You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरे : 'राज ठाकरे स्वतःला बाळासाहेब ठाकरे समजू लागले आहेत' #5मोठ्याबातम्या
विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..
1. राज ठाकरे स्वतःला बाळासाहेब ठाकरे समजू लागले आहेत - उद्धव ठाकरे
"राज ठाकरे स्वतःला बाळासाहेब ठाकरे समजू लागले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही भाजपची 'बी' टीम नव्हे तर 'ढ' टीम आहे," अशा शब्दांत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे.
शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियान अंतर्गत खासदारांच्या बैठकीत शुक्रवारी (29 एप्रिल) ते बोलत होते. यावेळी त्यांनी पक्षाच्या पुढील टप्प्यातील डावपेचांबाबत चर्चा केली.
"मुन्नाभाई चित्रपटात मुन्नाभाईला गांधीजी वाचून वाचून आपणच गांधींसारखे बोलू शकतो असा भ्रम होतो. तसेच हे राज ठाकरे हे आपण जणू बाळासाहेब ठाकरेच आहोत असे समजू लागले आहेत," असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं. ही बातमी लोकसत्ताने दिली.
2. 'मोदींच्या घरासमोर जाऊन मी कुराण वाचलं तर...?'
"पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरासमोर जाऊन कुराण वाचणार, असं मी म्हटलं तर तुम्ही काय म्हणाल? आमच्यावर गोळी चालवाल ना?" असा सवाल करत AIMIM अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी राणा दांपत्यावरील कारवाईचं समर्थन केलं आहे.
औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर जाऊन हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केली. यानंतर झालेल्या गोंधळानंतर त्यांनी यातून माघार घेतली.
याविषयी बोलताना ते म्हणाले, "मोदींच्या घरासमोर कुराण वाचू असं मी आणि इम्तियाज जलील यांनी म्हटलं तर तुम्ही रॅपिड अॅक्शन फोर्स लावाल, पोलिसांची ताकद लावाल, आमच्यावर गोळी चालवाल... बरोबर की नाही? मग आमचं असं वर्तन बरोबर आहे का? तर नाही. दुसऱ्यांच्या घरासमोर आपण का जात आहात?" ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.
3. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी औरंगाबादमध्ये
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे आज औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असतानाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हेसुद्धा औरंगाबादमध्ये दाखल झाल्याने याविषयी चर्चा सुरू झाली आहे.
योगायोग म्हणजे, औरंगाबादच्या ज्या हॉटेलमध्ये राज ठाकरे मुक्कामी आहेत, नेमक्या त्याच ठिकाणी राज्यपाल कोश्यारी मुक्कामास उतरले आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री भागवत कराड यांच्या मुलाचं काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे लग्न झालं होतं. त्याचा स्वागत समारंभ औरंगाबादमध्ये होणार आहे. तिथं उपस्थित राहण्यासाठी राज्यपाल औरंगाबादेत आल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, राज ठाकरे हेसुद्धा या कार्यक्रमास हजेरी लावतील, अशी शक्यता आहे. ही बातमी लोकमतने दिली.
4. शेतकऱ्यांना बोगस खते, बियाणे दिल्यास दुकानासोबतच कंपनी मालकही तुरुंगात - दादा भुसे
शेतकऱ्यांना बोगस बियाणे, रासायनिक खते दिल्यास त्या दुकानदाराबरोबर कंपनीच्या मालकाविरोधातही फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.
खरीप हंगामासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे बियाणे, रासायनिक खतांची कमतरता भासणार नसल्याचे आश्वासन कृषीमंत्री दादा भुसे यांनी यावेळी दिलं.
याबरोबरच बोगस बियाणे, रासायनिक खते शेतकऱ्यांना दिल्यास त्या दुकानदाराबरोबर कंपनीच्या मालकाविरोधातही फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असं दादा भुसे म्हणाले. ही बातमी एबीपी माझाने दिली.
5. आमदार गोपीचंद पडळकर यांना X दर्जाची सुरक्षा
भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांना X दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून गोपीचंद पडळकर आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत.
विशेषतः शरद पवारांवर त्यांनी केलेल्या आक्रमक टीकेनंतर त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून हल्ले होत असल्याचा आरोप करण्यात येत होता.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांना X दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. ही बातमी ई-सकाळने दिली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)