'सैराट'चा आत्मा 'धडक'मध्ये हरवला, पण तरीही मिळतात ग्रेस मार्क

फोटो स्रोत, DHARMA PRODUCTIONS/FACEBOOK
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"आरं ए बिली बावडिन मॅच थांबव, लाईट आली की."
"हॅलो... हॅलो माईक टेस्टींग.. ए नरसाळ्या, आरं हो बाजूला! हां.. तर लोडशेडिंगच्या लांबलचक व्यत्ययानंतर इथे उपस्थित असलेल्या क्रिकेट रसिकांचं, नेत्यांचं आणि भुरट्या चोरांचं बिटरगावच्या या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर बिटरगाव क्रिकेट प्रीमिअर लीग मध्ये स्वागत आहे."
हे सगळं ऐकू येत असताना पडद्यावर फक्त नावं जात असतात.
महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागाचं कसलं जबरदस्त चित्रण आहे. IPL किती खोलवर रुजलीये, काम नसणारे कितीतरी हात दिवसभर क्रिकेट खेळत असतात. खऱ्या IPL मध्ये चिअरलीडर्स नाचतात, इथे तडमताशे वाजतात.
लोडशेडिंग आहे, नोकऱ्या नाहीत, पैसा फक्त मुठभर बागाईतदारांच्या हातात. तेच तिथले स्थानिक नेते. तेच सर्वेसर्वा. तरीही ग्रामीण तरुणांच्या आशाआकांक्षांचं पुरेपूर चित्रण.
सलामीलाच असला कडक शॉट असलेला सिनेमा - 'सैराट'! यावरून चर्चा, वाद-प्रतिवाद, समीक्षा, समाजमन ढवळून का काय टाकणारे परिसंवाद झाले आणि सर्वसामान्य प्रेक्षकाने याची पारायणं केली आणि मग आला 'धडक'.
'सैराट' सुरू होतो एका मोठ्या कॅनव्हासवर. पहिली दीड मिनिटं फक्त आवाज येत राहतात. चेहरा नसणारे. हेच आवाज आर्ची-परश्याचा पाठलाग करतात आणि आपलाही. पण 'धडक'चा पहिला सीन? काहीतरीच! लाडू, घेवर, आणि मिरच्या खाऊन मग दांड्यावरून चालायचं. काहीतरी अतार्किक आणि माणूस करू शकणार नाही अशी गोष्ट. तद्दन फिल्मी!
दिल्लीतल्या थिएटरमध्ये बसलेल्या माझ्या आसपासच्या बिगर मराठी प्रेक्षकांना काही वावगं वाटत नसावं.
लोक हसत होते, मजा करत होते, त्यांना त्या पिक्चरमधला विनोद आवडत होता.
जातीचा उल्लेखही नाही
'सैराट'चं मुख्य कथानक फिरत जातीभोवती. धडकमध्ये मात्र जातीचा अगदी ओझरता उल्लेख आहे. जात हे भारतीय समाजातलं कठोर वास्तव. 'जात नाही ती जात' असं म्हणतात, पण जातीचा उल्लेख आला की बॉलिवुड आपली पाठ का फिरवतं?

फोटो स्रोत, Nagraj Manjule
'धडक'मध्ये दोघं वेगळ्या जातींचे आहेत, असं दाखवलं आहे. नायिका 'उँची जात'ची आहे, पण नायकाच्या जातीबद्दल मौन आहे.
काल परवा रिलीज झालेला 'काला' हा तामीळ सिनेमा दलितांच्या वस्तीतून सुरू होतो. भारतीय सिनेमाच्या इतिहासात क्वचितच दलित नायक लार्जर दॅन लाईफ बनून अवतरतो. ते रजनीकांतने करून दाखवलं.
रावणाचीही स्वतःची कथा आहे आणि त्यात तो हिरो आहे, राम नाही असं सांगणारा सिनेमा. पण हा सिनेमाही प्रादेशिक आहे हे लक्षात घ्यायला हवं.
बॉलिवुडने मात्र या गोष्टींकडे सोयिस्कर दुर्लक्ष केलं. या सिनेमांचं नाणं खणखणीत वाजलं तरी.
