हनुमान जयंती: हिंदी हनुमान चालिसा आणि मराठी मारुती स्तोत्र यांच्यात नेमका फरक काय आहे?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, नामदेव काटकर
- Role, बीबीसी मराठी
(आज -6 एप्रिल-हनुमान जयंती आहे. हनुमान चालिसा आणि भीमरुपी महारुद्र यांचे आज पठण केले जाते. या दोन्हीमध्ये काय फरक आणि काय साम्य आहे, याची माहिती देणारा हा लेख पुन्हा प्रसिद्ध करत आहोत. )
मशिदींवरील भोंगे आणि त्या भोंग्यांना उत्तर म्हणून हनुमान चालिसा... या मुद्द्यावरून महाराष्ट्राचं राजकारण अक्षरश: तापलं आहे. कुणी हनुमान चालिसा म्हणण्याचं आव्हान देतंय, तर कुणी थेट मुख्यमंत्र्यांच्या घरात जाऊन हनुमान चालिसा पठणाचं आव्हान देतंय.
काल, 1 मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी औरंगाबादमध्ये सभा घेतली आणि पुन्हा एकदा मशिदींवरील भोंग्यांना उत्तर म्हणून हनुमान चालिसा लावण्याचे आवाहन केले.
राज ठाकरे म्हणाले, "याआधी मीच केवळ भोंग्यांबद्दल बोललो नव्हतो. पण मी पर्याय दिला. जर 4 तारखेनंतर मशिदीवरील भोंगे उतरले नाहीत तर माझी सर्व हिंदू बांधवांना विनंती आहे की मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावावी."
जर सरळ सांगून समजत नसेल तर कठोर पावलं उचलावीच लागतील, असंही राज ठाकरे म्हणाले.
या सगळ्यात दोन गोष्टींची चर्चा होतेय, ती म्हणजे हनुमान चालिसा आणि मारुती स्तोत्र.
अनेकांची अजूनही हनुमान चालिसा आणि मारुती स्तोत्र यांमध्ये गल्लत होताना दिसते. हनुमान चालिसा म्हणा म्हटल्यावर अनेकजण मारुती स्तोत्र म्हणतात आणि मारुती स्तोत्र म्हटल्यावर हनुमान चालिसा.
आपण या बातमीतून या दोन्ही रचना काय आहेत आणि या दोन्ही रचनांमधील फरकही जाणून घेऊ.

फोटो स्रोत, Getty Images
हनुमान चालिसा आणि मारुती स्तोत्रातील सर्वांत महत्वाचा फरक म्हणजे भाषा.
हनुमान चालिसा अवधी भाषेत लिहिली गेलीय, तर मारुती स्तोत्र मराठीत. काही दशकांच्या अवधींच्या फरकात वावरलेल्या दोन संतांनी या दोन्ही रचना लिहिल्यात.
संत तुलसीदासांनी हनुमान चालिसा, तर संत रामदास स्वामींनी मारुती स्तोत्र लिहिलंय.
यापलिकडे या दोन्ही रचनांमध्ये काय फरक किंवा साम्य आहे, हे आपण जाणकारांकडून जाणून घेऊ. याबाबत आम्ही इतिहासविषयक व्याख्याते सच्चिदानंद शेवडे आणि लेखिका शैलजा शेवडे यांच्याशी बातचित केली.
मारुती स्तोत्र
मारुती स्तोत्र हे 17 व्या शतकात लिहिलं गेलंय. महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत समर्थ रामदास स्वामींनी मारुती स्तोत्राचं लेखन केलंय.
मारुती म्हणजे हनुमान. त्यामुळे मारुती किंवा हनुमानाच्या गुणांची स्तुतीपर रचनाच मारुती स्तोत्रात दिसून येते.
'भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती...' या पंक्तीनं मारुती स्तोत्राची सुरुवात होते.
खरंतर मारुती किंवा हनुमानाच्या स्तोत्रांचीही अनेक रूपं आहेत. मात्र, त्यातील रामदास स्वामींनी लिहिलेलं स्तोत्र विशेष करून प्रसिद्ध आहे.
याबद्दल इतिहासविषयक व्याख्याते सच्चिदानंद शेवडेंनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, "समर्थ रामदास स्वामींनी महाराष्ट्रात 11 ठिकाणी मारुती मंदिरं स्थापन केली. त्या काळात मोठ्या भूभागावर मुघलांची सत्ता होती आणि अशावेळी लोकांना शक्तीची उपासना शिकवण्याची गरज निर्माण झाली होती. याकरता समर्थ रामदास स्वामींनी हनुमानाचं स्तोत्र लिहिलं. असा सरळ सरळ उद्देश मारुती स्तोत्रामागे दिसून येतो."

