'या' गावातून 60 फूट लांबीचा लोखंडी पूल गेला चोरीला, नेमकं काय झालं?

    • Author, सीटू तिवारी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

हल्ली काय घडेल आणि काय नाही हे काही सांगता येणार नाही. बिहारमध्ये तर चोरांनी हद्दच केली. त्यांनी 60 फूट लांबीचा शेकडो टनाचा पूल चोरला आहे. ऐकून धक्का बसला ना, काही दिवसांपूर्वीच ब्रिटिशकालीन सन क्लॉकचा धातूचा पत्रा चोरट्यांनी लंपास केला होता आणि आता तर चक्क पूलच गायब केला.

बिहारच्या रोहतास जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी महिन्यात चोरट्यांनी 1871 मध्ये बसवलेल्या सन क्लॉकवरील (सावलीवरचे घड्याळ) धातूचा पत्रा चोरला होता. ही घटना ताजी असतानाच आता जलसंपदा विभागाचे कर्मचारी म्हणून आलेले चोरटे अवाढव्य असा लोखंडी पूल घेऊन पसार झालेत.

पूल चोरीला गेल्यानंतर या घटनेबाबत जाणून घेण्यासाठी बीबीसीने रोहतासचे पोलीस अधीक्षक आशिष भारती यांच्याशी संपर्क साधला.

त्यांनी सांगितलं, "या घटनेची सविस्तर चौकशी सुरू आहे. घटनेच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली असून लवकरात लवकर चोरांना अटक करण्यात येईल. तसंच चोरीला गेलेलं सामान परत मिळवलं जाईल. या घटनेच्या प्रत्येक शक्यतेचा तपास सुरू आहे."

पूल चोरीला गेलाच कसा?

चोरीला गेलेला पूल हा रोहतास जिल्ह्याच्या नासरीगंज स्टेशनच्या अखत्यारीत येतो. सोन कालव्यावर बांधलेला या पुलाला 'आरा कालवा' असंही नाव आहे. 12 फूट उंच आणि 60 फूट लांबीच्या पुलाची चोरी झाल्याची घटना अमियावर नावाच्या गावाजवळ घडली आहे.

पूल चोरीला गेला म्हणून 6 एप्रिलला जलसंपदा विभागातील अभियंता अर्शद कमल शम्सी यांनी रोहतास येथील नासरीगंज पोलीस ठाण्यात अज्ञात लोकांविरुद्ध तक्रार नोंदवली.

त्यांनी फोनवरून बीबीसीला घडलेल्या घटनाक्रमाची माहिती दिली. त्यांनी सांगितलं, "जलसंपदा विभागाचा यांत्रिक विभाग असून पुलाची देखभाल करणं हे त्यांच काम असतं. यांत्रिक विभागाचे लोक या मोसमात जाऊन पूल वगैरे तपासतात. याचाच फायदा घेत चोरटे तिथे गेले आणि विभागीय आदेश असल्यामुळे पूल तोडण्यासाठी आलोय असं सांगितलं."

अर्शद कमल शम्सी यांच्या म्हणण्यानुसार, "पूल जीर्ण झाला आणि त्यामुळे जनावर जखमी होत होते, तर काहीवेळा त्यांचा मृत्यूही होतोय म्हणून स्थानिकांनी अर्ज दिले होते. त्यामुळे जेसीबी, पिकअप, गॅसकटर घेऊन आलेल्या चोरट्यांचा कुणालाही संशय आला नाही."

सलग तीन चार दिवस तरी चोरट्यांनी हे काम सुरूच ठेवलं होतं असं स्थानिकांचं म्हणणं आहे.

ही बातमी शम्सी यांच्यापर्यंत कशी पोहोचली?

यावर अर्शद शम्सी सांगतात, "मी दुसर्‍या पुलाचं बांधकाम बघायला गेलो होतो. मी तिथल्या लोकांकडून चर्चा ऐकली आणि मग जाऊन पूल पाहिला. बघतो तर काय पूल चोरीला गेला होता. त्यानंतर मी एफआयआर दाखल केली."

चोरट्यांनी तोडलेला पूल आधीच जीर्ण अवस्थेत होता. स्थानिक लोक सांगतात की, 1972-73 मध्ये बांधलेला हा पूल अमियावर, चितोखार, घोंगा, मनौली, पडडी या गावांना जोडायचा. हा पूल बराच काळ बेकार पडून होता. त्यानंतर त्याच पुलाला दुसरा असा समांतर पूल तयार झाला. आज तो पूल लोक वापरतात.

दुसरीकडे जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी गांधी चौधरी सांगतात, "आम्हाला तर वृत्तपत्रातून पुलाच्या चोरीची माहिती मिळाली. ही चोरी पाटबंधारे विभागाच्या संगनमताने झाली असावी असं मला वाटतंय."

या पुलामध्ये 500 टन लोखंड असल्याचीही चर्चा सुरू आहे. पण अर्शद यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "पूल जीर्ण अवस्थेत होता. रिपोर्टमध्ये नोंद केलीय तितकं लोखंड त्या पुलात नव्हतंच."

स्थानिक पत्रकार जितेंद्र कुमार यांचे घर घटनास्थळापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर आहे.

ते सांगतात, "तो अतिशय अरुंद पूल होता. या पुलावरून ना दुचाकी, जायची ना सायकल. या पुलात लोखंड कमी असावं. आम्ही मॉर्निंग वॉकसाठी याच बाजूला यायचो, त्यामुळे 4 आणि 5 एप्रिलला जवळपास 500 लोकांनी तरी हा पूल तोडताना पाहिलं असेल. पण पुलाचा वापरच होत नव्हता म्हटल्यावर कोणी काही बोललं नाही, तसंही इथं जनावर अडकून मरायची. त्याचा दुर्गंध सगळ्या परिसरात पसरायचा त्यामुळे तो पूल म्हणजे लोकांच्या डोक्याला तापच झाला होता. या पुलाला समांतर बांधलेला पूलही आता जीर्ण झालाय."

विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनीही याप्रकरणी ट्वीट करत लिहिलंय की, "45 वर्षं जुना 500 टन लोखंडी पूल 17 वर्षांच्या भाजप-नितीश सरकारने दिवसाढवळ्या लुटून नेला."

सन क्लॉक गेलं चोरीला

फेब्रुवारी 2022 मध्ये रोहतासच्या डेहरीच्या पाटबंधारे विभागाच्या आवारात 1871 मध्ये बसवलेल्या सन क्लॉकचा पत्रा चोरीला गेला होता. या घड्याळाच्या डायलमध्ये एक धातूचा पत्रा असतो. जसा सूर्य सरकतो आणि त्याची सावली बदलते त्यावरून वेळेचा अंदाज लावला जातो.

हे घड्याळ ब्रिटीशकालीन असून त्यात हिंदी आणि रोमन अंक कोरलेले आहेत. हा पत्रा चोरीला गेल्यानंतर काही दिवसांतच रोहतास पोलिसांनी माणिकचंद गुप्ता नावाच्या भंगार विक्रेत्याकडे हे डायल सापडले. माणिकचंद गुप्ता यांनी ते डायल चोरट्यांकडून अवघ्या 2 हजार रुपयांत विकत घेतले होते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)