You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मनसेः राज ठाकरेंनी वसंत मोरेंना पदावरुन तडकाफडकी हटवण्याचे 3 अर्थ
- Author, हर्षल आकुडे,
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सालाबादप्रमाणे गुढी पाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवर सभा घेतली.
स्वाभाविकपणे या सभेनंतर राजकीय प्रतिक्रिया, आरोप-प्रत्यारोप यांना वेग आला. पण यंदाच्या वर्षीच्या या सभेनंतर केवळ मनसे पक्षाबाहेरच नव्हे तर पक्षांतर्गतही खळबळ माजल्याचं दिसून आलं.
राज ठाकरे यांच्या भाषणानंतर नाराज होऊन पुण्यातील एका मुस्लीम कार्यकर्त्यांने आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्याविषयी माध्यमांमध्ये चर्चा झाली.
त्यानंतर राज ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे मनसे पुणे शहराध्यक्ष आणि नगरसेवक वसंत मोरे यांनीही आपल्या पक्षाच्या भूमिकेशी फारकत घेतली.
याच मुद्द्यावरून पक्षाशी विसंगत भूमिका घेतल्याप्रकरणी वसंत मोरे यांना पदावरून तत्काळ दूर करण्यात आलं.
या सगळ्या घडामोडींनंतर विविध चर्चांना ऊत आला आहे. ठाकरे यांच्या या धडक निर्णयाचे काही छुपे अर्थ असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. हे संपूर्ण प्रकरण कोणत्या दिशेने जातं, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
'अजानच्या भोंग्यांसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा'
गुढी पाडव्याच्या दिवशी (2 एप्रिल) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेचं आयोजन शिवाजी पार्क येथे करण्यात आलं होतं. कोरोनामुळे गेली दोन वर्षे त्यांची ही सभा होऊ शकली नव्हती, त्यामुळे या सभेत राज ठाकरे काय बोलणार याची सर्वांना उत्सुकता होती.
सभेदरम्यान आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला निशाण्यावर घेत प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा मांडला.
राज आपल्या भाषणात म्हणाले, "माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती आहे. तुम्ही ईडी, इन्कम टॅक्सच्या धाडी टाकताय ना, पोलिसांना विचारा. झोपडपट्ट्यांतल्या मदरशांवर धाडी टाका. काय काय हाती लागेल, ते पाहा.
ते पुढे म्हणाले, "माझा प्रार्थनेला विरोध नाही, पण मशिदींवर लागलेले भोंगे उतरवावेच लागतील. ज्या मशिदीबाहेर भोंगे लागतील त्याच्यासमोर दुप्पट आवाजात स्पीकर लावायचे आणि हनुमान चालिसा लावायची. मी धर्मांध नाही, धर्माभिमानी आहे. धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का? बाहेरच्या देशांत दिसतात का?"
पक्षांतर्गत खळबळ
राज ठाकरे यांच्या भाषणानंतर राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. भाजपने त्यांच्या या नव्या भूमिकेचं स्वागत केलं. तर महाविकास आघाडीतील नेत्यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला.
दरम्यान, भाषणाच्या दुसऱ्याच दिवशी राज ठाकरे यांना पक्षातूनच धक्के बसण्यास सुरुवात झाली. पुण्यातील एका मुस्लीम कार्यकर्त्याने आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला. पुण्यात शाखा अध्यक्ष असलेल्या माजिद अमीन शेख यांनी उघड नाराजी व्यक्त करत थेट पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
याव्यतिरिक्त, इतर अनेक कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत, अशी माहितीही समोर आली.
त्याच्या दोन-तीन दिवसांनी मनसे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्या भूमिकेबद्दलही बातमी समोर आली. याच बातमीने मनसेला सर्वात मोठा धक्का बसला.
वसंत मोरे कोण आहेत?
वसंत मोरे हे पुण्यातील विद्यमान नगरसेवक आहेत. ते पुण्यातील कात्रज परिसराचं प्रतिनिधित्व करतात. मोरे यांच्या नगरसेवकपदाची यंदाची तिसरी टर्म आहे. मनसेच्या तिकीटावर ते सर्वप्रथम 2007 साली निवडून आले होते. त्यानंतर 2012 आणि 2017 असे सलग तीनवेळा त्यांनी निवडणुकीत विजय मिळवला. मोरे हे राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जात.
केवळ नगरसेवकच नव्हे तर महापालिकेतील विरोधी पक्षनेता म्हणूनही वसंत मोरे यांनी काम पाहिलं आहे. 2012 मध्ये पुणे महापालिकेत मनसेच्या 29 नगरसेवक निवडून आले होते. त्यांचं नेतृत्व राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांच्याकडेच दिलं होतं. महापालिकेत विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी आपल्या कामाची चांगली छाप पाडली होती.
पुढे 2017 च्या निवडणुकीत मोदी लाटेमुळे सर्वच ठिकाणी भाजपचं वर्चस्व राहिलं. पुणे महापालिकेत तर मनसेची पार दाणादाण उडून त्यांचे केवळ 2 नगरसेवक निवडून आले होते. त्यामध्ये एक होते वसंत मोरे तर दुसरे होते साईनाथ बाबर.
