे द्यायचे का, असा विचार सुरू होता. विजयला अर्थातच ते पसंत नव्हतं. तरी आम्ही अनाउन्समेंट करून लोकांना प्रयोग रद्द करत असल्याची कल्पना दिली!"

"पण लोकांना 'मावशी' बघायचंच होतं. शेवटी पेट्रोमॅक्सच्या प्रकाशात नाटक करायचं, असं ठरलं आणि विजयचा चेहरा खुलला. पण गाण्यांचं काय करायचं, हा प्रश्न होता. तोदेखील विजयने सोडवला. त्याने एक टेबल आणून बाजूला ठेवलं. या टेबलावर ताल धरून आपण गाणी म्हणू या, असं सांगून त्याने प्रयोग सुरू केला. त्या दिवशी कोणत्याही तांत्रिक सहाय्याविनाही तो प्रयोग भन्नाट रंगला," अलगेरी सांगतात.

"विजय असाच होता. त्याला प्रयोग रद्द झालेला आवडायचा नाही. किंबहुना कोणत्याही अडचणीमुळे नाटक थांबलेलं त्याला रुचलंच नाही. आमच्या संस्थेसाठी तर त्याने खूप केलं. कोणतीही अडचण असो, तो तयार असायचा," अलगेरी गहिवरून सांगतात.

आणि त्यांनी नाकातल्या नळ्या फेकून दिल्या...

अशोक पत्की विजय चव्हाण यांची आणखी एक आठवण सांगतात. ही आठवण अगदी गेल्याच वर्षीची, पण 'मोरूची मावशी' नाटकाबद्दलचीच!

"गेल्या वर्षी माझ्या पंचाहत्तरीचा कार्यक्रम झाला. विजय आजारी होता, तरी तो व्हिलचेअरवर बसून आला. कार्यक्रमात मोरूची मावशीचा विषय निघाला. विजय प्रेक्षकांमध्ये बसला होता. तिथूनच त्याने मला थांबवलं. लोकांच्या मदतीने तो वर आला," अशोक पत्की सांगतात.

ते पुढे म्हणतात, "त्या दिवशी विजयच्या अंगात काय संचारलं होतं माहीत नाही, पण त्याने टांग टिंग टिंगा गाण्यावर नाचायचा हट्ट धरला. तो चक्क नाचला. हाताला सलाईन लावण्यासाठी टोचलेल्या सुया काढल्या, नाकातल्या नळ्या काढल्या आणि तो नाचला. मी अक्षरश: थक्क झालो होतो."

300 रुपयांपासून दोन हजारांपर्यंतचा प्रवास

'मोरूची मावशी' या नाटकाने विजय चव्हाण यांना खूप काही दिलं, असं नाट्य अभ्यासक जयंत पवार सांगतात. या नाटकानंतर त्यांची कारकीर्द आणखी भरात आल्याचं निरीक्षण ते नोंदवतात.

जत्रा विजय चव्हाण

फोटो स्रोत, Youtube/Video Palace

फोटो कॅप्शन, 'जत्रा' या चित्रपटात त्यांनी साकारलेलं कान्होळे हे पात्रही खूप गाजलं.

गोपाळ अलगेरी म्हणतात, "'मोरूची मावशी' या नाटकाच्या पहिल्या प्रयोगासाठी आम्ही विजयला 300 रुपये नाईट दिली होती. अनेक प्रयोग त्यात काहीच वाढ झाली नाही. जसजसं नाटक लोकप्रिय झालं, तशी त्याच्या नाईटमध्येही वाढ झाली. हा आकडा दोन हजार रुपयांपर्यंत पोहोचला. पण त्यानंतर त्याने सांगितलं की, यापुढे 'मावशी'साठी नाईट घेणार नाही. आमच्या आणि नाटकाच्या प्रेमापोटी त्याने पुढले अनेक प्रयोग असेच केले."

विजय चव्हाण यांच्या या दिलदारपणाचा एक किस्सा प्रशांत दामलेही सांगतात. "'मोरूची मावशी'चे 500 प्रयोग झाले आणि मला 'ब्रह्मचारी' नाटकात मुख्य भूमिकेसाठी सुधीर भटांनी विचारलं. एक चालणारं नाटक सोडून नवीन नाटक स्वीकारायचं का, या द्विधा मनस्थितीत मी होतो. नुकतंच लग्न झालं होतं. संसाराची घडीही बसवायची होती. त्या वेळी विजय चव्हाणांनी मला सल्ला दिला की, मुख्य भूमिका मिळत आहे, ते नाटक तू कर. जेव्हा 'ब्रह्मचारी'चे प्रयोग नसतील, तेव्हा 'मोरूची मावशी'चे प्रयोग तूच करायचेस. त्या काळात माझ्यासाठी हा पाठिंबा खूप मोलाचा होता."

"त्यांनी पुढे खलनायकाच्या भूमिका केल्या, अनेक विनोदी भूमिकाही केल्या. 'श्रीमंत दामोदरपंत'मधली त्यांची अण्णांची भूमिका असेल किंवा 'जत्रा'मधली कान्होळेंची भूमिका असेल, अनेक भूमिका गाजल्या. पण लोकांना विजय चव्हाण म्हटल्यावर 'टांग टिंग टिंगाक्' म्हणत पिंगा आणि बसफुगड्या घालणारी 'मोरूची मावशी'च स्मरणात राहील," अलगेरी आणि प्रशांत दामले दोघंही सांगतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)