पी. रंजित आणि नागराज मंजुळेंसारखं अनुभवविश्व बॉलिवुडच्या ग्लॉसी दिग्दर्शकांना नाही का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
कोणी असंही म्हणू शकतं की दरवेळी सिनेमात जातीची चर्चा का करावी, किंवा समाजात खरखरीत वास्तव का दाखवावं? मुद्दा मान्य आहे.
सिनेमा वैयक्तिक अनुभवातून, वैयक्तिक जाणीव-नेणिवेतून येतो, त्यामुळे त्या कशा पद्धतीने दाखवाव्या किंवा त्यात काय असावं नसावं हे ठरवण्याचा अधिकार निर्माते-दिग्दर्शकांना नक्कीच आहे.
त्यामुळे हेही मान्य की शशांक खेतानचे दृष्टिकोन नागराज किंवा पी. रंजितपेक्षा वेगळे असू शकतात. त्यांना संपूर्णपणे व्यावसायिक, मसाला हिंदी सिनेमा बनवण्याचं स्वातंत्र्य आहे. पण अडचण तेव्हा येते तेव्हा प्रेक्षकांना 'नये पॅकेट में पुरानी चीज' विकली जाते.
जातिवादाचं, पुरुषसत्ताक समाजाचं, ऑनर किलिंगचं भयानक वास्तव असणाऱ्या चित्रपटाचा रीमेक करायचा आणि जातिवादालाच नाकारायचं. सुंदर सुंदर लोकेशनवर छान छान कपडे घालून हिरोईनला आकर्षक दाखवायचं. हिरोला नाचगाणं करायला लावायचं आणि तोंडी लावायला दोन विनोदी अभिनेत्यांना पाणचट विनोद करायला लावायचे. (तेही शारीरिक व्यंगांवर).
भारतातल्या जातींच्या उतरंडी, दलितांचं शोषण यावर आधारित असणारं राजकारण, वंचितांचं जगणं आणि त्यांचा लढा हे विषय म्हणजे समांतर चित्रपटांसाठी आहेत. व्यावसायिक सिनेमात असलं काही चालत नाही, लोक ते पहाणार नाहीत अशा गैरसमजात बॉलिवुड निर्माते गेली कित्येक वर्षं आहेत. 'धडक'ही त्याच पानावरून पुढे चालू राहातो.
गंमत म्हणजे ज्या सिनेमाचा हा रीमेक आहे, त्या सिनेमानेच सिद्ध केलंय की जातीसारख्या गंभीर विषयाला हात घालून लोकांचं मनोरंजन करता येतं, सामाजिक संदेश देता येता, उत्तम अशी कलाकृती बनवता येते आणि हे 100 कोटींचा धंदाही करता येतो.
पण या सिनेमाच्या निर्मात्यांनी हे पाहून न पाहिल्यासारखं केलं असावं. बरं जातीचं राहू द्या, पळून गेल्यानंतर जेव्हा घरच्यांचा पाठिंबा नसतो, हातात पैसे नसतात, शिक्षण-काम नसतं, तेव्हा प्रेमाखातर पळून जाणाऱ्यांची कशी परवड होते हेही 'सैराट'ने दाखवलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
त्या तुलनेत 'धडक'च्या कार्यकर्त्यांना (पक्षी हिरो-हिरोईनला) काहीच सहन करावं लागत नाही. पैशांची सोय होते, चांगली माणसं जणू त्यांच्या सेवेची संधी मिळण्याची वाटच पाहात असतात. मित्र, मामा सगळेच सोबत असतात. नाही म्हणायला तोंडी लावायचा चार-दोन भांडणं होतात, पण 'सैराट'मध्ये पळून गेल्यानंतर आर्ची-परश्या संपूर्ण दिवस जसे भकासपणे फिरत असतात, तेवढा त्रास दिग्दर्शकाने मधू-पार्थवीला दिला नाही.
राहून राहून एक वाटतं, एवढी वर्षं झाली पण बॉलिवुडला एक 'सैराट' किंवा एक 'काला' का काढावासा वाटू नये?