यानंतर गेल्या वर्षी मार्च महिन्यात वसंत मोरे यांची पक्षाकडून पुणे शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. राज ठाकरे यांच्या भाषणानंतर वसंत मोरे यांनी स्पष्ट शब्दात पक्षाच्या भूमिकेला विरोध दर्शवला.
"मला माझ्या प्रभागात शांतता हवी असल्याने मी मशिदीसमोर हनुमान चालिसा लावणार नाही. आमच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसा लावली. परंतु, सध्या रमजान सुरु असल्याने मला माझ्या प्रभागात शांतता हवी आहे. म्हणून मी हनुमान चालिसा वगैरे काही लावणार नाही. याचा अर्थ मी राज ठाकरे किंवा पक्षावर नाराज आहे, असा मुळीच नाही," असंही वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं.
मोरेंच्या जागी बाबर यांची नियुक्ती
मशिदीवरील भोंग्यांच्या संदर्भात राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाला ठाम विरोध करून वसंत मोरे यांनी चांगलाच दणका दिला.
याच मुद्द्यावरून पक्षाने वसंत मोरे यांना पुणे शहराध्यक्ष पदावरुन बाजूला केलं आहे.
वसंत मोरे यांच्याऐवजी त्यांचे सहकारी नगरसेवक साईनाथ बाबर यांच्याकडे या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
पुणे शहर मनसेच्या शहराध्यक्षपदावरुन हकालपट्टी झाल्यानंतरही वसंत मोरे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
"मी माझी भूमिका बदलणार नाही. भोंग्यांसंदर्भात आधी जी भूमिका मी घेतली होती, तीच माझी आताही भूमिका आहे. मी झुकणार नाही, माझी भूमिका बदलणार नाही. शेवटी आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. आम्हाला लोकांना तोंड द्यावं लागतं", अशा स्पष्ट शब्दात वसंत मोरे यांनी आपली बाजू स्पष्ट केली.
वसंतभाऊ, पक्षाने तुमची हत्या केली..
वसंत मोरे यांना पदावरून हटवण्यात आल्यानंतर त्यांच्या माजी सहकारी माजी मनसे महिला शहराध्यक्ष रुपाली पाटील ठोंबरे यांनीही प्रतिक्रिया दिली.
"वसंत मोरे यांना पदावरुन हटवलं जाणं हे निश्चित अन्यायकारक आहे. काम करणाऱ्या माणसाला पदावरुन बाजूला सारणं हे मनसेतील अंतर्गत राजकारण आहे," असं रुपाली पाटील म्हणाल्या.
त्या पुढे म्हणतात, "पण मला मागील प्रसंगाची आठवण येते. ज्यावेळी मी मनसेला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी वसंत भाऊंनी प्रसारमाध्यांना प्रतिक्रिया देताना, ही माझी राजकीय आत्महत्या असेल, असं म्हटलं. आता मला वसंत भाऊंची तीच प्रतिक्रिया आठवली. आता मनसेने तर भाऊंची राजकीय हत्या केली."
1. 'हिंदुत्वाच्या मुदद्यावर कायम'
मनसेने वसंत मोरे यांच्यावर केलेल्या कारवाईचे नेमके काय अर्थ असू शकतात, संदर्भात बीबीसीने तज्ज्ञांशी चर्चा केली.
ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान यांच्या "वसंत मोरे यांच्यावर कारवाई करून मनसेने यापुढचं राजकारण हिंदुत्वाच्याच मार्गाने असेल, हे स्पष्ट केलं आहे."
ते पुढे सांगतात, "सुरुवातीच्या काळात मनसेने सर्वसमावेशक अशी भूमिका घेतली होती. त्याचं प्रतिबिंब त्यांच्या झेंड्यातही दिसून येत होतं. झेंड्यांतील रंगांप्रमाणे समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन राजकारण करण्यात येईल, असा मनसेचा संदेश होता."
म्हणजे शिवसेनेने ज्या गोष्टी केल्या त्याच्याविरोधात भूमिका राज ठाकरेंच्या मनसेने त्यावेळी घेतल्या होत्या. त्यामुळे अनेक समाजघटक त्यांच्याशी जोडले गेले होते. पण कालांतराने मनसेची भूमिका ही शिवसेनेशी मिळतीजुळतीच आहे, असं लक्षात आल्यानंतर अनेक लोकांनी त्यांना सोडचिठ्ठी दिली आहे.
गेल्या काही दिवसांत राज ठाकरे हिंदुत्वाचं राजकारण करताना दिसत आहेत. भविष्यात याच दिशेने आपलं राजकारण चालणार आहे, याचे संकेत त्यांनी पाडव्याच्या सभेतून दिले होते. याच मुद्द्यावर मनसे कायम राहणार असं या घडामोडींमधून दिसून येतं, असं प्रधान सांगतात.
