आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित अधिकारी निलंबित; NCB ची कारवाई #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Instagram
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित अधिकारी निलंबित; NCB ची कारवाई
नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने हलगर्जीपणाचं कारण देत दोन अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे.
यापैकी एक अधिकारी अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन याच्याशी संबंधित ड्रग्ज प्रकरणातल्या कारवाईमध्ये सहभागी होते. एनडीटीव्हीनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
मुंबईतल्या कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीने छापा टाकत 3 ऑक्टोबर रोजी आर्यन खानला अटक केली होती. तो आणि त्याच्यासह इतर 19 जणांना एनडीपीएस कायद्यांतर्गत अमली पदार्थ बाळगणं, त्यांचं सेवन करणं, त्यांची खरेदी विक्री करणं यासाठी कारवाई करण्यात आली होती.
या प्रकरणात आर्यनसह इतर 17 जणांची जामिनावर सुटका झाली आहे. मात्र दोघेजण अद्याप न्यायालयीन कोठडीत आहेत.
अधीक्षक व्ही.व्ही. सिंग आणि गुप्तचर अधिकारी आशिष रंजन प्रसाद यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांना निलंबित करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं, असंही बातमीत म्हटलं आहे.
2. केंद्र कोळसा देत नसेल, तर ठाकरे सरकारने परदेशातून खरेदी करावा - रावसाहेब दानवे
राज्यावर भारनियमनाचे संकट ओढावले असून यासाठी कोळसा टंचाई कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोप होऊ लागले असून केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

फोटो स्रोत, FACEBOOK
"राज्यांना कोळसा पुरविण्याची जबाबदारी केंद्र सरकारची असून, ती केंद्र सरकारने पार पाडली आहे. ज्यावेळेस केंद्राकडे कोळशाची उपलब्धता होती, तेव्हा राज्य सरकारने कोळशाची मागणी करून त्याची साठवणूक केली नाही.
"आता कोळसा संपत आल्यानंतर राज्य सरकार केंद्राच्या नावाने ओरडत असेल तर त्यांनी बाहेर देशातून कोळसा आणावा," असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.
लोकमतनं ही बातमी दिली आहे.
3. मुस्लिम महिलांना दिली बलात्काराची धमकी, बजरंग मुनिदास यांना अटक
उत्तर प्रदेशमध्ये धार्मिक मिरवणुकीत मुस्लिम महिलांना बलात्काराची धमकी देणाऱ्या महंत बजरंग मुनिदास यांना बुधवारी न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Ani
याआधी उत्तर प्रदेशच्या सीतापूर पोलिसांनी बजरंग मुनिदास यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केलं होतं.
उघडपणे द्वेषपूर्ण भाषण देणाऱ्या महंतांच्या विरोधात मुस्लिम महिलांनी धरणे आंदोलन केलं होतं. घटनेच्या सहा दिवसांनंतर पोलिसांनी बजरंग मुनिदास यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला होता.
4. मशिदीवरचे भोंगे काढण्यास आमचा विरोध - रामदास आठवले
मंदिरावर भोंगे लावा त्याबाबत विरोध नाही पण मशिदीवर भोंगे काढण्यास आमचा विरोध, असं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.
टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे.

"राज ठाकरेंनी भोंगे काढण्याचा अल्टिमेटम दिला आहे. पण त्यांनी अशी कृती करू नये. देशात लोकशाही आहे. बाळासाहेब ठाकरेंनीही भोंगे काढा अशी भूमिका घेतली नाही. भोंगे काढण्याला रिपब्लिकन पक्षाचा विरोध आहे," असंही आठवले म्हणाले.
5. हार्दिक पटेल यांची नाराजी उघड, पक्ष दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
पाटीदार समाजाचे नेते आणि गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल आपल्याच पक्षावर नाराज असल्याचं दिसून येत आहे.
काँग्रेस पक्ष आपल्याकडे दुर्लक्ष करत आहे, असं त्यांनी इंडियन एक्स्प्रेस या वर्तमानपत्राशी बोलताना म्हटलं आहे.

फोटो स्रोत, AFP
पटेल म्हणाले, "पक्षामध्ये माझे स्थान एका नवविवाहित वराचे आहे, ज्याला नसबंदी करायला लावली आहे."
ते पुढे म्हणाले, "मला पीसीसीच्या कोणत्याही बैठकीला आमंत्रित केले जात नाही, ते कोणताही निर्णय घेण्यापूर्वी माझा सल्ला घेत नाहीत, मग या पदाचा अर्थ काय?"
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








