You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
होय, मला कॅन्सर झाला आहे आणि मला जगायचंय
- Author, रवी प्रकाश
- Role, बीबीसी हिंदीसाठी
जीवन आणि मृत्यू या दोन्हीमध्ये काय अंतर आहे, फक्त एका अनुभवाचेच ना. आयुष्य जगत असताना आपण जे अनुभव येतात त्याचा आपण अन्वयार्थ लावू शकतो, कारण आपला श्वास चालू आहे आणि तो जेव्हा नाही, तोच तर मृत्यू आहे...
मृत्यूची कहाणी अप्रकाशितच राहते. कारण त्यावेळेस श्वास थांबतो. म्हणूनच जगातल्या कुणाकडेच मृत्यूचा अनुभव नाही. मृत्यू येतो आणि आपल्याला निर्जीव बनवून टाकतो.
बाकी माणसं आपल्या मृत्यूबद्दल सांगू शकतात. पण मृत्यूनंतर काय होतं सांगता येत नाही. हा अनुभव कसा आहे?
काहीवेळेस आपल्या आजूबाजूला काही किस्से कानावर येतात. एखादा माणूस मेला अशी बातमी येते. काही तासांनंतर त्याचा श्वास सुरू झाला अशा कहाण्या सांगितल्या जातात. जेव्हा असं काही होतं तेव्हा नखांमध्ये .. भाताचे दाणे आणि कुंकू, उडहुल फूल वाहिलं जातं. अशा कहाण्या बिहारमध्ये अनेकदा ऐकवल्या जातात.
पण कथित असा मृत्यू पाहिलेला माणूसही तो अनुभव विषद करू शकत नाही. मृत्यू घाबरवून टाकणारा असतो. आपल्यापैकी कुणालाही मरायचं नसतं. अगदी आयुष्याच्या शेवटीही नाही. आपल्या देशात माणसाचं सरासरी आयुष्य 70 वर्षांचं आहे.
अशा परिस्थितीत तुमचं वय 50 पेक्षा कमी असेल आणि तुम्ही मृत्यूच्या विळख्यात अडकलात तर काय होणार?
जगातल्या भयंकर अशा व्याधींपैकी एक
मी 46 वर्षांचा आहे. जानेवारी 2021 मध्ये मला कॅन्सर झाल्याचं कळलं त्याच्या काही महिने आधीच मी 45वा वाढदिवस साजरा केला होता.
मला थोडा खोकला आणि ताप होता. डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी काही चाचण्या सांगितल्या. त्यातून हे स्पष्ट झालं की मला फुप्फुसाचा कॅन्सर झाला आहे.
माझ्यावर उपचार करणाऱ्या रांचीतील डॉ. निशीथ कुमार यांनी सांगितलं की हा शेवटच्या स्टेजचा कॅन्सर असू शकतो. कॅन्सरची लागण झालेले ट्यूमर आणि लिंफ नोड्स निष्क्रिय झाले होते.
तोपर्यंत हे सगळं स्कॅनच्या रिपोर्ट्समध्ये चित्रामध्ये होतं. कॅन्सरच झाला आहे की नाही यावर शिक्कामोर्तब होण्यासाठी मला आणखी काही चाचण्यांना सामोरं जावं लागलं. तो दिवस होता 30 जानेवारीचा. महात्मा गांधी यांची पुण्यतिथी.
कॅन्सर जगातल्या सगळ्यात महाभयानक अशा व्याधींपैकी एक आहे. कॅन्सर झाल्याचं कळल्यावर माणसं खचून जातात, त्यांची जीवनेच्छा मरून जाते. आपण आता मरणारच असं लोकांना वाटू लागतं. मृत्यू अगदी केव्हाही येऊ शकतो.
कॅन्सरवर सातत्याने संशोधन होत आहे. अत्याधुनिक उपचार पद्धती निघाल्या आहेत.
अमावस्येच्या रात्रीचा काळोख
सुरुवातीच्या टप्प्यात निदान झालं तर कॅन्सरवर उपचार होतात. अनेकजण यातून सावरतात.
