राज ठाकरेंना आदित्य ठाकरेंचा टोला - 'भोंग्यांमधून वाढलेल्या महागाईबाबतही सांगावं', #5मोठ्याबातम्या

विविध वेबसाईट्स आणि वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा

1. 'भोंग्यांमधून वाढलेल्या किमतींवर ही सांगावं' - आदित्य ठाकरे

मागील काही दिवसांपासून राज्यात मशिदींवर वाजणारे भोंगे आणि हनुमान चालीसा यावरून राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहे. मशिदींवरील भोंगे बंद न झाल्यास त्यासमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा लावा, असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यामध्ये केलं होतं.

त्यानंतर ठाण्यात झालेल्या 'उत्तर सभे'मध्ये देखील राज ठाकरेंनी या भूमिकेचा पुनरुच्चार करत राज्य सरकारला सर्व मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी 3 मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. यादरम्यान, शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे खोचक टोला लगावला आहे.

गोरेगाव मुलुंड जोडरस्ता प्रकल्प उड्डाण पुलाचे भूमिपूजन झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला.

मशिदींवरील वाजणाऱ्या भोंग्यांवर ते म्हणाले, "भोंग्यांवरून वाढलेल्या किमतींवरही काही सांगता आलं तर सांगावं. पेट्रोल, डिझेल, सीएनजी यांची दरवाढ नक्की कशामुळे झाली. मागील साठ वर्षात न जाता मागील दोन तीन वर्षात काय झालं हे सांगावं."

लोकमत या वृत्तपत्राने ही बातमी दिलीय.

2. राज ठाकरेंच्या उपस्थितीत पुण्यात हनुमान चालीसा पठण

मशिदीवरील भोंगे न काढल्यास त्याच्यासमोर हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल होतं. यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेतच.

दरम्यान हनुमान जयंतीनिमित्त पुण्यातील शनिवारी कुमठेकर रोडवरील खालकर मारुती मंदिर येथे सामूहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाला राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर येत असून 16 तारखेला हनुमान जंयतीच्या निमित्ताने शनिवारी कुमठेकर रोडवरील खालकर मारुती मंदिर येथे सायंकाळी सहा वाजता हनुमान चालीसा पठण कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमास राज ठाकरे येणार असून राज्य सरचिटणीस अजय शिंदे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. मशिदींवरील भोंग्यांवरून आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पुण्यात अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळण्याची शक्यता आहे.

TV9 या वृत्तवाहिनीने ही बातमी दिलीय.

3. भारत 15 वर्षात पुन्हा अखंड राष्ट्र बनणार - मोहन भागवत

15 वर्षांनी भारत पुन्हा अखंड भारत बनेल आणि हे सर्व आपण आपल्या डोळ्यांनी पाहू. तसेच सनातन धर्म हेच हिंदू राष्ट्र असल्याचं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. हरिद्वारमध्ये प्रवासादरम्यान ते बोलत होते.

यावेळी मोहन भागवत म्हणाले की, "विवेकानंद आणि महर्षी अरविंद यांनी ज्या भारताचं स्वप्न पाहिलं होत, ते आता पूर्ण होण्याच्या जवळ आहे. या कामाला आता 20-25 वर्षे लागतील, असे लोक म्हणत असले तरी माझ्या अनुभवानुसार येत्या 8-10 वर्षांतच हे स्वप्न साकार होईल.

"हे स्वप्न पूर्ण होताना आपली ही पिढी आणि आपण आपल्या डोळ्यांनी पाहू. हे आमचं स्वप्न असून असा आमचा विश्वासही आहे."

ABP माझा या वृत्तवाहिनीने ही बातमी दिलीय.

4. पंजाबचे माजी मुख्यमंत्री चन्नी यांची ईडी चौकशी

पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांची अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) सहा तास चौकशी करण्यात आली. वाळू उत्खननाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ही चौकशी झाल्याचे समजते.

ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) 59 वर्षीय कॉंग्रेस नेते चन्नी यांची चौकशी केली.

बुधवारी रात्री उशिरा ईडी विभागीय कार्यालयातून ते बाहेर पडले. ईडीतर्फे वाळू उत्खननप्रकणी आपल्याला चौकशीसाठी बोलावल्याची माहिती चन्नी यांनी ट्विटमध्ये दिली होती. त्यांनी नमूद केले, की आपल्याला जेवढी माहिती होती तेवढी सर्व आपण ईडीला दिली आहे.

लोकसत्ता या वृत्तपत्राने ही बातमी दिलीय.

5. यंदा सरासरी पवासाचा हवामान विभागाचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने मोसमी पावसाचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार देशात यंदा जून ते सप्टेंबर या हंगामाच्या कालावधीत नैऋत्य मोसमी पाऊस सरासरी 96% ते 104% दरम्यान पडणार असून मोसमी पावसाची स्थिती सामान्य राहणार असून, सरासरीच्या तुलनेत 99 टक्के पाऊस पडणार आहे.

मोसमी पावसाला पूरक ठरणारा हिंद महासागरातील 'ला निना' हा घटक संपूर्ण मोसमात सक्रिय राहणार आहे. द्विपकल्पीय भारताच्या उत्तरेकडील भाग आणि मध्य भारतात अनेक ठिकाणी, हिमालयाच्या पायथ्याशी आणि वायव्य भारताच्या काही भागांत सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त मोसमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ईशान्य, उत्तर भारत आणि दक्षिण द्विपकल्पाच्या दक्षिण भागामध्ये काही ठिकाणी सामान्य ते सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. इंडियन एक्स्प्रेस या वृत्तसमूहाने ही बातमी दिलीय.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)