फोटो स्रोत, Getty Images
आपण मारुती स्तोत्राच्या सुरुवातीच्या ओळी पाहू. आपल्या सहज लक्षात येतं की, यात शक्तीचा संदेश देण्याचा प्रयत्न संत रामदास स्वामींचा आहे.
भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती |
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ||१||
महाबळी प्राणदाता, सकळां उठवी बळें |
सौख्यकारी दुःखहारी, दुत वैष्णव गायका ||२||
महाराष्ट्रात प्रामुख्यानं मारुती स्तोत्राचं पठण होत असल्याचं दिसून येतं. आपण जसजसे उत्तरेकडे जातो, तसतसं हनुमान चालिसा पठण होताना दिसते.
'हनुमानाची प्रतिमा डोळ्यांसमोर उभी राहिल असं वर्णन'
महाराष्ट्रात मारुती स्तोत्र घराघरात लहान मुलांना शिकवलं जातं. त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल कीर्तनकार ज्योत्स्ना गाडगीळ यांच्याशी बीबीसी मराठीने संवाद साधला. त्या म्हणाल्या, "सुखकर्ता दुःखहर्ता या गणपतीच्या आरतीप्रमाणे, सत्राणे उड्डाणे या हनुंमत आरतीप्रमाणे समर्थ रामदास स्वामींनी मारुती स्तोत्रामध्ये सोप्या शब्दांची योजना केली आहे. मारुती स्तोत्र सर्वांना कळेल अशा मराठीमध्ये त्यांनी लिहिलं.
"मारुती किती विशाल आहे, भारदस्त आहेत, शूर, रक्षणकर्ते आहे याची प्रचिती ते स्तोत्रातून देतात. तो असताना आपल्याला भीती नाही अशी जाणीव ते करुन देतात. शक्तीशाली असला तरी रामाचं दास्यत्व त्यानी पत्करलंय, तो विनम्र असल्याचंही ते सांगतात. मारुती स्तोत्र आणि मारुतीच्या आरतीमधून सर्व चित्र डोळ्यासमोर उभं राहातं अशी शब्दयोजना रामदासांनी केली आहे. त्या शब्दांचं सौष्ठव स्तोत्र म्हणतानाच जाणवतं."
हे स्तोत्र गेय आणि मराठीत असल्यामुळे म्हणायला, पाठ व्हायला अत्यंत सोपं आहे, असंही ज्योत्स्ना गाडगीळ सांगतात.
हनुमान चालिसा
हनुमान चालिसा संत तुलसीदासांनी लिहिलीय. हिंदीची बोलीभाषा असलेल्या अवधी भाषेत हनुमान चालिसाचं मूळ लेखन करण्यात आलंय.
तुलसीदास जन्मस्थान हे आताच्या उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यात आहे. तुलसीदासांनी भारतभर भ्रमंती केल्याचे सांगितले जाते.
श्रीरामरचितमानस ही त्यांच्या नावावरील प्रसिद्ध रचना आहे. त्यामुळे ओघानेच हनुमानावरही त्यांनी लिहिलं.
सच्चिदानंद शेवडे सांगतात की, "संत तुलसीदासांनी रामचरितमानस लिहिलं. ती पूर्णपणे रामकथा लिहिलीय. रामकथा म्हटल्यावर ओघानं हनुमान येणारच होता. पण तुलसीदासांनी लिहिलेली हनुमान चालिसा ही केवळ भक्तिभावाकडे जाणारी आहे."

फोटो स्रोत, Getty Images
भारताचा आताचा नकाशा डोळ्यांसमोर ठेवल्यास, हिंदी पट्ट्यात म्हणजे उत्तरेकडे हनुमान चालिसा अधिक बोलली जात असल्याचं लक्षात येतं.
लेखिका शैलजा शेवडे सांगतात की, "तुलसीदासलिखित हनुमान चालिसा आता भारतातील इतर भाषेतही भाषांतरीत झालीय. त्यामुळे सर्वत्रच बोलली जाते. महाराष्ट्रात मात्र हनुमान चालिसाऐवजी मारुती स्तोत्रालाच प्राधान्य दिलं जातं."
तसंच, शैलजा शेवडे हनुमान चालिसाबाबत अधिक सांगतात की, "कुठलीही भीती वाटल्यास हनुमान चालिसा म्हणण्याचा प्रघात आपल्या भारतीय समाजात दिसून येतो. हनुमान चालिसा म्हटल्यास मनातली भीती निघून जाते, असं मानलं जातं."
हनुमान चालिसाची सुरुवात दोह्यांनी होते आणि नंतर चौपाई आहेत. हे एकूण 40 चौपाई किंवा श्लोक आहेत. म्हणूनच हनुमान चालिसा म्हणटलं जातं, असंही अनेकांचं म्हणणं आहे.