पण कॅन्सर पुन्हा शरीरात पसरण्याची शक्यता असते. कॅन्सरमुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या, कॅन्सरवरच्या उपचारांदरम्यान होणारे साईड इफेक्ट्स याला लोक घाबरतात. याची भीती वाटणं स्वाभाविक आहे.
कॅन्सरचे उपचार खर्चिक असतात. कॅन्सर झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पुढच्या उपचारांसाठी मी मुंबईत पोहोचलो तेव्हा माझ्यासमोर अमावस्येच्या काळोखासारखी परिस्थिती होती.
टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या डॉ. देवयानी यांनी माझ्या काही टेस्ट केल्या. शरीरात अनेक सुया टोचल्या जाऊ लागल्या. मला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं.
बायोप्सी आणि अन्य काही आवश्यक टेस्ट घेतल्यानंतर मला चौथ्या स्टेजचा कॅन्सर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. लंग कारसिनोमा मेटास्टिक हा कॅन्सर मला झाला होता.
ही अशी स्थिती आहे जेव्हा कॅन्सरच्या पेशी एका ठिकाणाहून अन्यत्र फोफावू लागतात. अशा परिस्थितीत उपचार रुग्णाला ठीक करण्यासाठी केले जात नाहीत.
उरलेलं आयुष्य
चौथ्या स्टेजच्या कॅन्सरला लास्ट स्टेज म्हटलं जातं कारण डॉक्टर रुग्णावर पॅलिएटिव्ह केअर ट्रिटमेंट करतात. सोप्या शब्दात सांगायचं तर या स्टेजचा कॅन्सर बरा होत नाही. पण रुग्णाचा त्रास कमी करण्यासाठी डॉक्टर उपचार करतात. जेणेकरून त्याचं उरलेलं आयुष्य वाढू शकतं.
अशा स्थितीत डॉक्टर रुग्णाला आणखी किती वर्ष जगू शकतो याची कल्पना देतात. तसं कळलं तर रुग्ण उरलेल्या आयुष्यात काही ठरवलेल्या गोष्टी मार्गी लावू शकतात.
हा असा काळ असतो जेव्हा कॅन्सरचा रुग्ण मृत्यूच्या छायेत उरलेल्या आयुष्याबद्दल विचार करू शकतो. मला असं वाटतं ही एक संधी आहे कारण पुढे काय होणार आहे याची जाणीव रुग्णाला झालेली असते. तो काही ठरवू शकतो.
गेल्या सव्वा वर्षात मी याच स्थितीतून जातो आहे. मी कॅन्सरमधून पूर्णपणे बरा होऊ शकणार नाही असं डॉक्टरांनी मला सांगितलं आहे. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे माझ्याकडे काही महिने, काही वर्ष आहेत.
या काळात माझा त्रास कमी व्हावा यासाठी काही थेरपी आहेत.
किमोथेरपी आणि टारगेटेड थेरपी
डॉक्टर देवयानी यांच्या उपचारानंतर मला याप्रकारच्या कॅन्सरचे विशेषज्ञ डॉक्टर कुमार प्रभाष आणि त्यांच्या चमूकडे पाठवण्यात आलं. फेब्रुवारी 2021 पासून मी त्यांनी सांगितलेल्या केमोथेरपी आणि टारगेटेड थेरपी घेतो आहे.
21 दिवसांनी मी केमोथेरपीला सामोरा जातो. केमोथेरपीची चार सत्रं, मुंबईतल्या हॉस्पिटलची ओपीडी, तिथे उपचार आणि पुढच्या तीन महिन्यांसाठी औषधं आणि बाकी पथ्यपाणी असा माझा दिनक्रम आहे.
केमोथेरपीचे उपचार घेऊन मी मुंबईहून रांचीला परततो तोच पुन्हा मुंबईला जाण्याचा विचार करू लागतो. मुंबईतलं हॉस्पिटल तीन महिन्यांच्या टप्प्यांनी माझ्या आयुष्याबरोबरच्या कराराचं नूतनीकरण करतं.
