राज ठाकरेंना ज्यामुळे ईडीची नोटीस आली ते कोहिनूर मिल प्रकरण आहे काय?

कोहिनूर मिल प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत अंमलबजावणी संचालनालयानं (ईडीनं) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावली आहे. 22 ऑगस्टला त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ज्या कोहिनूर मिल प्रकरणी राज ठाकरेंना नोटीस बजावली गेलीये, ते प्रकरण नेमकं आहे तरी काय?

दादरमध्ये ज्या जमिनीवर कोहिनूर स्क्वेअर हा टॉवर उभा आहे, त्या ठिकाणी एकेकाळी कोहिनूर मिल क्रमांक 3 उभी होती. बंद पडलेल्या मिलच्या जागेची विक्री करण्याची जबाबदारी नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशनकडे असते.

या मिलचा ताबा नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशनकडे आल्यानंतर त्यांनी कोहिनूर मिलच्या भर मुंबईतल्या 4 एकर जागेचा 2005 साली लिलाव केला.

लिलावामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राजन शिरोडकर यांची मातोश्री इन्फ्रास्ट्रक्चर आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी यांची कोहिनूर सीटीएनएल यांनी संयुक्तपणे 421 कोटींची बोली लावून ही जागा विकत घेतली. सीटीएनएल ही सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस (IL & FS) या संस्थेचीच एक सबसायडरी आहे.

उन्मेष जोशींच्या कोहिनूरने सीटीएनएलसोबत भागिदारी करून लिलावात बोली लावली होती. म्हणजे राज ठाकरे आणि उन्मेष जोशी यांनी एका सरकारशी संबंधित कंपनीसोबत बोली लावली होती.

मुळात या प्रकरणात ईडीच्या तपासाचा मुख्य रोख आहे तो IL&FS या सरकारी कंपनीच्या कोहिनूर मिलच्या व्यवहारातील सहभागाबद्दल. पायाभूत सुविधा उभारण्यासाठी IL & FS वित्तपुरवठा किंवा गुंतवणूक करते.

कोहिनूर मिलची जागा खरेदी करण्यासाठी उन्मेष जोशी यांच्यासोबत IL & FS ने 860 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. IL & FS ही गुंतवणूक काढून घेतली आणि पुन्हा काही गुंतवणूक या प्रकल्पात केली. यामध्ये IL & FS चे मोठे नुकसान झाल्याचा संशय ईडीला आहे. त्यातून याप्रकरणाचा तपास सुरू झाला आहे.

राज ठाकरे यांचा संबंध कसा?

ईडीनं राज ठाकरेंना या प्रकरणात चौकशीसाठी 22 ऑगस्टला हजर राहण्यासंबंधी नोटीस बजावली आहे. राज ठाकरेंच्या मातोश्री इन्फ्रास्ट्रक्चरचा जमीन खरेदीत सहभाग असल्यानं या व्यवहाराशी राज ठाकरेंचा संबंध येतो. राज ठाकरेंनी या प्रकल्पातील आपले शेअर्स 2008 मध्ये विकले.

राज ठाकरेंनी शेअर्स विकल्यानंतर IL & FS ने पुन्हा या प्रकल्पात गुंतवणूक केली. राज ठाकरेंनी प्रकल्पात केलेली गुंतवणूक, शेअर्स विकल्यानंतर त्यांना मिळालेला फायदा, त्यानंतर IL & FS ने केलेली गुंतवणूक हा मुद्दा ईडीच्या रडारवर आहे.

2005 मध्ये जेव्हा या जागेचा व्यवहार झाला तेव्हा राज ठाकरे शिवसेनेत होते. त्यानंतर पुढच्या वर्षी त्यांनी शिवसेना सोडून 2006 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली.

सध्या प्रकल्पाची स्थिती काय आहे?

2005 मध्ये या जागेची खरेदी झाली असली तरी या जागेवर उभारलेल्या कोहिनूर ट्विन टॉवर्सचे काम अजून पूर्ण झालेलं नाही. रिअल इस्टेटमधील 2100 कोटी रुपयांचा हा एक अत्यंत मोठा प्रकल्प आहे. मात्र उन्मेष जोशी यांना हा प्रकल्प हातून गमवावा लागला आहे.

प्रकल्पासाठी उन्मेष जोशी यांनी विविध वित्त संस्थांकडून कर्ज घेतले होते. जवळपास 900 कोटी रुपायंचे कर्ज थकल्यानं संबंधित वित्त संस्थांनी नॅशनल लॉ ट्रायब्युनलकडे धाव घेतली. त्यानंतर ट्रायब्युनलने हा प्रकल्प प्रभादेवी येथील संदीप शिक्रे अँड असोसिएट्सला देण्याची शिफारस स्वीकारल्यानं उन्मेष जोशी यांना हा प्रकल्प सोडावा लागला.

मध्यंतरी दोन वर्षं या प्रकल्पाचे काम बंद होती. 26 जानेवारीपासून हा प्रकल्प पुन्हा सुरू झाला असून 15 ते 18 महिन्यात त्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

काय आहे कोहिनूर स्क्वेअर?

दादरमध्ये अगदी मोक्याच्या ठिकाणी शिवसेना भवनासमोर 52 आणि 25 मजल्याचे दोन जुळे टॉवर्स या प्रकल्पात आहेत. मुख्य इमारतीत पहिल्या पाच मजल्यांवर अत्याधुनिक शॉपिंग मॉल्स असतील तर उर्वरित 47 मजल्यांवर सिंगापूर ब्रँडचे 'द आयू मुंबई' हे पंचतारांकित हॉटेल तसेच व्यापारी गाळे असतील.

जुळ्या इमारतीत पहिले 15 मजले पार्किंगसाठी असतील ज्यामध्ये 2 हजार गाड्यांचे पार्किंग होऊ शकेल. उर्वरित 20 मजल्यांवर आलिशान सदनिका असतील.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)