ST चे 43 हजार कर्मचारी कामावर रूजू, संप मागे? #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, HINDUSTAN TIMES
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा थोडक्यात पाहूया,
1. एसटीचे 43 हजार कर्मचारी कामावर रूजू, संप मागे?
जवळपास साडे पाच महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप पूर्णपणे संपण्याची चिन्ह दिसत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक झाल्यानंतर एसटी कर्मचारी कमावर रूजू होण्यास सुरुवात झाल्याचं दिसतंय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी मुंबईत हल्ला झाल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वीच एसटी संपकऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर रूजू होण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत 43 हजार कर्मचारी कामावर परतले आहेत.
राज्यभरात 3 नोव्हेंबर 2021 पासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. दरम्यानच्या काळात शेकडो कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला होता परंतु मोठ्या संख्यने कर्मचारी संपावर ठाम होते.
एसटी महामंडळाचे विलीनीकरण ही या संपाची प्रमुख मागणी होती. आता एसटीच्या 16 हजार 697 दैनंदिन फेऱ्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे एसटी वाहतूक पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे.
सकाळने हे वृत्त दिलं आहे.
2. पराभवानंतर हिमालयात जाण्याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले....
"कोल्हापूरमध्ये निवडणूक हरल्यास मी हिमालयात जाईन," असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. आता उत्तर कोल्हापूरच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याने चंद्रकांत पाटील यांचं हे वक्तव्य चर्चेत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
चंद्रकांत पाटील हिमालयात जाणार का? असा प्रश्न राजकीय नेते उपस्थित करत आहेत. चंद्रकांत पाटील यांनी याबाबत पत्रकार परिषदेत उत्तर दिलं आहे.
ते म्हणाले, "आमचे नाना कदम लढले तर तुमच्या तोंडाला फेस आला. मी लढलो तर काय होईल? मी असं म्हटलं होतं की, मी लढलो आणि जिंकलो नाही तर हिमालयात जाईन. मी लढलोच नाही. नाना लढले."
"कोल्हापूरमध्ये तीन पक्ष विरुद्ध भाजपा एकट्याने निवडणूक लढली. विकासाचे मुद्दे मांडले आणि हिंदुत्वाबाबत लपवाछपवी केली नाही. पराभव का झाले याचे चिंतन करण्यात येईल. भाजपमध्ये 15 महिला आमदार आहेत. जयश्री जाधव भाजपच्या होत्या पण त्यांनी महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवली. काँग्रेस सत्तेत असल्याने त्यांनी असं केलं. आम्ही सत्तेत असतो तर आमच्याबाजूने लढल्या असत्या."
लोकमतने हे वृत्त दिलं आहे.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांचा मतदारसंघ कोथरुडमध्ये 'दादा, हिमालयात कधी जाताय?' असे बॅनर शिवसेनेने लावले आहेत.
3. गणेश नाईक यांच्यासोबत 27 वर्ष लिव्ह-इनमध्ये राहिल्याचा महिलेचा दावा, गुन्हा दाखल
भाजपचे आमदार आणि नवी मुंबईतील नेते गणेश नाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सीबीडी पोलीस स्टेशनला दीपा चौहान या महिलेच्या तक्रारीनंतर ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
27 वर्षांपासून आपण गणेश नाईक यांच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचा दावा या महिलेने केला आहे, तसंच या संबंधांमधून झालेल्या मुलाचा स्वीकार करण्यास गणेश नाईक तयार नसल्याचंही महिलेने म्हटलं आहे.
झी 24 तासने हे वृत्त दिलं आहे.
यापूर्वी तक्रारदार महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. आता गणेश नाईक यांच्याविरोधात पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही यासंदर्भात पोलिसांना अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे.
4. 19 एप्रिलपर्यंत राज्य भारनियमनमुक्त होणार?
राज्यभरात अनेक ठिकाणी भारनियमन सुरू असताना "राज्य लवकरच भारनियमनमुक्त होईल," असं आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
गुजरातमधून महाराष्ट्राने 760 मेगावॅाट वीज खरेदी केली आहे. तसंच कोळसा पूर्ण वापरण्याचे निर्देश दिले आहे. तरीही भारनियमन करावं लागत आहे, असंही ते म्हणाले.
महाराष्ट्र टाईम्सने हे वृत्त दिलं आहे.
राज्य सरकार 19 एप्रिलपर्यंत मार्ग काढेल आणि मंगळवारपर्यंत राज्य भारनियमनमुक्त होईल, असा विश्वास नितीन राऊत यांनी व्यक्त केला आहे. राज्याकडे 2025 पर्यंत अतिरिक्त वीज असल्याची माहिती राज्य वीज नियामक अहवालात नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
कोरोना आरोग्य संकटानंतर राज्यातील उद्योग पूर्ववत सुरू झाले आहेत, उष्णतेची लाट आहे त्यामुळे राज्यातील विजेची मागणी 2700 मेगावॉट झाली आहे. राज्याची कमाल मागणी आणि वीज उत्पादन यात अडीच ते तीन हजार मेगावॉटची तफावत आहे असंही त्यांनी सांगितलं.
5. दिल्लीत कोरोना रुग्णसंख्येत वाढ
राजाधानी दिल्लीत कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. दिल्लीत गेल्या 24 तासांत 461 नवीन रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आरोग्य विभागाला सतर्क राहण्याची सूचना केली आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णसंख्या वाढल्याची 20 फेब्रुवारीनंतरची ही सर्वाधिक संख्या आहे. 20 फेब्रुवारी रोजी 570 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. तसंच दिल्लीत कोरोना संसर्गाचा दर 5.33 टक्क्यांवर पोहचला आहे.
एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.
दिल्लीत सध्या 1262 सक्रिय रुग्ण आहेत. 5 मार्चनंतरची ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत देशभरात 975 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तसंच मुंबईत शनिवारी (16 एप्रिल) 43 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईतील कोरोना आकड्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार पहायला मिळत आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