मी हा ऋणानुबंध हळूहळू वाढवू इच्छितो आहे. मी आणखी काही वर्ष तिथे जाऊ इच्छितो. उरलेल्या आयुष्यात काही जबाबदाऱ्या मला पार पाडायच्या आहेत.
आधारवड
शेवट आणि आशा यांच्यातल्या हिंदोळ्यावर मी सध्या आहे. मृत्यूच्या भीतीचं दहशतीत रुपांतर करून मी माझं आणि घरच्यांचं आयुष्य खराब करू शकतो.
पण मी देवाचा आभारी आहे. भीती हा शब्दकोशातला एक शब्द आहे असं मानून उरलेलं आयुष्य मनाप्रमाणे आणि स्मरणीय करण्याचा माझा प्रयत्न आहे.
बायको संगीता, मुलगा प्रतीक आणि असंख्य दोस्तांचा ऋणी आहे. या प्रवासातले ते साथी आहे किंवा उरलेल्या आयुष्यासाठी ते माझा आधारवड बनले आहेत.
काही दिवसांपूर्वी आम्ही उपचारांसाठी मुंबईत होतो. 20 किमोथेरपी आणि सव्वा वर्ष टारगेटेड थेरपीच्या नंतर हा माझा पाचवा फॉलोअप होता. सिटी स्कॅन आणि ओपीडी यादरम्यान चार दिवस होते. हा काळ मी गोव्यात चिंतेपासून दूर व्यतीत करायचं ठरवलं.
शरीराने खूप सोसलंय
बायकोला याबद्दल विचारलं आणि सिटी स्कॅननंतर थेट विमानतळ गाठला. काही तासात आम्ही गोव्यात होतो. कारण का माहितेय? कॅन्सरच्या भीतीचं मला दहशतीत रुपांतर होऊ द्यायचं नाहीये.
मृत्यूच्या सत्यापासून दूर पळणाऱ्यांपैकी मी नाही. ज्यावेळी जन्म झाला त्यावेळी कधी मरणार हेही ठरलं. जे आधीच ठरलं आहे त्याची कसली भीती? या भीतीला बाजूला सारून ....
टारगेटेड थेरपीच्या दुष्परिणामांमुळे माझ्या शरीराने खूप काही सोसलं होतं. वेदना होतात. पण या दुखण्याला मी वरचढ होऊ देत नाही.
चार दिवस गोव्यात भरपूर मस्ती केली. एवढंच लक्षात ठेवलं की वेळेवर औषधं घ्यायची आहेत. एवढं सोडलं तर कॅन्सरची आठवणही काढली नाही. आम्ही अनवट जागा हिंडून आलो. चर्चेस पाहिली, मंदिरं पाहिली.
अनेक समुद्रकिनाऱ्यांवर मुशाफिरी केली. मनमुराद डुंबलो. समुद्रकिनाऱ्यावर चांदण्यांच्या प्रकाशात रात्र अनुभवली. डिस्कोत गेलो. भरपूर खाल्लं.
हसता हसता मृत्यू आला तर
दिलखुलास हसलो आणि मुंबईला परतल्यावर ओपीडीत डॉक्टरांना काय सांगायचं ते ठरवलं. गोव्यात अरबी समुद्रात निळ्या लाटांवर स्वार होत पॅरासेलिंग करायला निघालो तेव्हा बायकोने विचारलं, हवेतच श्वास थांबला तर? तिने हे विचारलं कारण मला फुप्फुसांचाच कॅन्सर आहे.
मी तिला म्हणालो, हसत हसत मृत्यू यावा येण्यासारखा दुसरा आनंद नाही. मी इतक्यात मरणार नाही. मला काही होत नाही.
आम्ही हसत हसत पॅरासेलिंग केलं.
आता आम्ही पर्वतराजीत जायची तयारी केली आहे. कारण मृत्यूचा काही अनुभव असा नसतो. आयुष्याचा अनुभव असतो. या अनुभवाची गोष्ट आम्ही जगाला सांगू इच्छितो आहोत. जेणेकरून कोणाची आणि कशाचीच भीती वाटू नये.
कॅन्सरशी अशी साथ करता येऊ शकतो मित्रांनो.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)