जय हनुमान ज्ञान गुन सागर
जय कपीस तिहुँ लोक उजागर॥१॥
अशी हनुमान चालिसाची सुरुवात आहे. या सुरुवातीआधी दोन दोहे आहेत.
एकूणच मारुती स्तोत्र 17 व्या शतकात, तर हनुमान चालिसा 16 व्या शतकात लिहिली गेलीय.
आणि सच्चिदानंद शेवडे जसं म्हणतात, त्याप्रमाणे दोन्ही रचनांमधील मुलभूत फरक हाच की, संत तुलसीदासांच्या हनुमान चालिसामध्ये भक्तीभाव हा उद्देश, तर समर्थ रामदास स्वामींच्या मारुती स्तोत्रमध्ये शक्तीची उपासना हा उद्देश दिसून येतो.
वाराणसीच्या संकटमोचन मंदिराच्या महंतांना काय वाटतं?
आयआयटी बीएचयूचे प्राध्यापक आणि संकटमोचन मंदिराचे महंत पं. विश्वंभरनाथ मिश्र यांच्याशी बीबीसी मराठीनं बातचित केली.
पं. विश्वंभरनाथ मिश्र म्हणतात, "तुलसीदासांना वाटलं की, जर भगवान रामाला भेटायचंय, तर हनुमानाला खुश करावं लागेल. त्यासाठी त्यांनी हनुमान चालिसामध्ये तसं वर्णन केलं आणि त्यातून ते रामाला भेटू पाहत आहेत. रामाचं सानिध्य मिळवण्यासाठी तुलसीदासांनी हनुमान चालिसाला माध्यम केलं."
हनुमान चालिसा वाचून मशिदींवरील भोंगे उतरवणं हा काही तुलसीदासांचा उद्देश नव्हता, असा टोला पं. विश्वंभरनाथ मिश्र राजकीय नेत्यांना लगावतात.

फोटो स्रोत, Getty Images
ते पुढे म्हणतात की, "तुमच्या आयुष्यात जीवन-मरणाचा प्रश्न उभा राहतो, त्यावेळी त्यातून मार्ग काढण्यासाठी हनुमान चालिसा वाचली जाते. तुलसीदासांचाही तोच उद्देश होता."
"आता जे हनुमान चालिसावरून राजकारण सुरू आहे, ते अत्यंत दुर्दैवी आहे. तुम्हाला जर हनुमान चालिसा म्हणायचीच असेल, तर देशभरात ज्या समस्या आहेत, त्यातून मार्ग काढण्यासाठी हनुमान चालिसा म्हटली पाहिजे," असंही विश्वंभरनाथ मिश्र म्हणतात.
प्राचीन भारतीय संस्कृतीच्या अभ्यासक काय सांगतात?
'प्राचीन भारतीय संस्कृती' या विषयात पीएचडी केलेल्या डॉ. प्राची मोघे यांच्याशी बीबीसी मराठीनं बातचित केली.
डॉ. प्राची मोघे म्हणतात की, "जेव्हा तुलसीदासांना अकबरानं अटक केली होती. तुलसीदास हे भक्तीमार्गातले होते. संपूर्ण देवासमोर शरण जायचं अशातले ते होते. त्यामुळे अटकेत असताना त्यांनी दोन दोहे आणि 40 श्लोक लिहिले. याच रचनेला हनुमान चालिसा म्हणतात."
"तुम्ही अत्यंत समर्पण वृत्तीनं हनुमान चालिसा म्हटलीत, तर तुमच्यावरील संकट दूर होतं, असं यावर विश्वास असणारे मानतात," असं डॉ. प्राची मोघे सांगतात.
तर मारुती स्तोत्राबद्दल सांगताना डॉ. प्राची मोघे सांगतात की, "मारुती स्तोत्र हे समर्थ रामदासांनी लिहिलंय. त्यांनी मारुतीची 'बलोपासना' केली. त्याचबरोबर त्यांनी भक्तीला कमी लेखलं नाही. कारण रामदासांचं सर्व लेखन हे भक्ती, शक्ती आणि युक्ती या तिन्हींनी युक्त आहे. मात्र, मारुती स्तोत्र हे बलोपासनेसाठी लिहिलंय."
"मारुती स्तोत्रात मारुतीची ताकद सांगितलीच आहे, मात्र स्तोत्रात शेवटी हेही सांगितलंय की, तुम्हाला भूत-प्रेत बाधा होणार नाही, चिंता दूर होतील. त्यामुळे शक्तीपेक्षा भक्तीही दिसून येते," असंही डॉ. मोघे सांगतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