समांतर सिनेमे आहेत. 'मसान'सारख्या चित्रपटात जातीचं वास्तव नक्कीच मांडलं आहे. असे अनेक सिनेमे असतील, पण व्यावसायिक सिनेमात चान्स मिळूनही धडकच्या निर्मात्यांनी तेवढी हिंमत दाखवलेली नाही.
हे म्हणजे फ्री हिट मिळून सिंगल रन काढल्यासारखं आहे.
नायिका स्वतंत्र नाहीच
जसं जातीचा उल्लेख नाही तसंच नायिकेला स्वातंत्र्य नाही. 'सैराट'मधली आर्ची हेकेखोर आहे, पाटलाची पोरगी असल्याने तिच्यात एक माज आहे आणि तिचं परश्यावर नितांत प्रेम आहे. पण याही पलीकडे जाऊन तिला एक स्वतंत्र अस्तित्व आहे.
ती दुबळी नाही. पोलीस स्टेशनमध्ये बापाच्या विरोधात जाऊन 'मी परश्याला पळवलं' हे सांगायची धमक तिच्यात आहे. तिला वेगळं सांगावं लागत नाही की आता पैसे कमव.

फोटो स्रोत, Sairat movie
पार्थवीचं तसं नाही. तिला पदोपदी मदत लागतेय. तिला मधूने मारणं तिने जणू काही हे नॉर्मल आहे असं मान्य केलंय. तिच्यात आर्चीसारखी बंडाची आग दिसत नाही. आर्ची बंड करते आधी आपल्या बापाविरूद्ध आणि नंतर परश्याविरूद्धही.
पार्थवीला पुरूषप्रधानत्व मान्य आहे का, असा प्रश्न पडतो.
हातात पिस्तूल आल्यावर आर्ची ते समोरच्यावर उगारते, तर पार्थवी ते स्वतःच्या डोक्यावर धरून आत्महत्या करण्याची धमकी देते. आर्ची एवढी दुबळी नाहीये.
तरीही ग्रेस मार्क देऊन पास का?
हे असलं तरीही 'धडक'ने बरीच धडक मारलीये असं वाटतं. कदाचित 'सैराट' तुलना करायला नसता तर या चित्रपटाला आपण सगळ्यांनी चांगल्याचा शेरा देऊन टाकला असता.
त्यांना घरच्यांची आठवण येणं, परत जावसं वाटणं हे जेन्युईन वाटतं. 'जालीम' जमान्याचा विरोध झुगारून हिरो-हिरोईन एक झाले की आपले सिनेमा संपतात. पुढे काय 'हालत' होते हे दाखवल्याबद्दल धडकच अभिनंदन केलं पाहिजे.

फोटो स्रोत, DHARMA PRODUCTIONS/FACEBOOK
इंटरवेल नंतरच्या भागात बऱ्यापैकी साधेपणा आहे. बॉलिवुडचा भपका नाही. भडक पार्श्वसंगीत नाही.
'धडक'चा शेवटही 'सैराट'सारखा धक्कादायक. धक्कादायक यासाठी म्हटलं की आपण सैराटवाले रक्ताची पावलं आत्ता दिसतील, नंतर दिसतील म्हणून वाट पाहातो. पण होतं भलतंच!
शेवटी पाटी दाखवली आहे ऑनर किलिंगची आकडेवारी दाखवणारी. ती दाखवून का होईना लोकांना विचार करायला लावलं यासाठी धडकचं अभिनंदन.
'सैराट' संपतो तेव्हा एक भयाण शांतता थिएटरभर भरून राहाते. हिंदी प्रेक्षकांसोबत 'धडक' पाहिला की पुन्हा तशीच शांतता अनुभवायला मिळते. लोक बोलत नाहीत, बाहेर पडताना कोणताही दंगा-गोंधळ नसतो. पोराबाळांना घेऊन आलेले लोक त्यांना जास्तच कुशीत घेतात.
काहीतरी टोचल्याची जाणीव राहते. निदान यासाठी तरी धडकच अभिनंदन करायला हवं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 3
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








