राणा दाम्पत्याची 'हनुमान उडी' शिवसेनेसाठी 'संजीवनी बुटी' ठरेल का?

नवनीत राणा

फोटो स्रोत, Hindustan Times

'काहीही झालं तरी मातोश्रीसमोर हनुमान चालिसा म्हणणारच. हिंमत असेल तर अडवून दाखवा' असं म्हणत खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा अमरावतीहून मुंबईत दाखल झाले.

रेल्वेनं येणार सांगितल्यानं मुंबईतले शिवसैनिक त्यांना रोखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर दाखल झाले. मात्र, शिवसैनिकांना गुंगारा देत राणा दाम्पत्य विमानानं मुंबईत दाखल झाले आणि त्यांच्या खारमधील निवासस्थानी पोहोचले.

तिथूनही राणा दाम्पत्यानं सांगितलं की, काहीही झालं तरी 'मातोश्री'समोर जाऊन हनुमान चालिसा म्हणणार. त्यामुळे खारमधील राणा दाम्पत्याच्या निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांनी जोरदार आंदोलन केलं आणि तिकडे 'मातोश्री' या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या खासगी निवासस्थानाबाहेरही शिवसैनिकांनी कडेकोट पहारा दिला.

काल (22 एप्रिल) आणि आज (23 एप्रिल) असे दोन्ही दिवस मुंबईत 'शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्य' असा सामना पाहायला मिळाला. या निमित्तानं मुंबईतील शिवसैनिक आपल्या मूळ रूपात म्हणजेच आक्रमक शिवसैनिकाच्या रूपात पाहायला मिळाला.

संतप्त शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरोधात घोषणाबाजी केली, त्यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन केलं, बॅरिकेड्स तोडून राणा दाम्पत्याच्या घरापर्यंत पोहोचण्याचाही प्रयत्न केला, तसंच मातोश्रीबाहेर दिवस-रात्र पहारा दिला.

हे एकीकडे सुरू असतानाच, 22 एप्रिलच्या रात्री मातोश्री बंगल्याबाहेर भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला झाला. त्यामुळे या वादात आधीपासून केवळ प्रतिक्रियांपुरता सहभागी झालेल्या भाजपने पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर शाब्दिक हल्ला चढवला आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला.

रवी राणा

मुंबईत शिवसैनिक आक्रमक झाल्यानं मुंबई पोलिसांसमोर आव्हान उभं राहिलं, राणा दाम्पत्याच्या खारमधील निवासस्थानाबाहेर संतप्त शिवसैनिकांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिला, असं असतानाही एक गोष्ट प्रकर्षानं चर्चेत आली, ती म्हणजे, शिवसेनेचं मूळ रूप दिसलं.

महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यात सत्ताधारी बनलेल्या आणि मुख्यमंत्रिपदी स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असलेली शिवसेना काही अंशी मवाळ बनल्याची चर्चा होत असतानाच, राणा दाम्पत्याच्या हनुमान चालिसाबाबतच्या आव्हानानंतर मुंबईतले शिवसैनिक आपल्या मूळ आक्रमक रूपात पाहायला मिळाले.

त्यामुळे मशिदीवरील भोंगे नि हनुमान चालिसा यावरून राणा दाम्पत्यानं मारलेली ही 'हनुमान उडी' शिवसेनेसाठी 'संजीवनी बुटी' ठरेल का, असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. या प्रश्नाचं आम्ही महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकारांशी चर्चा करून उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला.

'शिवसेनेची हीच स्टाईल ऑफ फंक्शनिंग'

ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर शिवसेनेनं राणा दाम्पत्याविरोधात मुंबईत केलेल्या आंदोलनाला 'शिवसेनेची स्टाईल ऑफ फंक्शनिंग' म्हणतात.

मृणालिनी नानिवडेकर पुढे म्हणतात की, "कुठल्याही छोट्या मुद्द्यावर अकारण वातावरण पेटवण्याची सवय शिवसेनेला आहे. किंबहुना, त्यांची ती 'स्टाईल ऑफ फंक्शनिंग' आहे."