2. 'पक्षांतर्गत 'भिकारडी लोकशाही' मान्य नाही'
वसंत मोरेंची हकालपट्टी करण्यात आली त्यामागे राज ठाकरेंची राजकारणाची शैली हेसुद्धा एक कारण आहे, असं प्रधान यांना वाटतं.
ते सांगतात, "महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत माझाच शब्द अंतिम असेल, असं यामधून राज ठाकरेंना सांगायचं असेल. बाळासाहेब ठाकरे हेसुद्धा पक्षांतर्गत लोकशाही मानत नव्हते. ते नेहमी म्हणायचे की अशी भिकारडी लोकशाही मला पक्षामध्ये नको आहे.
शिवसेनेत आदेशाची पद्धत बाळासाहेब ठाकरेंनी रुजवली होती. एकदा मी मत व्यक्त केलं की ते अंतिम आहे. ते ज्यांना मान्य असेल त्यांनी पक्षात राहावं, इतरांनी बाहेरचा रस्ता धरावा, या स्टाईलने बाळासाहेबांनी पक्ष चालवला होता. राज ठाकरे यांनाही त्याच पद्धतीने राजकारण करायचं आहे. वसंत मोरेंवरील कारवाई ही त्याचंच द्योतक आहे, असं प्रधान यांना वाटतं.
3. शिवसेनेच्या 'स्पेस'कडे लक्ष
शिवसेना हा पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत गेल्यापासून मनसे त्यांची स्पेस मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातून आपली हिंदुत्ववादी प्रतिमा अधिक बळकट करण्याचा प्रयत्न मनसे करत आहे, असं हेमंत देसाई यांना वाटतं.
राज ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावर राजकारण सुरू केलं होतं. आता त्यांनी त्याला हिंदुत्ववादाची जोड दिली आहे. शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याची टीका भाजपकडून वारंवार केली जाते. त्यामुळे आता शिवसेनेची राजकीय स्पेस मिळवण्याच्या प्रयत्नात राज ठाकरे आहेत. हिंदुहृदयसम्राट प्रतिमेचा वारसा आपला आहे. सध्याची शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना नाही, असे दर्शवण्याचे राज ठाकरे यांचेही प्रयत्न सुरू झाले आहेत.
वसंत मोरेंचा निर्णय पूर्वनियोजित आहे का?
वसंत मोरे हे 2017 मध्ये मनसेच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यावेळी त्यांना मुस्लीम मतदारांनीही मते दिलेली आहेत. आता आगामी निवडणुकीत पुन्हा मते मागायला गेल्यानंतर कोणत्या तोंडाने जाणार, अशी धारणा त्यांची झालेली असू शकते.
मनसेच्या भूमिकेसोबत जाणं म्हणजे मुस्लीम मतदारांसोबत प्रतारणा करणं, असं मोरे यांना वाटलं असेल. त्याच विचारांतून मोरे यांनी हा निर्णय घेतला असू शकतो.
पण वसंत मोरेंनी हा निर्णय घेतला त्याचं कारण मुस्लीम मतदार हेच आहे की आणखी काही वेगळं आहे, हे कारण अद्याप पडद्यामागे आहे, असं ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी सांगितलं.
त्यांच्या मते, हिंदुत्वाचा मार्ग राज ठाकरे यांनी गेल्या सहा महिन्यांपासून स्वीकारला होता. त्यामुळे त्याचा परिणाम न होता, केवळ भोंग्यांबाबत घोषणेचा परिणाम होईल, हे मोरेंना का वाटलं असेल?
ते म्हणतात, "मोरेंनी आधीच काही निर्णय घेतला होता. त्यांना आताचं हे कारण मिळाल्याने त्यांनी आपला निर्णय जाहीर केला, अशी शक्यता नाकारता येत नाही.
वसंत मोरे यांना आपल्या पक्षात खेचण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू असल्याचं एका बाजूला दिसून येतं. पुण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी त्यांना पक्षात येण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्यानंतर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोरेंना शिवसेनेत येण्यासाठी निमंत्रण दिल्याची बातमी आज सकाळी माध्यमांमध्ये होती.
आपल्याला सर्वच पक्षांकडून ऑफर आहे, पण अद्याप आपण मनसेमध्येच आहोत, असं मोरेंनी तूर्तास म्हटलं आहे.
याबाबत प्रश्न उपस्थित करताना हेमंत देसाई म्हणतात, "मोरेंना पक्ष सोडायचा नव्हता, तर त्यांनी ही भूमिका घेतली, हे संभ्रम निर्माण करणारं आहे. मोरे यांचं वक्तव्य राज ठाकरेंच्या भाषणाच्या दोन-तीन दिवसांनंतर आलं होतं. त्यामुळे कोणत्याही पूर्वनियोजनाशिवाय त्यांनी तडकाफडकी हा निर्णय घेतला, असं वाटत नाही. शिवाय आता त्यांच्या पक्षात राहण्याला काय अर्थ आहे, हा प्रश्नही उपस्थित होतो."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)