"आम्ही पण तुमच्यासोबत हनुमान चालिसा म्हणतो, असं शिवसेनेला करता आलं असतं. पण राणा दाम्पत्याला माघार घ्यायला लावून फटाके फोडणं, हा जो काही विचित्र प्रकार घडला. पण शिवसेनेची संस्कृतीच अशी आहे. आलं अंगावर की घेतलं शिंगावर असं आहे," असं नानिवडेकर म्हणतात.

राणा

यावेळी मृणालिनी नानिवडकेर म्हणाल्या की, भाजपला बाजूला करून काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती केल्यानं शिवसैनिक नाराज तर होत नाहीत ना, याची चाचपणी शिवसेना अधून-मधून करताना दिसते. राणा दाम्पत्याच्या निमित्तानं शिवसेनेनं तेच केलं. नव्या युतीमुळे शिवसेनेनंच 'सेनापण' संपलंय का, हे सुद्धा त्यांना पाहायचं होतं. या सेनापणाला जागवण्याचा पहिला प्रयत्न कंगना राणावतच्या वादावेळी झाला.

शिवसेनेचे कार्यकर्ते हे अशा आंदोलनांमुळे सक्रीय होतात, असंही त्या म्हणतात.

'अशा आंदोलनांमुळे शिवसैनिक चार्ज होतात...'

हाच मुद्दा ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान मांडतात. प्रधान म्हणतात की, शिवसेनेतील राडा करण्याचं एलिमेंट आम्ही संपवलेलं नाही, हे दाखवण्याचा प्रयत्न शिवसेनेनं केलाय.

"गेल्या काही दिवसात आक्रमक शिवसैनिक बाजूला पडला होता. शिवसेनेतील नेमस्त शिवसैनिकाला समोर आणलं गेलं होतं. त्यातून बाहेर शिवसेना पडू पाहतेय. यासाठी युवासेनेनं पुढाकार घेतल्याचं दिसतं. महापालिका निवडणुका किंवा इतर निवडणुका येतील तेव्हा रस्त्यावर पण उत्तर द्यायला पाहिजे, तसे आम्ही देऊ, हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय," असं संदीप प्रधान म्हणतात.

या मुद्द्याशी ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाईही सहमत होतात. ते म्हणतात, अशा आंदोलनांमुळे शिवसैनिक 'चार्ज' होतात.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Facebook

"सत्तेत आल्यानंतर शिवसेनेला मरगळ आल्याचं बोललं जात होतं, उद्धव ठाकरे मवाळ झाल्याचं चित्र निर्माण झालं होतं, अशावेळी अशा घटना घडल्यानंतर शिवसेनेला फायदा होतो," असं हेमंत देसाई म्हणतात.

'शिवसैनिक आक्रमक, पण...'

मात्र, यावेळी संदीप प्रधान असंही म्हणतात की, एकीकडे शिवसैनिकांना आक्रमक करताना, त्यांना वेसण घालण्यात नेतृत्वाला यश आलं नाही, तर संधी भाजपला मिळेल.

याचं कारण सांगताना प्रधान म्हणतात की, "ही राडेबाजी मर्यादेपलिकडे गेली आणि हिंसाचार झाला, तर भाजपला जे हवंय, म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती नाहीय, ते सिद्ध होईल. भाजपच्या या सापळ्यात शिवसेना अलगद अडकण्याची भीती सुद्धा आहे."

मात्र, शिवसैनिकांना 'चार्ज' करण्यासाठी असे प्रसंग यापुढेही घडत राहातील, अशी शक्यताही संदीप प्रधान म्हणतात. ते म्हणतात की, "भाजप किंवा भाजपच्या जवळचे राणांसारखे लोक आहेत, ते अशी संधी शिवसेनेला देतच राहणार आहेत. कारण कायदा-सुव्यवस्था नसल्याचं सिद्ध करण्यासाठी भाजपकडून असे प्रयत्न होताना दिसतील."

"सत्ता असल्यानं मानसिक बळ मिळतंय, मात्र त्याचवेळी जबाबदारीही आहे," असंही प्रधान म्हणतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)